मनातील अष्टलक्ष्मी

हाती काम घेऊन ते अर्धवट सोडून देणारे, काम पूर्ण करण्यास टाळाटाळ करणारे, त्यात आळस करणारे कितीतरी लोक असतात. आळशी माणसाला यश मिळत नाही. जो मनापासून काम करतो, ते वेळेत पूर्ण करतो, कामाची गुणवत्ता उत्तम राखतो व सजग राहतो त्याला यश दूर नाही.

borderpng.png

सा

यंकाळची - दिवेलागणीची वेळ झाली होती. त्या रस्त्यावरून चालताना अचानक आकाशाकडे लक्ष गेले. वेढून येणार्‍या सावल्यांसोबत केशरी-गुलाबी छटांच्या गगनमंडपात आपल्या घरट्यांकडे परतणार्‍या पक्षीगणांची एक सुंदर माळ विहरत होती. तिथून नजर खाली उतरली तर एका बाजूला आपल्या शुष्क फांद्यांच्या ओंजळीत मंद सुगंधाची पखरण करणारी मखमली श्वेत-सुवर्ण फुले ल्यालेला पांढरा चाफा आणि दुसरीकडे चकाकत्या इमारतींच्या झगमगाटात आपल्या शालीन सौंदर्याने उठून दिसणारा देवळाचा घाटदार दगडी कळस . . .

शहरी आयुष्याच्या धावपळीत, आजूबाजूच्या वाहनांच्या व माणसांच्या गर्दीत तो शांततेचा निरभ्र तुकडा पाहून माझे मनही क्षणभर तिथेच थबकले. देवळातून सायंकालीन आरतीचा घंटानाद ऐकू येत होता. माझी पावले आपोआप त्या दिशेने वळली. शरीर बाहेरच्या एका सोपानावर हलकेच विसावले. एक उसंतीचा श्वास घेतला. डोळे त्या आल्हादक वातावरणात काही क्षण मिटले. मनाच्या गाभार्‍यात ते गूढरम्य वातावरण साठवून घेत असतानाच जवळपासच्या कोणत्या तरी घरातून मंजुळ स्वर कानांवर येऊ लागले,

सुमनसवन्दित सुंदरी माधवी चंद्र सहोदरि हेममये
मुनिगणमण्डित मोक्षप्रदायिनि मञ्जुळभाषिणि वेदनुते।
पङ्कजवासिनि देवसुपूजित सद्गुणवर्षिणि शान्तियुते
जयजय हे मधुसूदन कामिनी आदिलक्ष्मि सदा पालय माम्॥

अष्टलक्ष्मी स्तोत्र! लक्ष्मीच्या आठ रूपांचं स्तवन. भारताच्या संस्कृतीत लक्ष्मीला विष्णूची शक्ती मानलं गेलं आहे. अशा त्या शक्तीस्वरूपा लक्ष्मीची ही आराधना. बर्‍याच दिवसांनी अष्टलक्ष्मी स्तोत्र ऐकत होते. पूर्वी आमचे एक शेजारी ते स्तोत्र संध्याकाळी लावत असत. आज बर्‍याच दिवसांनी ते पुन्हा ऐकताना कानांमधून स्तोत्राचे स्वर जसजसे मनात उतरत होते तसतसा त्या प्रत्येक शब्दामधील गोडवा हृदयात झिरपत होता. एकीकडे दीपावलीच्या निमित्ताने रोषणाईने लखलखलेले रस्ते-बाजारपेठा, लक्ष्मीच्या आगमनाची जोरदार तयारी तर दुसरीकडे त्या शब्दांच्या लहरींवर माझ्या मनात उमटणारे विचार तरंग . . .

