मानसकन्या

एखाद्या नात्यात दिल्यापेक्षा आपण जास्त घेत आहोत, ही भावना त्या नात्याला आणखी दृढ करते, नाही का!

borderpng.png

खाद्या नात्यासंबंधी लिहिताना, नेहमी ते भूतकाळात लिहिले जाते. पण एखादे नाते उमलत असताना,
त्याबद्दल लिहिणे हे तर अतीव समाधानाचे!

एखाद्या नात्यात, माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे मुद्दाम सांगायची गरज नसते, कारण ते असतेच. आणि त्याचे असणे, हे गृहीतक नसून वास्तव असते . . . तर अशाच एका नात्यासंबंधी.

तिच्या आणि माझ्या वयात तब्बल ३५ वर्षांचे अंतर आहे. आणि या अंतरामुळेच या नात्याला निदान लोकांना सांगण्यासाठी, कुठल्यातरी रूढ साच्यामध्ये बसवावे लागते. तर मी हे नाते मानसकन्येच्या साच्यात बसवलेय. पण ती माझी जिवलग मैत्रीण आहे.

साधारण ९ वर्षांपूर्वी माझ्या जीवनात एक वादळ आले होते. त्यावेळी मी नुकताच मायबोली डॉट कॉम या मराठी संकेतस्थळाचा सभासद झालो होतो. मी तिथे माझी कैफियत मोकळेपणी मांडली होती.
अपेक्षेपेक्षा खूपच चांगला प्रतिसाद तिथे मिळाला. मला धीर देणारे अनेक मैत्रीचे हात पुढे आले. ते भावबंध मी आजवर जपलेत.

त्यावेळी तिच्या आईबरोबर तिनेही मैत्रीचा हात पुढे केला होता. बाकी सर्व मित्रमंडळींना माझ्याबद्दल माहिती असल्याने त्यात सहानुभूती होती, पण ते काही कळण्याइतके तिचे वय नव्हते. तिचा हात होता तो निखळ मैत्रीचा. आणि तिथेच आमच्या नात्याची रुजवात झाली.

अगदी जाणीवपूर्वक आम्ही हे नाते पितापुत्रीच्या नात्यापेक्षा वेगळे ठेवलेय. याला कारण, तिला बाबा आहेत, हे वास्तव आहे. आणि त्या धाग्यात मला ढवळाढवळ करायची नव्हती. म्हणून ती मला काका म्हणते. तिचा खास उच्चार दिनीशकाका!

तिची माझी ओळख झाली त्यावेळी ती सव्वाचार वर्षांची होती. तिचे वास्तव्य असते न्यूझीलँडला. आमचे पहिल्यांदा फोनवरच बोलणे होत असे. पण तिला चांगले मराठी बोलता येते (तिचे बाबा अमराठी आहेत), याचे मला खूप कौतुक वाटायचे. कारण आई आणि अधूनमधून आजीआजोबा सोडले तर तिच्याबरोबर मराठी बोलणारे कुणी नव्हतेच.

त्यावेळी ती बोलताना द्वैभाषिक बोलत असे. प्रत्येक वाक्याची सुरुवात, 'हे तुला माहीत आहे का', अशी होत असे. (म्हणजे डू यू नो समथिंग, चे मराठी भाषांतर.) कधी कधी मराठी इंग्लिशचे मस्त कडबोळे करून टाकायची. 'मम्मीने मला Let नाही केलं, तू तिला Tell करतो का?' अशा वाक्यरचना ती सहजच करून टाके.

आपल्यासाठी कुणाचा फोन आलाय याचा तिला फारच आनंद व्हायचा. फोनवरचे तिचे बोलणे अगदी ऐकत राहावेसे वाटे. त्यावेळी तिच्या काही ठाम समजुती होत्या. त्या म्हणजे, ज्याने फोन केलाय त्याने तो आधी ठेवायचा. म्हणून ती काही आधी फोन ठेवायची नाही आणि मला ठेवावासा वाटायचाच नाही.

