भारतीय परिप्रेक्षात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

धर्माच्या पुनर्विचारातून निर्माण झालेले दोन महत्त्वाचे प्रश्न म्हणजे अस्पृश्यतेचा प्रश्न आणि स्त्रियांच्या दु:स्थितीचा प्रश्न हे होत याचा यापूर्वी निर्देश येऊन गेलेला आहे. या प्रश्नांना म. विठ्ठल रामजी शिंदे कसा प्रतिसाद देतात हे समजावून घेणे आवश्यक ठरणार आहे.

borderpng.png

हर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर केलेले कार्य आणि विविध सामाजिक प्रश्नांसंबंधी त्यांनी केलेले चिंतन लक्षात घेऊन त्यांना दोन विशेषणे लावण्यात आलेली आहेत. एक म्हणजे 'कर्मवीर' व दुसरे म्हणजे 'महर्षी'. ही दोन्ही विशेषणे त्यांच्या कार्यावर, स्वभावविशेषांवर आणि त्यांच्या चिंतनशील व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारी तर आहेतच, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंची निर्देशित करणारीही आहेत. हे व्यक्तिमत्त्व निरपेक्ष वृत्तीने अस्पृश्यांच्या जीवनात बदल घडविण्याचा प्रयत्न करताना दिसते. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी जी संस्था स्थापन केली, ती संस्था भरभराटीला आल्यानंतर सोडावी लागली तरी कुठलाही कटूभाव न ठेवता अस्पृश्यांसंबंधीचा प्रेमभावच शेवटपर्यंत बाळगला. एवढेच नाही तर त्यांच्या चिंतनविश्वात अस्पृश्यता आणि जातिव्यवस्था या दोन गोष्टी शेवटपर्यंत राहिल्या. परिणामी "भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न" हा एक महत्त्वाचा संशोधनपर ग्रंथ त्यांनी प्रसिध्द केला. या विषयावरील १९३३ साली प्रकाशित झालेला भारतातील हा पहिला ग्रंथ होय.

Shinde.jpgया संदर्भात श्री. म. माटे म्हणतात, "पण प्रचाराची चळवळ निराळी, आणि या चळवळीला पायाभूत असलेली ग्रंथरचना निराळी. अर्थातच या रचनेकडे अनेक लेखक वळले. या विषयात ज्यांनी सगळी हयात घालवली होती, त्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी या विषयावरचे पुस्तक प्रसिद्ध केले. म. म. श्रीधरशास्त्री पाठक यांनीही शास्त्रविचारांचे मंथन करून आपला ग्रंथ लिहिला. नागपूरचे वृद्ध विद्वान भाऊजी दप्तरी यांचेही पुस्तक प्रसिद्ध झाले. वे. शा. सं. घुलेशास्त्री यांची रचना प्रसिद्ध झाली. समाजाची सेवा हेच आपले व्रत बनविलेले जे महादेवशास्त्री दिवेकर, यांचेही पुस्तक प्रसिद्धीची वाटचाल करू लागले. सन १९३३ साली मीही माझे पुस्तक लिहिले, व ते श्री. शंकररामचंद्र तथा मामाराव दाते यांनी फार औदार्य दाखवून लोकसंग्रह छापखान्यातून प्रसिद्ध केले." [१]

१९०५ पासून अस्पृश्यांचा प्रश्न ते फार पोटतिडिकीने मांडत असले आणि अस्पृश्यांमध्ये प्रत्यक्ष सहकुटुंब रहिवास करून कार्य करीत असले तरी अस्पृश्यांच्या दु:स्थितीसंबंधी तात्त्विक पातळीवर म. फुले वगळता कुणी लिहिलेले नव्हते. शिवाय वेद, उपनिषदे इ. असंख्य ग्रंथांचा धांडोळा घेऊन केलेले हे लेखन संशोधनाच्या दृष्टीने अपूर्व असेच आहे.

म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपले जीवितकार्य म्हणून अस्पृश्यसेवेचे कार्य केलेले असले तरी त्यांनी एवढेच कार्य केलेले आहे असे मात्र नाही. भारतीय प्रबोधन परंपरेच्या परिप्रेक्षात त्यांच्या कार्याचा आणि त्यांनी केलेल्या चिंतनाचा अन्वयार्थ लक्षात घेतल्यास म. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याची बहुविधता आणि मौलिकता अधिकच लक्षात येते.

....................................................१................................................................

इंग्रजांच्या आगमनानंतर आपल्या देशात अनेकविध ताणतणाव निर्माण होऊ लागले, तसे बदलही होऊ लागले. साधारणत: १९ व्या शतकाचा विचार केला तर असे जाणवते की क्रमाने इंग्रजांची सत्ता स्थिर होत गेली. गेल्या चारशे वर्षांपासून असलेली मोगली सत्ता सहजासहजी कोसळून पडली. परिणामी छोटेमोठे संस्थानिक आणि राजेही इंग्रजांपुढे निष्प्रभ होऊन गेले. दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत आणि ब्रह्मदेशापासून कराचीपर्यंत इंग्रजांचा एकछत्री अंमल सुरू झाला. या सत्तेविषयी सर्वसाधारण भारतीय मानसिकता अनुकूल अशीच होती. इंग्रजांच्या राज्यात काठीला सोने बांधून तीर्थयात्रेला जावे असे म्हणत असत. हे झाले सर्वसामान्यांचे. परंतु लोकहितवादी न्या. रानडे, ना. गो. कृ. गोखले यांच्यासारखी विचार करणारी माणसेही इंग्रज येथे येणे आपल्या दृष्टीने उपकारक आहे असे म्हणत होती. म. फुले यांचे म्हणणे जरा वेगळे आहे. ते म्हणत होते, इंग्रज येथे आहेत, तोपर्यंत शूद्रातिशूद्रांनी शिकून घेतले पाहिजे. आपला उद्धार करून घेतला पाहिजे. याचा अर्थ असा की इंग्रजी सत्ता आता अपरिहार्य आणि अटळ आहे याची खूणगाठ भारतीय मनाने बांधली होती. एवढेच नाही तर इंग्रज इथून जाणार नाहीत, असेही भारतीयांना वाटत होते.