लक्ष्मी म्हणजे कोणी बाहेरची शक्ती नाही. ती स्वतःमध्येच आहे. तिचे सर्व गुण हे माझ्यात आहेत. पण मी कोण आहे याचा कधी थांबून विचार केलाय का? कोण आहे मी? कोठे चालले आहे? कशाचा शोध घेत आहे? कोणता प्रवास आहे हा? एका श्वासापासून सुरू होणारा ते एका उच्छ्वासाने संपणारा . . . या दीर्घ प्रवासात मी कोणती पुंजी जमवत आहे? आदि ते अंताच्या या सफरीत एका अनामिक उत्कंठेने सुरू केलेला हा आत्मशोध आणि त्याची परिणिती . . . हीच असेल का आदिलक्ष्मी?

लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा आणि पैसा एवढेच गृहीत धरणार्‍या कोणाची तरी आठवण आली आणि मला हसू आले. ज्या ज्या कशाने आयुष्याला गती मिळते, स्थैर्य येते त्या त्या सर्वांना देवत्व बहाल करण्याची आदिम विचारधारा जगातील सर्व संस्कृतींमध्ये आहे. अगदी वाटेतल्या दगडालाही शेंदूर फासून त्याची मनोभावे पूजा करणारे मन जिथे आहे तिथे लक्ष्मी म्हणजे आदराचे स्थान. पूजेचे स्थान. कधीतरी कोठेतरी आठ लक्ष्मींची संकल्पना आली, कोणी स्तोत्रे रचली आणि लोकांमध्ये मूर्त स्वरूपात अष्टलक्ष्मी पूजिल्या जाऊ लागल्या. पण या प्रत्येक लक्ष्मीची संकल्पना मानवाला जे काही अनमोल वाटते, समृद्धीचे द्योतक वाटते त्यातूनच जन्मली असावी.

अहिकलि कल्मषनाशिनि कामिनी वैदिकरूपिणि वेदमये
क्षीरसमुद्भव मङ्गलरूपिणि मन्त्रनिवासिनि मन्त्रनुते।
मङ्गलदायिनि अम्बुजवासिनि देवगणाश्रित पादयुते
जयजय हे मधुसूदन कामिनी धान्यलक्ष्मि सदा पालय माम्॥

घरात पुरेसं धान्य, दूध-दुभतं असावं, आला-गेला-पै-पाहुणा तृप्त होऊन परत जावा, घरातील सर्वांच्या तब्येती ठणठणीत असाव्यात, अनारोग्य नसावं हे तर कोणाही गृहस्थाश्रमीचे स्वप्न असते. आपल्या घरात रांधल्या गेलेल्या अन्नाची नासाडी होऊ नये, कोणी अन्नाला अव्हेरू नये, देशातील धान्याची नासाडी होऊ नये, प्रत्येक भुकेलेल्याला दोन वेळचे अन्न मिळावे, शेतातील धान्य-भाज्या-फळे निरोगी असावीत, पर्यावरणाचे संतुलन राहावे या सार्‍या विचारांचे प्रतीक म्हणजे धान्यलक्ष्मी. तिची पूजा म्हणजे या विचारांसाठी झटणे, त्यांना प्रत्यक्षात आणणे. धान्याचे बीज निरोगी राखण्यासाठी, देशाचे भविष्य उज्ज्वल राखण्यासाठी प्रयत्न करणे. फक्त धान्यलक्ष्मीच्या चित्राची वा मूर्तीची पूजा करून काम कसे भागणार?

जयवरवर्णिनि वैष्णवि भार्गवी मन्त्रस्वरूपिणि मन्त्रमये
सुरगणपूजित शीघ्रफलप्रद ज्ञानविकासिनि शास्त्रनुते।
भवभयहारिणि पापविमोचनि साधुजनाश्रित पादयुते
जयजय हे मधुसूदन कामिनि धैर्यलक्ष्मि सदा पालय माम्॥

