एक अर्ध-मुर्ध नातं

अडवून ठेवले आहेत काही शब्द
मी माझ्या ओठांवर...
जस अडवून ठेवलय एक नातं
मैत्रीच्या सीमेवर...
पण तिला ना अपेक्षाच नाहीये
कुठल्या रुकारा-नकाराची
तसा शब्दांवर विश्वासच नाहीये म्हणा तिचा...
सहज जमतं तिला माझा चेहरा वाचायला
तरीही मी चोरतो माझी नजर
आणि जमवतो काही मोघम वाक्ये मनात
तिच्या अवघड प्रश्नांची उत्तरे द्यायला
तिलाही मग वाटून जातं
तिने वाचलं ते खरं की ऐकल ते खरं?
तिची चलबिचल दिसते तिच्या डोळयात,
तेंव्हा माझाही उडतो गोंधळ
मी बोललो ते खरं की .....?
जाउ दे, आपण दुसरं काहीतरी बोलूया
असं म्हणत ती बदलते विषय...
मी मात्र पटवून देत राहातो
माझी वाक्यं आणि त्यामागचे आशय...
सराईत बहुरुप्यासारखा बदलत रहातो मी
मुखवटे, आवाज, शब्द आणि त्यांचे पोत
पण ती मात्र नेमका दगड मारते...
मग माझा कुठलाच चेहरा मला खरा वाटत नाही
किंवा सगळेच आवाज खरे खरे वाटत रहातात...
विचारुन पहातो माझं मला मीच
खरंच मला नकोच आहे कुठलं नातं,
का हे जुनंच आहे आकर्षण-
अपूर्णतेचं...?
अर्धवट सोडलेल्या कवितांसारखं
न सुचलेल्या शेवटासारखं
अर्ध-मुर्धं नातं
ना होकार ना नकार
एक अर्ध-मुर्धं नातं!

- स्वरुप