समाजामध्ये सत्ताधारी कोण आहेत आणि कसे आहेत याला फार महत्त्वाचे स्थान असते. त्यातूनच एक कलासंवाद (discourse) सुरू होतो. एकोणिसाव्या शतकात सुरू झालेल्या या कलासंवादामधूनच आधुनिक भारतीय प्रबोधन आकाराला आले. या कलासंवादातील पहिला प्रश्न होता, इंग्रजांचे श्रेष्ठत्व कशात आहे? आपला पराभव का झाला? मुद्रणयुग आलेलेच होते आणि औद्योगिकरणाची पूर्वचिन्हे दिसत होती. अशा काळात हे प्रश्न भारतीयांना आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त करू लागले. त्यातूनच भारतात आधुनिक प्रबोधन युगाचा प्रारंभ झाला. किंबहुना संपूर्ण एकोणिसावे शतक हे प्रबोधनपर जाणिवा विकसित करणारे शतक आहे असे म्हणता येईल.

कलासंवाद करताना भारतीयांची मने अंतर्मुखही झाली. आपल्या समाजाविषयी चिंतन करू लागली. त्यातून त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला तो धर्माबद्दल. धर्म म्हणजे काय? पुरोहित सांगतात तोच धर्म आहे का? धर्म जर मोठी गोष्ट असेल तर सर्वांप्रती सारखेपणाचा भाव त्याच्याजवळ का नसावा? कर्मकांड म्हणजे धर्म काय? धर्माने स्त्रियांना आणि शूद्रातिशूद्रांना वाईट का वागवावे? हे आणि यासारख्या प्रश्नांच्या अनुषंगाने 'धर्म' या संकल्पनेबद्दल पुनर्विचार सुरू झाला. यातून बुद्धिवादी दृष्टीकोन विकसित होण्याचा मार्ग खुला झाला. यातूनच १८२८ पासून १८७३ पर्यंत धर्माचा उदारमतवादी मांडणी करणारे विविध संप्रदाय उदयाला आले. 'ब्राह्मो समाज,' 'प्रार्थना समाज', 'परमहंस सभा', 'आर्य समाज' आणि 'सत्यशोधक समाज यांची निर्मिती झाली. 'आर्य समाजा'चा अपवाद वगळता बाकी सर्व समाज आज नष्ट झालेले असले आणि असे का झाले याचा शोध घेण्याची गरज असली तरी, या समाजांनी केलेले कार्य अपूर्व असेच आहे यात शंका नाही. मुख्यत: मानवी विवेकाला या संप्रदायांनी आवाहन केले.

याचा अर्थ असा की धर्म ही चिकित्सेची बाब आहे आणि ती कालसापेक्ष व परिवर्तनशील असते याची जाणीव या कालखंडात झाली. संपूर्ण भारतीय इतिहासातील ही परिवर्तनाला कारण झालेली महत्त्वाची गोष्ट आहे. यातूनच आणखी दोन बाबी पुढे आल्या. सगळेच ईश्वराचे अंश असतील तर अस्पृश्यता, श्रेष्ठ-कनिष्ठ असा जातीभेद कशासाठी? शूद्रातिशूद्रांना हीनतम पातळीवरून का वागवले जाते? या सगळ्याच जाती कायम वंचित, शोषित का? शूद्रातिशूद्र हे हिंदू असले (हिंदू म्हणजे कोण हा पुन्हा गहन प्रश्न आहे!) तरी त्यांना आत्मोन्नतीचा प्रतिष्ठित मार्ग का नाही?

धर्मविचारांच्या अनुषंगानेच भारतीयांना स्त्रियांची दु:स्थितीही जाणवू लागली. सतीप्रथा, केशवपन, बालविवाह, बालाजरठ विवाह, बहुपत्नित्व या कुप्रथांबरोबरच, स्त्रिया 'ताडनके अधिकारी' कशामुळे असा प्रश्न निर्माण व्हायला लागला. स्त्री आणि पुरुष एकाच धर्माचे असूनही त्यांना वेगळी वागणूक कशासाठी असेही प्रश्न उपस्थित होऊ लागले. याचे पहिले उत्तर म. जोतिराव फुले यांनी दिले आहे. जगातील कुठलाही धर्मग्रंथ स्त्री ने लिहिलेला नाही असे त्यांचे उत्तर आहे. [२]

एकंदरीत काय धर्माचा पुनर्विचार तर सुरू झालाच, पण त्यानुषंगाने अस्पृश्य आणि स्त्रियांची हीनदशा याकडे भारतीय प्रबोधनाने अंगुलीनिर्देश केला आणि भारतातील संवेदनशील महात्मे जनक्षोभ सहन करून या प्रश्नांच्या अनुषंगाने कार्य करू लागले.

येथपर्यंतच्या चर्चेचा इत्यर्थ असा की भारतीय प्रबोधन जाणिवांमधे धर्म, शूद्रातिशूद्रांची अवनती आणि स्त्रियांची गुलामगिरी हे महत्त्वाचे प्रश्न ठरले. याशिवाय आणखी दोन महत्त्वाचे प्रश्न भारतीय प्रबोधनाने उपस्थित केले. शेतकर्‍यांच्या शोषणाकडे प्रथमत:च या काळात म. फुले यांच्या लेखनातून लक्ष वेधले गेले. शिवाय समाजामध्ये एकूणच आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि तेही धर्ममान्यतेने होत आहे याची जाणीवही प्रबोधनयुगात हळूहळू होऊ लागली. अर्थात आजही या प्रश्नाची जाणीव समाजाला जेवढी व्हायला हवी तेवढी होत नाही. ज्या दिवशी 'आर्थिक शोषण' हा मुद्दा आपल्या देशात केंद्रस्थानी येईल त्या दिवशी भारतीय प्रबोधनाची परिपूर्ती झालेली असेल आणि खर्‍या अर्थाने परिवर्तनही!

