लहानशा गोष्टी

सगळा वेळ काहीतरी कामे करत स्वत:ला गुंतवून घेतले म्हणजेच आयुष्य सत्कारणी लागत नसून हा 'निवांत बसून रहाण्यातला आनंद' पण घेतलाच पाहिजे हे लक्षात येतं आणि मग लगेच "आज मी येत नाहीये"चा फोन ऑफिसात करायला माझा हात नि:संकोच फोनकडे सरसावतो.

borderpng.png

"तू

माझ्याएवढी झालीस म्हणजे समजेल!" हा आई नावाच्या प्राण्याचा सर्वात आवडता डायलॉग असावा. लहानपणापासून ते आजतागायत सर्वांप्रमाणेच मीही तो ऐकत आलेय. आपल्याला न कळणारा कुठला तरी अगम्य सिनेमा पाहतांना आई नाक लाल करकरून का रडतेय? चांदोबातल्या गोष्टीतील दरिद्री विधवेसारख्या दिसणार्‍या कुणा बाईंना दरवेळी ती पैसे, साड्या कशाला देतेय? एकमेकांशी सदा कर्कश्श आवाजात बोलणार्‍या चुलत काका काकूंना डिवोर्स घ्यायचा आहे तर मुलासाठी म्हणून तडजोड करायचे नसते सल्ले का देतेय? या वेगवेगळ्या वयात मनात आलेल्या प्रश्नांना अनेकदा एकच उत्तर मिळायचं "तू माझ्याएवढी झालीस म्हणजे समजेल!"

आज मी तिच्याएवढी झाले आहे आणि अर्थात ती आणखी मोठी. हल्ली बाबांशी तिचे भांडण झाले की ते जरा जास्तच वेळ रेंगाळते, कामवाल्या बाईंचा अर्धा खाडासुद्धा ती अतितत्परतेने कापते आणि आजुबाजूला पोरांचा जास्त कलकलाट सुरू झाला की तिचे कपाळ आठ्यांचे जाळे विणायला घेते.

या सगळ्यावर "पूर्वी तू अशी नव्हतीस" असे मी म्हटल्यावर पुन्हा आजही तिचे तेच उत्तर असते, "तू माझ्याएवढी झालीस म्हणजे समजेल!". ती आताशा अशी का वागते हे मला आताही समजत नाही पण तिच्याएवढी झाल्यावर त्या गोष्टी मला समजतील असं मात्र हल्ली नक्की वाटतं.

लहानपणच्या आठवणी म्हणले की काही गोष्टी हटकून मला आठवतात. या आहेत अगदीच लहानशा, पण तिच्याएवढी झाल्यावर त्यातली गंमत आणि महत्त्व मला समजले म्हणून लिहाव्याशा वाटल्या.

lahanashagoshti_new.jpg"तुला जोप आली?" असं म्हणत माझ्या खोट्या खोट्या मिटलेल्या डोळ्यांच्या पापण्या जेव्हा लेकीने उघडून बघितल्या तेव्हा पटकन डोळे उघडत तिच्याशी मस्ती करत हसण्याच्या नादात लख्खपणे अगदी अशीच लहानपणची आठवण डोळ्यासमोर तरळून गेली. दुपारची जेवणे वगैरे आटोपून आम्हा भावंडांना 'झोपायला चला' म्हणून आई दामटून खोलीत नेत असे आणि मग "झोपा आता!" म्हणत पडदे ओढून सगळ्यात पहिले तीच झोपी जात असे. ती झोपली की दोनचारदा तिला हाका मारून ती खरंच झोपली का नाही हे तपासून पाहिल्यावर तिच्या अंगाअंगाशी खेटत, तिच्या हातावर डोके ठेवून कुशीत मला निर्धास्त झोप येत असे. पण तिच्या 'सर्वात आधी झोपण्याचं' रहस्य मात्र आत्ता इतक्या वर्षांनी मला परवा समजले.

