'निर्माण' घडताना..

दुसरं म्हणजे समाजाची गरज काय आहे हे बघायचं असेल तर समाजात मिसळावं लागेल. आता आमच्या आयुष्याची पहिली ते पदवीपर्यंतची पंचवीस एक वर्षं शाळा-महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या आवारातच जातात. त्यामुळे प्रत्यक्ष आयुष्य कसं आहे हे आम्हाला कळतच नाही. जे कळतं ते फार फार तर प्रसारमाध्यमांमार्फत ज्या प्रतिमा आम्हापर्यंत पोचवल्या जातात त्याचमधून. तू दूरदर्शन पाहिलंस तर असं वाटेल की भारतात तरुण मुला-मुलींचं सुंदर असणं याची सर्वात जास्त गरज आहे.

borderpng.png

डचिरोलीच्या मागास आणि आदिवासी भागात सुमारे २५ वर्षांपूर्वी डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग या दोघांनी सर्च (शोधग्राम) ची स्थापना केली. आजचा त्यांच्या कामाचा आवाका पाहून अचंबित होतो आपण. त्यानंतर आजच्या तरुणांना दिशादर्शक म्हणून, आजच्या काळाशी सुसंगत एखादी चळवळ उभारावी या हेतूने 'निर्माण'चा जन्म झाला. शिक्षणाने संगणक अभियंता असलेला अमृत या उपक्रमाचे कामकाज बघतो आहे. फक्त अभय-राणी बंग यांचा मुलगा यापलीकडेही त्याची जी ओळख 'निर्माण'ने बनवलेली आहे, त्यासंदर्भात, त्याच्या विचारसरणी आणि जडणघडणीबाबत तसंच 'निर्माण'बाबत जाणून घेऊयात अमृतकडूनच.

Amrut.JPG


नमस्कार अमृत! 'निर्माण'ची मूळ संकल्पना काय आणि याची सुरुवात कशी झाली याबाबत सांगशील?

'निर्माण'ची मूळ संकल्पना आहे ती आई-बाबांची ( डॉ. राणी-अभय बंग). जून २००६ मध्ये त्यांनी 'निर्माण'ची सुरुवात केली. आई-बाबा ३०-३५ वर्षांपासून सामाजिक प्रश्नांवर काम करत आहेत, त्यांच्या पिढीतल्या असंख्य लोकांनी अशा विविध सामाजिक प्रश्नांवर काम केलेलं आहे. आता जे वेगवेगळे सामाजिक, वैज्ञानिक, तांत्रिक प्रश्न आपल्याला आजूबाजूला दिसतात, या प्रश्नांवर काम करायला नवीन पिढी कशी तयार होईल, या पिढीतल्या अशा मुलांचा शोध घेणं आणि त्यातून असा गट तयार करणं, हे 'निर्माण'च्या मागचं एक मुख्य उद्दीष्ट होतं. सध्या 'निर्माण'चा मूळ गाभा जरी तोच असला तरी त्यात बरेचसे बदल आणि सुधारणा कालौघात झालेल्या आहेत. नेमकं आपल्याला काय आणि कसं करायचंय याचा अंदाज हळूहळू येत गेला. दुसरा मुद्दा असा की, माझ्या पिढीचे महाराष्ट्रातले जे तरुण-तरुणी आहेत, त्यांच्यापैकी बर्‍याच जणांच्या भौतिक गरजा बर्‍यापैकी सुलभतेने पुर्‍या होत आहेत. त्यामुळे आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण करावं याचा शोध ही पिढी घेत असते. पूर्वी बहुतांशी लोकांचा बराचसा वेळ हा रोजी रोटी कमावण्यात जात होता. आता जी अर्थव्यवस्था आपल्याकडे आहे आणि जे शिक्षण आपल्याला मिळालेलं आहे, त्यामुळे गुजारा करणं हे काही फारसं अवघड नाहीये. केवळ पैसा आणि करिअर याच्यापलीकडे काही आहे का याचा शोध घेणारी बरीच तरुण मंडळी समाजामध्ये आज आहेत. एका बाजूला हे तरुण आणि दुसर्‍या बाजूला प्रश्न सोडवणार्‍यांची गरज या दोहोंचा मेळ घालायची आवश्यकता आहे.

'निर्माण'ची व्याख्या कशी करशील तू?

'निर्माण'ची व्याख्याच करायची झाली, तर 'निर्माण' ही समाजात बदल घडवू पाहणार्‍या तरुणांना शोधण्याची, त्यांना संघटित करण्याची आणि त्यांची जोपासना करण्याची प्रक्रिया (To identify, organize and nurture youth) आहे. 'निर्माण'संदर्भात तीन प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील - 'निर्माण'च का, 'निर्माण' काय आहे आणि कशा प्रकारे 'निर्माण'मध्ये काम होतं. 'निर्माण'च्या माध्यमातून आम्ही कुठल्या समस्येचं उत्तर शोधू पाहतोय? तर 'निर्माण' ही एक शैक्षणिक प्रक्रिया आहे. आता आमच्या पिढीतले बहुतांशी जण हे दहावी-बारावी, मग कुठली तरी पदवी किंवा अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शाखेत किंवा अजून कुठेतरी जातात. डोळ्यांवर झापड बांधून आम्ही चाकोरीत अडकलेले असतो. आम्ही जर हा प्रश्न स्वतःलाच विचारला की आम्ही जे शिकतोय ते का, आणि त्याचा उपयोग काय, तर त्याचं उत्तर आमच्याकडे सहसा नसतं. आपली शैक्षणिक व्यवस्था आपल्याला खूप माहिती देते, जर आपण नशिबाने चांगल्या महाविद्यालयात गेलो तर सोबत काही कौशल्येही शिकता येतात. पण एक गोष्ट निश्चितपणे मिळत नाही, ती म्हणजे उद्दिष्टांची जाणीव. माझ्या शिक्षणाचा उपयोग काय, हे मला कळतच नाही. आणि आम्ही आमच्या आयुष्याचा अर्थ किंवा उद्दिष्ट शोधत नसल्याने आमच्या आयुष्याचं उद्दिष्ट दुसरे कुणीतरी ठरवतात. हे दुसरे म्हणजे कोण, तर आपल्या भवताली असलेली बाजारव्यवस्था. ती ठरवते की आमच्या आयुष्याचा हेतू काय? ही आम्हाला सांगते की बाबा रे, तू अमूक तमूक महाविद्यालयातून संगणक अभियंता झालास तर नंतर अमूक कंपनीत नोकरी करायला हवी, मग तू वर्षानुवर्षे तिथे राहा, स्वतःचा बंगला बांध किंवा अजून काही. किंवा मी जर एम.बी.बी.एस. करुन बाहेर पडलो, तर त्याला काही किंमतच नाही. मग मी एम.डी, सुपर स्पेशालिटी करुन, शहरामधल्या गर्दीत मी पण माझी एक पाटी लावून दवाखाना सुरु करायचा. किंवा पाटीवर पाटी, मजल्यावर मजले चढवत, माझी प्रॅक्टिस वाढवायची, जमलं तर 'कट' प्रॅक्टिस करायची आणि ऐष-आरामात जगायचं. म्हणजे आमचं आयुष्य ही व्यवस्थाच ठरवते. आणि खूप कमी वेळा आम्हाला आम्ही काय करायचंय हे ठरवायची संधी मिळते.

