हा छंद जीवाला लावी पिसे

स्वसुखासाठी सुरु झालेला हा छंद शेवटी स्वतःबरोबरच इतरांच्या उपयोगास येतो, तेव्हा होणारा आनंद अवर्णनीय असतो. आपली आवड जोपासताना मिळालेलं छोटसं यशही समाधान देउन जातं आणि मग आणखी यश मिळवायची आवड तयार होते. काहीतरी गवसल्याचं सुख खुणावू लागतं . . .

borderpng.png

क्षिण ध्रुवावर जायच्या वेडाने झपाटलेल्या रोअ‍ॅल्ड आमुंडसेनने आपल्या डायरीत लिहून ठेवलेले एक वाक्य माणसाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे उदाहरण म्हणून नेहमी सांगितले जाते.

"दक्षिण ध्रुवावर जायचा मार्ग मी शोधून काढेन आणि नसला, तर तयार करेन." त्यात विशेष असं की, हे वाक्य लिहिताना त्याची मोहीम पूर्णपणे फसलेली होती, सहकारी परत निघून गेले होते आणि त्याला स्वत:ला पायाची बोटं हिमदंशाने सडल्यामुळे धड चालताही येतं नव्हतं. कुठून आली ही इच्छाशक्ती? असं काय होतं त्याच्याकडे, जे त्याला आलेल्या संपूर्ण अपयशाला शरण न जाता उलट यशाचं स्वामित्व मिळवण्याची खात्री देत होतं ? ते होतं त्याचं वेड, त्याचं झपाटलेपण, त्याची झोकून देण्याची वृत्ती आणि त्याचा स्वतःच्या ध्येयावर असलेला पूर्ण विश्वास. तसं बघायला गेलं, तर आपल्याला थोर भासणारी ही सगळी माणसं आपल्यातलीच असतात. आपल्यासारखंच साधसुधं आयुष्य जगणारी. त्यांना वेगळं बनवतात, ते त्यांचे छंद आणि त्यासाठी आयुष्य वेचण्याची त्यांची तयारी.

hiking-Chand0001_new.jpgछंद तर प्रत्येकालाच असतात, पण ते आयुष्यातला एक छोटासा भाग म्हणून. छंद म्हणजे नक्की असतं तरी काय ? रोजच्या कटकटीच्या, दगदगीच्या आयुष्यातून शोधलेला थोडासा विरंगुळा? तसं असतं तर प्रत्येक छोट्याशा ब्रेकला आपण छंद म्हटलं असतं. पण तसं होत नाही. चहा पिणं, फावल्या वेळात गप्पांचे फड जमवणं, व्यसनपूर्ती कंरणं या गोष्टी नक्कीच छंदात मोडत नाहीत.

माझ्या लहानपणी स्टॅंप्स जमवणं, तिकीटं अथवा चित्रं गोळा करणं, पत्रमैत्री करणं हे छंद भलतेच पॉप्युलर होते. तुम्हाला कोणता छंद आहे, याचं सर्वात सोप्पं उत्तर म्हणजे 'वाचन,' पण मग काय वाचायला आवडतं, कोणता लेखक/लेखिका आवडते, सध्या काय वाचताय, यासारख्या प्रश्नांची उत्तरं मात्र माहिती असायला हवीत. बायोडेटाच्या शेवटच्या ओळीत सहसा वाचन, संगीत आणि खेळ अशा त्रिसूत्रीत हा सगळा कार्यक्रम संपवलेला आढळतो. गडबड होते, ती मुलाखत घेणार्‍यालाही तेच छंद असले तर! खरं सांगू का? छंद कुठला आहे ह्यापेक्षाही तुम्ही तो किती पॅशनने जोपासताय, हे जास्त मह्त्त्वाचं. कारण कुठलाही छंद घेतला तरी प्रवास साधारणत: सारखाच असतो. विरंगुळा, आवड, सवय, छंद, नाद आणि पिसं किंवा वेड ही या प्रवासाच्या स्टेशनांची क्रमवारी.

आता एखाद्याने छंदांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केल्यास वस्तू जमवणे (स्टॅंप्स, नाणी, चित्रं, दुर्मिळ गोष्टी, मॉडेल्स, एखाद्या विशिष्ट विषयाशी संबंधित गोष्टी, पुस्तकं, मासिके, गाणी, खेळणी इत्यादी), सादर करण्याजोग्या कला (गाणे म्हणणे,वादन करणे, नृत्य, अभिनय करणे, जादू करणे इ.), नवीन क्रीडाप्रकार शिकणे, नवनिर्मिती (बागकाम, मॉडेल्स बनवणे, शिल्पकला, पाककला, मातीकाम, छायाचित्रण, चित्र काढणे, लेखन करणे, मत्स्यपालन, सुतारकाम इ.), आउटडोअर किंवा घराबाहेर जोपासता येणारे छंद (ट्रेकिंग, हायकिंग, कयाकिंग, सर्फिंग, स्कूबा डायव्हिंग), निरीक्षण (पक्षीनिरीक्षण, आकाशनिरीक्षण, वाचन, प्रवास, खेळ पहाणे) हे प्रमुख प्रकार आहेत. अर्थात छंद जोपासणारे कधी वर्गीकरण करायच्या फंदात पडत नाहीत म्हणा.