मनुष्यस्वभावातील निर्भयता ही जपण्याची, जोपासण्याची गोष्ट आहे. घरी सर्व काही आहे. उत्तम आरोग्य आहे, पैसा आहे, जमीनजुमला-शेती-व्यवसाय-नोकरी-धंदा अगदी सगळं व्यवस्थित आहे. पण वृत्ती जर घाबरट, भेदरट असेल तर त्याचा काय उपयोग? घाबरट माणूस खरे वागणार नाही, बोलणारही नाही. त्याच्या मनातील भय त्याला दिवसरात्र छळत राहील. तो कोणताही धाडसी निर्णय घेऊ शकणार नाही. हिंमत, धैर्य दाखवणार नाही. अशाने त्याची प्रगती कशी होणार? मनुष्याच्या स्वभावातील धैर्याला, धाडसाला, साहसी प्रवृत्तीला इथे लक्ष्मीचे स्वरूप दिले. कारण त्या साहसातूनच विकास साध्य होतो. अशा प्रवृत्तीचा आदर व ती अंगी यावी याची मनोकामना याचेच द्योतक म्हणजे धैर्यलक्ष्मी!

जयजय दुर्गतिनाशिनि कामिनि सर्वफलप्रद शास्त्रमये
रथगज तुरगपदादि समावृत परिजनमण्डित लोकनुते।
हरिहर ब्रह्म सुपूजित सेवित तापनिवारिणि पादयुते
जयजय हे मधुसूदन कामिनि गजलक्ष्मि रूपेण पालय माम्॥

गजलक्ष्मी, राजलक्ष्मी, भाग्यलक्ष्मी . . . पूर्वीच्या काळी गजदळावरून राजाची व राज्याच्या समृद्धीची परीक्षा केली जायची. ज्या राजाचे गजदळ उत्तम, अवाढव्य व भव्य त्या राजाच्या राज्यात सुबत्ता नांदत असणार, असा हा सर्वमान्य ठोकताळा!

हत्ती ज्याप्रमाणे निर्भयतेने चालतो, अडथळ्यांना पार करतो, शत्रूवर चाल करून जातो त्याच प्रकारे माझ्यातही संकटांना, अडथळ्यांना, परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ येऊ देत हा एक विचार आहे. माझ्या हातून घडणार्‍या कार्याला यश मिळू दे . . . ते कार्य तडीस जाऊ देत या संकल्पाचे मूर्त स्वरूप म्हणजे भाग्यलक्ष्मी.

त्याचप्रमाणे काही लोकांमध्ये समाजावर, जनतेवर अधिराज्य गाजवायचे सामर्थ्य असते. त्यांचे विचार, आचार, उच्चार यांमधून ते लोकांच्या मनावर राज्य करत असतात. त्यांच्या एका वाक्यासरशी जनसमूह प्रेरित होतो, हलतो, प्रभावित होतो. एक वेळ अशा व्यक्तींकडे लौकिकार्थाने धन नसेल, पण त्यांच्या शब्दाला प्रचंड किंमत असेल. हेही एक बळच की! अशा तर्‍हेच्या सामर्थ्याचा कधी सदुपयोग केला जातो, तर कधी दुरुपयोग. त्या सामर्थ्याला लक्ष्मीच्या स्थानी मानून त्याला आदराचे स्थान देण्याचे प्रतीक म्हणजे भाग्यलक्ष्मी किंवा राजलक्ष्मी.

अहिखग वाहिनि मोहिनि चक्रिणि रागविवर्धिनि ज्ञानमये
गुणगणवारिधि लोकहितैषिणि स्वरसप्त भूषित गाननुते।
सकल सुरासुर देवमुनीश्वर मानववन्दित पादयुते
जयजय हे मधुसूदन कामिनि सन्तानलक्ष्मि त्वं पालय माम्॥