domain.jpg

आता अजून एक गंमत आहे, मी जे काही आयुष्यात करेन असं म्हणतो ते मुख्यत: दोन गोष्टींवर अवलंबून आहे. एक म्हणजे मी कसा आहे, माझ्या व्यक्तिमत्त्वात काही विशेष गोष्टी असतील, काही कमतरता असतील. त्याच्या आधारावर ठरेल की मी काय करु शकतो, आणि दुसरा मुद्दा असा की बाहेरच्या समाजात कशाची गरज आहे? मी कशाची गरज असं जेव्हा म्हणतो तेव्हा कशाची कृत्रिम गरज आहे असं म्हणत नाहीये. म्हणजे बाजाराने तयार केलेली गरज अशा अर्थाने नव्हे. आता बघायला गेलं तर 'कोक' ही गरज आहे, की कृत्रिमरीत्या निर्माण केलेली गरज, हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. तर एक म्हणजे मी कसा आहे, आणि दोन म्हणजे समाजाची गरज, या दोहोंमध्ये जर मी पूल बांधू शकलो तर तो पूल हेच माझं करियर. हा पूल बांधायला मी उद्युक्त कसा होईन? दुर्दैवाने आमच्या शैक्षणिक प्रक्रियेत असा पूल बांधायला काही साधन उपलब्ध नाही. आमची शिक्षणव्यवस्था कधीच याचं भान करुन देत नाही की आम्ही कसे आहोत. पहिलीपासून ते पदवीपर्यंत हे भान मिळवण्यासाठी कुठलाच विषय अभ्यासक्रमात नसतो. सगळ्या परीक्षा कशा तर आम्ही काहीतरी रट्टा मारायचा आणि परीक्षेत जाऊन ओकायचा. पण माझा 'स्व' नेमका कसा आहे हे कुठेच येत नाही.

दुसरं म्हणजे समाजाची गरज काय आहे हे बघायचं असेल तर समाजात मिसळावं लागेल. आता आमच्या आयुष्याची पहिली ते पदवीपर्यंतची पंचवीस एक वर्षं शाळा-महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या आवारातच जातात. त्यामुळे प्रत्यक्ष आयुष्य कसं आहे हे आम्हाला कळतच नाही. जे कळतं ते फार फार तर प्रसारमाध्यमांमार्फत ज्या प्रतिमा आम्हापर्यंत पोचवल्या जातात त्याचमधून. तू दूरदर्शन पाहिलंस तर असं वाटेल की भारतात तरुण मुला-मुलींचं सुंदर असणं याची सर्वात जास्त गरज आहे. सर्वात जास्त जाहिराती प्रसाधनांच्याच असतात. जणूकाही तो आजचा कळीचा प्रश्न आहे. तर दोन समस्या अशा की शिक्षणव्यवस्थेत अशी काही तरतूद नाही, की ज्यातून आम्हाला आमच्या 'स्व' ची ओळख होईल आणि दुसरं म्हणजे समाजाला कशाची गरज आहे, किंवा वास्तव काय आहे, हे आम्हाला स्वतः अनुभवल्याखेरीज कळणार नाही. आता याला आपल्याला हाताळता येईल का, तरुण पिढी जी समाजातील प्रश्नांवर काम करायला उत्सुक आहे त्यांना त्यांच्या आयुष्याचा हेतू कळावा किंवा तो शोधण्याची त्यांची वाटचाल सुकर व्हावी यासाठी जी प्रक्रिया उभारली जातेय, ती म्हणजे 'निर्माण'.

'निर्माण'चं नेमकं स्वरुप कसं आहे त्याबाबत सांगशील का थोडं?

'निर्माण' ही काही नोंदणीकृत संस्था नाही. कार्यक्रमावर जास्त लक्ष देता यावं म्हणून मुद्दामच आम्ही असं केलं नाही. जरी हा 'सर्च' या संस्थेचा उपक्रम असला तरीही आम्ही आधीपासूनच ठरवलं होतं की 'निर्माण' फक्त सर्चपुरते किंवा गडचिरोली जिल्ह्यापुरते मर्यादित ठेवायचे नाही. सध्या महाराष्ट्रातल्या २० एक संस्था/तज्ज्ञ निर्माणशी जोडले गेलेले आहेत. महात्मा गांधी आणि विनोबांनी जी 'नयी तालीम' नावाची शिक्षणपद्धती सुचवली होती, की जिला आता Constructivist approach towards education (शिक्षणासाठीचा रचनात्मक दृष्टीकोन) असंही म्हणतात. तिचं एकविसाव्या शतकात महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी जे स्वरुप असेल तशाच पद्धतीने आम्ही 'निर्माण'ची रचना केलेली आहे.