अशीच एक सकाळ. माझे वय, अर्धवट शिंगं फुटलेले. आई पोळ्या लाटतेय आणि मी ओट्याशी तिच्या बाजूला उभे रहात तिला प्रश्न विचारलाय,
"मघाशी काकू तुला ड्रिंकबद्दल काय विचारत होती ? तू दारू प्यायलीस ??"
"हो. काल मामाकडे पार्टी होती ना, तेव्हा झाली ड्रिंक्स."
"ड्रिंक्स ड्रिंक्स म्हणू नकोस! सरळ दारू म्हण ना, मला अजिबात आवडलेले नाही तू दारू प्यायलेले!"

आई पोळ्या लाटणे बंद करून, मोठ्या आवाजात,
"ए, काय चाल्लंय? दारू तर दारू. काय योग्य काय अयोग्य हे मला आणि बर्‍याचशा मोठ्या लोकांना समजते. सिनेमातल्यासारखे दारू पिऊन रस्त्याकडेला झिंगत पडलेली दिसतेय का मी तुला? नाही ना! मग कधी तरी रिलॅक्स व्हायला, दुसर्‍याला कंपनी म्हणून ड्रिंक्स्; नाही, सॉरी, दारू घेतली तर त्याचे तुला स्पष्टीकरण मी देणार नाहीये. प्रमाणात केलेली कुठलीच गोष्ट वाईट नाही."

मी मुकाट्याने मान खाली घालून तिथून कलटी मारली. (आजही माझा दुसरा पेग संपत आल्यावर "नको रिपीट पुन्हा" हे तोंडातून निघते ते ’प्रमाणातच रिलॅक्स व्हावे’ची अ‍ॅटोमॅटीक अलार्मबेल कुठेतरी वाजते म्हणून की काय?)

मग अशीच एक आणखी उन्हाळी सुट्टीमधली सकाळ. कुठल्याश्या हिलस्टेशनच्या पंचतारांकित हॉटेलरूम मधल्या मऊमऊ रजईमध्ये गुरफटलेली.

". . . प्लीज सेन्ड टू कॉफीज्. शुगर सेपरेट." या आईच्या आवाजाने मला जाग येते. थोड्या वेळात आईने बाबा आणि तिच्यासाठी बोलावलेली कॉफी येते.
"मला पण हवी कॉफी आणि बरोबर ते कालचे चॉकलेट स्वीस रोल्स पण हवे."
"मग तू तुझे ऑर्डर कर की."
"मी? म... मी कसे करू... मला नाही येत."
"सात नंबर दाब आणि सांग रूम सर्विसला."
"नाही... म्हणजे मला नाही देता येत इन्ग्लिशमधे ऑर्डर... ते लोक मला हसतील"
"छे काही कुणी हसत नाही."
"दीदी हसते." मी रडक्या चेहर्‍याने तक्रार करताच दीदीने लगेच फिस्सकन हसून दाखवले.
"आता नाही हसणार ती. तू लाव फोन." आईने तिच्याकडे बघत डोळे वटारले.
"आणि काय बोलू?"
"ऑर्डर दे, न घाबरता. आमच्यासाठी पण आणखी एक सांग, टू कॉफी विथ शुगर सेपरेट. वन चॉकोलेट स्विस रोल आणि दीदीसाठी फ्रेश ऑरेंज ज्यूस."

मी मनाचा हिय्या करून रूम सर्विसचा नंबर दाबला आणि
"हॅलो आय अ‍ॅम स्पिकींग फ्रॉम रूम नंबर सेवन झिरो वन... नो नो... वन झिरो सेवन... अं अं...प्लीज टू स्वीस कॉफी विथ....नो नो.. आय मीन्.. अं अं......"
आणि मग घाबरून फोनच ठेवून दिला.
"आई........ मला नाही येत. तूच दे ना ऑर्डर."
"नाही तूच एकदा पुन्हा धीटपणे प्रयत्न कर बरं. नीट मनात एकदा ठरव आणि बोल. उचल फोन परत. रूम नंबर नाही सांगितलास तरी चालेल."