भारतातील कुठल्याही महापुरुषाच्या संदर्भात विचार करताना, त्याने प्रबोधन काळात निर्माण झालेल्या प्रश्नांसंबंधी कोणती भूमिका घेतली आणि कसा प्रतिसाद दिला ते पाहावे लागते. या सर्व दृष्टीने पहाता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अतिशय सजग, निरपेक्ष आणि प्रत्यक्ष सेवाभावाने प्रतिसाद दिला असेच म्हणावे लागते. किंबहुना त्यातच त्यांचे मोठेपण आणि द्रष्टेपण सामावलेले आहे असेही म्हणावे लागेल.

प्रस्थापित हिंदू धर्मसंबंधाने ते बालपणापासूनच विचार करीत असणार हे त्यांच्या चरित्रावरून दिसते. त्यांच्या जमखिंडीच्या घरी कुठलीही जात पाळली जात नव्हती, सर्व जातींच्या लोकांना त्यांच्या घरी मुक्त प्रवेश होता; शिवाय सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांपासून हे घर मुक्त होते. हे त्यांच्या स्वतःच्या घरचे जरी वास्तव असले तरी भोवतीचे सामाजिक वास्तव मात्र कमालीचे संकुचित व स्पृश्यास्पृश्य भावाने बरबटलेले असणार हे उघड आहे. प्रस्थापित हिंदू धर्माच्या चौकटीत आपणास समाधान मिळणार नाही, एवढेच नाही तर अस्पृश्यांसंबंधी काही कार्यही करता येणार नाही असे त्यांना महाविद्यालयात शिकत असल्यापासून वाटत होते हे त्यांच्या रोजनिशीतील २२ मे १८९८च्या उतार्‍यावरून लक्षात येते. असे कार्य करण्यासाठी दोन बाबींची आवश्यकता होती. एक म्हणजे धर्मासंबंधी उदार असणार्‍या संप्रदायात प्रवेश करणे आणि दुसरी बाब म्हणजे धर्माचा अभ्यास करणे. त्या दृष्टीने त्यांनी १८९८ मध्ये म्हणजे बी. ए. ला असतानाच प्रार्थना समाजात प्रवेश केला. प्रार्थना समाजामध्ये प्रवेश करणे, पुढे प्रचारक म्हणून कार्य करणे आणि अस्पृश्यांसाठी कार्य करणे ही त्यांची आंतरिक गरज होती. एका उदार संप्रदायात प्रवेश केला असला तरी एकूण धर्माचा अभ्यास करणे हेही त्यांना आवश्यक वाटले. १९०१ ते १९०३ या कालावधीत इंग्लंडमधील मँचेस्टर येथील विद्यापीठात त्यांनी धर्मशास्त्राचा अभ्यास केला. बौध्द, ख्रिश्चन आणि एकूणच तौलनिक धर्मशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे त्यांची दृष्टी अधिकच व्यापक आणि उदार झाली. अस्पृश्यांची सेवा करताना प्रस्थापित धर्माच्या बाह्य फोलपटांची त्यामुळेच त्यांनी पर्वा केली नाही. तसेच ते धर्माचे मूळ स्वरूप कोणते हेही शोधीत राहिले. त्यातूनच 'भागवत धर्माचा विकास' या सारखा प्रदीर्घ संशोधनपर लेख ते लिहू शकले. यातील महत्त्वाचे म्हणजे 'भागवत' ही गोष्ट वेदपूर्व कालापासून चालत आलेली आहे हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. शिवाय वेद म्हणजे प्रारंभीचा शब्द नव्हे हेही त्यांनी ठासून सांगितले आहे. [४] म्हणजे धर्म ही चिकित्सेची बाब आहे, कालानुसार त्यात बदल होतात हे त्यांनी आपल्या अभ्यासातूनच सिद्ध केले.

या सगळ्याचा अर्थ असा की, प्रबोधन काळात जी व्यक्तिमत्वे घडत होती, त्यांना प्रस्थापित धर्मव्यवस्थेत सुख आणि समाधान मिळणे शक्य नव्हते. कमालीचे शोषण आणि धर्मकांड म्हणजेच धर्म अशी त्याकाळातील धारणा होती. या काळासंबंधी म. शिंदे यांचे समकालीन व संन्यास धर्माचा स्वीकार करणारे स्वामी विवेकानंद म्हणतात, "आपल्या देशाबद्दल मला मुळीसुध्दा आशा वाटत नाही. जो तो कोंबड्या बैलांच्या त्याच त्याच जुन्या कथांचे चर्‍हाट वळत आहे. त्या कथांना ना शेंडा ना बुडखा! शिव ! शिव! तुम्ही नुसता खुळेपणा चालवला आहे. आज घंटी आणली, उद्या शिंग आणले, परवा चवरीची भर घातली. आज पलंग आणला, उद्या त्याच्या खुरांना चांदीचा पत्रा ठोकला, लोकांना प्रसादाची खिचडी खावू घातली, त्यांना लंब्याचवड्या गोष्टी सांगितल्या. थोडक्यात म्हणजे दुसरे तिसरे काही न करता केवळ बाह्य उपचारात तुम्ही मग्न आहात. ह्यालाच इंग्रजीत imbecility (शारिरीक व मानसिक दुबळेपण) म्हणतात. ज्यांच्या डोक्यात असल्या मूर्खपणाव्यतिरिक्त दुसरे तिसरे काही शिरत नाही त्यांना imbecile म्हणतात. घंटा डाव्या बाजूला वाजवायची की उजव्या बाजुला, गंधाचा टिळा कपाळावर लावायचा की आणखी कुठे लावायचा, दीप दोनदा ओवाळायचा की चारदा ओवाळायचा असल्या निरर्थक प्रश्नांचा विचार करण्याची ज्यांच्या डोक्याला सवय जडलेली आहे त्या लोकांना करंटे हे एकच नाव शोभून दिसते आणि आपण वरीलसारख्या कल्पनांना कवटाळून बसत असल्यामुळे भाग्यलक्ष्मीने आपल्यावर बहिष्कार टाकला आहे, आपल्याला लाथा खाव्या लागत आहेत, आपला धिक्कार होत आहे. या उलट पाश्चात्य लोक अवघ्या जगाचे धनी होऊन बसले आहेत. आळशीपणा व वैराग्य ह्या दोहोत आकाशपाताळाएवढे अंतर आहे हे लक्षात असू द्या. [५] (१८९४)

याचा अर्थ असा की तो काळ कमालीचा कर्मकांडाने भरलेला आणि खर्‍या धर्मापासून दुरावलेला होता. अशा काळात म. वि. रा. शिंदे यांचा प्रार्थना समाजातील प्रवेश, तौलनिक धर्माचा अभ्यास आणि अस्पृश्यांची सेवा या गोष्टी त्यांचे वेगळेपण सांगणार्‍या, त्यांचा अध्यात्मिक प्रवास रेखाटणार्‍या अशाच आहेत असे म्हणावे लागते. किंबहुना त्यांचा हा प्रवासच त्यांना "मी बौध्द आहे" असे म्हणेपर्यंत घेऊन जातो.