ओळख झाल्यानंतर काही महिन्यांनी ती भारतात आली. आमची प्रत्यक्ष भेट व्हायच्या आधी, आम्ही दोघांनी एकमेकांबद्दल ज्या कल्पना केल्या होत्या, त्या प्रत्यक्ष भेटीत अगदी तंतोतंत जुळल्या. आणि नातेही अगदी लगेच दृढ झाले . . .

खरं तर मला भेटायला यायचे म्हणून तिने खास भारतीय ड्रेस घ्यायला लावला होता. पण त्या लांबलचक विमान प्रवासात ती अगदी थकून गेली होती. विमानात काही न खाल्ल्याने भुकेली पण होती. मला बघून लगेच खुलली आणि अगदी दोन मिनिटात ती माझ्या कडेवर होती.

त्या पहिल्या भेटीच्या सहवासात मी तिला आंबोलीला घेऊन गेलो होतो. तिकडे आम्ही भरपूर भटकलो. तिचे बोलणे ऐकत राहावे असे असायचे. खरे तर बोलताना तिचे हातवारे आणि डोळे यांच्याकडे बघत बसावे असे वाटे. आणि त्या तंद्रीत ती काय सांगते, याकडेच दुर्लक्ष होत असे.

ती मुळातच खूप बोलघेवडी आहे. कुणाशी म्हणजे कुणाशीही ती सहजसंवाद साधू शकते. आम्ही आंबोलीला असताना, तिथे एका मठात कुणा वृद्ध तपस्व्याचे वास्तव्य होते. तर हिने धीटपणे पुढे होऊन, तुम्ही एकटेच राहता का? तुम्हाला जेवायला कोण देतं? अशी विचारपूस केली होती. प्रत्येकाला कुणीतरी प्रेम करणारं आणि काळजी घेणारं असलंच पाहिजे, अशी तिची ठाम मनोधारणा आहे.

तिला घडवण्यात अर्थातच तिच्या आईचा खूप मोठा वाटा आहे. खरे तर तिने एकटीनेच तिला घडवलेय. तिच्या यशाच्या बातम्या ऐकल्यावर, माझी आई नेहमी म्हणते की, तिच्या आईची तपश्चर्या आहे ही!

आणि याचा प्रत्यय तिच्यासोबत वावरताना कायम येतो. तिच्या वयाच्या मुली जेवताना, तयार होताना जो हट्टीपणा करतात तो मला नवीन नाही, पण हिच्याबाबतीत खाण्यापिण्याचा कधी हट्ट म्हणून नसतो. ताटात पडेल ते मुकाट्याने खायचे, अश्या शिस्तीत ती वाढली आहे. आणि आपली तयारी आपले आपण करायची तिला अगदी लहानपणापासून सवय आहे. आपले लांबसडक केस विंचरून, त्याची मनाजोगती केशरचना करून, छानसा ड्रेस घालून ती अगदी पाच मिनिटात तयार होते. लहानपणी तर स्वत: तयार होऊन, माझे केस विंचरून द्यायची ती.

एखादी नवीन गोष्ट करायची असेल तर ती रीतसर आईची परवानगी विचारायची. त्यासाठी तिचा असा एक खास प्रश्न असायचा. मम्मी ते अलाऊड आहे का? या प्रश्नाची मला फार गंमत वाटायची. आणि मी काही खोडी काढली, तरी ती म्हणायची, ते अलाऊड नाही आहे.

तिच्या-माझ्या पहिल्या भेटीनंतर आमच्यात दर रविवारी फोनवरून बोलायची प्रथा पडली. खरं तर हा फोन असतो पाचेक मिनिटांचा पण आम्हा दोघांसाठी तो खूप महत्त्वाचा असतो. बोलायचे खास काही नसते, पण हे बोलणे माझ्यासाठी मात्र आठवडाभराची बेगमी असते.

ही प्रथा गेली आठ वर्षे अखंड सुरू आहे. तिच्याबाबतीत काही नवीन घडले तर आधी मला सांगायची तिला घाई असते. अगदी पहिल्यांदा ती ज्यावेळी वाचायला शिकली, त्यावेळी मुद्दाम मला फोन करून, एक धडा वाचून दाखवला होता. बासरी (रेकॉर्डर) वाजवायला शिकली त्यावेळी मला फोनवर तिने वेगवेगळ्या रचना वाजवून दाखवल्या होत्या. ड्रम्स शिकली तेव्हाही तसेच. या सगळ्या वाद्यांशिवाय ती पियानोही वाजवते आणि तिच्या शाळेच्या वाद्यवृंदात ती असतेच. आणि या वयातही ती इतर सहवादकांना पुढे यायची संधी देते हे विशेष!