आता यामध्ये आमची काही गृहीतकं आहेत. ती काय तर, आपण जेव्हा म्हटलं मला माझ्या 'स्व' ची ओळख झाली पाहिजे, तर आम्ही असं मानतो की 'स्व' ची ओळख ही काही गुहेत बसून होत नाही. ' स्व' हा प्रकाशासारखा आहे असं आम्ही मानतो. आपल्याला निव्वळ प्रकाश दिसत नाही. जेव्हा प्रकाश एखाद्या वस्तूवरुन परावर्तित होईल, तेव्हाच ती वस्तू दृश्य होते आणि ती वस्तू जेव्हा दृश्य होते तेव्हा आपल्याला प्रकाश दिसतो. तसंच 'स्व' बाबत. म्हणजे चला, आता 'स्व' ला शोधू असं म्हटलं, तर तो सापडणार नाही. जेव्हा आव्हान सामोरं येतं, तेव्हा 'स्व' दृश्यमान होतो. तेव्हा कृतीमधून आणि आव्हानांना सामोरं जाऊनच त्याची ओळख पटते. आता इथे आव्हान म्हणजे प्रत्येक वेळेला समरप्रसंग असायची गरज नाही. छोटी आव्हानं किंवा कृतीही असू शकते. यात सहभागी होऊन त्यामार्फत मला जे समाजाचं दर्शन होईल, त्यातूनच मला माझ्या 'स्व'ची ओळख होऊ शकते. आता 'स्व'च्या शोधासाठी जेव्हा मी समाजात मिसळेन तेव्हा आपोआपच मला समाज कसा आहे ते ही कळेल. तेव्हा आपले जे दोन्ही प्रश्न होते त्यांचं एकच उत्तर आहे हे. म्हणून आम्ही 'निर्माण'मध्ये अशा प्रक्रियेला प्राधान्य देतो, की ज्यामध्ये समाजातील वास्तवाला जाऊन भिडायचं. म्हणजे प्रत्येक वेळी आकांडतांडव केला पाहिजे किंवा क्रांती केली पाहिजे किंवा मोर्चेच काढले पाहिजेत असं नाही. मी एक दोन उदाहरणं देतो - सरकारची प्राथमिक आरोग्य केंद्रावर काय व्यवस्था आहे, ते तिथं प्रत्यक्ष जाऊन पाहायचं. किंवा कचर्‍याची काय समस्या आहे, ते कचर्‍याच्या गाडीवर बसायचं कचरा कामगारांसोबत, आणि उरळी देवाचीला त्या ठिकाणच्या डंपिंग ग्राऊंडवर जाऊन बघायचं. तिथे मग कचर्‍याची समस्या काय, ते खर्‍या अर्थाने कळेल. तर अशा प्रकारच्या शिक्षणप्रक्रियेला आम्ही 'निर्माण'मध्ये उत्तेजन देतो.

आमच्यामध्ये असे भरपूर तरुण-तरुणी आहेत, जे मोठ्या कंपन्यांतली नोकरी सोडून 'निर्माण'ला आले आहेत. त्यामुळे आपल्या बौद्धिक क्षमतेचा आणि दिवसभरातील कामाचा काहीतरी अर्थपूर्ण उपयोग व्हावा ही त्यांची यामागची मुख्य प्रेरणा आहे. प्रश्नांकडे बौद्धिक दृष्टीकोनातून हाताळायला मुलांशी चर्चा करायला वेगवेगळे तज्ज्ञ 'निर्माण'च्या शिबिरात येतात. विवेक सावंत येतील आणि महाराष्ट्राचा माहिती तंत्रज्ञानविषयक निरक्षरतेचा प्रश्न कसा सोडवायचा यावर सांगतील, अनिल अवचट येतील आणि त्यांनी मुक्तांगणच्या माध्यमातून दारूच्या प्रश्नावर काय काम केलं आहे ते सांगतील, राजेंद्र सिंग येतील आणि पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी राजस्थानमध्ये जे काम केलंय ते सांगतील, आनंद कर्वे येतील आणि ऊर्जेच्या प्रश्नावर बोलतील, अशी अनेक उदाहरणं आहेत. यामधून हे प्रश्न सोडवणं शक्य आहे, हा विश्वासही आमच्या मुलांमुलींत निर्माण होतो.

आमच्यावर झालेल्या वैज्ञानिक पद्धतीच्या संस्कारांनुसारच या प्रक्रियेची घडी बसवलेली आहे. त्यामुळे मनाला येईल ते करु असं न करता, प्रयोग करुन त्यांचं फलित काय ते बघून, त्यातून व्यवस्था सुधारत जायचं, असा आमचा खाक्या आहे. आमची 'निर्माण'ची संघटन समिती ४ लोकांची आहे. त्यांच्याकडे 'निर्माण'च्या रोजच्या कामकाजाची जबाबदारी आहे. त्यातला मी एक. बाकीचे तीन अमिताभ खरे, सायली ताम्हणे, उमेश खाडे. अर्थात 'निर्माण'मध्ये आम्ही ज्यांना रिपोर्ट करतो ते म्हणजे डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग आणि विवेक सावंत. मुख्यत्वेकरून यांच्याबरोबरच्या चर्चेत गोष्टी निश्चित होतात. पण 'निर्माण'मधल्या संशोधकांचा गटाबरोबर तसंच गिरीश सोहनी, आनंद करंदीकर, सुहास कुलकर्णी, नंदा खरे इ. लोकांसोबतही आम्ही वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा करतो. त्यांचीही मतं विचारात घेऊन त्याप्रमाणे बदल करतो. तसंच सहभागी मुलं-मुलीही अभिप्राय देतात. अशा सगळ्यातून कुठलाही निर्णय घेतला जातो. पण संघटन समिती तो राबवण्यासाठी जबाबदार असते.

Nirman Coordination Team.jpg

'निर्माण'च्या निवडप्रक्रियेबद्दल थोडं सांग.

आम्ही जागोजागी महाराष्ट्रात 'निर्माण'ची माहिती देत असतो. मी वाचकांनाही आवाहन करेन की जे जे त्यांच्या माहितीतले १८ ते २८ वयोगटातील तरुण-तरुणी आहेत त्यांच्या पर्यंत 'निर्माण'ची माहिती जरुर पोचवावी. आमच्या वेबसाईटवर २२ प्रश्नांचा अर्ज आहे तो भरुन पाठवायचा असतो. ह्या अर्जात तुम्ही कसे आहात, तुम्हाला काय वाटतं यावर भर दिलेला आहे. आम्हाला त्या व्यक्तीला जाणून घ्यायचं असतं. यातले काही प्रश्न अर्थातच व्यक्तीला समाजाशी जोडतात. बरीचशी मुलं अर्जात शेवटी असंही लिहितात की 'तुम्ही आम्हाला निवडा किंवा निवडू नका, पण हा अर्ज भरतानाच आम्हाला खूप मजा आली आणि विचार करायला लागला'. बरेच हौशे-नवशे-गवशे ते २२ प्रश्न बघून तिथेच गळतात.

त्यानंतर आमचा १० जणांचा गट महाराष्ट्रात जागोजागी जाऊन या मुलांच्या मुलाखती घेतो. मुलांना आम्ही प्रवास करायला लावत नाही, तर आम्ही त्यांच्याकडे जातो. तिथे मुलाखत घेतल्यावर आम्ही शेवटी ७० ते ८० मुलांची निवड करतो. आता 'निर्माण'ला ४-५ वर्षे झाल्यामुळे आमचे स्थानिक गट कार्यरत झालेले आहेत, आणि ही मुलं वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करत आहेत. तर या मुलांबरोबर जोडले गेलेले तरुण हा ही आमच्या निवडप्रक्रियेतला मोठा घटक ठरतो. कारण त्यांनी 'निर्माण'च्या गटाबरोबर काम करुन स्वतःला सिद्धच केलेलं असतं. आम्ही बरेच चेकपॉईंट्स ठेवलेत, जेणेकरून ती व्यक्ती 'निर्माण'साठी योग्य आहे की नाही हे त्याला आणि आम्हालाही कळावं. महाराष्ट्राच्या विविध भागांमधून, जळगावपासून ते कोल्हापूरपर्यंत, भंडार्‍यापासून ते अगदी सांगलीपर्यंत मुलंमुली येतात आणि या मुलांमुलींमुळेच या प्रक्रियेत जान येते. खरंतर तेच 'निर्माण'.