धर्माच्या पुनर्विचारातून निर्माण झालेले दोन महत्त्वाचे प्रश्न म्हणजे अस्पृश्यतेचा प्रश्न आणि स्त्रियांच्या दु:स्थितीचा प्रश्न हे होत याचा यापूर्वी निर्देश येऊन गेलेला आहे. या प्रश्नांना म. विठ्ठल रामजी शिंदे कसा प्रतिसाद देतात हे समजावून घेणे आवश्यक ठरणार आहे. साधारणतः १९०५ पासून ते अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी चर्चा आणि चिंतन करीत आहेत, असे दिसते. विविध स्वरुपाचे लेख इंग्रजी-मराठीत लिहिणे, सर्वेक्षणे करणे अशी कामे त्यांनी प्रारंभी केली आणि अस्पृश्यता सुधारणा घडविण्यासाठी १९०६ साली त्यांनी कामाला प्रारंभ केला. १९०६ साली त्यांनी "निराश्रित साह्यकारी मंडळी"ची स्थापना केली. भारतात बहुसंख्य भागात तिच्या शाखा काढल्या आणि १९२३ पर्यंत प्राण पणाला लावून अस्पृश्यांमधे काम केले. या काळात अशा प्रकारे काम करणारे ते भारतीय पातळीवरील एकमेव व्यक्तिमत्त्व होते. त्या काळात अस्पृश्य समाजात काम करणे किती अवघड होते याची आपण कल्पना करू शकतो. हिंदू समाजाची स्थिती सांगत असताना स्वामी विवेकानंदांनी अस्पृश्यांच्या धर्मांतराची मीमांसा केली आहे. धर्मांतराचे कारण येथील पुरोहितशाही आणि जमीनदारी पद्धती आहे हे त्यांनी रोखठोकपणे सांगितले आहे. [६] (१९८४)

भारतातील एकूण परिस्थितीबद्दल स्वामी विवेकानंदांनीच १८९३ साली म्हटलं आहे, "भगवंता, आम्ही का माणसे आहोत! आपल्या देशात चोहोकडे जे अस्पृश्य समजले जातात त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांना दोन घास अन्न देण्यासाठी आम्ही काय करीत आहोत? आपण त्यांना स्पर्श करीत नाही, आपण त्यांना 'दूर व्हा, दूर व्हा' असे म्हणतो! आपण काय माणसे आहोत? हे जे हजारो साधू ब्राह्मण आहेत ते आपल्या अवनत, दलित, गरीब बांधवांसाठी काय करीत आहेत? केवळ 'मला शिवू नका, मला शिवू नका' हाच घोष! आता धर्म कुठे आहे? [७] एवढेच नाही तर स्पार्टा देशातील लोकांनी तेथिल निग्रोंवर जेवढे अन्याय केले त्यापेक्षा अधिक अन्याय आपण अस्पृश्यांवर केले आहेत असेही स्वामी विवेकानंद म्हणतात. [८]

तसेच "जातीकल्पना हाच मोठ्यात मोठा विभाजक घटक आहे" असे सांगून आपल्या शिष्यांनी भंग्यांमधे काम केले पाहिजे असे सांगतात. [९] विशेष म्हणजे म. वि. रा. शिंदे भंग्यांच्या मुलांसाठी शाळा तर काढतातच, पण सहकुटुंब भंग्यांच्या वस्तीमध्ये जाऊन राहतात. एकंदरीत म. शिंदे जे कार्य करीत आहेत ते किती अवघड आहे, हे आपल्या लक्षात येते. शिवाय मिशन काढणे आणि मिशनरी वृत्तीने कार्य करणे ही काही भारतीय परंपरा नाही. शिवाय हे सारे ते निरपेक्ष वृत्तीने करतात. त्यांच्या या निरपेक्ष वृत्तीसंबंधी श्री. म. माटे यांनी एक हृद्य आठवण नोंदवली आहे. पुढे १९१७ साली श्री. म. माटे अस्पृश्य वस्त्यांमधून कार्य करायला लागले तेव्हा ते मार्गदर्शनासाठी महर्षींच्याकडे गेले होते. तेव्हा म. शिंदे म्हणाले, " ह्या कामाने अस्पृश्यांचा उद्धार किती होईल हे आपल्याला सांगता येत नाही. पण ते करीत राहिल्याने आपला मात्र उद्धार होत असतो." [१०] मला वाटते, यावर भाष्य करण्याचे काही कारण नाही.

अस्पृश्यांसंबंधी त्यांनी केलेले कार्यही बहुनिध स्वरुपाचे आहे. अस्पृश्यांसंबंधी सातत्याने लेखन करणे, सर्वेक्षण करून एक शष्ठांश 'बहिष्कृत भारत' आहे असे प्रतिपादन करणे, अस्पृश्यांच्या प्रश्नांसंबंधी संशोधनपर लेखन करून या प्रश्नांची मुळं किती खोलवर गेली आहेत ते सांगणे, या प्रश्नाच्या शोधासाठी ब्रह्मदेशापर्यंत जाणे, अस्पृश्यतेच्या प्रश्नासाठी भारतीय पातळीवर पाठलाग करणे व काँग्रेसच्या अधिवेशनात राष्ट्रीय प्रश्न म्हणून मान्यता मिळवणे (१९१७), म. गांधींना त्यांच्या कार्याचा एक भाग म्हणून जाहीर करावयास लावणे ही त्यांची कामे तर महत्त्वाची आहेतच. परंतु 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' मधून अस्पृश्य मुलांना अक्षरज्ञानाबरोबर व्यावसायिक शिक्षण देणे, अस्पृश्यता परिषदा भरविणे आणि सहभोजने आयोजित करणे हीही महत्वाची कामे त्यांनी केली आहेत.

