भावगीत

या कातरवेळी

या कातरवेळी, पाहिजेस तू जवळी ॥ ध्रु ॥

एकटि मी दे आधार, छेड हळू हृदय तार
ऐक आर्त ही पुकार, सांजवात ये उजळी ॥ १ ॥

रजनीची चाहुल ये, उचलुनिया अलगद घे
पैलतिरी मजला ने, पुसट वाट पायदळी ॥ २ ॥

शिणले रे, मी अधीर, भवती पसरे तिमिर
व्याकुळ नयनांत नीर, मिलनाची आस खुळी ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

ती येते आणिक जाते

ती येते आणिक जाते,
येताना कधि कळ्या आणते
जाताना पण फुले मागते
येणे जाणे, देणे घेणॆ
असते गाणे जे न कधी ती म्हणते ॥ १ ॥

येताना कधि अशी लाजते
तर जाताना ती लाजविते
कळते काही उगीच तेही
नकळत पाही काहीबाही
अर्थावाचुन असते, "नाही", "हो" हि म्हणते ॥ २ ॥

येतानाची कसली रीत
गुणगुणते ती संध्यागीत
जाताना कधि फिरून येत
जाण्यासाठिच दुरुन येत
विचित्र येते, विरुन जाते जी सलते ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

रूपास भाळलो मी

सुधीर: हंऽऽऽ हंऽऽऽ हंऽऽऽ
आशा: आऽऽऽ आऽऽऽ

सुधीर: रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला
मज वेड लाविले तू, सांगू नको कुणाला

आशा: आऽऽऽ
एकांत पाहुनीया जे तू मला म्हणाला
ऐकून लाजले मी, सांगू नको कुणाला
रूपास भाळले मी...

सुधीर: चंद्रा ढगातुनी तू हसलास का उगा रे? (२)
आशा: आऽऽऽ
सुधीर: वाकून खालती अन्‌ का ऐकलेस सारे?
जे ऐकले तुवा ते, सांगू नको कुणाला
रूपास भाळलो मी...

आशा: वार्‍या तुझी कशानी चाहूल मंद झाली? (२)
सुधीर: आऽऽऽ
फुलत्या फुला कशानी तू हासलास गाली ?
जे पाहिले तुवा ते, सांगू नको कुणाला
रूपास भाळले मी...

सुधीर: हे गोड रूप ऐसे निरखीन मी दुरून (२)
आशा: आऽऽऽ
पाण्या अशीच ठेवी छाया उरी धरून
धरिलेस जे उरी ते, सांगू नको कुणाला
रूपास भाळलो मी...

आशा: हा लाजरा शहारा पाहील काय कोणी? (२)
सुधीर: आऽऽऽ
करतील का चहाडी हे लाल गाल दोन्ही?
गालांत रंगले जे, सांगू नको कुणाला
रूपास भाळले मी...
सुधीर: रूपास भाळलो मी...
दोघे: हंऽऽऽ हंऽऽऽ

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

नको नको रे पावसा

नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी, आणि दारात सायली ॥ ध्रु ॥

नको नाचूं तडातडा, अस्सा कौलारावरून
तांबे सातेली पातेली, आणू भांडी मी कोठून ॥ १ ॥

नको करू झोंबाझोंबी, माझी नाजूक वेलण
नको टाकू फूलमाळ, अशी मातीत लोटून ॥ २ ॥

आडदांडा नको येऊ, झेपावत दारातून
माझं नेसूचं जुनेर, नको टाकू भिजवून ॥ ३ ॥

किती सोसले मी तुझे, माझे एवढे ऐक ना
वाटेवरी सखा माझा, त्याला माघारी आण ना ॥ ४ ॥

वेशीपुढे आठ कोस, जा रे आडवा धावत
विजेबाई कडाडून मागे फ़िरव पांथस्थ ॥ ५ ॥

आणि पावसा, राजसा, नीट आणि संभाळून
घाल कितीही धिंगाणा, मग मुळी न बोलेन ॥ ६ ॥

पितळेची लोटिवाटी, तुझ्यासाठी मी मांडीन
माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन ॥ ७ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

सावळांच रंग तुझा

सावळांच रंग तुझा, पावसाळी नभापरी
आणि नजरेत तुझ्या, वीज खेळते नाचरी ॥ ध्रु ॥

सावळांच रंग तुझा, चंदनाच्या बनापरी
आणि नजरेत तुझ्या, नाग खेळती विखारी ॥ १ ॥

सावळांच रंग तुझा, गोकुळीच्या कॄष्णापरी
आणि नजरेत तुझ्या, नित्य नांदते पांवरी ॥ २ ॥

सावळांच रंग तुझा, माझ्या मनी झाकळतो
आणि नजरेचा चंद्र, पाहू केव्हा उगवतो ॥ ३ ॥

सावळाच रंग तुझा, करी जीवा बेचैन
आणि नजरेत तुझ्या, झालो गडे बंदिवान ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कल्पवॄक्ष कन्येसाठी