पण 'निर्माण' फक्त तरुणांसाठीच आहे का मग?

नाही, 'निर्माण' ही तसं बघायला गेलं तर एक वृत्ती पण आहे. ती काय म्हणते तर आंधळेपणाने आजूबाजूला जे सुरु आहे ते स्वीकारु नका, गोष्टींचा जरा वेचक-वेधक पद्धतीने विचार करुयात, फक्त आत्मकेंद्रित पद्धतीने न जगता आजूबाजूच्या लोकांचाही विचार करुयात, लोभ-आकर्षणांना बळी न पडता मी जरा अधिक उन्नत आयुष्याचा मार्ग चोखाळू शकतो का, हे चाचपून पाहूयात. हे तर प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात करु शकतो. तरुण मुलामुलींचा हा जो अर्थपूर्ण जीवनाचा शोध आहे, तो आपणही करु शकतो. असा शोध घेणारे आणि समाजात सकारात्मक बदल घडविणारे सगळेच म्हणजे आमचा 'निर्माण' समुदाय. तेव्हा एखादी ४० वर्षांची व्यक्ती 'निर्माण'चा भाग होऊ शकत नाही असं नाही. त्याला शिबिरात सहभागी होता येणार नाही कदाचित, पण या समुदायाचा भाग होऊ शकतो. मी असंही म्हणेन 'निर्माण'चा अर्ज बाकीच्यांनी जरुर पहावा. कारण तो जरी आम्ही आमच्या मित्रांकडून भरुन घेत असलो तरी तो काही तेवढ्याच वयोगटापुरता मर्यादित नाही. आमचे जे प्रश्न आहेत ते विचार करायला लावणारे आहेत. ते प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारुन पाहिले तर बरीच विचारांची स्पष्टता यायला मदत होईल असं मला वाटतं तसंच कुणाला त्या प्रश्नांमध्ये काही सुधारणा किंवा बदल सुचवायचे असले तर त्या सूचनांचं स्वागतच आहे. दर वर्षी आम्ही नवनव्या सुधारणा घडवित असतोच आमच्या प्रक्रियेत.

'निर्माण'मध्ये नक्की कसा प्रवास होतो 'निर्माणी'चा ते सांगशील का?

'निर्माण'ची आत्तापर्यंतची कार्यपद्धती कशी आहे ते समजून घेऊ. एखाद्या अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाप्रमाणे 'निर्माण'ची प्रत्येक तुकडी ही चार टप्प्यांमधून जाते. उदा. तुकडी पहिली असेल तर ती १.१, १.२, १.३ आणि १.४ अशा चार टप्प्यांमधून जाईल. जवळजवळ ६०-८० मुलामुलींचा एक गट हा चार शिबिरांच्या टप्प्यांमधून जातो. ही चार शिबिरं दीड वर्षांच्या कालावधीमध्ये आयोजलेली असतात. दर सहा महिन्यांनी आठ ते दहा दिवसांसाठी आमचं शिबिर होतं. ही शिबिरं जून-जुलै किंवा डिसेंबर-जानेवारीमध्ये असतात; म्हणजे तुम्ही शिकत असाल तर परीक्षा झाल्यावर येणं सोयीस्कर व्हावं. या चार टप्प्यात ढोबळ मानाने आधी 'स्व'ची ओळख, दुसरा आजूबाजूच्या समाजाची ओळख, तिसरा समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांचं बौद्धिक विश्लेषण आणि त्यातल्या केसेचचा अभ्यास आणि चौथा म्हणजे मी स्वतः आता काय करु ते ठरवणं. यात आम्ही भरपूर केसस्टडी, प्रत्यक्ष कृती अशा सगळ्यांचा वापर करतो. परत गेल्यावर सहा महिन्यात त्यांनी काय करायचं याचीही आखणी होते. या दरम्यानच नक्की कशात काम करायचं आहे याचा निश्चय होत असतो.

collage.jpg

आमच्या शिबिरात आमची सगळी सहभागी मुलं मुली चार ते पाच दिवस एका खेड्यात राहतात. एका खेड्यात एक व्यक्ती राहते. त्या खेड्यातल्या एखाद्या घरात त्या घरातल्यांप्रमाणे बनून ते राहतात. प्रवासी म्हणून तिथे जायचं नाही. ते जे काम करतील ते याने करायचं, ते जे खातात ते यांनी खायचं, जसे झोपतात तसं यांनी झोपायचं अशा प्रकारे समजून घ्यायचं. जर ते शेतावर रोवणी करायला चालले तर यांनीही जायचं. ती बाई जर लांबून पाणी आणत असेल सकाळी तर यांनी पाणी आणायचं. थोडक्यात तिथलं वास्तव समजून घ्यायचं. हा एक आमच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा मुद्दा आहे. आता मला तिथे येणार्‍या समस्या ही ' माझी स्वतःची वाढलेली गरज आहे का' याचा सोक्षमोक्ष त्या चार-पाच दिवसात लागतोच. जे आपल्याला अगदी नको-नको असं झालं असेल ते तसंच आहे का हे दोन दिवसातच कळून येतं. आणि तरीही आपल्याला असं वाटलं की हा खरंच प्रश्न आहे तर त्या लोकांशी बोलूनच ठरवायचं. ही प्रश्नांसोबतची आमची पहिली तोंडओळख.

त्यानंतर मात्र समाजातील प्रश्नांना आणि आव्हानांना आपल्याला बौद्धिकदृष्ट्या पाहता आलं पाहिजे. याचं कारण आपण आपली बौद्धिक क्षमता वापरली नाही तर हे प्रश्न सुटणं कठीण आहे. त्यामुळे सामाजिक प्रश्नांकडे केवळ भावनिक उमाळा म्हणून बघू नये. किंवा केवळ दोन हात करायचे त्याच्याशी म्हणूनही. तर त्यात आपण आपलं व्यावसायिक कौशल्य आणि बुद्धिमत्ताही आणायची गरज आहे.