मी पुन्हा एकदा मनात उजळणी करत, हातात रिसिव्हर घट्ट धरत बटने दाबली.
"हॅलो, प्लीज सेन्ड टू कॉफी. शुगर सेपरेट. वन चॉकोलेट स्विस रोल अ‍ॅन्ड वन फ्रेश ऑरेंज ज्यूस."
इंग्लिशमध्ये, न अडखळता एकदाची ती ऑर्डर झाली. दीदीच्या 'येडं आहे पात्र.' वाल्या कटाक्षाकडे दुर्लक्ष करत मी मोठी लढाई जिंकल्याच्या थाटात आईकडे बघितलं.
"पहा इतकिशी तर होती गोष्ट. आता ब्रेकफास्टची ऑर्डर पण तूच देणार ना?"

प्रायमरी मधून मिडल स्कूलमध्ये गेल्यावरची, म्हणजे आपण आता मोठे झालो असे समजायचे वय असतांनाची ही गोष्ट. नुकतीच सायकलने आपले आपण शाळेत जायला सुरूवात केलेली. शाळेबाहेर मधल्या सुटीत गोळ्या, आईसफ्रूट, भेळ, बॉबी अशा अनेक मजेमजेच्या वस्तू विकणारे एक रंगीबेरंगी जग आहे हे नुकतेच समजू लागलेले. मैत्रिणीने दिलेले थंडगार पेप्सीकोला एक दोनदा चाखत माखत खाल्ल्यावर पुढच्या वेळी आपण पैसे द्यायला हवे हे डोक्यात. पण माझ्याकडे तिच्यासारखा पॉकेटमनी नव्हता. चार दिवसांनी मग मधल्या सुटीत भेळ खायला जातांना, सायकलमध्ये हवा भरायला असावा म्हणून आईने दिलेला रुपया बाहेर आला. त्यानंतर मग सायकलमध्ये वारंवार हवा भरायची वेळ येऊ लागली. अनेकदा ती पंक्चरसुद्धा होत असे!

गोष्ट इथवर थांबणारी नव्हती. काही दिवसांनी शाळेला जातानाच्या रस्त्यात एक नवे आईसक्रीम पार्लर उघडले. पण भक्कम बारा पंधरा रुपयाला असणारे तिथले आईस्क्रीम काही माझ्या पंक्चरलेल्या पैशात बसणारे नव्हते. घरी आल्यावर खुंटीला लटकवलेली आईची पर्स दिसू लागली. पर्समधल्या लहानशा मनीपर्समध्ये खूप सार्‍या नोटा असत. त्यातली एकच पन्नासची नोट मी काढली तर आईला काय कळणार होते? पण चोरी करणे तर वाईट, त्यातून ती करतांना आपण पकडले गेलो तर? नकोच ते! पण दुसरीकडे लालचुटूक चेरीवाले आईसक्रीम सन्डे खुणावत होते. शेवटी बाबा ऑफिसला, दीदी मैत्रिणीकडे गेली आहे, आई मावशीशी फोनवर बोलतेय अशी योग्य संधी साधत मी तिची पर्स उघडली. आतली मनीपर्स उघडून नोट काढली आणि तेव्हाच आईच्या मनीपर्सला असलेल्या एका खणात माझा फोटो ठेवलेला दिसला.

आईच्या पर्समध्ये माझा फोटो ठेवलाय तिने. अगदी माझ्या एकटीचा!! दीदीचा पण नाही ठेवलेला. अगदी बाबांचाही नाही. आईला आपण ही चोरी केली हे आज समजले तर, तिच्या मनातून आपण नक्कीच उतरणार. हा फोटोसुद्धा काढून टाकेल का काय मग ती? एका क्षणात असे अनेक विचार भिरभिरायला लागले. घामेजलेल्या हातातली नोट पुन्हा पर्समध्ये गेली. अर्थात चेरीवाले आईसक्रीम मग आईबाबांबरोबरच जाऊन खाल्ले हे सांगायला नकोच.

