संध्येच्या पारावरती विस्कटले ऊन्ह जरासे
मग उगाच ऐकू येती दिवसाचे क्षीण उसासे
संध्येच्या पारावरती कल्लोळ अस्वस्थांचा...
काळोख दाटुनी येतो उजळल्या गत जन्मांचा
संध्येच्या पारावरती प्रश्नांची बैठक भरली
न्यायनिवाड्याआधी शिक्षेची सुटका झाली
संध्येच्या पारावरती चुकलेले हंबर कानी
मन शांतपणाचे त्याला घालतसे चारापाणी
संध्येच्या पारावरती प्राणाची धडपड नुसती
हा देह सुटेना अजुनी; नि:स्तेज तेवते ज्योती
- कामिनी फडणीस केंभावी
ध्वनीमुद्रण साहाय्य: योगेश जोशी