किडामुंगीप्रमाणे जगणार्या, सतत कुठल्या ना कुठल्या खर्या वा काल्पनिक भीतीच्या दडपणाखाली वावरणार्या पापभीरू वर्गातलाच एक म्हणजे सरकारी कारकून चेरव्हॅकोव्ह. दस्तायेव्हस्कीच्या कादंबरीतील काही प्रमुख पात्रांप्रमाणेच ह्या कथेच्या नायकाच्या आडनावाचा अर्थही आशयाशी जोडलेला ('चेर्व्हाक' म्हणजे किडा). हे ध्यानात घेतलं, तर कथेचा काहीसा अतिरंजित वाटू शकेल असा रूपकात्मक शेवट अधिक अर्थपूर्ण वाटतो.
अ
न्तोन चेकॉव्ह हा एकोणिसाव्या शतकातला एक थोर लेखक आणि नाटककार. सार्वकालिक श्रेष्ठ अशा लघुकथाकारांमध्ये चेकॉव्हची गणना होते. चेकॉव्ह लिहिता होण्यापूर्वी तुर्गनेव्ह, दस्तायेव्हस्की आणि टॉलस्टॉय ह्या तीन लेखकांनी रशियन साहित्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते. दस्तायेव्हस्कीची माणसाच्या मनाचा थांग शोधणारी 'क्राईम अँड पनिशमेंट' असो वा नेपोलियनच्या आक्रमणाचा आणि दारूण पराभवाचा विस्तृत पट रेखाटणारी टॉलस्टॉयची 'वॉर अँड पीस' असो - गुंतागुंतीचा विषय, तपशीलवार उलगडत जाणारे कथानक व व्यक्तिरेखा आणि त्या अनुषंगाने येणारं चिंतन अशा दीर्घ, असामान्य कादंबर्यांच्या पार्श्वभूमीवर उण्यापुर्या चव्वेचाळीस वर्षाच्या आयुष्यात लघुकथा हा वाङ्मयप्रकार समर्थपणे हाताळणे आणि तत्कालीन समीक्षकांची टीका सोसूनही लोकप्रिय करणे ही चेकॉव्हची कामगिरी अधिकच उठून दिसते.
एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध हा रशियासाठी मोठ्या खळबळीचा काळ होता. दीर्घकाळ चाललेले क्रिमियन युद्ध, फ्रेंच भाषा आणि संस्कृतीचा अभिजन वर्गावरील ओसरणारा प्रभाव, जवळजवळ गुलामीत जगणार्या वेठबिगार शेतमजुरांसाठी अलेक्झांडर झारने अंमलात आणलेल्या सुधारणा, मध्य आशियात रशियाचा वेगाने होणारा विस्तार, शहरी मध्यमवर्गात खदखदणारा असंतोष आणि परिणामी वेळोवेळी होणारे उठाव, झारची हत्या, युरोपातील नवीन विचारांचा वाढणारा प्रभाव - या आणि अशा अनेक गोष्टींचा परिणाम पुढे राज्यक्रांतीत झाला, असं म्हणता येईल. चेकॉव्हच्या लघुकथा ह्याच काळातल्या सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या आहेत.
सूक्ष्म निरीक्षणशक्ती, विसंगती टिपणारा मात्र बोचरा न होणारा उपहास, कथानकावर अतिक्रमण न करताही परिणामकारक पात्राची आणि पार्श्वभूमीची भूमिका बजावणारा निसर्ग आणि गरीब-श्रीमंत, सुष्ट-दुष्ट अशा ढोबळ भूमिका न घेणारी, लघुकथेच्या शब्दमर्यादेत राहूनही प्रसंगांची आणि व्यक्तिरेखांची घट्ट वीण गुंफणारी शैली ही चेकॉव्हच्या लेखनाची वैशिष्ट्यं त्याच्या उमेदीच्या काळात लिहिलेल्या लघुकथांमध्ये विशेषत्वाने आढळतात.
ह्याच कालखंडातली 'डेथ ऑफ द गव्हर्न्मेंट क्लर्क' ही प्रातिनिधिक म्हणता येईल अशी कथा. तिच्या स्वैरानुवादाचा प्रयत्न पुढील परिच्छेदांत केला आहे. किडामुंगीप्रमाणे जगणार्या, सतत कुठल्या ना कुठल्या खर्या वा काल्पनिक भीतीच्या दडपणाखाली वावरणार्या पापभीरू वर्गातलाच एक म्हणजे सरकारी कारकून चेरव्हॅकोव्ह. दस्तायेव्हस्कीच्या कादंबरीतील काही प्रमुख पात्रांप्रमाणेच ह्या कथेच्या नायकाच्या आडनावाचा अर्थही आशयाशी जोडलेला ('चेर्व्हाक' म्हणजे किडा). हे ध्यानात घेतलं, तर कथेचा काहीसा अतिरंजित वाटू शकेल असा रूपकात्मक शेवट अधिक अर्थपूर्ण वाटतो.
