तुझे नी माझे नाते अनामिक

rk_fun1.jpg

पुसते जग हे मला
नाते अपुले कोणते
न बोलले कुणी जरी
प्रश्न नयनी जाणते

ओढ लागते मना
ऐकू येता पावरी
श्वास हे दुणावती
नजर होई बावरी

तुझाच रंग घेऊनी
कुणी आभाळ रंगले
तू तमास स्पर्शता
नभ चांदण्यांनी शिंपले

आसमंती तूच रे
आत्मछंदी तूच रे
अंतरंगी तूच रे
मर्मबंधी तूच रे

गोपिकांचे प्रेम हे
श्याम रास खेळतो
आर्जवास राधेच्या
चक्रधारी भाळतो

ऐकू येते स्पंदनी
साद घालती वेणू
मी अशी गं नाचते
न पाहते कुणी जणू

नाते हे निष्पाप रे
का कुणी न जाणते?
ह्या जगाच्या नीतीला
नाव द्यावे कोणते?

नाव देता नात्याला
बंधनात बंधते
नाते अनामिक हे
नात्यांची वेस लांघते

- सत्यजित