सुरु करताना काय अडचणी आल्या? येत आहेत?

अडचणी म्हणायचं की काम करण्याजोगे प्रश्न म्हणायचं हे आपल्या वृत्तीवर अवलंबून आहे. तर अशी आव्हानं किंवा प्रश्न 'निर्माण'ची प्रक्रिया राबवताना आम्हाला सामोरे येतात. त्यातलं पहिलं आव्हान म्हणजे निवड. ज्यांना खरंच मनापासून असं काम करायचंय अशांना निवडणं. व्यक्तिमत्त्व विकास म्हणून किंवा चार मोठ्या लोकांची भाषणं ऐकूयात म्हणून 'निर्माण'ला कुणी यावं हे आम्हाला अपेक्षित नाही. पण अशा मुलांची पण बरीच संख्या असते. किंवा काही मुलं गोंधळलेलीच असतात आयुष्यात. त्यांची संख्या बर्‍यापैकी असते. पण जी खरीच वाहून घेतलेली, कष्टाळू आहेत, ज्यांनी छोटीमोठी धडपड सुरु केली आहे अशीही मुलं असतात. या सर्वांतून योग्य मुलं कशी निवडायची हा एक मोठा प्रश्न आहे.

दुसरी अडचण म्हणजे पैसा. ही सगळी प्रक्रिया चालवायला पैसा लागतो आणि तो सगळाच काही आम्ही मुलांकडून घेत नाही. आमच्या एक तुकडीचं एक शिबिर दहा दिवसांचं असतं. अशी चार वेळा शिबिरं म्हणजे चाळीस एक दिवस त्यांचा खर्च असतो. आणि त्यातला १/३ आम्ही मुलांकडून घेतो. त्यातही कुणाला जमत नसेल तर आम्ही शिष्यवृत्ती देतो. 'निर्माण'चा प्रसार करायचा, यातील संघटन गटालाही स्वतःला खर्च असतो, जागोजागी लोकांशी बोलायचं, तसंच काही मुलांना विद्यावृत्तीही देतो. या सगळ्याला वर्षाला वीस एक लाखांवर आमचं अंदाजपत्रक असतं. त्यामुळं हे पैसे उभारणं हे कायमच एक आव्हान असतं.

ही एक शैक्षणिक प्रक्रिया असल्याने तिची फळं मिळायला किंवा दिसायला थोडा वेळ लागतो. ताप आला, पॅरासिटामोल दिली, ताप उतरला अशा पद्धतीचं हे काम नाही. एखादा मनुष्यप्राणी विकसित व्हायला, त्यामधले बदल दिसून यायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे आज प्रक्रिया सुरु केली तर दोन-तीन वर्षांनी थोडेफार निकाल दिसू लागतात. त्यामुळे थोडी लांब पल्ल्याची प्रक्रिया आहे त्याला संयम लागतो. त्यामुळे अशावेळी विश्वास टाकणं किंवा मदत करणं याची खूप गरज असते.

प्रकल्पांचं स्वरुप आणि आताचे सुरु असलेले प्रकल्प - त्याबद्दल काही सांगू शकशील?

आमच्या शिबिरांचा जो आराखडा मी सांगितला त्यातून तुझ्या लक्षात आलंच असेल की ही मुलं-मुली समाजातल्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जातात आणि या समस्या सोडवणारे जे बदलांचे प्रणेते (changemakers) आहेत, त्यांना आणि त्यांच्या संस्थाना ते भेटतात. त्यांच्याबरोबर काम सुरु करतात. किंवा आमच्या संपर्कामध्ये कुठेही एखादी कामाची संधी असेल तर जसं की सांगलीमधल्या एका खेड्यात एका वैद्यकीय अधिकार्‍याची गरज आहे किंवा शेतकी संशोधनातला हा नवा प्रयोग आहे आणि तो अजून चार ठिकाणी करुन पहायचाय, त्यासाठी एखादा माणूस हवाय. तर आमच्या संपर्कामधल्या संस्था आम्हाला सांगतात की 'निर्माण'च्या युवक युवतींमध्ये आहे का कुणी भाग घेणारं? मग आम्ही आमच्या विदागारात शोधून त्याप्रमाणे त्यांना विचारतो की तुम्हाला यात काही करायचं आहे का? आणि मुलं मुली त्यात समाविष्ट होतात. अशा दोन्ही प्रकारे प्रकल्प शोधले जातात. त्यामुळे त्यांनी शोधायचं किंवा आजूबाजूला काही असेल त्यातून त्यांचा मेळ घातला जातो. अशा पद्धतीने ही प्रक्रिया पुढे जाते.

collage2.jpg

दुसरा पर्याय म्हणजे काही 'निर्माणी' सरकारी नोकरीही करतात जसं की वैद्यकीय अधिकारी किंवा तत्सम. काहीजण स्वतःचंच काम सुरु करतात. अर्थात त्याला आर्थिक मदत 'निर्माण'कडूनही मिळते. आमच्यातल्या काही जणांना विद्यावृत्ती मिळते वेगवेगळ्या संस्थांकडून. काही जण संस्थात अधिकृतरीत्या समाविष्ट होऊन काम सुरु करतात. बर्‍याचदा एखाद्या संस्थेतली मुलं मुली त्या त्या मार्गदर्शकाच्या हाताखाली काम करतात. संस्थेमध्ये सुद्धा किंवा प्रकल्पातदेखील बाकी सगळं व्यावसायिक वातावरण असतं. प्रकल्पाचा जो मुख्य आहे त्याच्याशी संपर्क साधायचा असतो, बोलायचं असतं. सामाजिक काम करताना काही नवीन, क्रांतिकारक असं कामाच्या बाबतीत आपण नसतो करत. तिथे खरंतर बर्‍यापैकी व्यावसायिक पद्धतीनेच काम करायचं असतं. मुद्दा इतकाच आहे की जे काम मी करतोय त्यामागची प्रेरणा काय, मी हे काम का करतोय आणि काम करायला कुठली समस्या घेतोय. इथे मुख्य फरक आहे. एकदा अशी गोष्ट निवडली की मग मात्र तन-मन-धन झोकून काम करावच लागतं. इथे कष्टांना पर्याय नाही.

आज ३०७ मुलामुलींच्या गटापैकी आज जवळजवळ ५० अशी आहेत की जे कुठला ना कुठला तरी प्रश्न घेऊन त्यावर पूर्णवेळ काम करत आहेत. ही संख्या पण दिवसेंदिवस वाढत जाईल कारण हे बाकीचे उरलेले कुठलंतरी शिक्षण घेत आहेत आणि त्यांचं शिक्षण येत्या किंवा पुढच्या वर्षी पार पडणार. त्यानंतर त्यातले काही यात समाविष्ट होतील.बरेच जण असे आहेत की जे फक्त अर्धवेळ जोडले गेलेले आहेत किंवा कधीकधीच कामात सहभागी होतात किंवा अजिबातच सहभागी होत नाहीत. त्याची कारणंही वेगवेगळी आहेत, कधी त्यांच्यावर बाकीच्या खूप जबाबदार्‍या आहेत म्हणून किंवा त्यांचं व्यक्तिमत्त्व एखाद्या उपक्रमाला सुयोग्य नव्हतं. पण सुदैवाने ही संख्या कमी आहे आणि त्याचं प्रमाणही कमी होत चाललं आहे. कारण आमची निवडप्रक्रियाही सुधारते आहे. त्यामुळे 'निर्माण'च्या पहिल्या तुकडीपेक्षा चौथ्या तुकडीला याचा फायदा झालय. एकतर 'निर्माण' जास्त लोकांपर्यंत पोचलंय आणि आमची निवडप्रक्रिया अधिक नेमकी झालीये. त्यामुळे ही संख्या कमी होते आहे. पण अशी मुलंमुली आहेत हे खरं. हे मान्य करावंच लागेल की कुठल्याही उपक्रमामध्ये तुम्ही जसं ठरवता तसं १००% होत नाही.

सध्या सुरु असलेले प्रकल्प म्हणशील, तर आमचा सजल कुलकर्णी जो जैवविविधतेचं शिक्षण घेतो आहे, त्याचं काम आहे ते गाई-बैलांचं वाण कसं सुधारता येईल यात. किंवा चारुता गोखले जी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे, ती गडचिरोलीच्या दुर्गम भागात जिथे मलेरियाचा खूप प्रादुर्भाव आहे तिथे मलेरिया आटोक्यात कसा आणता येईल यावर काम करते. प्रमोद पाटील हा माळढोक पक्ष्यांच्या संवर्धनावर काम करतोय. तन्मय जोशी हा पुण्यातल्या विश्रांतवाडी भागातल्या झोपडपट्टीतल्या मुलांना रोजगाराची काय साधनं मिळू शकतील, यावर काम करतोय. डॉ. सचिन बाराबदे, डॉ. विठ्ठल साळवे, डॉ. दीपक शिंदे, डॉ. पूनम संचेती, डॉ.तेजश्री शेलार ही आमच्यातली बरीच डॉक्टर मंडळी गडचिरोली, मेळघाट, कोल्हापूर, कोकण इथल्या दुर्गम भागात वैद्यकीय केंद्रात अधिकारी म्हणून काम करत आहेत. निखील जोशी, अतुल गायकवाड, अश्विन भोंडवे हे माहिती तंत्रज्ञान आणि अणू अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेले मोबाईलवरून आणीबाणीच्या परिस्थितीत संदेश पाठवण्यासाठी कार्यप्रणाली विकसित करत आहेत. एक गट रोजगार हमी योजना कशी प्रभावीपणे राबवता येईल यावर काम करत आहे. तसंच संतोष हा 'निर्माणी' उमरखेडच्या त्याच्याच गावाच्या विकासाचं काम करतो आहे. डॉ. वैभव आगवणे भरारी पथकाच्या माध्यमातून गडचिरोलीच्या अनेक भागात वैद्यकीय सेवा पुरवण्याचं आणि हृदयविकार, रक्तदाब वगैरे आजारांचं वाढतं प्रमाण यावर संशोधनाचं काम करतो आहे. संजय कांबळे हा मुंबईमधल्या झोपडपट्टीतल्या मुलांसाठी काम करतो. अशा प्रकारे सामाजिक काम करु शकणारे पण व्यावसायिक शिक्षण घेतलेले जे तरुण तरुणी आहेत त्यांना स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी काय पद्धत अवलंबिता येईल किंवा, ते कुठला सामाजिक व्यवसाय करु शकतात का ? त्यांच्यापैकी काही जणांना आपण बाहेरुन आर्थिक मदत करु शकतो का? अशा बर्‍याच पर्यायांचा विचार करता येऊ शकतो. यावर मायबोलीच्या वाचकांच्या सूचनाही स्वीकारार्ह आहेत.

'निर्माण' मध्येच पूर्णवेळ काम करायचं हे कसं ठरवलंस? कधी?

मी स्वतः पीआयसीटी या महाविद्यालयातून संगणक अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं आणि नंतर सिमँटेकमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. मी तिथे आठ महिने काम केलं आणि नंतर कंटाळा येऊन राजीनामा दिला. मला तिथे गलेलठ्ठ पगार होता. पण मी करत असलेल्या कामाचा उपयोग काय आहे आणि कुणाला आहे याची सुतराम कल्पना नव्हती. अमेरिकेत बसलेल्या कुणा गिर्‍हाइकाला कामकाज सोपं जावं म्हणून मी का सॉफ्टवेअर लिहू? माझ्या आजूबाजूला कितीतरी लोक उपाशी आहेत, कितीतरी लोकांना शिक्षणाची संधी नाहीये, कितीतरी लोकांवर अन्याय होतोय अशी सगळी परिस्थिती असताना मी कुठल्यातरी विचित्र समस्येवर काम करावं का? हा मला पडलेला प्रश्न होता. सगळ्यांनाच हाच प्रश्न पडावा असं नाही.

सुदैवाने आमच्या घरी स्वतंत्र विचारांची परंपरा आहे त्यामुळे घरातही कुणी कुणावर मतं लादत नाही. मी बारावीनंतर काय करावं, म्हणजे अभियांत्रिकी शाखेत जावं, का वैद्यकीय शाखेत जावं का क्रिकेटपटू व्हावं याबाबत आमच्या घरी पर्याय खुले होते. पण शेवटी निर्णय माझा मलाच घ्यायचा होता आणि आमच्या घरात असंही आहे की बाकीचे लोक त्यांचं मत जरुर मांडतील, पण शेवटी निर्णय ज्याचा त्यानं घ्यायचा आणि त्याबरोबरच त्याची जबाबदारीही स्वीकारायची. लहानपणापासून अशाच प्रकारे निर्णय घेतल्याने स्वतंत्र विचार करायचा हे तर होतंच. म्हणजे संगणक अभियांत्रिकीला प्रवेश हा निर्णय माझा होता, त्यानंतर सिमँटेकला नोकरी करण्याचा आणि ती सोडण्याचाही निर्णय माझा होता.

