भावगीत

त्रिवार मंगलवार

त्रिवार मंगलवार आजला त्रिवार मंगलवार
स्वातंत्र्याची सिंह गर्जना अता इथे उठणार॥धृ॥
कौल मिळाला फुटला नारळ गुढी उभी झाली
आणि माउली चढला कुंकुम पुन्हा तुझ्या भाळी
झडली भीती, चढली नीती, तुटला गे लोभ
सामर्थ्याच्या अता अंतरी उफाळला क्षोभ
या पुढती तव पायावरती या रक्ताची धार

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

एक कोकिळा फांदीवरती

एक कोकिळा फांदीवरती झोके घेऊनी गाणे गाई
आणिक माझ्या पूर्वस्मृतींना गंध बावरा मोहर येई॥धृ॥
आशीच झुलले होते मीही गीत आळवीत प्रेम रसाचे
प्राशन केले होए तूही प्रीतीमधल्या सोमरसाचे
वसंतातले हळवे पाणी तुझ्या गीताने कंपित होई
आणिक माझ्या पूर्वस्मृतींना गंध बावरा मोहर येई॥१॥
शीळ वाजवित हलके येतो अजून ही रे वारा झुळझुळ
भास होतसे आला तूही क्षणभर होते माझी चुळबुळ
डोळे मिटुनी कल्पनेत मी तुझ्या रूपाला चुंबुन घेई
आणि माझ्या पूर्वस्मृतींना गंध बावरा मोहर येई॥२॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

तुला मलाही जाणीव नसता

तुला मलाही जाणीव नसता अशी अचानक गाठ पडावी
अन्‌ दडलेली रात्र मनातील चांदण्यात निथळता बुडावी॥१॥
जपला तरिही उडून जावा पार्‍याचा क्षण क्षणभर खळबळ
आणि लवावी श्रांत पापणी हलके स्पर्शित काळे वर्तुळ॥२॥
तुला मलाही जाणिव नसता उडुनि मनातील रान कबूतर
पश्नाच्या डोहात शिरावे शोधाया रुसलले उत्तर॥३॥
कळूनही काही न कळावे शब्दांचा हरवावा आशय
डोहा भवती घोटाळावे रान कबूतर आणि निराश्रय॥४॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

हातात घेऊनी हात

हातात घेऊनी हात नदीला पार करू
गर्द वनराईत सखे ये मस्त फिरू॥धृ॥
बघ जांभुळलेले झाड किती दिलदार
या फुलवेलींचा पहा कसा शिणगार
मोहरलेल्या गंधीत आमराई शिरू॥१॥
भाराने झुकली रसाळलेली फळे
वार्‍यावरती तनु तुझी ग झुले
झर्‍या झर्‍या इथे लागतो अनुराग झरू॥२॥
ही मदन मंजिरी करवंदाची जाळी
हो माळीण माझी तुझाच मी वनमाळी
ओठात प्रीतीची मधूर पावरी धरू॥३॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

पंढरीची ती पताका

पंढरीची ती पताका घेऊनी भगवी करी
विठ्ठलाचा गजर होतो चंद्रभागेच्या तिरी॥धृ॥
टाळ चिपळ्या वाजती त्या एकतारी वाजते
भाव भक्तिचे सुगंधी चित्त येथे नाचते
संत सगळे जमुनी येथे गर्जती ते श्रीहरी॥१॥
ज्ञानवंतांनो जरा या या पहा कळसाकडे
वैष्णवाच्या भक्तिचा ध्वज उंच गगनी फडफडे
अमृताचा बोल ऐसा सांगते ज्ञानेश्वरी ॥२॥
वारिला येणे इथे हा पूर्वपिढीचा वारसा
ज्ञान वैराग्यात आमुच्या जीवनाचा आरसा
वाळवंटी वाजते या श्री हरीची बासरी॥३॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

बनात आली बहार पिवळी

बनात आली बहार पिवळी उगाच हरिणी बावरली
उत्सव येता नवनवतीचा नव्हाळ काया कस्तुरली॥धृ॥
दरवळणारा पहाट वारा निळ्या आभाळी हवा उडे
मावळतीला चंद्र केशरी क्षितिजावरती रंग चढे
रूप पहाते पहाट पवळी प्रभा जळावर अंथरली॥१॥
उत्सव भरता प्रीत फुलांचा दिसू लागते स्वप्न तिला
पैंजण बांधुनी पहाट येते झर्‍यात झुलते नृत्यकला
प्राण सख्याच्या स्पर्शासाठी चंदन राई थरथरली ॥२॥
जळात शिरण्या अधीर जाहली मनात फुलती आठवणी
चैतन्याची लहर उजळते दुरून घालतो साद कुणी
नवीन दिवस हा घेऊनी आला वन वेळुतुन मुरली॥३॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