तिला आईकडून कवितांचा वारसा मिळाला आहे. अगदी लहानपणापासून ती कविता करते. तिच्या कविता तिच्या शाळेच्या वेबसाईटवर झळकत असतात. तिच्या कवितांचे विषय आणि त्यातले विचार हे तिच्या वयाच्या मानाने फारच प्रगल्भ असतात. मी मुद्दाम तिला छेडून बघितले. ती या कवितांमध्ये कुठलाही आव आणत नाही, तर या तिच्याच भावना असतात. सगळ्यांबद्दल कणव आणि अपार कळवळा, हा तिचा स्वभावच आहे.

तिला घेऊन एकदा मुंबई विमानतळाजवळ फिरत होतो. तिने बहुतेक पहिल्यांदा भटके कुत्रे बघितले. त्याच्याकडे बघून तिला भिती तर वाटली नाहीच, उलट त्याला खाऊपिऊ कोण घालत असेल, याचीच काळजी वाटली.

तिच्या वयाला साजेसा अवखळपणा ती करतेच, पण वेळप्रसंगी खूपच समजूतदारपणा दाखवते. एकदा तिची आई खूप आजारी पडली. तर हिने तिथल्या इमर्जन्सी नंबरवर फोन करून अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली. फोनवर व्यवस्थित पत्ता सांगितला. आईला हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मग आईच्या मैत्रिणीला बोलावून घेतले. आणि त्यावेळी ती फक्त ९ वर्षांची होती.

तिच्या माझ्या पहिल्या भेटीनंतर मध्ये बराच काळ आमची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. तिच्या वाढदिवसाला मी न्यूझीलॅंडला यावे अशी तिची खूप इच्छा होती, पण मला ते शक्य झाले नाही. दर वाढदिवसाला ती वाट बघायची. आणि एका वाढदिवसाला तिने मला सरप्राइज दिले. बर्थडे प्रेझेंट म्हणून तिनेच माझ्याकडे यायचे ठरवले.

त्यावेळी मी गोव्याला होतो. न्यूझीलँडवरुन ती आईच्या मैत्रिणीसोबत आली होती. गोव्याच्या विमानतळावर मला बघितल्यावर तिने एस्कलेटरवरून धावत येऊन मला मिठी मारली. ते दिवस म्हणजे माझ्या घरी गोकूळच होते. तिच्या सोबतीला म्हणून मी माझ्या भाच्याभाचींना माझ्या घरी बोलावून घेतले होते. पण तशी गरज नव्हती. कारण आजूबाजूच्या लहान मुलांशी तिने तासाभरातच दोस्ती जमवली.

येताना भली मोठी बॅग घेऊन आली होती आणि गळ्यात चाव्यांचा जुडगा. प्रत्येकासाठी आठवणीने चॉकलेट्स घेऊन आली होती. नव्याने मिळालेल्या मैत्रिणींना स्वत:ची खेळणी पण देऊन टाकली.

घरात वावरत असताना समोरचा जे काम करत असेल त्यात ती चिमुकल्या हाताने मदत करतेच. ही पण तिच्या आईने लावलेली शिस्त आहे. ती शाळेतून आईच्या आधी घरी येते. आल्याआल्या आपले सगळे आवरून, ती कीचन आवरून ठेवते. सिंकमधली भांडी घासून टाकते. आईसाठी चहा करून ठेवते.

मी तिकडे गेलो की माझेही ती असेच लाड करते. स्वत: पिझ्झा वगैरे बनवून मला खाऊ घालते. तिच्या चिमुकल्या हातांनी ती सगळे करत असताना, तिला बघत असताना मी मनोमन सुखावतो. आता मात्र मी तिला तसे करू देत नाही. मीच तिला वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ घालतो. आधी तिला संकोच वाटायचा, आता मात्र असे लाड करू देते.

