आठवते का गं

मज आठवते ते सारे
तुजला आठवते का गं...
मी तुला चिडवले कितीदा धरला न कधी तू राग...

bahinbhau1.jpg

होते दैवाने लिहीले
नशिबी अपुल्या हे नाते
एकाच कुशीतुनी आलो
आणि दूधही एकच होते
तू भाऊ म्हणाली जेंव्हा हे धन्य जिणे झाले गं...

तू खेळ मांडुनी बसता
मी मोडुनी हासत होतो
तू पुस्तक वाचत असता
मी खोडी काढत होतो
कधी प्रेमानेही मजवर ना हात उचलला तू गं...

तू शाळेला निघताना
मी दप्तर लपून ठेवी
तू काही ना करताही
मी आईला भडकावी
ती रागे भरता तुजला मज बिलगून रडली तू गं...

किती गंमती-जंमती केल्या
किती केला भांडणतंटा
पण घरात कोणी नसता
तुज लागे माझी चिंता
कधी आईच्या मायेने मज घास भरविला तू गं...

तू नवरीबाई झाली
आणि सोडून मजला गेली
होतो मी अजाण इतका
ती रीत मला न कळाली
मी रोज अंगणी बसुनी तुझी वाट पाहिली किती गं...

हा कसा बदलला काळ
तू दंग तुझ्या संसारी
माझ्याही खांद्यावरती
घरटयाची जबाबदारी
पुसतेस दुरून खुशाली मग पाय कुठे अडला गं...

- शाम.