मी 'निर्माण'च्या आमच्या पहिल्या तुकडीचा विद्यार्थी. मी स्वतः 'निर्माण'मध्ये येताना मला नक्की काय करायचंय हे माहीत होतं असं नाही. आमचं पहिलं शिबिर हे १८ जून २००६ ला झालं. आणि त्यावेळी खूप व्यवस्थित निवडप्रक्रियाही नव्हती. पण अशा पद्धतीनं युवकांचं शिबिर होणार आहे आणि त्यात आपण काही मुद्दयांवर चर्चा करणार आहोत याची ढोबळ कल्पना होती. माझे मित्र, वर्गमित्र असे साठ-एक जण यात आलो. मी असा दावा मुळीच करणार नाही की आम्हा सगळ्यांना कल्पना होती की 'निर्माण' नेमकं काय आहे. पण ती एका शोधाची सुरुवात होती. दीड वर्षानंतर मात्र बर्‍यापैकी विचार झालेला होता. म्हणून मी निश्चय केला की आपण याच कामात उतरायचं आहे. तेव्हापासून म्हणजे २००८ पासून मी 'निर्माण'च्या संघटन गटाचा भाग आहे. मी स्वतःला काही 'निर्माण'च्या प्रक्रियेपासून वेगळा समजत नाही. मीही त्याचाच भाग. योगायोग असा की माझा प्रकल्पच 'निर्माण' आहे.

निर्माणला बाकीचे लोक कशी मदत करु शकतील?

मदत करण्याचे बरेच वेगवेगळे पर्याय आहेत. एक म्हणजे 'निर्माण'चा प्रचार आणि प्रसार करणं. निवड हे आमचं मोठं आव्हान आहे हे मी आधी सांगितलंच. त्यामुळे चांगल्या मुलांपर्यंत जी थोडी अस्वस्थ आहेत, वाहून घेतलेली आहेत, हुशार आहेत त्यांच्यापर्यंत 'निर्माण'ची माहिती पोचवणं ही देखील खूप मोठी मदत आहे. म्हणजे असं काही सुरु आहे तर तू अर्ज टाकून बघ. दुसरं आर्थिक मदत. जी लोक मोठ्या प्रमाणावर करु शकतात. आम्ही त्यांना पावती पाठवतो, त्यामुळे त्यांना आम्हाला पैसे मिळालेत हे कळतं. दुसरं ते आम्हाला वर्षाचा खर्च विचारु शकतात. आम्ही आमचं अंदाजपत्रक त्यांना दाखवू. जर त्यांना अमुक एका हेतूसाठीच पैसे द्यायचे असतील तर आम्ही त्याच कामासाठी वापरु. त्यांनी सांगितलं की तुम्हाला गरज लागेल तिथे वापरा तर तसं करु. अर्थात हे कुणी मागणी केली तरच. हा 'सर्च' च्या अंतर्गत उपक्रम असल्याने आम्ही वेगळा अहवाल प्रकाशित करत नाही. आमचा खर्चाचा अंदाज २० लाखांच्या घरात आहे. तो अर्थातच दरवर्षी वाढतोय. पण त्याच्यावर कुणाला काहीही प्रश्न असेल तर ते आम्हाला विचारु शकतात.

तिसरं, अर्धवेळ का होईना, गरजेपुरतं का होईना आपली बौद्धिक मदत द्यायची. समजा एखादी व्यक्ती एखाद्या विषयातली तज्ज्ञ आहे आणि कुणाला त्याबाबत मदत हवी असेल तर माझ्याकडे येऊ शकता, असं त्यांनी स्वतःहून आम्हाला सांगितलं , तर आमच्यासाठी खूप मोठी मदत बनते ती व्यक्ती. चौथं, आम्ही 'निर्माण'मध्ये वाचनसंस्कृतीला प्राधान्य देतो. तू आमच्या वेबसाईटवर सुचवलेल्या पुस्तकांची यादीही पाहिली असशील. जवळपास १०० पुस्तकं आम्ही त्यात सुचवली आहेत. त्यात अजून १०० वाढवता येतील. आम्हाला चांगली पुस्तकं भेट देऊ शकतात लोक. ती आम्ही आमच्या मुलांपर्यंत पोचवू.

आमचे 'निर्माण'चे मुलं मुली ज्या वेगवेगळ्या ठिकाणी पसरले आहेत तिथल्या त्यांच्या स्थानिक पातळीवरच्या कामात कुणी सहभागी होऊ शकतात. 'निर्माण'चा एखादा मुलगा तुमच्या शहरात आला काही कामानिमित्त त्याला एक दिवशी जेवायला बोलावू शकता किंवा राहण्याची सोय करु शकता. आमच्या वेबसाईटवर How can I contribute? नावाचं एक पेज आहे ज्यामधूनही लोक मदत करु शकतात किंवा त्यांनी आम्हाला फोन, मेल केली तरी आम्ही त्यांना त्यांच्या भागातल्या व्यक्तींच्या संपर्कात आणू.

या सगळ्यात आणि तुझी विचारांची बैठक तयार होण्यात अभय-राणी बंग यांचा हातभार किती? कशाप्रकारे?

मी किंवा आनंद आम्ही त्यांची रक्ताची मुलं. पण निर्माण ही अशी प्रक्रिया आहे की जिच्या माध्यमातून बर्‍याच मुलामुलींना अभय-राणी बंग यांची मुलं व्हायची संधी मिळते. आमच्या घरी आम्ही त्यांना अम्मा-नायना अशी हाक मारतो. आता 'निर्माण'मध्ये येणारा प्रत्येकच मुलगा किंवा मुलगी त्यांना अम्मा-नायना म्हणूनच हाक मारतात. आणि त्याच पध्दतीचं त्यांचं नातं असतं. ते दोघं आमचे आई-वडील असण्याचा जो फायदा आम्हाला होतोय, तो फक्त आमच्यापुरताच का मर्यादित राहावा? तो अजून ४०० लोकांपर्यंत पोचावा. आता त्यातून नक्की काय घ्यायचं आणि त्याचा वापर कसा करायचा हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं. मी केवळ अम्मा-नायना म्हणत त्यांच्या पदराला चिकटून राहू शकतो किंवा मी त्यांचं कामाला वाहून घेणं, त्यांचं 'करायचं ते सर्वोत्तमच' हा ध्यास, त्यांचं कठीण परिस्थितीतही न डगमगता काम करणं यामधून शिकून हे गुण माझ्याही अंगी बाणवू शकतो. पण त्यांचा सहवास आणि मार्गदर्शन ही मात्र सगळ्याच निर्माणींसाठी एक सकारात्मक गोष्ट आहे.