मानवतावादी दृष्टीकोन आणि प्रेमपूर्ण साहचर्य यातूनच त्यांचे हे कार्य आकाराला आले असे म्हणता येईल.

प्रस्थापित धर्माच्या पुनर्विचारातून उपस्थित झालेला आणखी एक प्रश्न म्हणजे स्त्रियांची दु:स्थिती. स्त्रियांच्या गुलामगिरीच्या संदर्भात म. शिंदे कसा प्रतिसाद देतात हे पाहणेही तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे. त्या दृष्टीने पाहता पुढील गोष्टी जाणवतात-

१) त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा एक उदार आणि व्यापक दृष्टीकोन होता. खरोखर समाजस्थिती सुधारायची असेल तर स्त्रियांना सर्व क्षेत्रात सहभागी करून घेतले पाहिजे असे त्यांचे मत होते. त्या दृष्टीने त्यांनी आपल्या भगिनीस शिक्षण देऊन त्यांना मिशनच्या कार्यात आणि अन्य कार्यातही सहभागी करून घेतले होते.

२) देवदासींचा प्रश्न हा एक गंभीर प्रश्न आहे याची त्यांना जाणीव होती. हा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. एका देवदासीला ती आजारी असताना त्यांनी स्वतःच्या घरी आणले होते. विशेष म्हणजे त्यांच्या बहिणीने या देवदासीची फार मन:पूर्वक सेवा केली. तिला दुरुस्त केले.

३) अस्पृश्यांच्या ज्या परिषदा त्यांनी भरविल्या होत्या त्यात स्पृश्य आणि अस्पृश्य वर्गातील स्त्रियांसाठी एक स्वतंत्र दिवस राखून ठेवलेला असे. त्यात मनोरमाबाई रानडे, पार्वतीबाई जाधव, जनाबाई शिंदे आणि अन्य स्त्रियांनी नोंदवलेला सहभाग मोलाचा ठरला होता. संधी मिळाली तर स्त्रिया किती चांगला विचार करू शकतात, हेच यातून म. वि. रा. शिंदे यांनी दाखवून दिले होते.

४) त्यांनी जी कौटुंबिक उपासना मंडळे काढलेली होती, ती स्त्रियांच्या उन्नतीच्या दृष्टीने निश्चितच मोलाची होती.

५)म. ज्योतिबा फुले यांच्यानंतर म. वि. रा. शिंदे हेच एकमेव असे लेखक आहेत की, ज्यांनी आपल्या लेखनातून स्त्रियांचा गौरव केला आहे.

धर्म आणि स्थितीशील धर्माच्या पुनर्विचारातून निर्माण झालेल्या प्रश्नांकडे महर्षी कसे पाहतात आणि कोणती कार्ये करतात याचा विचार येथपर्यंत केला. भारतीत प्रबोधनाने आणखी एका प्रश्नाकडे अंगुलीनिर्देश केला होता. तो प्रश्न म्हणजे शेती आणि शेतकर्‍यांचा प्रश्न. भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे या प्रश्नाला अधिकच महत्त्व आहे, हे उघड आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, अनावृष्टी अशी अस्मानी व सुलतानी संकटे भारतीय शेतकर्‍याला नवी नव्हती. परंतु इंग्रज आल्यानंतर वाढलेल्या शेतसार्‍याने भारतीय शेतकरी मेटाकुटीला आलेला होता. त्यातून १८६०-६५ नंतर भारतभर शेतकर्‍यांचे उठाव झाले. या पार्श्वभूमीवरच म. ज्योतिबा फुले यांना 'शेतकर्‍यांचा असूड' हा अत्यंत धारदार शैलीतील ग्रंथ १८७३ साली प्रकाशित झाला. त्यापूर्वी लोकहितवादींनी या प्रश्नाला स्पर्श केल्याचे दिसते.

एकंदरीत काय की शेतीची दुर्दशा आणि शेतकर्‍यांची दु:स्थिती हा प्रबोधन काळात उपस्थित झालेला महत्त्वाचा प्रश्न. या प्रश्नाबद्दल म. फुले यांच्यानंतर जर कुणी मूलगामी विवेचन केले असेल तर ते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनीच हे आवर्जून सांगितले पाहिजे. इतके मूलगामी विवेचन एकूण भारतीय पातळीवर कदाचित महर्षींनीच केले असेल! १९२८ ते १९३२ या काळात महर्षींनी विविध ठिकाणी झालेल्या शेतकरी परिषदांमध्ये अध्यक्ष म्हणून भाग घेतला आणि भारतीय शेती आणि शेतकर्‍यांसंबंधी अतिशय मूलगामी असे विवेचन केले आहे.

वाळवे तालुका शेतकरी परिषदेमध्ये म. वि. रा. शिंदे यांनी शेतीसंबंधी विवेचन करताना शेती ही एकूण राष्ट्राची, समाजाची असते, पण वहिवाटदार मात्र शेतकरी असतो असे मत मांडले आहे. शेतकरी कोण याचेही त्यांनी विवेचन केले आहे. ते म्हणतात, "माझ्या मते शेतकरी म्हणजे तोच की जो आपल्या कुटुंबाच्या व आश्रितांच्या पोषणाला, शिक्षणाला आणि योग्य त्या सुखसोयींनी आवश्यक इतकीच, आणि आपल्या आप्तांकडून आणि आश्रितांकडून वाहवेल इतकीच जमीन बाळगतो आणि ती स्वतः आपल्या आप्तांच्या व आश्रितांच्या श्रमाने योग्य रीतीने खरोखर वाहतो." [११]