आज जगात असे अनेक स्त्री-पुरुष आहेत ज्यांच्यापाशी इतर भौतिक सुखे कमी असतील कदाचित, परंतु पोटी जन्मलेल्या मुलांचे सुख - त्यांचे प्रेम त्यांना मिळत आहे. ही आहे संतानलक्ष्मी. भारतात स्त्रियांची भ्रूणहत्या करणार्‍यांना खरे तर या लक्ष्मीची पूजा करायचीही लाज वाटली पाहिजे. पोटी मुलगा असो वा मुलगी, त्यांच्यावर भरभरून प्रेम करणे व त्यांचे भरभरून प्रेम मिळणे . . . हीच संकल्पना आहे संतानलक्ष्मीची! त्या संततीचे उत्तम प्रकारे संगोपन करून त्यांना जबाबदार नागरिक बनविण्यात यश मिळणे, त्यांचा स्नेह लाभणे हीच आहे संतानलक्ष्मीची आराधना. हळूहळू आपले मूल हे आपल्याच रक्तामांसाचे हवे हा आग्रह मागे पडू लागला आहे, आणि आपल्या पोटी जन्मले नसले तरी ते आपले मानून त्याचे लालन-पालन, भरण-पोषण करणार्‍या पालकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. संतानलक्ष्मीचे सुख त्यांना लाभत आहे!

जय कमलासनि सद्गतिदायिनि ज्ञानविकासिनि गानमये
अनुदिनमर्चित कुङ्कुमधूसर-भूषित वासित वाद्यनुते।
कनकधरास्तुति वैभव वन्दित शङ्कर देशिक मान्य पदे
जयजय हे मधुसूदन कामिनि विजयलक्ष्मि सदा पालय माम्॥

हाती काम घेऊन ते अर्धवट सोडून देणारे, काम पूर्ण करण्यास टाळाटाळ करणारे, त्यात आळस करणारे कितीतरी लोक असतात. आळशी माणसाला यश मिळत नाही. जो मनापासून काम करतो, ते वेळेत पूर्ण करतो, कामाची गुणवत्ता उत्तम राखतो व सजग राहतो त्याला यश दूर नाही. अन्यथा निमित्त शोधणारे, बहाणे धुंडाळणारे कैक असतात. परंतु त्यांना यश मिळतेच असे नाही. आणि चुकूनमाकून यश मिळाले तरी ते टिकतेच असेही नाही. तेव्हा हाती घेतलेल्या कामाला तडीस नेण्याची वृत्ती व शक्ती हीच विजयलक्ष्मीच्या स्वरूपात पाहावयास मिळते.

प्रणत सुरेश्वरि भारति भार्गवि शोकविनाशिनि रत्नमये
मणिमयभूषित कर्णविभूषण शान्तिसमावृत हास्यमुखे।
नवनिधिदायिनि कलिमलहारिणि कामित फलप्रद हस्तयुते
जयजय हे मधुसूदन कामिनि विद्यालक्ष्मि सदा पालय माम्॥

आज भारतात प्राथमिक शालेय शिक्षण हा सर्व मुलांचा पायाभूत हक्क मानला गेला आहे. परंतु आजही अनेक मुले शालेय शिक्षणापासून वंचित आहेत. आपल्या मनाजोगते शिक्षण मिळणे, विद्या प्राप्त होणे व त्या विद्येचा सदुपयोग करणे ही आहे विद्यालक्ष्मी. जो कोणी शिक्षणाचा दुरुपयोग करतो, समाजाच्या किंवा व्यक्तींच्या हिताला बाधक कार्य करण्यासाठी आपले ज्ञान वापरतो त्याने विद्यालक्ष्मीच्या प्रतिमेची पूजा जरी केली तरी त्याचा काय उपयोग?