Dr Abhay & Rani Bang.jpg

आपण जे आहोत आणि आपलं व्यक्तिमत्व जसं आहे त्याचा वापर करुन जास्तीत जास्त चांगलं काम करुन स्वतःला कसं घडवू शकतो याचा ध्यास घ्यायचा, हे त्यांच्याकडून जरूर शिकण्यासारखं आहे. त्यांच्या कामाचं दडपण मात्र येत नाही. उलट त्याचा झाला तर सकारात्मक फायदाच होतो. दडपण येत नाही याची कारणं अशी असू शकतील की आमचा स्वतःवर असलेला विश्वास म्हणजे आपलं नाणं खणखणीत आहे तर आपण ते वाजवून घ्यायचं नीट. आणि जे काम करतो आहे त्यामागची भूमिका आणि विचार जास्त महत्त्वाचा आहे. लोक त्यावर काय म्हणतात हे तुलनेनं दुय्यम आहे. मी जे काम करतो आहे त्यामागं माझी वैचारिक सुस्पष्टता असणं गरजेचं आहे. त्यामुळे तिसर्‍या आणि चौथ्या वर्षाला आणि त्यानंतरही वाचायची संधी मिळाली, लोकांशी बोलायची संधी मिळाली, आजही मिळते त्यातून स्वतःला सारखं घासत-पुसत राहायचं. आणि ती सुस्पष्टता मिळवत राहायची. त्यातून तुम्हाला आत्मविश्वास येतो आणि कामामुळे तुम्हाला कळत राहतं.

खरं सांगायचं तर आपण जर योग्य कामात पडलो ना, तर बरेचसे संभ्रम पडतच नाहीत माणसाला. बर्‍याचदा काय होतं की आपण काम करणं सोडतो आणि उगाचच वैचारिक चर्चांमध्ये गुरफटून राहतो. त्यामुळे आपले संभ्रम खूप जास्त वाढतात. मला आईचं हे विशेष वाटतं की ती कधीच गोंधळत नाही. आता मी हे करु का ते? हा निर्णय घ्यावा की तो? असे प्रश्न तिला सहसा पडत नाहीत. तिला उत्तर माहीत असतं आतूनच. आणि ती करते. आणि त्या निर्णयाशी ठाम राहण्याचं धाडस तिच्याकडे आहे. मुळमुळीतपणा नाही. याचा नक्कीच आपल्यावर परिणाम होतो. आयुष्यात आपल्याला कशाला महत्त्व द्यायचंय, आपले मापदंड काय आहेत - बाहेरची जी व्यवस्था आपले मानदंड आणि मापदंड ठरवते ते भाडोत्री मापदंड आम्ही आमचे म्हणून स्वीकारतो. माझ्यासाठीचे मापदंड काय आहेत ते माझे मी ठरवायला हवेत. संगणक अभियंत्यानी अमूकच गोष्टी केल्या पाहिजेत अशी महाराष्ट्रातली मानसिकता आहे, म्हणून मी तेच करायचं असं नाही. बाहेरचे मापदंड झुगारून आपण आपले मापदंड तयार करावेत, हे ही त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.

अजून एक मुद्दा जो माझ्यावर परिणाम करुन गेला, तो म्हणजे 'निर्माण'चं माझं शिबिर सुरु असताना एक दिवशी संध्याकाळी बाबा असं म्हणाले होते, की Rani and I were blessed with lack of personal ambition (सुदैवाने राणीला आणि मला वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नव्हती!). मी त्या वेळेला ते वाक्य लिहून घेतलं होतं. मला असं वाटलं, की ते काहीतरी भारी बोलले आहेत. खरं सांगायचं तर मला ते फारसं कळलं नव्हतं. त्याचा जो शब्दशः अर्थ आहे तो तर लगेच कळतो, पण त्यामागचा गर्भितार्थ काही मला कळला नव्हता. जवळपास एक-सव्वा वर्ष लागलं त्याला. त्याकाळात मी माझे माझे अनुभव घेत होतो, वाचन करत होतो, 'निर्माण'ची प्रक्रिया वाढत होती, मी उत्क्रांत जीवशास्त्राचा त्यावेळी भरपूर अभ्यास केला, त्या नंतर सिमँटेकला गेलो. अंदाजे २००८ मधल्या मार्चमध्ये कधीतरी एकदा सकाळी अचानक बाबा जे म्हणाले होते, त्याचा अर्थ उमजला. माझे आईवडील समाजासाठी खूप महत्त्वाकांक्षी आहेत. म्हणजे समाज कसा घडावा, चालावा, यासाठी त्यांच्या मनात खूप उच्च मानकं असतात. म्हणजे 'कुछ भी किया तो चलता है', काहीही करा, कसंही राहा तरी ते चालवून घेऊ असं मानणार्‍यातले ते बिलकूल नाहीत. अन्याय दूर व्हावा, गरिबी मिटावी, सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभावं, चांगलं शिक्षण मिळावं अशा त्यांच्या सामाजिक महत्त्वाकांक्षा मोठ्या आहेत. पण माझं करिअर पुढे जावं, मला लोकांनी चांगलं म्हणावं, मला खूप प्रसिद्धी-पैसा मिळाला पाहिजे अशा त्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा जशा वगैरे नाहीत.

मला ज्या दिवशी हा अर्थ जाणवला, तेव्हा एकदम हलकं हलकं वाटायला लागलं. मला असं वाटायला लागलं की आपल्या अंगावरचे साखळदंड कुणीतरी काढून घेत आहे. आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला फुंकर न मारता, आपण त्याहीपेक्षा मोठ्या अशा सामाजिक महत्त्वाकांक्षेत स्वतःला विलीन करु टाकू शकतो असा विचार आला. आता माणसाला कुठलीच महत्त्वाकांक्षा नसेल तर तो कामच करणार नाही काहीच न करता बसून राहील. त्यामुळे समाजात असे बदल घडावेत अशी कळकळ वाटणं महत्त्वाचं आहे. मला हे १००% जमलंय असा माझा मुळीच दावा नाही. मध्येमध्ये स्वार्थ प्रबळ होतो, मग जातात काही दिवस नैराश्यात. पण परत स्वतःला या सगळ्याची आठवण करुन दिली की सुसंवाद साधला जातो. पण त्यातला मी-मी असा भाव जितका कमी करता येईल तितकं आपण मुक्त आणि आनंदी राहतो. हे जेव्हापासून लक्षात तेव्हापासून माझा प्रवास अधिक आनंददायी आणि सुकर होतोय.

http://nirman.mkcl.org/Downloads/NIRMAN_Data/3/NIRMAN_Application_Form.pdf

How can I contribute? http://nirman.mkcl.org/howcanicontribute.htm

- मुलाखतकारः अनीशा