याचा अर्थ त्यांच्यासमोर जमीनदार नाहीत. साधा, कसणारा गरीब शेतकरी हा त्यांच्या चिंतनाचा विषय आहे. त्याची होणारी कोंडी प्रकट करणे त्यांना महत्त्वाचे वाटते. अशा शेतकर्‍यावर सतत अन्याय होतो, तरीही त्याला काही करता येत नाही. त्याला कारखान्यातील कामगारांसारखा संप करता येत नाही कारण सारे कुटुंबच शेतीवर अवलंबून असते. यातून मार्ग काढण्यासाठी जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन शेतकर्‍यांनी स्वतःची संघटना केली पाहिजे असे त्यांना वाटते. (संस्थानी शेतकरी परिषद, तेरदळ) [१२]

आणखी दोन महत्त्वाच्या बाबी म. वि. रा. शिंदे निर्देशितात. कारखान्याचे मालक असो की इतर भांडवलदार असोत, ते अंतिमत: शेतकर्‍यांचेच शोषण करीत असतात. म्हणून कारखान्यातील कामगार आणि शेतकरी यांनी एकत्र येऊन "भांडवलासुरा" विरुद्ध उभे राहिले पाहिजे हेही त्यांनी आवर्जून सांगितले आहे. [१३] ज्याच्या हाती चंदी त्याच्याच हातात लगामही असला पाहिजे असेही त्यांना वाटते.

भारतीय शेतीसंबंधीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती तर शेतीमालाचा भाव. शेतकरी हा या मालाचा निर्माता असतो. परंतु आपल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार मात्र त्याला असत नाही. आजही शेतकरी आपल्या या मागणीसाठी लढे उभारीत आहेत. परंतु शेतीमालाच्या भावामुळे संपूर्ण शेतीच कशी संकटात येते याची जाणीव त्यांना १९३१ सालीच झालेली होती. यापूर्वी त्यांनी "भांडवलासुरा"चा उल्लेख केलेलाच होता. आता १९३१ साली चांदवड तालुका शेतकरी परिषदेमध्ये अमेरिकन शेतकरी व्यापारावरही कसा ताबा ठेवतात व बाजारपेठेवरही ताबा चालवतात हे आवर्जून सांगतात. [१४] याचा अर्थ असा की भारतीय शेतीच्या दुरावस्थेचे कारण शेतीमालाला भाव मिळत नाही हे म. शिंदे यांनी ओळखले होते. एका प्रकारे दुखरी नस कुठे आहे ते महर्षींना बरोबर जाणवले होते. ही बाब इतकी महत्त्वाची आहे की स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे उलटून गेली तरी ही नस कशी दुरुस्त करावी हेच कळत नाही!

संस्थानांमधील शेतकर्‍यांमध्ये दलितांइतकीसुद्धा जागृती नसते, हे वास्तव सांगतानाच दलितांना तर शेतीच नसते हे सांगायलाही ते विसरत नाहीत. एवढेच नाही तर महाराष्ट्रातील शेतीचे मूळ मालक अस्पृश्यच आहेत, मराठे हे उपरे आहेत हेही ते आवर्जून सांगतात. [१५]

एकंदरीत भारतीय शेती व भारतीय शेतकरी या संबंधी केलेले महर्षींचे विवेचन आजही मार्गदर्शक आहे यात शंका नाही. या परिषदांच्या निमित्ताने ते शेतकरी चळवळींमध्येही कार्य करू लागले होते असे दिसते.

भारतीय शेतकर्‍यांचे शोषण शासन जसे करते, तसेच येथील व्यापारी आणि दलालही करतात याचे भान हळूहळू भारतीयांना येऊ लागले. इंग्रजी सत्ता प्रस्थापित झाल्याबरोबर तिच्या चांगुलपणाने प्रभावित झालेला भारतीय माणूस हळूहळू जागा होऊ लागला. इंग्रज सरकार आपले शोषण करणारे सरकार आहे हे त्याला १८७० च्या आसपास जाणवू लागले. मुस्लीम सत्ताधारी आणि इंग्रज सत्ताधारी यामधला फरक म्हणजे येथे कमावलेली संपत्ती इंग्लंडमध्ये पाठविली जाते असे भारतीय माणसाला जाणवू लागले. कच्चा माल स्वत: घ्यायचा आणि पक्का माल महाग विकायचा या दुहेरी शोषणाच्या झळा जाणवू लागल्या. यातूनच पुढे म्हणजे विसाव्या शतकात परकीय मालावर बहिष्कार आणि स्वदेशीचा वापर या दोन गोष्टी आल्या. त्यातून इंग्रज सरकारची नाकेबंदी होऊ लागली. पण हे फार पुढचे झाले. परंतु याची जाणीव एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस तीव्र होऊ लागली. दादाभाई नवरोजी यांनी हाच मुद्दा राष्ट्रीय पातळीवर लावून धरला होता हे प्रसिद्ध आहे.

याचा अर्थ असा की भारतीय प्रबोधनाने इतर अनेक बाबींबरोबरच आर्थिक शोषणाकडेही अंगुलीनिर्देश केला आहे. या आर्थिक शोषणाकडे महर्षी वि. रा. शिंदे कसे पाहतात हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.

या संदर्भातील त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी म. गांधी यांच्या उदयानंतरचा कालखंड समजावून घ्यावा लागतो.

..........................................-२-......................................................................

एकोणिसावे शतक हे इंग्रज राजवट स्थिरस्थावर होण्याचे शतक आहे याची नोंद यापूर्वीच केली आहे. विशेषत: १८५७ नंतर ते अधिक स्थिर झाले. वेगळे प्रशासन, वेगळी जीवनमूल्ये यांचा अनुभव भारतीयांना येऊ लागला. ख्रिश्चन मिशनर्‍यांद्वारे ख्रिश्चन धर्माचा परिचयही भारतीयांना होत होता. या सगळ्यांमधून इंग्रज राजवट स्थिर, अटळ आणि पराभूत न होणारी आहे असे भारतीयांना वाटत होते. त्यातून जो कालसंवाद (discourse) झाला तो स्वतःचे आत्मपरिक्षण करणारा होता. धर्माचा आणि एकूणच आपल्या भोवतीच्या जीवनाचा पुनर्विचार करणारा होता. परंतु ही परिस्थिती लो. टिळकांच्या उदयानंतर क्रमाने बदलू लागली. त्यामुळे येथून पुढच्या कालसंवादाचे (discourse) स्वरूपही बदलत गेले दिसते.

