एक रंग नभामधला
हळूच शाईत मिसळून बसला
डोळ्यांमधल्या पावसाबद्दल
नकळतपणे लिहून फसला
एक फूल बागेमधलं
खिशामध्ये मुडपून बसलं
तिची वाट बघून बघून
हिरमुसून झोपी गेलं
एक गंध वार्यामधला
रानोमाळ फिरत बसला
संध्याकाळी दिव्यापाशी
तुळशीमध्ये विरून गेला
एक मन देहामधलं
धाव धाव धावत राहिलं
अखेर वाट संपली, मग
पालखीमागून चालत राहिलं
एक शब्द ओळीमधला
चुकून जगण्यामध्ये आला
एक क्षण जगण्यामधला
फुटून ओळीमध्ये गेला
- नचिकेत जोशी