भावगीत

आकाश देऊळवाडा

आकाश देऊळवाडा तिथे वाजतो चौघडा
काठोकाठ भरे घडा मेघ शिंपतात सडा॥धृ॥
ध्वज आकाश गंगेचा झगमगते शिखर
लखलखते सौदामिनी तळपते गर्भागार॥१॥
दिसे निळाई माऊली झाला जीव माझा तान्हा
तिच्या कुशीत शिरूनी पिते अमृताचा पान्हा॥२॥
माझी निळाई हासली ऊन पडले पिवळे
दोन रंग एक जीव जन्मा मातीतून आले॥३॥
माता निळाई भेटली द्वैत सरले सरले
धरतीच्या देव्हार्‍यात अद्वैताचे पीक आले॥४॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

स्वप्नात माझ्या येतेस तू कितीदा

स्वप्नात माझ्या येतेस तू कितीदा
उडवून नीज माझी जातेस तू कितीदा॥धृ॥
त्या दिव्य तारकांनी माळून देह सारा
बरसात चांदण्याची करतेस तू कितीदा॥१॥
चुंबून ओठ माझे उमलून पापण्यांना
नयनात स्वप्न सखये बघतेस तू कितीदा॥२॥
रेशीम स्पर्श होता मी ही फुलून येतो
प्रणयात रंगताना हरतेस तू कितीदा॥३॥
माझ्या मनातली तू कमनीय उर्वशी गे
सत्यातत ये जराशी छळतेस तू कितीदा॥४॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

निळ्या जळावर कमान काळी

निळ्या जळावर कमान काळी कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याची कारंजीशी कुठे गर्द बांबूंची बेटे॥१॥
फूलपाखरी फूल थव्यावर कुठे सांडली कुंकूम टिम्बे
आरसपानी पाण्यावरती तरत्या बगळ्यांची प्रतिबिम्बे॥२॥
घाटामध्ये शिरली गाडी अन्‌ रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्र वीणा अजून करते दिडदा दिडदा॥३॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

फारा दिवसांनी आज

फारा दिवसांनी आज
उन्हे सोनियाची आली
चिंब साळीची बालके
उब पिऊनीया धाली॥१॥
ही भाताची रोपं जणू पाणीयाच्या वाक्यावाळे
पायी घेऊन नाचली
गेला वारा गंधांगुली
त्याच्या गालांना लावून
मेघ सारून आकाश
त्यांना घेतले चुंबून ॥२॥
त्याना पाहून फुटले
हसू राजेश्री श्रावणा
लोणियाने बळावला
त्याच्या ओठातला दाणा ॥३॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

लाल केशरी गुलमोहराचे

लाल केशरी गुलमोहराचे क्षितिजी फुलले तुरे
आणि फुटाण्यापरी उडाली दिपलेली पाखरे
सर्कशीतल्या बालकापरी धीट चपल कोकरे
आढ्यावरूनी खुडीत होती कोमल पाने त्वरे
बिंब तयांचे होते पडले निळसर ओढ्यामध्ये
गार उन्हातील चित्र दुहेरी तरळत होते मुदे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

चांदण काळी आंदण वेळ

चांदण काळी आंदण वेळ
दलदल फुलते रंजन वेल
आनंदाला फुटून फांद्या
निळे पाखरू घेते झेल॥१॥
चांदण काळी आंदण वेळ
जग सगळे टिपर्‍यांचा खेळ
सृष्टीवरती करिते वृष्टी
स्वर पुष्पांची अमृत वेल॥२॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

माझ्या गोव्याच्या भूमीत

माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे
कड्याकपारी मधोनी घट फुटती दुधाचे॥१॥
माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्याफणसाची रास
फुली फळाचे पाझर फळी फुलाचे सुवास॥२॥
माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा
ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा॥३॥
माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानावीण फुले
भोळा भाबडा शालीन भाव शब्दावीण बोले॥४॥
माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे भात
वाढी आईच्या मायेने सोन केवड्याचा हात॥५॥
माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती निळे पाणी
खोल आरक्त घावात शुद्ध वेदनाची गाणी॥६॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

तापता उन्ही तुला

तापता उन्ही तुला दिली प्रशान्त सावली
भागवावया तहान गोड गार शाहुळी।
स्नान उष्ण घातले तनूस तेल लावुनी
घास लाविले मुखा मुठेल त्यात वाहुनी।
रात दाटता घरी सुवर्ण दीप लाविले
कुंतली प्रभातकाली दैन्य सर्व झाडले।
शंभू ठाकता समोर गांगतीर्थ सांडुनी
कंठिच्या हलाहलास जासि शीघ्र मोहुनी।
कोटितीर्थ मानवा असून माझिया शिरी
तू विषार्थ लाविली गळ्यास माझिया सुरी।

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

दिव्यत्वाचे जेथ प्रचिती

तेथे कर माझे जुळती दिव्यत्वाचे जेथ प्रचिती॥धृ॥
ज्या प्रबला नेज भावबलाने
करित सदने हरिहर भुवने
देव पतींना वाहुनी सुमने
पाहुनी केशव वाडविता तेथे कर माझे जुळती॥१॥
गाळुनिया भाळीचे मोती
हरिकृपेचे मळे उगवती
जलदापरी येऊनिया जाती
जग ज्याची न करी गणती तेथे कर माझे जुळती॥२॥
यज्ञी ज्यानी देऊनि निजशीर
घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहन भूमिवर
नाही चिरा नाही पणती तेथे कर माझे जुळती॥३॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

जीवन त्यांना कळले हो

जीवन त्यांना कळले हो
मीपण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो
जळापरी मन निर्मळ ज्याचे गेले तेथे मिळले हो
चराचराचे होऊन जीवन स्नेहासम पाजळले हो॥
सिंधूसम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो
आपत्काली अन्‌ दीनावर घन होऊनी जे वळले हो॥
दुरित जयाच्या दर्शनमात्रे मोहित होऊनी जळले हो
पुण्य जयाच्या उजवाडाने फुलले अन्‌ परिमळले हो॥
आत्मदळाने नक्षत्राचे वैभव ज्यानी तुळिले हो
सायासाविण ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो॥
उरीच ज्या आढळले हो जीव त्यांना कळले हो

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: