पहिल्या टोस्टबरोबर तिच्या डोळ्यात रागाची एक हलकीशी झलक मला दिसली. पण ती आपली आई आहे आणि तिला थोडा राग रिझर्व करून ठेवावा लागत असेल अशा विचारात मी फारसं लक्ष दिलं नाही. पण मी दुसरा टोस्ट फस्त करून दुसर्यांदा चहा ओतून घेतल्यावर ती आत निघून गेली आणि दार लावून घेतलं.
आ
ई आणि मुलीचं नातंच काही वेगळं असतं. वर्षानुवर्षं या गोड नात्याबद्दल लोक लिहीत आलेत. त्यात आणि मी कशाची भर घालणार? पण प्रत्येक मुलीचं तिच्या आईशी वेगळ्या कारणांनी पटतं (किंवा पटत नाही). असा एक तरी घट्ट दुवा असतो जो काहीही झालं तरी तुटत नाही. तसा माझ्या आईमध्ये आणि माझ्यामध्ये एक घसघशीत दुवा आहे. तो म्हणजे वजनवाढीचा.
माझं वजनवाढीचं दु:ख फक्त म्हणजे फक्त माझी आईच समजू शकते. कारण तिच्याच कृपेने मला हे असले जीन्स मिळालेत; ज्यामुळे मला पौर्णिमेपासून ते अमावास्येपर्यंत साईझच्या जीन्स घेऊन ठेवायला लागतात. लहानपणी गोबर्या गालाचं गोंडस बाळ म्हणून मी लई फुटेज खाल्लं. तेव्हा खोलीतल्या समस्त शिशुसंप्रदायात मी अगदी उठून दिसायचे. आईला बर्याच जणांनी मला कुठल्याशा ग्राईपवॉटरच्या सुदृढ बालक स्पर्धेत घालायचे सल्ले दिले होते. नशीब माझ्या आईला वेळ नव्हता नाहीतर ते एक कटू बक्षीस आयुष्यभर बघावं लागलं असतं. आपण लहान असताना आई-बाबा काय करतील ते सांगता येत नाही. आपण बोलायला लागेपर्यंत आपला त्यांच्यावर काहीच कंट्रोल नसतो. त्यामुळेच मुलांचे घागरा घातलेले, कोआलासारखं काजळ घातलेले फोटो त्यांच्या बायकांना बघायला मिळतात.
साधारण सहा वर्षांची असल्यापासून मी आईला "डाएटिंग" करताना पाहतेय. यामध्ये खूप प्रकार आहेत. आणि अखंड भूतलावरची सगळी डाएट्स आईच्या हाताखालून गेली आहेत. त्यामुळे आपल्याला मोठं झाल्यावर असं काहीतरी करावं लागणार आहे, याची कल्पना माझ्या चिमुकल्या मनाला तेव्हाच आली होती. आधी आई घरगुती उपाय करायची. पण नंतर जसजशी तिची सामाजिक प्रतिमा (आणि वजन) वाढू लागली, तसं तिने वेगवेगळ्या महागड्या फिटनेस सेंटर्सना भेटी द्यायला सुरुवात केली. आणि साधारण दहा एक वर्षांतच मी तिच्या जोडीने हे सगळे प्रकार करू लागले. आमच्या घरात सकाळी सातनंतर झोपलेल्या व्यक्तीकडे अतीव करुणेने बघितलं जातं. बाबा सकाळी दोन किलोमीटर पोहून मग सायकल वरून ऑफिसला जातो. आई चार वाजताच उठून प्राणायाम, योगासनं करून मग आणि वर जीममध्ये जाते! एखाद्या वेळी कौतुकाने बाबाला मी आज एवढा व्यायाम केला असं सांगितलं की, "अजून वाढवू शकतेस!" असं अगदी निरागस मत व्यक्त केलं जातं! त्यामुळे व्यायामाच्या बाबतीतही "आय अम ट्राइंग टू स्टेप आउट ऑफ देअर शॅडो" म्हणायची वेळ येते.
एकदा मी आईच्या ऑफिसमध्ये कामाला असताना तिने तळवलकरांचं डीटॉक्स डाएटचं व्रत घेतलं. त्यात पहिल्या दिवशी नुसतं पाणी पिऊन जगायचं, दुसर्या दिवशी भाताची पेज, तिसर्या दिवशी फळांचा गाळीव अर्क असं एक एक दिवस एक एक क्षुल्लक वाढ करून आठवडाभर उपासमार करायचे टिच्चून पैसे घेतात.
पहिल्या दिवशी आईचा नूर आपण आपल्या शरीराला ही विश्रांती फक्त शरीरासाठी म्हणून देतोय, असा होता. हे कसं देवा-धर्मासाठी (आणि मुख्य म्हणजे नवर्यासाठी) नसून, आपल्या स्वत:च्या भल्यासाठी आहे अशी तृप्ती तिच्या चेहर्यावर झळकत होती. दुसर्या दिवशी सकाळी सकाळी मी तिच्यासमोर बसून जॅम, बटर आणि टोस्ट असा नाश्ता केला. पहिल्या टोस्टबरोबर तिच्या डोळ्यात रागाची एक हलकीशी झलक मला दिसली. पण ती आपली आई आहे आणि तिला थोडा राग रिझर्व करून ठेवावा लागत असेल अशा विचारात मी फारसं लक्ष दिलं नाही. पण मी दुसरा टोस्ट फस्त करून दुसर्यांदा चहा ओतून घेतल्यावर ती आत निघून गेली आणि दार लावून घेतलं.