पहिल्या महायुद्धानंतर जगभरचे वातावरण बदलून गेले. रशियन राज्यक्रांतीचा परिणामही भारतीय मनांवर होऊ लागला. म. गांधी यांनी राजकारणाचे स्वरूप बदलले, ते व्यापक केले आणि त्यामुळे इंग्रजी सत्तेला हादरे बसू लागले. १९२० नंतर भारतीय वातावरण अधिक स्फोटक व संवेदनशील होत गेले. इंग्रजही भारतीय लोकांना मर्यादित प्रमाणात का होईना सत्तेत प्रतिनिधित्व देण्याच्या तयारीला लागले. साउथबारो कमिशन ही त्याचीच नांदी होती. मा. गांधी यांच्या आगळ्या वेगळ्या नेतृत्वाने स्वातंत्र्य आंदोलनात एक नवाच प्राण भरला होता आणि आता इंग्रज लवकरच जाणार, स्वातंत्र्य प्राप्त होणार अशी जाणीव भारतीयांना होऊ लागली होती. स्वातंत्र्य मिळताच येथे एक नवी राज्यव्यवस्था आकाराला येईल असेही वाटत होते. जाणार्‍या इंग्रजांचा येणार्‍या नव्या राज्यव्यवस्थेच्या घडणीत वाटा असणार होता. अशा सगळ्या परिस्थितीत सगळा कालसंवाद (discourse) बदलून जाणे स्वाभाविक होते आणि तो बदललाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेत कोण असणार? सत्ता नेमकी कशी असली पाहिजे?या आणि अशासारख्या प्रश्नांबद्दल चर्चा सुरू झाली. त्यातूनच हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील अंतर वाढत जाऊ लागले. तसेच शूद्रातिशूद्रांना सत्तेत अधिक वाटा मिळाला पाहिजे आणि त्यासाठी इंग्रजांवर दबाव आणला पाहिजे असे लोकांना वाटू लागले. उद्याच्या स्वातंत्र्याची आणि लोकशाहीची चाहूल लागली आणि सगळा माहौल बदलून गेला.

अशा सगळ्या वातावरणात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे नेमका काय विचार करीत होते याचा शोध घेणे आवश्यक आहे. हा शोध घेताना सर्वप्रथम आपल्या लक्षात येते ते त्यांनी छ. शाहू महाराजांना दुखवून मराठा मतदार संघातून निवडणूक लढवायची नाही हा घेतलेला निर्णय. अर्थात त्याचे परिणामही त्यांना माहित नसतील असे नाही. तरीही ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. अर्थात हा निर्णय घेताना नेतृत्व करणार्‍यांनी जाती-जमातीच्या पलीकडे असले पाहिजे असे त्यांना वाटत असणार. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांनी केलेल कार्य लक्षात घेता त्यांनी असा विचार करणे स्वाभाविक होते. आणखी एका गोष्टीची नोंद घेतली पाहिजे, ती म्हणजे राजकारण करणे हा त्यांचा पिंड नसला तरी त्याबाबत मात्र ते कमालीचे सजग होते. लो. टिळकांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा त्यांनी प्रार्थना समाजाच्या धोरणात बसत नसूनही त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती, ही बाब सर्वश्रृत आहे. पुढे त्यांनी सत्याग्रह केला आणि सहा महिन्यांचा तुरुंगवासही भोगला. याचा अर्थ एवढाच की राजकारणाबद्दल ते सजग होते. या सगळ्याचा परिपाक म्हणून त्यांनी १९२० साली बहुजन पक्षाची स्थापना केली. त्यानुषंगाने 'बहुजन' म्हणजे कोण याची सविस्तर मांडणीही केली. डॉ. गो. पु. देशपांडे यांच्या मते 'बहुजनवाद' मांडणारे भारतातील पहिले तत्त्वचिंतक म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे होते. [१६]

स्वातंत्र्यानंतर लोकशाही प्रस्थापित होणार असेल तर लोकशाहीच्या माध्यमातून 'बहुजन' हे सत्तेवर आले पाहिजेत अशी म. विठ्ठल रामजी शिंदे यांची भूमिका आहे. मग 'बहुजन' कोण हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. समाजातील बहुसंख्याक वर्ग म्हणजे मराठा वर्ग. तेव्हा बहुजन म्हणजेच मराठा वर्ग असे काही लोक म्हणताना दिसतात. किंवा राजकारणातून सिद्धही करतात. काही लोक ब्राह्मणेतर सारे म्हणजे बहुजन होत असे म्हणतात. या दोन्ही मांडणीतील धोके विठ्ठल रामजी शिंदे यांना नीटपणे माहिती होते. आयुष्यभर अस्पृश्यांमध्ये कार्य करीत असताना जातीव्यवस्था किती जीवघेणे रूप धारण करू शकते हे त्यांनी अनुभवलेले, पाहिलेले होते. म्हणजे जातीच्या पलीकडे गेल्याशिवाय देशाचा उद्धार होणार नाही अशी त्यांची खात्री होती. पुढे सहा वर्षांनी म्हणजे १९२६ साली 'मराठेतर कोण' या शीर्षकाचा लेख लिहिलेला आहे. या लेखामध्ये ब्राह्मणेतर, मराठेतर अशी 'इतर' शब्दाला प्राधान्य देणारी नीती आपल्याला मान्य नाही हे ते सांगतात आणि जातीय राजकारण शेवटी 'आंधळ्या कोशिंबिरी' सारखे असते असेही आपले मत नोंदवतात. [१७]

आपल्या देशात सगळ्यात अवघड कुठली गोष्ट असेल तर ती जातीव्यवस्थेला नकार देणे. असा नकार देणे व्यापक राष्ट्रीय हितासाठी आवश्यक असणारी बाब होय. परंतु दुर्दैवाने सर्वच जातींच्या अस्मिता तीव्र व्हायला लागतात तेव्हा समाजहित आणि राष्ट्रहित अशा गोष्टी दुय्यम होऊन जातात. अशा अवस्थेत 'डी-कास्ट' होणे ही एक तपश्चर्याच ठरते. अशी तपश्चर्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी निश्चितच केली होती. म्हणूनच ते स्वतः 'डी-कास्ट' होऊन काही वेगळी बहुजनवादी भूमिका मांडू शकले.

