निरोपाच्या वेळी तुझे आकाश निरभ्र होते
निरोपाच्या वेळी माझ्या पावसाला अवकाशाचे भान होते
निरोपाची कुठली वेळ नक्की मानायची? आपण पहिल्यांदा भेटलो ती?
तर तू नेहमी म्हणत असायचीस, हीच..हीच. तुझे आकाश निरभ्र नव्हते...
त्या सकाळी पाऊस होता इतकेच आठवते मला
एक कवडसा आडरानी पावसाला भिजवून गेला
तुझे असे कधी झाले आहे काय? जगातले सगळ्यात सुंदर गाणे
कानांना बिलगले आणि नंतर संपलेच नाहीत कधी त्यातले ईश्वरी सूर
त्या दुपारी गात्रांतून मोहरल्यागत तू हसत सुटलीस कितीतरी वेळ
पाण्याने तहानच वाढावी तसा पडून राहिलो होतो नुसता..पडून राहिलो आहे
पुन्हा तिथे ’तुझ्या’सवे त्याच झाडापाशी बसू
मोहवेलीच्या पाशात फक्त दोघांसाठी असू
स्मितांनी गच्च भरलेल्या चेह-यावरून हसू ओसंडत रहायचं
घनदाट काळोखात संयत तेवत असलेल्या शुभ्र ज्योतीसारखं
काळजातल्या बिलोर आडवाटा उजळवणा-या त्या प्रकाशावर
कुणाचाच अधिकार नसायचा ...तेव्हा उमलून आलेल्या चांदण्याचाही
तुझे पुन्हा हवे आहे जुने हसू ओठभर
कोरभर चंद्रासाठी तुझे होणे सैरभैर
- zaad