लाविशी का वेड मजला

लाविशी का वेड मजला राजहंसा येऊनी
जाशी का तू हळू मला अर्धी कहाणी सांगुनी ॥धृ॥
मोतियाचा रम्यसा रे मी तुला देईन चारा
नित्य तू माझ्या गवाक्षी करित जाई येरझारा
तृप्त होते राजसची दिव्य कीर्ती ऐकुनी॥१॥
मंद कलकल गुंजणारी बोल तू शब्दातुनी
ओळखू ये गायिलेला राग तो हंसध्वनी
हरखुनी जाते सहज मी या तुझ्या नादातुनी॥२॥
मी इथे तू दूर कोठे अन्‌ अनोळखी वाट रे
मीलना मध्येच मंगल तूच अतंरपाट रे
बैसवुनी तुझिया विमानी जा मला तू घेऊनी॥३॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

भंग व्हावे स्वप्न ऐसे

भंग व्हावे स्वप्न ऐसे बोल तू बोलू नको
जीव घेण्या वेदनेचे गीत तू गाऊ नको॥धृ॥
पूर्व जन्मीचे असे का भोग माझ्या संगती
अंतरीच्या वेदनांना छेद तू देऊ नको
रेखिल्या मूर्तीस आता भंगुनी टाकू नको॥१॥
ओढ प्रितीची अनावर आठवणी येता मनी
पेटतो वन्ही स्मृतीचा उर येतो दाटुनी
पेटल्या वणव्यात माझी राख तू मागू नको
संपलेली प्रेमगाथा तू पुन्हा उघडू नको॥२॥
का उगा ही भेट झाली प्रीत जडलेली खुळी
प्राक्तनाचा खेळ झाला अंतरी सल राहिली
मीलनाचे स्वप्न आता तू वृथा ठेऊ नको
साठलेल्या त्या स्मृतींना तू उगा उधळू नको॥३॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कंठात अंबराच्या

कंठात अंबराच्या झुलवीत मेघ आला
पवनाशी खेळ झाला आला पाऊस आला॥धृ॥
चैतन्यहीन धरणी ग्रीष्मातल्या उन्हाने
पाहून वाट वेडी आतुरल्या मनाने
बोले हळूच कानी प्राशून थेंब ओला॥१॥
अस्मान गर्जू लागे बिजली कडाड वाजे
एकात एक भवरे तालात फेर साजे
झाडे लवूनी वदती आनंद दाटलेला॥२॥
धरती तृषार्त न्हाली पहिल्या सरीत ओली
हिरव्या तृणांकुराचा शालू अपूर्व ल्याली
रेखूनी सप्तरंग पिवळी किनार त्याला॥३॥
धरतीस शांतावया आल्या दुधाळ धारा
पडल्या वरून तारा घेऊन रूप गारा
नवरूप यौवनाचे आले चराचराला॥४॥
तालात मोर नाचे फुलवून तो पिसारा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

रुप रंग रस गंध घेऊनी आली दिपावळी

रुप रंग रस गंध घेऊनी आली दिपावळी
इंद्रधनूच्या रर्म्य रहाऊन गात गात ही आली ॥धृ॥
दिशा दिशांना सूर लाभले आनंदाचे गीत गाईले
अष्ट दिशातून सप्तस्वरांची गाणी दुमदुमली॥१॥
नक्षराच्या वेलीवरती चंद्रतारका उमलून येती
चंदन गंधित अवनीवरती सुखशांती आली॥२॥
फुलबाज्यांची फुले लेवुनी भुईनळ्याचे झाड अंगणी
रंगबिरंगी रांगोळ्याचा गालीचा घाली ॥३॥
आनंदाचे दीप उजळले मांगल्याचे सडे शिंपले
दिशा दिशातुन चैतन्याची दीप ज्योत लागली॥४॥
सजीव झाले अचल चराचर घराघरातून घुमले सुस्वर
तुझे नि माझे नुरले अंतर भेदभावना सरली ॥५॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: