आसामदारांकडे सण मागायला जाणं, हाही एक सुंदर सोहळा होता. त्याचा 'भार' नेहमी मी आणि माझे चुलते आप्पा यांच्यावर असायचा. सणाच्या दुसर्या दिवशी आसामदारांच्या दारात जाऊन "सण वाढा सण" अशी आरोळी ठोकताना आपल्याच जातीचा दिव्य अभिमान तेव्हा वाटायचा.
आ
ज आईने घर स्वच्छ करायला घेतलं आणि म्हणाली "सणसूद आहे, सगळं स्वच्छ हवं, नव्यासारखं!".
कोणताही सण आला की तिची अशीच लगबग असते.
सणाचा सगळ्यात जास्त आनंद लहान मुलांना असतो, त्या पाठोपाठ स्त्रियांना. पुरुष मंडळी सणाबाबत तशी गंभीर नसली तरी सणामुळे पडणार्या आर्थिक बोजाने गंभीर वाटतात. सुधारलेल्या जीवनपद्धतीत सणही सुधारीत झाले आहेत. काहीतरी कारणांमुळे सण वाटावेत असेच सण आज आपल्याला जवळचे वाटतात, जसे राखीपौर्णिमा, वटसावित्री, गुढीपाडवा . . . इत्यादि.
आज गोपाळकाला जितक्या उत्साहाने साजरा केला जातो तितक्या जोमात बैलपोळा साजरा होत नाही ही खंत आहे. शहरात बैल नसतील पण बैलांनीच पिकवलेलं धान्य आपण खातो याची जाणीवही नसावी! नव्याची पौर्णिमा, अक्षय्य तृतीया . . . ही सणांची नावं आहेत हे काहींना माहीतही नसेल!
लहानपणी मला सगळे सण तोंडपाठ होते. त्याचं कारणही तसंच होतं . . . सण आला की आमचं छोटसं 'सपार' आतून बाहेरून स्वच्छ व्हायचं. सकाळचं सडा-सारवण, अंघोळीची लगबग . . . चहा घेतला की भाऊ, म्हणजे माझे आजोबा हातात एक पिशवी घेऊन एखाद्या आसामदाराच्या घरी जायला निघालेले असायचे. रोजच्या भाकरीची भ्रांत असणार्या घरात सणाबद्दल आकर्षण असणं साहजिकच होतं. त्याच दिवशी काय ते गोडधोड मिळायचं, बाकीचे दिवस फक्त काहीबाही गिळून ढकलायला होते.
'आसामदार' म्हणजे असा शेतकरी ज्याने वर्षभराच्या कामाच्या मोबदल्यात, शेतीत पिकलेल्या धान्यातला काही अंश ते काम करणार्याला देण्याचा अलिखित करार केलेला असतो. हा करार वैयक्तिक संबंधानुरूप प्रामाणिक असायचा. लोहार, सुतार, न्हावी आदि बलुतेदार अशा कराराने त्या शेतकर्याचे वर्षभराचे काम करायला बांधलेले असायचे आणि बदल्यात मिळायचं चार-पाच पायल्या धान्य, पिकेल तसं.
माझे वडील चांभारकाम करायचे, त्यांच्याकडे आठ-नऊ आसामदार होते. त्या सगळ्यांच्या कुटुंबाच्या चपला दुरुस्त करणं, बैलांच्या म्होरक्या, चाबूक, आसूड, मोटा इत्यादी कामं दादा वर्षभर करायचे. बदल्यात मिळणारं धान्य काही वाण्याकडं जायचं तर उरलेलं गिरणीत. त्यामुळे शेतकर्यापेक्षा त्याच्या पिकाची चिंता आम्हालाच जास्त असायची.
आसामदारांकडे सण मागायला जाणं, हाही एक सुंदर सोहळा होता. त्याचा 'भार' नेहमी मी आणि माझे चुलते आप्पा यांच्यावर असायचा. सणाच्या दुसर्या दिवशी आसामदारांच्या दारात जाऊन "सण वाढा सण" अशी आरोळी ठोकताना आपल्याच जातीचा दिव्य अभिमान तेव्हा वाटायचा.