तिसर्या दिवशी "माझ्याच बाबतीत असं का होतं?" असा जगातल्या हजारो लोकांना रोज पडणारा प्रश्न तिला पडला. आपण कसे इतके प्रयत्न करूनदेखील लठ्ठ राहतो आणि बाकीचे लोक रोज बटाटेवडे खाऊन देखील बारीक राहतात. जगात कसा राम उरला नाही. देवाच्या दारी कसा न्याय नाही असे अनेक विचार तिच्या मनात थैमान घालू लागले. मग चवथ्या दिवशी सकाळी सकाळी (वस्त्रगाळ ज्यूससाठी) लागणारं कलिंगड घेताना फळवाला घासाघिशीत तिला भारी ठरला, यामुळे तिचा कंठ दाटून आला. घरी येऊन एका कोपर्यात ती रिकाम्या पोटी अश्रू ढाळत बसली. मी येऊन, "आई, रडू नकोस, डीहायड्रेट होशील!" असं म्हटल्यावर तिच्या रागाची बिजली माझ्यावर कोसळली. त्यादिवशी ऑफिसमध्ये कित्येक बेसावध हरणांचा हकनाक बळी गेला. तिच्या खोलीतून बाहेर येणार्या प्रत्येक माणसाच्या चेहर्यावर एखाद्या घायाळ सशाची व्याकुळता दिसायची. मग तिच्या सेक्रेटरीने शक्यतो मॅडमकडे हे डीटॉक्स प्रकरण संपेपर्यंत नवीन खर्च घेऊन जाऊ नका, अशी सूचना सगळ्यांना दिली. पाचव्या दिवशी "एवढा नाश्ता करायची काही एक गरज नाही!" असं स्पष्ट मत माझ्या फळांनी सजलेल्या प्लेटकडे बघून व्यक्त करण्यात आलं. सहाव्या दिवशी संपूर्ण दिवस मौनव्रत आणि सातव्या दिवशी, रविवारी सकाळी सकाळी अचानक गरम गरम पॅटीस खाताना आईसाहेबांचं दर्शन झालं! मी आणि बाबाने जोरात हुश्श केलं.
पण बारीक होण्याबद्दल मला मात्र आई छान सल्ला देऊ शकते. कित्येक वेळा शाळेतल्या इतर बारीक मुलींसारखे कपडे मला घालता येत नाहीत, म्हणून मी हिरमुसली होऊन बसायचे. तेव्हा आई मला नियमित व्यायाम आणि आहार घेऊन झालेलं माझं भविष्य दाखवायची. आणि सोळाव्या वर्षी ते खूप दूर वाटलं असलं तरी आता तरी ते खरं झालंय! (अर्थात माझ्याही बाबतीत वजनाच्या डोंगर आणि दर्या असतातच). आम्ही दोघी मिळून वेगवेगळ्या कोशिंबिरी करायचो.
लहानपणी लठ्ठ असण्याचा एक फायदा म्हणजे जगात काहीही सोपं नाही, हे लहानपणीच लक्षात येतं. स्वत:चं वजन आटोक्यात ठेवणं जर इतकं अवघड असेल, तर बाकीच्या गोष्टींसाठी कंबर कसलीच पाहिजे. वजन वाढेल अशा कुठल्याच गोष्टी खायची सवय लागत नाही आणि कुठल्याही गोष्टी सोडताना फार त्रास होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप व्यायाम करून मनाला जी प्रसन्नता मिळते, ती लहानपणीच अंगवळणी पडते. त्यामुळे कुठल्याही दगदगीच्या काळात, तणावाच्या काळात व्यायाम सुटत नाही. आई आणि मी समदु:खी असल्यामुळे आईचे सल्ले मला जास्त जवळचे वाटायचे. पण बाबाची तर गोष्टच वेगळी आहे. त्याला गेली ३२ वर्षं डायबेटीस आहे. आणि तो त्याला लाडाने माझा "जिवलग मित्र" म्हणतो. त्याची साखर आटोक्यात ठेवण्याचे शेकडो प्रयोग करताना मी त्याला बघितलं आहे. आणि कुठल्याही गोष्टीला ताब्यात ठेवण्यासाठी रोज त्याची मोजणी करणं महत्त्वाचं आहे, हा नियम आई बाबा साखरेच्या आणि वजनाच्या बाबतीत रोज पाळतात. अडचणी आणि वजन या दोन्हीपासून पळून जाऊन त्यांना कमी करता येत नाही!
एकदा ट्रेडमिलवर चालताना आईनी वजनवाढीवर एक विडंबन गीत केलं. ते आम्ही चिपळ्या वगैरे घेऊन गाऊन दाखवतो.
देहाची तिजोरी, चरबीचाच ठेवा
वजन उतरो देवा आता, वजन उतरो देवा||
हालचाल करणे म्हणजे वाटे आम्हा शिक्षा
कोपर्यावर जाण्याकरिता करू आम्ही रिक्षा
चालणे विसरलो आम्ही, बसून करू धावा
वजन उतरो देवा आता, वजन उतरो देवा!
कॅलरींची करू आम्ही रोज लयलूट
तळलेले गोड आणि दाण्याचे कूट
कधी मधी आइसक्रीम खाऊ, कधी सुका मेवा
वजन उतरो देवा आता, वजन उतरो देवा!
तरी मिताहारी आम्ही, म्हणू वारंवार
वजन कमी होताच नाही, करू तक्रार
सडपातळ व्यक्तींचा मग करू आम्ही हेवा
वजन उतरो देवा आता वजन उतरो देवा!
- सई केसकर