------------------------------------------------------------
'एका सरकारी कारकुनाचा मृत्यू'
मोठी सुरेख संध्याकाळ होती. कारकून इव्हान दमित्रीच् चेरव्हॅकोव्ह स्टॉल्समधल्या दुसर्या रांगेत बसून, ऑपेरा पाहण्याच्या दुर्बिणीतून 'ले क्लोश द कॉर्नव्हिल' हा प्रसिद्ध फ्रेंच ऑपेरा पाहत होता. त्याच्या दृष्टीने ही सुखाची परिसीमाच! पण अचानक . . . बर्याचदा अनेक कथांमध्ये हा 'पण अचानक' मध्येच आडवा येतो. लेखकांचंही बरोबर आहे म्हणा - आयुष्यात असे आश्चर्याचे प्रसंग कमी का आहेत? पण अचानक, त्याचा चेहरा वेडावाकडा झाला, डोळे अदृश्य झाले, श्वास थांबला . . . त्याने ती ऑपेराची दुर्बिण डोळ्यांवरून हटवली, पुढे वाकला आणि . . . 'आक् छी!'. बरोबर आहे - तो शिंकला. खरं तर, शिंकणं हा काही गुन्हा नव्हे. शेतमजूर शिंकतात तसेच पोलीस अधिकारीही शिंकतात, आणि कधी कधी चक्क प्रिव्ही कौन्सिलचे मानद सदस्यदेखील. सारीच माणसं कधी ना कधी शिंकतात. चेरव्हॅकोव्हला याबद्दल काहीच शंका नव्हती. त्याने रूमालाने तोंड पुसलं आणि सभ्य गृहस्थाप्रमाणे आपल्या शिंकेचा कुणाला त्रास तर नाही ना झाला, हे पाहण्यासाठी आजूबाजूला नजर टाकली. मग मात्र त्याचा गोंधळ उडाला. त्याच्या पुढच्याच रांगेतला एक माणूस स्वतःशी काहीतरी पुटपुटत रूमालाने आपलं टक्कल आणि मान नीट पुसत होता. चेरव्हॅकोव्हने त्याला ओळखलं. वाहतूक विभागातल्या मोठ्या पदावरचा तो एक अधिकारी होता - मुलकी जनरल ब्रिझॅलोव्ह.
"मी थेट जनरल साहेबांवरच शिंकलो वाटतं," चेरव्हॅकोव्ह स्वतःशी म्हणला, "भले ते माझ्या विभागाचे प्रमुख नसतील, पण मला माफी मागायलाच हवी."
चेरव्हॅकोव्ह हळूच खाकरला. पुढे झुकून तो जनरलच्या कानाशी कुजबुजला, "माफ करा हं, साहेब. मी चुकून शिंकलो आणि . . ."
"ठीक आहे, ठीक आहे"
"खरंच सांगतो हो, तसा माझा इरादा नव्हता."
"ओह, जागेवर बसा प्लीज. मला ऐकू दे नीट!"
चेरव्हॅकोव्ह आता चांगलाच ओशाळला. एक अजागळ हसू त्याच्या चेहर्यावर पसरलं आणि त्याची नजर पुन्हा रंगमंचाकडे वळली. त्याचं लक्ष पुन्हा ऑपेराकडे गेलं खरं, पण आता त्याला त्यात रस वाटेना. मगासचा आनंद आता हरवला होता. आपल्या चुकीची टोचणी त्याला लागून राहिली. मध्यंतरात त्याने ब्रिझॅलोव्हला गाठलं आणि आपला संकोच काही काळ दूर सारत तो हलकेच म्हणाला,
"जनरल साहेब, मी क्षमा मागतो. असं पहा, मी काही हे . . ."
"अरे, पुरे की आता . . . मी ते विसरलो देखील, आणि तुम्ही पुन्हा तेच घेऊन बसला आहात!" जनरल गरजले. त्यांचा खालचा ओठ आता अधीरपणे थरथरत होता.
"साहेब 'मी विसरलो' म्हणताहेत, पण त्यांच्या नजरेत एक क्रूर चमक नक्कीच आहे," चेरव्हॅकोव्हला वाटलं. "आणि तरीही त्यांना याबद्दल काहीच बोलायचं नाही. मलाच त्यांना नीट समजावून सांगायला हवं . . . की खरंच माझा तो हेतू नव्हता . . . हा तर निसर्गाचा नियमच आहे, नाहीतर त्यांना वाटेल की मला त्यांच्यावर थुंकून त्यांचा अपमान करायचा होता. भले आता ते तसा विचार करत नसतील, पण काही वेळाने नक्कीच करतील!"
घरी परतल्यावर चेरव्हॅकोव्हने ही सगळी कहाणी आपल्या बायकोला सांगितली. तिने काही फारशा गांभीर्याने आपलं म्हणणं ऐकून घेतलं नाही, असंच त्याला वाटलं. ती जरा घाबरली, पण ब्रिझॅलोव्ह साहेब वेगळ्या खात्यात आहेत हे ऐकून तिला हायसं वाटलं.