आप्पाच्या काखेत पोळ्यांसाठी पिशवी आणि माझ्या हातात सारासाठी चरवी अशी दिंडी गावच्या एका वेशीपासून दुसर्या वेशीपर्यंत असणार्या आसामदारांच्या दारांवरून आरोळ्या ठोकत घरी यायची. दहा पंधरा पोळ्या आणि चरवीभर सार म्हणजे अनोखी पर्वणी असायची. दोन दिवस आम्ही त्याच्यावरच भागवायचो.
पण हे सोपं नव्हतं. आसामदारीण सरळ सरळ थोडीच वाढायची? कोणी म्हणायची "अजून सैपाक नाई, घरधनी जेवले नाइत आणि वाढा लगेच यांना", तर कोणी म्हणायची, ''राती काई उरलंच नाई बाबा".
त्यांची हक्काची वाक्यं त्या बोलून घ्यायच्या आणि आम्ही लाज-शरम, मान-अपमान याच्या पलिकडे
असणार्या पोटभर अन्नाच्या स्वप्नात तल्लीन!
कधीकधी अर्धा-अर्धा तास दारात उभं करून एखादी तिचं घरकाम उरकायची. आम्हाला आत जायला मनाई होती. भेदाभेद नाही म्हणता काही लोक पाळतच होते. भाऊ जेव्हा एखाद्याच्या पाचवीच्या भजनाला जायचे तेव्हा इतर भजनी आत आणि भाऊंना दाराबाहेर बसायला लागायचं. त्यांना देण्यात येणारं चहाचं भांडं देखील रात्रभर बाहेर असायचं.
आजी सांगते की, ती जेव्हा लग्न होऊन नव्यानं गावात आली होती, तेव्हा गावातून चप्पल घालून चालली म्हणून चावडीवर बोलवून एका गावकारभार्यानं तिच्या तोंडात भडकावली होती. बलुत्यांनी गावात चपला घालायच्या नाहीत असा दंडकच होता त्यांचा. शिळ्यापाक्यासाठी दारात आलेली कुत्री आणि आम्ही सारखेच होतो त्यांना. शेजारच्या कुणी शिळ्या पोळ्या आणून दिल्या तर आई त्या वाळवून ठेवायची. जेव्हा एखाद्या दिवशी घरात खायला काही नसायचं तेव्हा याच पोळ्या कामी यायच्या!
अशाच एका सणाला भाऊ चंदी (धान्य) आणायला म्हणून घराबाहेर गेले, ते सांज होईपर्यंत आलेच नाही . . . आजीचा शिव्यांचा पाढा चालू झाला, ''मुतारा ढोसून पडला आसल. याला काह्याची सणसूद?"
शेजारीपाजारी खमंग पदार्थांचे वास येत होते आणि अजून आमची चूलही पेटली नव्हती. आम्ही सगळे भाऊ येण्याची वाट पहात बसलो होतो. आजीची बडबड काही केल्या थांबत नव्हती, तोच लांबून भाऊ येताना दिसले. रिकामी पिशवी हलवत भाऊ डुलत डुलत अंगणात येऊन बसले.
"दानं कुठय?"
"सगळी घरं हिंडून झाली . . . नाई मिळालं काई . . . च्यामारी यांची कामं करा वर्षभर . . . आन घ्या कवाबी काढून . . ."
केलेल्या कामाचा मोबदला वेळेला न मिळाल्याने भाऊ त्रागा करत होते. आई एकवार बंद चुलीकडं तर एकवार आमच्याकडं बघून डोळे भरून आणत होती. मी, माझे दोन लहान चुलते, दोन बहिणी गप्प राहून सगळं बघत होतो.
बोलता बोलता दादांकडे पहात भाऊ म्हणाले, "मानानं जगायचं आसल त ह्यो धंदा सोड." आणि मला जवळ ओढून छातीशी कवटाळत ओक्साबोक्शी रडू लागले. आजीचाही आवाज कापरा झाला होता. दादाही डोळे पुसत होते. आम्ही लहानगे टोपल्यातलं शिळं गिळून झोपी गेलो. बाकीचं घर, पाणी गाळत राहिलं . . . रात्रभर!
दुसर्या दिवशीच वडिलांनी चांभारकीची हत्यारं बांधून ठेवली ती कायमची. आमचं सण मागणंही कायमचं बंद झालं!
- शाम.