कल्पवॄक्ष कन्येसाठी लावुनियां बाबा गेलां
वैभवाने बहरुन आला, याल का हो बघायाला ॥ ध्रु ॥

तुम्ही गेला आणिक तुमच्या, देवपण नांवा आले
सप्तस्वर्ग चालत येतां, थोरपण तुमचे कळले
गंगेकाठि घर हे अपुले, तीर्थक्षेत्र काशी झाले
तुम्हावीण शोभा नाही, वैभवाच्या देऊळाला ॥ १ ॥

सुर्य चंद्र तुमचे डोळे, दुरुनीच हो बघतात
कमी नाहिं आम्हा कांही, कृपादॄष्टीची बरसात
पाच बोटे अमृताची, पंचप्राण तुमचे त्यांत
पाठिवरी फिरवा हात, या हो बाबा एकच वेळां ॥ २ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कळा ज्या लागल्या जीवा

कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या
कुणाला काय हो त्यांचे ? कुणाला काय सांगाव्या ? ॥ ध्रु ॥

उरी या हात ठेवोनी, उरीचा शूल का जाई
समुद्री चहुकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही ॥ १ ॥

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगत बंधू
हमामा गर्जनेचा हो, न नेत्री एकही बिंदू ॥ २ ॥

नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा
भुतांची झुंज ही मागे, धडाडे चहुकडे दावा ॥ ३ ॥

नदी लंघोनि जे गेले, तयांची हाक ये कानी
इथे हे ओढिती मागे, मला बंधोनी पाशांनी ॥ ४ ॥

कशी साहू पुढे मागे, जिवाला ओढ जी लागे
तटातट काळजाचे हे, तुटाया लागती धागे ॥ ५ ॥

पुढे जाऊं ? वळूं मागे ? करूं मी काय रे देवा
खडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करे हेवा ॥ ६ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

नाहि कशी म्हणू तुला

नाहि कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत
परी सारे हलक्याने, आड येते रीत ॥ ध्रु ॥

नाहि कशी म्हणू तुला, येते जरा थांब
परी हिरव्या वळणांनी, जायचे न लांब ॥ १ ॥

नाहि कशी म्हणू तुला, माळ मला वेणी
परी नीट ओघळेल, हासतील कोणी ॥ २ ॥

नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नाव
परी नको अधरांचा, मोडू सुमडाव ॥ ३ ॥

नाही कशी म्हणू तुला, मांडू सारीपाट
परी नको फार काळ, दूध उतूं जातं ॥ ४ ॥

नाहि कशी म्हणू तुला, जरा लपूछपू
परी पाया खडीकाटे लागतात खुपू ॥ ५ ॥

नाहि कशी म्हणू तुला, विडा दे दुपारी
परी थोरांच्या समोर घ्यायची सुपारी ॥ ६ ॥

नाहि कशी म्हणू तुला, हिरव्या पदराचा शेव
परी हळु माप निळ्या डोळ्यांतला भाव ॥ ७ ॥

नाहि कशी म्हणू तुला, हाती घ्याया हात
आले वाटते भावोजी, घेऊनी गणित ॥ ८ ॥

नाहि कशी म्हणू तुला, लाविते मी दार
परी नाही दाराचा या नीट अडसर ॥ ९ ॥

नाही कशी म्हणू तुला, जाऊं चांदण्यांत
परी पहा दिसे चंद्र छान खिडकीत ॥ १० ॥

नाही कशी म्हणू तुला, पहाटमागणी
परी घालायचे आहे, तुळशीस पाणी ॥ ११ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

नववधू प्रिया मी बावरते

नववधू प्रिया मी बावरते. लाजते, पुढे सरते, फिरते ॥ ध्रु ॥

कळे मला प्राणसुखा जरि, कळे तूच आधार सुखा जरी
तुजवाचुनि संसार फुका जरि, मन जवळ यावया गांगरते ॥ १ ॥

मला येथला लागला लळा, सासरी निघता दाटतो गळा
बागाबगीचा येथला मळा, सोडिता कसे मन चाचरते ॥ २ ॥

जीव मनीचा मनी तळमळे, वाटे बंधन करुनि मोकळे
पळत निघावे तुजजवळ पळे, परि काय करु, उरी भरभरते ॥ ३ ॥

चित्र तुझे घेउनि उरावरि, हारतुरे घालिते परोपरि,
छायेवरि संतोष खुळी करि, तू बोलविता परि थरथरते ॥ ४ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कशी काळनागिणी

कशी काळनागिणी, सखे गं वैरिण झाली नदी
प्राणविसावा पैलतिरावरि, अफाट वाहे मधि ॥ ध्रु ॥

सुखी मीन हे तरति न गणुनी लाटा कोट्यावधी
सुखी पाखरे गात चालली, पार वादळी सुधी ॥ १ ॥

पैलतटी न कां तॄण मी झाले, तुडविता तरी पदी
पैलतटी न का कदंब फुलले, करिता माळा कधी ॥ २ ॥

पापिण खिळले तीरा, विरह हा शस्त्रावीणॆ वधी
प्राणांचे घे मोल नाविका, लावि पार, ने अधी ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: