सूनी हर महफ़िल

दिनांक १० ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिद्ध गजल गायक श्री जगजित सिंग यांचे अल्पशा आजारानंतर मुंबईत निधन झाले. मेंदूतल्या रक्तस्रावामुळे त्यांना एक आठवड्यापूर्वी मुंबईच्या लीलावती इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मृत्यू समयी त्यांचे वय ७० होते. डॅश डॅश येथील डॅश डॅश स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा जन्म डॅश डॅश येथे डॅश डॅश साली झाला होता. डॅश डॅश डॅश डॅश डॅश डॅश वगैरे वगैरे…..

jagjitsingh.jpg

श्या मथळ्यात आणि शब्दांत जगजित सिंग बसवता येणार नाहीत. इतकं सरळ नाही हे प्रकरण! या माणसाने गायले आहे म्हणून शब्दन्‌शब्द पाठ केले त्याला असं किरकोळीत नाही कटवता येणार. वयाच्या आतापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर मनाच्या वेगवेगळ्या 'मूड' मध्ये त्याचीच घनगंभीर आवाजातली गजल, गीत, भजन आठवावे इतका हा माणूस आपल्याला भिडला आहे राव! आपल्यातून गेला हेही कसे म्हणावे! नुकत्याच आवडू लागलेल्या आणि मनात घर करू लागलेल्या 'ति'ला पाहून जेव्हा जगजितचे 'तुमको देखा तो ये खयाल आया' आठवले होते, तसेच आता ती गजल ऐकली की 'ती' आठवते . . . कसे काय म्हणायचे हा माणूस आपल्यातून निघून गेला?

तिने लिहीलेली पत्रं तिला सोपवतांना 'तेरे खुश्बू में बसे खत' माझ्यासाठीच गायलंय या बाबाने, असं सारखं वाटत होतं. 'तेरे खत आज मै गंगा में बहा आया हूं' या ओळीनंतर कसला जीवघेणा पॉज घेतला आहे या माणसाने . . . आणि नंतर अलगद म्हणून जातो 'आग बहते हुए पानी मे लगा आया हूं' . . . पुन्हा यातल्या प्रत्येक शब्दावर कळेल न कळेल इतका पॉज . . . प्रत्येक शब्दाला काळीज तुटतं राव!

मला आता बिलकूल म्हणजे अजिबातच नाही आठवत की जगजितची ओळख कशी झाली. पण त्यानंतर मी बहिणीच्या वाढदिवसाला जगजितचे कम्पाइलेशन असलेली 'अ जर्नी' नावाची डबल कॅसेट भेट दिली. बहिणीचा, खरं तर ती कॅसेट ऐकण्याशी, काही संबंध नव्हता. पण घरातून पैसे कसे मागायचे यावर मीच ही शक्कल लढवली होती. त्यावेळी पहिल्यांदा 'सरकती जाये है' ऐकलं होतं. जादू की काय म्हणतात तसा प्रकार झाला होता या गज़लेने! रिव्हर्स-फ़ॉरवर्ड करून तीच ती गजल ऐकत बसलो कितीतरी वेळा! माझ्या मित्राकडे तेव्हा ऑटो-रिव्हर्स आणि ट्रॅक सेन्स करणारा केनवूडचा डेक होता. मला त्याचा जबरदस्त हेवा वाटला होता. माझ्याकडे घरगुती असेम्बल केलेला 'टकारा' चा टेप होता. त्यात कॅसेट अडकली की अस्सा जीव जायचा!

त्यानंतर पुढचे काही दिवस 'तुम नही गम नही' ने वेड लावले होते. आणि मग त्यानंतर 'अपने हाथों की लकीरों मे', मग 'सलाम करता चलू' . . . असं काय नि काय! पहिल्या नोकरीतल्या पहिल्या पगाराने बहुतेक आईला साडी घेतली होती. पण जगजितची अजून एक कॅसेट घेतल्याचं अगदी स्पष्ट आठवत आहे. मग प्रत्येक पगाराला एक कॅसेट हे समीकरण अगदी पक्कं झालं होतं. गंमत अशी की नवीन घेतलेली कॅसेट महिनाभर ऐकून अगदी पाठ होऊन जायची. काही गजला समजायला थोडा वेळ लागला; कारण मध्येच अडणारे उर्दू शब्द! पण आवाजाची जादूच अशी की नाही समजलं तरी चालून जायचं. मग पहिला भर ओसरला की सावकाश ऐकत, पॉज-प्ले करत एकेक शब्द उतरवून घ्यायचे. नंतर ते एका वहीत नीट लिहून घ्यायचे. घरात इतरांना हा प्रकार शिक्षा वाटायचा. त्यावर मी एक उपाय शोधला. पियानोच्या कीबोर्डसारखी बटनं असलेला आणि आडवा ठेवावा लागणारा एक टेपचा सांगाडा भावाकडून दुरुस्त करून घेतला आणि मग रात्री बेरात्री जगजित ऐकत बसायचो. शब्द लिहून घेत असल्याने टेबल लॅम्प चालू असायचा. त्यामुळे बाहेरच्या लोकांना उगीच वाटायचे की पोरगा किती अभ्यास करतोय म्हणून!

एकदा अशीच पगारातून जगजितच्या लाईव्ह प्रोग्रामची एक कॅसेट घेतली आणि 'सरकती जाये है' चं लाईव्ह व्हर्जन ऐकलं. अफलातून अगदी! त्याआधी एकाच गाण्याची दोन व्हर्जन्स म्हणजे एक पुरुषाने तर एक स्त्रीने गायलेलं किंवा एक आनंदी आणि एक दुःखी मूडमध्ये . . . इतकंच माहीत होतं. त्यामुळे जुन्या गृहीतकाला तडा जातानाच एक जबरदस्त अनुभव मिळाला. पुढे एकदा प्रत्यक्ष कार्यक्रमात हीच गजल ऐकली तेव्हा अजूनच वेगळा अनुभव मिळाला.

जगजितच्या आधी गजल सादर करणारे, गाणारे मोठमोठे लोक होतेच. प्रत्येकाच्या नावाचा एक जबरदस्त दबदबा होता. असं असतांना जगजितच्या गजल गायकीला लोकांनी ज्या प्रमाणात आपलंसं केलं तितका मोठा प्रभाव सर्वसामान्य श्रोत्यांवर इतरांचा नाही पडू शकला. त्या मोठ्या नावांचा एका अर्थाने भीतियुक्त आदर वाटत राहिला, पण भरभरून प्रेम मात्र जगजितच्या गज़लवरच!

बर्‍याच जणांची 'गजल' या काव्यप्रकाराशी आणि गानप्रकाराशी ओळख करून देणारा आवाज हमखास जगजितचा असतो. आणि म्हणूनच हे पहिलं प्रेम श्रोत्यांच्या काळजात घर करून राहिलं असावं. जणू गजल ही जनसामान्यांसाठी नसते असा गैरसमज श्रोत्यांमध्ये होता. पारंपारीक अंगाने, रागदारीच्या वळणाने जाणारी आणि पंधरा-वीस मिनिटे गायली जाणारी फारसीमिश्रित उर्दूप्रचूर गजल सामान्य श्रोत्यांपासून आपसूकच दूर होणार! भारतात जिथे उर्दूची लोकप्रियता कमी होत होती आणि उर्दू ही मुस्लिमांची भाषा असा काहीसा गैरसमज होऊ लागलेला, अश्या काळात जगजितच्या आवाजाने गजलेचा खजिना सर्वसामान्यांपुढे खुला केला.

भारतीय जनमानसावर चित्रपट संगीताचा मोठ्ठा पगडा आहे. पाच सहा मिनिटांमध्ये गीत ऐकण्याची आवड असलेल्या आपल्या लोकांवर जगजितच्या चार-पाच शेर निवडून सुगम संगीताच्या अंगाने जाणार्‍या गज़लेने जादूच केली. जगजितच्या गजलेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे योग्य गझलेची निवड! सोप्या परंतु अर्थपूर्ण आणि सहज भावतील अश्या गजलेची निवड केल्यावर तितक्याच सुमधुर चालीत बांधलेली गजल कानांना जितकी गोड वाटते तितकीच मनाला भिडतेही! याचं एक साधं उदाहरण म्हणजे 'तेरा चेहरा कितना सुहाना लगता है' ही गज़ल! प्रेयसीचं कौतुक करणार्‍या एका रोमॅन्टिक गज़लेला तितकीच गोड आणि सतत गुणगुणावी अशी चाल असल्याने जो मूड तयार होतोय तो काही औरच! बरेचसे गजल गायक दुसर्‍या कोण्या संगीतकाराने लावलेल्या चालीवर गजल गात असतात. जगजित मात्र जितका जबरदस्त गायक आहे तितकाच; किंबहुना त्यापेक्षा मोठा संगीतकारही आहे. अश्या 'डेडली' कॉम्बिनेशनमुळे जगजित इतका अपील होत असावा.

गज़ल व्यतिरिक्त जगज़ितने हिन्दी गीत किंवा उर्दू नज़्म ही अगदी श्रवणीय करून गायल्या आहेत. 'तेरे खत' ही नज़्म तर सर्वश्रुत आहेच. त्याच चालीवर बांधलेली 'कोई ये कैसे बताये' ही नज़्म 'हीना' या मालिकेचे शीर्षकगीत म्हणून प्रसिद्ध आहेच. 'बुझ गयी तपते हुए दिन की अगन' ही पंडित विनोद शर्मा यांची हिन्दी रचना माझी खूप आवडती आहे. अजून एक म्हणजे 'वो कागज़ की कश्ती'! जगज़ित आणि चित्राच्या आवाजात ही रचना ऐकून जो आपल्या बालपणात गेला नसेल तो एक दगड म्हणावा लागेल. बालपणात घेऊन जाणारी आणि अगदी नॉस्टॅल्जिक करणारी अजून एक रचना म्हणजे 'मुझको यकीं है'! व्हायोलिनचा अगदी काळजाला हात घालणारा वापर हे या रचनेचं अजून एक वैशिष्ट्य. असाच व्हायोलिनचा वापर असलेली गजल म्हणजे 'सरकती जाये है' चं लाईव्ह व्हर्जन. पण यात त्याच व्हायोलिनने प्रसन्नतेचा चमत्कार करून दाखवला आहे.

'अपने हाथों की लकीरों में' हीसुद्धा माझी अगदी प्राणप्रिय गजल आहे. शब्दातली आर्तता जितकी जगज़ितच्या आवाजातून व्यक्त होते तितकीच मागे वाजत राहणार्‍या सॅक्सोफोननने काळजाला घरं पडतात. इथेच जगजितमधला संगीतकार आपल्याला दिसू शकतो. पारंपारिक गज़ल गायनामध्ये कधी न वापरलेली वाद्ये जगज़ितने स्वतःच्या गायकीमध्ये इतकी बेमालूम मिसळली की क्या कहने! संतूर आणि सतारीचा वेगवेगळ्या मूडमध्ये वापर केला. 'होटों से छू लो तुम' त्यातल्या गिटारशिवाय फिकं वाटायला लावेल इतकी गिटार त्या गज़लेचा भाग बनली आहे. संतूर तर जगजितच्या प्रत्येक लाईव्ह मैफिलीचा अविभाज्य भाग असते. गोव्यात राहत असतांना माझे घर मनुष्यवस्तीपासून तसे फटकूनच होते. आसपास सगळा इंडस्ट्रीअल भाग असल्याने रात्रीचा माणसांचा वावर बिलकूल बंद असायचा. अश्या वातावरणात 'कौन आयेगा यहां कितीतरी वेळा ऐकून झालं आहे. यातल्या,

दिल-ए-नादां न धडक ऐ दिल-ए-नादां न धडक,
कोई खत लेके पडोसी के घर आया होगा

या शेराने हमखास डोळ्यातून पाणी काढलं आहे. 'दिल-ए नादां' म्हटल्यावर पुन्हा जेव्हा 'ऐ दिल-नादां' म्हणत जगजित आवाज वर नेतो, तेव्हा आपल्यालाच समजूत घालत असल्यासारखा त्याचा स्वर पुढच्या 'कोई खत लेके' म्हणतांना अगदी निराश असल्यासारखा पुन्हा खाली येतो. जगजितच्या त्या खालच्या पट्टीतल्या घनगंभीर स्वराने तर कित्येक जणांना घायाळ केलं आहे. माझ्या एका मित्राला 'अपनी मर्ज़ी से' खूप वेड्यासारखं आवडतं. गोव्याला त्याच्या घराच्या गच्चीवर तो थोडा नॉस्टॅल्जिक झालेला असतांना त्याने मला खास फर्माईश करून 'अपनी मर्ज़ी से' म्हणायला लावलं होतं. मला फर्माईश करण्याचं कारण एकच की मला ती गजल पूर्ण येत होती. माझ्या बेसूर आवाजाला त्याने मनातल्या मनात जगजितच्या आवाजात परिवर्तीत करून ती गजल ऐकली होती. अश्याच जगजितच्या प्रत्येक गजलेशी एकेक आठवणी आपोआप पिच्छा करत येतात.

जगज़ितने गजल केल्या तितक्याच आर्ततेने भक्तीगीतं केली.जगज़ितने संगीतबद्ध केलेली आणि गायलेली रामधून ऐकली नसेल असा माणूस विरळाच. इस्कॉनसाठी गायलेल्या 'हरे कृष्णा' या अल्बममध्ये 'हरे कृष्ण हरे राम' ही धून तर तीन ते चार वेगवेगळ्या प्रकारे गायली आहे. प्रत्येकदा ते ऐकतांना वेगळ्याच दुनियेत आपण पोचतो.यातलंच मीरेचं 'हरी तुम हरो जन की पीड' आणि 'जय राधा माधव' कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा ऐकावसं वाटतं. थोडं फिलॉसॉफिकल अंगाने जाणार्‍या रचनांचा 'इनसाईट' हा अल्बम आहे. यातलं 'गरज बरस' ऐकावं.

दो और दो का जोड हमेशा चार कहां होता है
सोच समझ वालों को थोडी नादानी दे मौला

आणि

फ़िर मूरत से बाहर आकर चारों ओर बिखर जा
फ़िर मंदिर को कोई मीरा दिवानी दे मौला

यातली प्रार्थना जगजितच्या आवाजात सफल होईल अशी आशा वाटायला लागते.

शेकड्याने गजल, गीत, भजन अशी सांगितिक संपत्ती असणार्‍या माणसाच्या जितक्या रचना डोळ्यांसमोर येतात तितक्याच रचना मनात असतात. सगळ्यांचा उल्लेख येणं खूप अवघड गोष्ट आहे. पण जगजितने संगीतबद्ध केलेल्या आणि गुलज़ारने दिग्दर्शित केलेल्या 'मिर्ज़ा गालिब' या दूरचित्रवाणी मालिकेतील गालिबच्या रचनांचा उल्लेख अपरिहार्य आहे. चित्रा सिंगच्या लाडिक आवाजाचा योग्य वापर करून जगजितने कित्येक रचना दिल्या आहेत. 'ये न थी हमारी किस्मत' आणि 'दिल ही तो है' या रचना इतर नावाजलेल्या गज़लगायकांच्या आवाजातल्या ऐकूनही जगजित-चित्राचे व्हर्जनच कानांना गोड वाटते. 'आह को चाहिये' तर अफ़लातून आहेच. या रचना ऐकूनच गालिबच्या इतर रचना वाचायची आणि ऐकायची खुमारी आली होती. गुलज़ार साहेब जगजित न म्हणता ’गज़लजित’ म्हणतात ते काही उगीच नाही. जगजित-गुलज़ार जोडीचा 'मरासिम' हा अल्बम माझा अजून एक आवडता. 'हाथ छुटे भी तो रिश्तें नही छोडा करते' ऐकतांना प्रत्येकदा काहीतरी वेगळंच सापडतं. गुलज़ारच्या काव्याचा साधेपणा आणि तरीही त्यातून व्यक्त होणारी भावोत्कट जगज़ितच्या आवाजाने अगदी 'उभर के सामने आती है.

जिसकी आखोंमे कटी थी सदियां,
उसने सदियों की जुदाई दी है

इतक्या साध्या पण अर्थपूर्ण शब्दांना जगजितच्या आर्ततेने अगदी उंचावर नेऊन ठेवलं आहे.

आईना देखकर तसल्ली हुई,
हमको ईस घर मे जानता है कोई

एकटेपणात हमखास आठवतात त्या ओळी . . . त्यातल्या प्रत्येक नोटसह.

’फ़िर वहीं लौट के जाना होगा,
यारने कैसी रिहाई दी है’

यातल्या 'वहीं' वर घेतलेली एक हरकत पुढच्या ओळीतल्या 'रिहाई' ला अगदी पोरकं करून जाते.
या माणसाच्या आवाजाची जादूच अशी आहे. वर उल्लेख केलेल्या रचना जितक्या भावतात तितक्याच मनाच्या कोपर्‍यात लपून साद घालत असतात.

एक-दोन कॉलमच्या बातमीत जगज़ित मावणार नाही तसा तो अनेक आर्त रात्रींमध्ये पण नाही मावणार. अनेक कातर संध्या त्याच आवाजाच्या नशेत घालवल्या असूनही त्या सगळ्या वेळा जगजितला सामावू नाही शकणार. लांबी-रुंदी नसलेल्या पण अफाट खोली असलेल्या हृदयातच त्याची जागा आहे. मनात खूप काही आहे. जगजित गेला असं कुणी म्हटलं की त्याला मनाचे कोपरे आणि जगज़ितसोबतचे असंख्य क्षण दाखवावेसे वाटतात. पण तसे तरी का दाखवावे! गरजच नाही.

धुळ्याच्या थंडीमध्ये रात्री गच्चीवर बसून ऐकलेले 'कभी यूं भी तो हो' केव्हाही ऐकले की त्या वेळचे वातावरण भोवती आपोआप तयार होते. कुठल्याश्या चित्रपटात शाहरुखच्या मागे आपोआप जसे वादक दिसायला लागतात, तसेच त्या रात्रीचे धुके आणि त्याला भेदत चमकणारे पिवळे पथदीपक भोवती आहेत असेच वाटायला लागते आणि कानांत ऐकू येतो तो जगजितचा प्रेयसीला साद घालणारा आवाज . . . पण या ठिकाणी जगजितच्या आवाजाचे आम्ही प्रियकर त्याला साद घालत असतो . . .

सूनी हर महफ़िल हो कोई न मेरे साथ हो
और तुम आओ, कभी युं भी तो हो . . .

आणि वेळोवेळी त्याचा आवाज साद ऐकून अस्सा धावून येतो!

- गिरीराज

(प्रकाशचित्र आंतरजालावरून साभार)