"तरी पण, एकदा जाऊन माफी मागितलेली बरी," ती म्हणाली, "नाहीतर त्यांना वाटेल तुम्हांला चार माणसांत वावरण्याची अक्कल नाही."
"तेच तर सांगतोय ना मी! मी माफी मागितली, पण ते जरा विचित्रच वागले . . . एक शब्द धड बोलले असतील तर शपथ. शिवाय तेव्हा वेळही नव्हता नीट काही बोलायला."
दुसर्या दिवशी चेरव्हॅकोव्हने आपल्या खात्याचा नवीन गणवेश चढवला, केस नीट कापून घेतले आणि तो ब्रिझॅलोव्ह साहेबांकडे गेला. त्यांच्या कार्यालयाबाहेर बरीच गर्दी होती. अनेक लोक त्यांच्याकडे अर्जविनंत्या घेऊन आले होते आणि त्यांच्या घोळक्यात स्वत: जनरल साहेब उभे राहून त्यांना प्रश्न विचारत होते. बर्याच अर्जदारांशी बोलून झाल्यावर अखेर त्यांची नजर चेरव्हॅकोव्हकडे वळली.
"साहेब, काल थिएटरमध्ये, आपल्या आठवत असेल तर," चेरव्हॅकोव्ह म्हणाला, "मी शिंकलो आणि . . . चुकून शिंतोडे . . . माफ . . ."
"हा काय तमाशा आहे! . . . काय चाललंय काय? काय हवंय तुम्हांला?," पुढच्या अर्जदाराकडे वळत जनरल साहेब गुरकावले.
"ते माझ्याशी बोलत नाहीत," पडलेल्या चेहर्याने चेरव्हॅकोव्ह स्वतःशीच पुटपुटला, "म्हणजेच ते फार रागावले आहेत . . . नाही, हे प्रकरण असं इथेच सोडून देऊन चालणार नाही . . . मी परत समजावतो त्यांना."
जेव्हा सगळ्या अर्जदारांशी बोलून जनरल साहेब आतल्या खोलीकडे जायला वळले, तेव्हा चेरव्हॅकोव्ह पुढे आला आणि पुटपुटला,
"साहेब, मी आपल्याला पुन्हा तसदी देतोय. पण मी खरंच दिलगीर आहे हो . . . तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण मी ते अजिबात जाणूनबुजून केलं नाही."
जनरल ब्रिझॅलोव्हचा चेहरा आता जवळपास रडवेला झाला. हताशपणे त्यांनी हात हलवला.
"तुम्ही माझी थट्टा करत आहात, हे उघड आहे." असं म्हणून त्यांनी दार लोटलं.
"यात थट्टा कुठे आली?" चेरव्हॅकोव्ह विचारात पडला, "तसं तर काहीच नाही. इतका मोठा जनरल, पण तरी त्याला कळत कसं नाही? असं असेल तर, ह्या टिक्कोजीरावाची माफी मागायला मी काही परत जाणार नाही. मसणात गेला. एक पत्रच खरडतो, पण पुन्हा काही त्याच्या दारात पाऊल टाकणार नाही!"
ह्याच विचारांत गढून चेरव्हॅकोव्ह घरी परतला. त्याने जनरलला पत्र लिहायला घेतलं खरं, पण खूप विचार करूनही काय लिहावं हे त्याला सुचेना. अखेर दुसर्या दिवशी तो पुन्हा परतला.
"मी काल आपल्याला त्रास दिला साहेब," जनरल साहेबांची प्रश्नार्थक नजर त्याच्याकडे वळल्यानंतर चेरव्हॅकोव्ह म्हणाला, "पण तो तुमची थट्टा करावी म्हणून नाही. मी त्या दिवशी तुमच्यावर चुकून शिंकलो म्हणून माफी मागत होतो . . . तुमची चेष्टा करण्याचा विचार तर माझ्या स्वप्नातही येणार नाही. जर मी तुमची थट्टा उडवण्याचं धाडस केलं, आपण सगळेच जर एकमेकांची टर उडवू लागलो तर, कुणालाच कुणाविषयी आदर राहणार नाही. सगळेच . . ."
"चालता हो!" जनरल ओरडले. अचानक त्यांचा चेहरा लालबुंद झाला होता. संतापाने त्यांचं सर्वांग थरथरत होतं.
"काय?" चेरव्हॅकोव्हचा आवाज भीतीने आता अगदी इवलासा झाला होता.
"निघ इथून!" पाय आपटत जनरल पुन्हा ओरडला.
चेरव्हॅकोव्हच्या पोटात तुटल्यासारखं झालं. त्याला काहीच दिसेना, ऐकू येईना. भेलकांडत तो दाराबाहेर पडला, रस्त्यावर आला आणि कसाबसा घरी पोचला. आपला गणवेषही न उतरवता तो पलंगावर पडला आणि त्याने आपले प्राण सोडले.
- नंदन होडावडेकर