श्रेयस आणि प्रेयस यांच्या झगड्यात जे मिळवलंय त्यात सुख मानणं हे समाधान, आणि जे आपल्याला आवडतंय ते मिळवण्याची धडपड करतं ते आयुष्य. मुळात मनाला जे आवडतं ते करणं ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. पण प्रत्येकवेळी तेच करणं शक्य असतंच, असं नाही. किंबहुना, बहुतांश वेळी मनाला न आवडणार्‍या गोष्टींतच जास्त वेळ जात असतो. अशावेळी तेच, तेच करुन किंवा नावडीचं काम करुन मनाला आलेला थकवा घालवण्यासाठी आपण नवीन किंवा आवडणारं काम करायला लागतो. हळूहळू या नवीन गोष्टीची आवड निर्माण होते, नाद लागतो आणि विरंगुळा म्हणून सुरु झालेली आवड ही सवय बनून जाते. एकदा का एखादा छंद जडला, की माणसाचं रुपांतर छंदवेड्यात व्हायला सुरुवात होते, एखाद्या अळीचं रुपांतर फुलपाखरात व्हावं तसं. आपल्या छंदाविषयी शक्य तेवढी माहिती जमवणं, समान छंदी मित्र गोळा करणं आणि त्यांच्याबरोबर राहून आपल्या ज्ञानाची पातळी वाढवणं आणि मग जाणकार झाल्यावर नवशिक्या छांदिष्टांना मदत करणं, हा साधारण प्रवास. एका छांदिष्टापासून स्फूर्ती घेऊन दुसरा समानधर्मी तयार होत असतो, एका मेणबत्तीने पेटवलेली दुसरी मेणबत्तीच जणू. निव्वळ आवड किंवा खरं तर टाईमपास म्हणून सुरु झालेली गोष्ट आपल्या आयुष्याचा हळूहळू ताबाच घेते आणि गंमत म्हणजे हे वेड जडलेल्याला त्याची जाणीवही नसते. असं भान विसरायला लावतं म्हणूनच तर त्याला वेड म्हणतात ना!

छंदाचं व्यवसायात रुपांतर करणारे काही भाग्यवान सोडले तर इतरांच्या आयुष्यात याचं महत्त्व काय ? निव्वळ छंदापायी बर्‍याच गोष्टींकडे दुर्लक्ष होतं, कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही, काही गोष्टी करायच्या राहून जातात. मग हातात उरतं काय?

आता माझ्यासारख्या छंदांचा छंद बाळगणार्‍या माणसाला विचाराल, तर माझ्या लेखी वरचे सगळे मुद्दे गौण ठरतात. माणसाला त्याच्या आवडीचं कामं करायला मिळणं, यासारखं दुसरं सुख नाही. अर्थात आवडणारं प्रत्येक काम म्हणजे काही छंद नव्हे. मग छंद म्हणजे काय? तर आपल्याला आवडणार्‍या गोष्टीची जास्तीत जास्त माहिती मिळवून, त्यात शक्य तेवढं ज्ञान प्राप्त करत रहाणं. स्टॅंप्स जमवणारा नुसते कागदाचे कपटे गोळा करत नसतो तर त्या तुकड्यांमागे असलेला इतिहास, त्या देशांचा भूगोल, त्यांचे किस्से, कहाण्याही त्याला ठाउक असतात. स्थळ-काळ-वेळाच्या भिंती नाहीशा होऊन तो त्याच्या स्टॅंप्सच्या जगात पूर्ण बुडालेला असतो.

एखाद्या गोष्टीविषयी ज्ञान मिळवायला सुरुवात केली, की आपल्या मर्यादांची जाणीव व्हायला सुरुवात होते. ही जाणीव आपल्याला आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावायला शिकवते. ज्ञानप्राप्तीचा ध्यास माणसाला नम्र करतो. विचार करायला लावतो. एखाद्या विषयाची व्याप्ती किती मोठी आहे, हे त्या विषयाची गोडी लागल्याखेरीज नाही समजत. मग सुरु होतो ज्ञानप्राप्तीचा एक न संपणारा आनंदी प्रवास. खेरीज कुठलंच ज्ञान कधीच स्वयंपूर्ण नसतं, त्याचे पदर गुंतलेले असतात ते इतर सगळ्या गोष्टींशी.