जात मान्य नाही, पण जाती तर आहेत, अशा परिस्थितीत जातींची आणि 'इतर'ची आंधळी कोशिंबीर खेळण्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या शोषित व वंचित एकत्र आले पाहिजेत ही त्यांची भूमिका त्यांनी बहुजन पक्षाच्या जाहिरनाम्यात फार विस्ताराने व चिकित्सकपणे मांडली आहे. सामाजिक सत्ता, संपत्ती आणि आधुनिक काळात शिक्षण या बाबींमुळे माणसाचे अगर जातीगटाचे शोषणाचे सामर्थ्य वाढते. तेव्हा ज्यांच्याकडे शोषणाचे सामर्थ्य आहे त्या सार्‍या घटकांना वगळून जे जे वंचित आहेत, शोषित आहेत त्या सार्‍यांनी एकत्र येण्याची आवश्यकता त्यांनी आपल्या बहुजन पक्षाच्या जाहिरनाम्यात मांडली आहे.

बहुजन पक्षाचा जाहिरनामा तयार करताना त्यांनी कुठल्याही जातीगटाला बाहेर ठेवले नाही. कारण सर्वच जातींमध्ये धनदांडगे असू शकतात, असतात. तेव्हा शोषित, वंचित व ज्यांचे अतिरिक्त उत्पन्न नाही असे सारेच घटक त्यांना 'बहुजन' वाटतात. मर्यादित उत्पन्न असणारा नोकरदार वर्ग, अतिरिक्त उत्पन्न नाही असे शेतकरी, केवळ उपजीविका चालेल एवढेच उत्पन्न ज्याला आपल्या व्यापारातून मिळते ते व्यापारी, मजूर, शेतमजूर असे सगळेच घटक एकत्र आले तर त्यांच्या दृष्टीने 'बहुजन' सिद्ध होतो. कुठलीही जातीय भूमिका न घेता आर्थिक निकषांवर 'बहुजनवादा'ची मांडणी करणारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे पहिले तर आहेतच, पण एकमेवही आहेत!

भारतीय प्रबोधनाने ज्या आर्थिक शोषणाचा निर्देश करून वंचितांच्या दुरावस्थेतेचे सूचन केले, त्याला म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यांनी मांडलेली भूमिका अपूर्व अशीच आहे, असे म्हणावे लागेल.

..................................................-३-...........................................................

म. वि. रा. शिंदे यांचा जन्म १८७३ चा. वयाच्या पंचविसाव्या वर्षी प्रार्थना समाजात प्रवेश करून त्यांनी आपल्या जीवित कार्याला प्रारंभ केला. १९३० साली त्यांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सत्याग्रह केला आणि त्यांना सहा महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. १९३३ साली त्यांनी 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न' हा महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रसिध्द केला. या दोन घटना म्हणजे स्वतंत्र भारताच्या घडणीतील त्यांची भूमिका स्पष्ट करणार्‍या अशाच आहेत. या सगळ्यांचा अर्थ असा की ते इतिहासाच्या अशा एका टप्प्यावर उभे आहेत की, जेथून त्यांच्या मागे संपूर्ण एकोणिसावे शतक प्रबोधन चळवळींसह पसरलेले आहे. आणि पुढे विसाव्या शतकाचा विस्तीर्ण कालपट, येणार्‍या स्वातंत्र्यासह पसरलेला आहे. आपण इतिहासाच्या कोणत्या टप्प्यावर उभे आहोत याचे भान ठेवून, प्रबोधन परंपरेचा सत्वांश ग्रहण करून विसाव्या शतकातील भारताच्या अभ्युदयाचा त्यांनी ध्यास घेतला. अध्यात्मिक पाया आणि सेवाभावी वृत्ती यातून करुणेचा वर्षाव करणार्‍या एका 'मिशन'ची स्थापना केली. (त्या काळात भारतात दोनच मिशनची स्थापना सालेली होती. एक मिशन होते म. रा. वि. शिंदे यांचे. तर दुसरे होते स्वामी विवेकानंदांचे रामकृष्ण मिशन.) कार्यात्मक प्रतिसाद देत एक ऐतिहासिक जबाबदारी त्यांनी पार पाडली. भारताच्या अभ्युदयाचा हाच मार्ग नाही का?

...................................................................................................................

संदर्भ :

१) माटे श्री. म. - चित्रपट : मी व मला दिसलेले जग, दु. आ. २५ डिसें, २०१०, देशमुख आणि कंपनी, पुणे, पृ. २७०-७१

२) फडके य. दि. (संपादक)- म. फुले समग्र वाङ्मय, म. रा. सा. संस्कृती मंडळ, आ. चौथी, पृ. ५०२

३) पवार गो. मा. - म. विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङ्मय , म. रा. सा. संस्कृती मंडळ, आवृत्ती १, पृ. २७९

४) मंगुडकर मा. पं.- क. विठ्ठल रामजी शिंदे लेखसंग्रह, पृ. ७

५) स्वामी विवेकानंद- स्वामी विवेकानंदांची पत्रे, रामकृष्ण मठ, नागपूर, सहावे पुनर्मुद्रण २००६, पृ. २०८-९

६) तत्रैव, पृ २५०-५१

७) तत्रैव, पृ. १०५

८) तत्रैव, पृ. १०

९) तत्रैव, पृ. ५१५

१०) माटे श्री. म. - तत्रैव, पृ. १६०

११) मंगुडकर मा. पं.- तत्रैव, पृ. २९१

१२) तत्रैव, पृ. २८०-८१

१३) तत्रैव, पृ .२९५

१४) तत्रैव, पृ. ३०२

१५) तत्रैव, पृ. २५४

१६) साधना साप्ताहिक- १९ मार्च २०११, पृ. २५ (गो. पु. देशपांडे यांच्या, ' The World of Ideas in Modern Marathi' या ग्रंथाच्या परीक्षणातील नोंद.)

१७) मंगुडकर मा. पं.- तत्रैव, पृ. २०२-२०७

- डॉ. नागनाथ कोतापल्ले