तसे तिचे लहानपण जरा स्ट्रगल करण्यात गेले. एकट्या पालकाचे मूल, म्हणून तिने ताण सोसलेच. त्या काळात आईची वाट बघत तिला शाळेतच एक दोन तास एकटीला थांबावे लागे. तसेच तिच्या आईने फार पुढचा विचार करून तिला लहानपणापासून कठोर शिस्तीत वाढवलेय. पण या सर्वाचा तिच्या स्वभावावर अजिबात विपरीत परिणाम झालेला नाही. तिच्या मनात कटूपणाचा लवलेश नाही. त्या काळात माझ्याबरोबर प्ले करायला कुणीच नाही, अशी बारीकशी तक्रार असायची, पण आता मात्र तीच मुलांना खेळवू शकते. आईबद्दल तिच्या भावना पण खूपच आदराच्या आहेत.

एक प्रसंग मुद्दाम लिहिण्यासारखा. एकदा आम्ही दोघे के एफ् सी मधे चिकनचे पार्सल आणायला गेलो होतो. तिथे चिकनबरोबर कोलस्लॉ देतात. तो तिला खूप आवडतो. पण आईलाही तो आवडत असल्याने तीच खाते, याची बारीकशी तक्रार तिने केली. मी म्हणालो, अगं मम्मीला सांग की, नाही खाणार ती! यावर तिची प्रतिक्रिया फार मजेशीर होती, 'पण काय करणार! कारण ती तर माझीच मम्मी आहे.'

ती वयाने आता मोठी झालीय हे सत्य स्वीकारणे मला खूपच कठीण जातेय. माझ्यासाठी ती छोटीशी बाहुलीच आहे. (तिने याबाबतीत माझ्याकडे नाही पण तिच्या आईकडे तक्रार करून बघितली.) तिकडे गेल्यावर मला फिरवायची जबाबदारी तिची असते. माझ्यासाठी बसच्या वेळा बघून ठेवणे, गरज वाटल्यास चौकशी करणे हे तर करतेच. पण मला अखंड सोबतही करते. अधुनमधुन मला आईसक्रीम हवेय का, अशी चौकशी पण करत राहते. हा माझा वीक पॉंईंट तिला चांगलाच माहीत आहे. सिग्नलवर रस्ता क्रॉस कसा करायचा वगैरे तर ती मला अगदी हात धरून शिकवते. तिथली फुलाफळांनी लगडलेली झाडे बघून मी फारच चेकाळतो, त्यावेळी मी कुठेही ट्रेसपासिंग करणार नाही, यावर ती बारीक लक्ष ठेवून असते. मला वाटतं, तिच्या नजरेतून मी एक नाठाळ, खट्याळ मुलगाच आहे.

मी तिथे गेल्यावर माझ्यासाठी काहीतरी भेटवस्तू घ्यायची असाही तिचा हट्ट असतो. माझ्या आवडीचा शर्ट आणि खाऊ ती मला घेऊन देते आणि त्यावेळी शिताफीने छापील किंमत झाकून टाकते.

मला माझे जनरल नॉलेज अधून मधून पाजळायची सवय आहे, पण याबाबतीत ती माझ्या बरोबरीने गप्पा मारू शकते. तिचे वाचन अफाट आहे. तिने एकदा माझ्याकडे हॅरी पॉटरची पुस्तके मागितली होती. सीडीज नको पुस्तकेच हवीत यावर ती ठाम होती. तिने सांगितलेले कारणही विचार करण्यासारखे आहे. ती म्हणाली होती, आय कॅन इमॅजिन बेटर!

तिच्या हुशारीमुळे ती शिक्षकांत खूपच प्रिय आहे. प्रत्येक शिक्षकाला ती आपल्यासोबत प्रोजेक्टमध्ये असावी असे वाटते. तिच्याबरोबर तिथल्या बाजारात फिरताना तिच्या ओळखीचे अनेकजण दिसतात, त्यावेळी मला तिचा अभिमान वाटतो.

