थोडा उजेड ठेवा,अंधार फार झाला
पणती जपून ठेवा,अंधार फार झाला !!१!!
आले चहूदिशानी तुफान विस्मृतीचे
नाती जपून ठेवा अंधार फार झाला !!२!!
शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी हे
हरणे जपून ठेवा अंधार फार झाला !!३!!
काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून
घरटी जपून ठेवा अंधार फार झाला !!४!!
शिशिरातल्या हिमात हे गोठ्तील श्वास
हृदये जपून ठेवा अंधार फार झाला !!५!!
स्वर:हेमा उपासनी
गीत: हिमांशु कुलकर्णी
संगीत:पं. नाथराव नेरळकर