धिमिधिमि धिंधिमि धिंधिमि धिंधिमि दुन्दुभि नाद सुपूर्णमये
घुमघुम घुंघुम घुंघुम घुंघुम शङ्खनिनाद सुवाद्यनुते।
वेदपुराणेतिहास सुपूजित वैदिकमार्ग प्रदर्शयुते
जयजय हे मधुसूदन कामिनि धनलक्ष्मि रूपेण पालय माम्॥

''पैसेसे सारी दुनिया चलती है'' हे आजच्या काळातील वास्तव आहे. परंतु पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे. त्याच्या हव्यासापायी आंधळ्या झालेल्या, वाहवत जाणार्‍या लोकांना धनलक्ष्मीची संकल्पनाच कळली नाही असे म्हणावे लागेल! पैशाचे व्यवहारातील स्थान वादातीत आहे. परंतु धनाचे जे व्यवहारात स्थान आहे तेच व तेवढेच राहू देत. त्याला सर्वस्व मानण्याची चूक करू नका. पैशाचा आदर जरूर बाळगा. त्याचे अति-प्रेम नको, तसेच त्याचा तिटकाराही नको. त्याच्या लालसेपायी आयुष्य बरबाद करू नका. आपले वर्तमान उत्तम राखा. तीच आहे धनलक्ष्मी!

आयुष्यात या अष्टलक्ष्मींचे स्थान अतिशय महत्त्वाचे, म्हणून मग त्यांची पूजा. त्यांचा जिथे अभाव त्याला अष्टदारिद्र्य म्हणून संबोधिलेले आढळते. काही माणसांना मनातूनही काही करण्याची इच्छा नसते, ना त्यांच्यापाशी मार्ग असतो, ना जवळ कोणते साधन. अंगी प्रचंड आळस असतो व अनास्था असते. मात्र तरीही या सर्वात सुखाची अपेक्षा तर असते! परंतु त्यांनी अष्टलक्ष्मींच्या प्रतीकातील गुण व मूल्ये अंगी बाणविल्याखेरीज त्यांना यश तरी कसे मिळणार? दारिद्र्याचा हा एक शाप आहे. त्यातून बाहेर यायचे असेल तर योग्य व कठोर परिश्रमांना पर्याय नाही. अशा दरिद्रीनारायणाची सेवा करायला ही संस्कृती सांगते. लक्ष्मीनारायणाची म्हणजेच त्यात अंतर्भूत गुणांची पूजा करा, त्यांना आदराचे स्थान द्या व ते अंगी बाणवा असा संदेश देते.

संपन्नतेचा आदर-सन्मान व जिथे दारिद्र्याचा वास आहे तिथे सेवा असाच संदेश अष्टलक्ष्मींच्या आराधनेतून मिळतो. मात्र काही वेळा लोक फक्त उपचारांत व प्रतीकांत अडकून बसतात आणि त्यामागील शिकवणूक, मूल्ये विसरतात. मूल्यरहित, वरवरच्या उपचारांनी काय साध्य होणार? एकीकडे अष्टलक्ष्मीच्या चित्राला उदबत्ती फिरवायची व दुसरीकडे धान्यात भेसळ करायची, एकीकडे लक्ष्मीची स्तोत्रे गायची व दुसरीकडे भ्रष्टाचार करून धन मिळवायचे याला काहीच अर्थ नाही! एकीकडे लक्ष्मीची व्रतवैकल्ये करायची व दुसरीकडे पोटच्या मुलीचा गळा कापायचा, तिचा छळ करायचा हा तर त्या लक्ष्मीचा अवमानच आहे!

आज अष्टलक्ष्मींच्या स्तोत्राने मला बर्‍याच सार्‍या विस्मृतीत गेलेल्या गोष्टींची पुनश्च आठवण करून दिली होती. आयुष्यात असे गुण अंगी यावे यासाठी प्रयत्न करण्याचे सुचणे हेही त्याच लक्ष्मीच्या वरदानाचे प्रतीक! त्या लक्ष्मीस्थानी मानल्या गेलेल्या मूल्यांना, गुणांना आचरणात आणण्याचे मनोभावे प्रयत्न करायचेच असा निश्चय करूनच मी त्या सोपानावरून उठले. ज्या घरातून मला ते स्तोत्र ऐकू आले होते त्याच्या दिशेने बघत नमस्कार केला आणि सायंकाळच्या संधिप्रकाशात मार्गस्थ झाले.

- अरुंधती कुलकर्णी