संभाषणांत पण ती चतुर आहे. आणि यातही तिच्या मूळच्या स्वभावाला अनुसरूनच ती बोलते. एकदा तिला जरा बरं वाटत नव्हतं. ताप वगैरे आला होता. मी तिच्या कपाळावर हात ठेवून म्हणालो, आय अ‍ॅम सॉरी, बेटा. तर त्या तापातही ती म्हणाली, यू डोंट हॅव टू, इट इज नॉट युअर फॉल्ट (आदल्या दिवशी आम्ही उन्हात भरपूर भटकलो होतो). मी निरुत्तर झालो होतो.

ती अनेक वाद्यांत, खेळांत पारंगत आहे. पण सध्या अभ्यासाच्या रेट्यामुळे तिला सगळ्यासाठी वेळ मिळत नाही. यावेळी कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे, हे तिने आपणहून ठरवले आहे. तिच्या या विचारीपणामुळे तिच्याशी गप्पा मारताना, समवयस्क माणसाशी गप्पा मारल्यासारखे वाटते. ती लहान आहे म्हणून कुठला विषय टाळावा असेही वाटत नाही. पण आता माझी एक तक्रार असते, मी तिच्या मराठीला हसतो, म्हणून तिने माझ्याशी मराठी बोलणेच सोडून दिलेय. (आईशी मात्र ती मराठीतच बोलते.) त्या अजोड गोड वाक्यरचनांना मात्र मी आता मुकलोय.

माझ्याबाबतीत ती कमालीची पझेसिव्ह आहे. एकदा तिच्या डॉक्टरआजोबांच्या गावी गेलो होतो, तर तिने मला हात धरून आजोबांच्या सूतिकागृहातील सर्व कर्मचार्‍यांशी, हा माझा दिनीशकाका अशी ओळख करून दिली होती. न्यूझीलँडमध्येही ती माझ्याबद्दल मित्रमैत्रिणींना नेहमीच सांगत असावी, कारण तिथल्या तिच्या मैत्रिणी मला भेटायला उत्सुक असतात. पण एकत्र फोटो काढताना मात्र, ती माझ्या बाजूला कुणाला बसू देत नाही. ती जागा खास तिचीच असते.

माझ्या दिवसाची सुरवात माझ्या सेलवरचा तिचा फोटो बघूनच होते. 'ती माझ्या आयुष्यात नसती तर' हा विचारही मी करू शकत नाही. तशी ती अजिबात रडवी नाही, पण तिच्या आईने माझ्याजवळ तिची तक्रार केली, तर मात्र तिला खूप रडू येते आणि हो, मला टाटा करताना पण! पण त्यावेळी तो आमच्या दोघांचा एकत्र कार्यक्रम असतो. (माझी वहिनी समोर असेल तर, चालली शकुंतला . . . गुणगुणायला सुरुवात करते).

आपल्याला कुठल्या क्षेत्रात उच्च शिक्षण घ्यायचेय, याबाबतही तिने आधीच विचार करून ठेवलाय. त्या क्षेत्रातले तिचे यश बघण्याइतपत आयुष्य मला लाभो, हीच इच्छा.

अनेक नात्यांचा शुद्ध व्यवहार होताना दिसतो. त्याने/तिने मला काय दिले, मी काय देऊ हा विचार कायम असतो. पण या नात्यात मात्र अशा व्यवहाराला स्थानच नाही. तिच्या प्रेमाचे मी कधी मोल करूच शकणार नाही.

आज इतक्या वर्षांनंतर विचार करताना असे वाटते, की मी तिच्यासाठी फार काही करू शकलो नाही. पण तिने मात्र मला भरभरून दिले. तुझ्यासाठी काय आणू, यावर तिच्याकडून उत्तर मिळवणे फारच कठीण असते. काही नको, तूच ये, हेच कायम म्हणत असते.

आपण कुणालातरी फार हवेहवेसे वाटतोय, अशी मानसिक सुरक्षितता तिने मला दिली. या नात्यात माझा हात नेहमीच घेणेकर्‍याचा राहिलाय.

एखाद्या नात्यात दिल्यापेक्षा आपण जास्त घेत आहोत, ही भावना त्या नात्याला आणखी दृढ करते, नाही का!

- दिनेशदा