म्हणजे बघा हं, झाडांविषयी माहिती मिळवताना हवा, पाणी, माती, प्रकाश हे घटक तर समजून घ्यायला लागतातच, पण त्याशिवाय, झाडांवर ज्यांचं जीवन अवलंबून आहे आणि झाडांचं जीवन ज्यांच्याशी निगडीत आहे ते प्राणी, कीटक, जीवाणू, खतं, परागीभवन आणि त्याला मदत करणारं निसर्गचक्र . . . अ‍ॅंड द लिस्ट गोज ऑन . . .

थोडक्यात काय, तर विश्वातल्या कुठल्याही एका गोष्टीपासून सुरुवात करुन त्याच्यासोबत गुंतलेल्या इतर सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेणं. थोडसं 'मी' पासून सुरुवात करुन 'ब्रह्मा'पर्यंत पोहोचण्यासारखंच!

स्वतःला इतरांशी जोडायला शिकवणारं हे छंदवेड, माणसाला खर्‍या अर्थाने जगायला शिकवतं. जगात कुठलीच गोष्ट एकटी किंवा वेगळी नसते, तर, ती ह्या संपूर्ण ब्रम्हांडाचा एक भाग असते. वर्तुळाच्या केंद्रस्थानी राहून परीघाच्या बाहेरची ओळख करुन देतो, तो छंद. मी हा 'आम्ही'चाच एक भाग आहे हे शिकवतो, तो छंद. शिकण्यासारखं कितीतरी असतं या जगात. कितीही जाणकार असलात तरीही अजून विद्यार्थीच असल्याची भावना मनात बाळगायला लावतो, तो छंद. सततचा अभ्यास, स्वतःला पूर्णत्वाकडे नेण्याची तगमग, कर्तृत्वाच्या कक्षा रुंदावायची धडपड आणि या सगळ्यासाठी करावी लागणारी तपश्चर्या, ह्यासाठी ताकद पुरवतो, तो छंद!

ह्याच छंदाचा जेव्हा ध्यास बनतो, तेव्हा बनतात दिग्गज! मग तयार होतात ते त्या त्या क्षेत्रातले ध्रुवतारे. जगासमोर मार्गदर्शक म्हणून चमकत राहिलेले. कुणाला वन्यप्राणी संरक्षणाचं वेड असतं, कुणाला एखाद्या वाद्याचं, कोणी फोटो काढतो तर कोणी समाज सुधारणेच्या मागे लागतो. त्यातच कोणी क्रांतीच्या वेडाने झपाटला जातो आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुख समाधानच काय, पण प्रसंगी प्राणांचीही आहुती द्यायला तयार होतो. ध्येयप्राप्तीसाठीची पिपासा एवढी जबर होते की कुसुमाग्रज म्हणून जातात,

"अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा; किनारा तुला पामराला!"

आपण सगळे जरी एवढी उंची गाठायच्या तयारीने निघालेलो नसू तरी जमेल तेवढं करायला काय हरकत आहे? कारण अगदी नवशिक्या आकाश निरीक्षकांनीही काही शोधून काढल्याचीही उदाहरणं आहेतच. खूपदा असं आढळून येतं की एखाद्याचा व्यवसाय हा दुसर्‍याचा छंद असू शकतो. त्यामुळे तो तेच काम जास्त आवडीने करतो आणि म्हणूनच त्यात यशस्वीही लवकर होऊ शकतो. आता हल्लीच्या युगातलं उदाहरण द्यायचं झालं तर लिनक्सची सुरुवात एका विद्यार्थ्याच्या छंदातून झाली. १९३० साली वनसंरक्षणासाठी दुर्बीण घेउन निघालेल्या छांदिष्टाला "रेस बघायला जाताय का?" विचारलं गेलं होतं. हळूहळू हाच छंद एवढा व्यापक झाला की त्याची विश्वव्यापी चळवळ बनली. हौशी हॅम यूजर्सनी आणीबाणीच्या परिस्थितीत केलेली मदत सर्वश्रृत आहे.

स्वसुखासाठी सुरु झालेला हा छंद शेवटी स्वतःबरोबरच इतरांच्या उपयोगास येतो, तेव्हा होणारा आनंद अवर्णनीय असतो. आपली आवड जोपासताना मिळालेलं छोटसं यशही समाधान देउन जातं आणि मग आणखी यश मिळवायची आवड तयार होते. काहीतरी गवसल्याचं सुख खुणावू लागतं . . .

ह्या सुखालाही आशेचं तारु घेउन जातं स्वप्नांच्या राज्यात
आणि मग खुणावतात अनोळखी आनंदाचे झरे
तिथे पोहोचणं अजून बाकी आहे, जिथे मन आत्ताच रेंगाळतंय
कसल्यातरी अनामिक बंधाने जखडल्यासारखं
जणू ह्याच गोष्टीची गरज होती आत्तापर्यंत
आयुष्याला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी.

आता जाणवतंय अव्यक्त नातं 'त्याच्या' आणि माझ्यामधलं
जे वर्णायला शब्दांचीही गरज उरली नाहीये . . .

- अमित देसाई (बागुलबुवा)