दहावीच्या परीक्षेचा माझा पहिला पेपर होता. कडक उन्हात सायकल चालवत परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर सगळीकडे भलतीच लगबग दिसत होती. अनेक विद्यार्थ्यांबरोबर आई किंवा वडील सोडायला आलेले. कुठल्या वर्गात बसायचं आहे वगैरे आपापल्या मुलांना शोधून देतायत. कोणी बरोबर सरबत, ताक वगैरे घेऊन आलेत. कोणी मुलांना "नीट लक्ष देऊन पेपर लिही हं", "घाई करू नकोस.", "ते व्हीव्हीआयपी पुन्हा वाचतेस का?" वगैरे शेवटच्या सूचना देतायत. आपल्या बरोबर कुणीच आलं नाही या जाणिवेने माझं मन थोडं खट्टू झालेलं.

पेपर संपवून घरी आल्यावर "कसा गेला पेपर?" या आईच्या प्रश्नावर "सगळ्यांना कोणी ना कोणी सोडायला आलं होतं. अनेक जण रिक्षेने आलेले. आणि मी एकटीच सायकल चालवत गेले. सगळे माझे मीच शोधले. तुला माझी काही पडलीच नाहीये." म्हणत थयथयाट केला.

"एवढी मोठी झाली आहेस आता, सोडायला कशाला यायला हवं. सायकल चालवत गाव उंडारतेस मग दोन किलोमीटरवरच्या ठिकाणी न जायला काय!" आईचे म्हणणे खरे असले तरी 'तुला काही फिकीर नाही'चे तुणतुणे मी चालूच ठेवले. अगदी दहावीचा उत्तम रिझल्ट लागल्यावरसुद्धा, "मला रोज सोडायला आली असतीस तर आणखी दोन चार मार्क जास्त पडले असते." असे खवचट बोलल्याशिवाय राहवले नाही.

मग अगदी आत्ता काही दिवसांपूर्वी दहावीतले मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटले तेव्हा परत हे सगळे आठवले. "तुझी आई अगदी पेपर संपेपर्यंत बसून राहात असे वर्गाबाहेर." मी मैत्रिणीला आठवण काढत म्हटलं. "काय आठवण काढून देऊ नकोस. ती दहावी बारावीची वर्षं आणि माझ्या आईचे अभ्यासासाठी मागे लागणे. अगं मी रात्री झोपत नाही ना यावर लक्ष ठेवायला पण जागत बसत असे ती."

अरे खरंच की पेपर संपेपर्यंत वर्गाबाहेर थांबणे दिसले तसे तिच्या आईने अभ्यासासाठी मागे लागून आणलेला वैताग नाही दिसला कधी. माझ्यामागे अभ्यासाचा अनाठायी लकडा न लावणार्‍या आईला फि़कीर नव्हती म्हणायचे का माझ्याबद्दल खात्री होती म्हणायचे?

आता एक दिवस अलिकडचाच. ऑफिसात, घरात कामाचा ताण अगदी पराकोटीला पोचलेला. 'पुरे आता फार झाले.' म्हणत ब्रेक घ्यायची इच्छा वर येऊ लागते आणि मग तेव्हा काही न करता, स्वतःच्याच विचारात गर्क अशी सोफ्यावर निवांत बसलेली आई मला आठवते. सगळा वेळ काहीतरी कामे करत स्वत:ला गुंतवून घेतले म्हणजेच आयुष्य सत्कारणी लागत नसून हा 'निवांत बसून रहाण्यातला आनंद' पण घेतलाच पाहिजे हे लक्षात येतं आणि मग लगेच "आज मी येत नाहीये"चा फोन ऑफिसात करायला माझा हात नि:संकोच फोनकडे सरसावतो. आज मस्तपैकी दुपारभर झोपायचे असे ठरवून, शाळेतून आलेल्या लेकीबरोबर जेवणे आटोपून, तिला 'चल झोपायला' म्हणत मी पलंगावर पाठ टेकते. तेवढ्यात सेलफोनवर एसएमएस येतो. कुणीतरी फॉरवर्ड केलेला काहीतरी पाचकळ जोक. तरीही हसायला येतंच. लेक विचारते, "तू कशाला हसत्येस?"

"ते तुला माझ्याएवढी झालीस म्हणजे समजेल!" म्हणत मी झोपेचे सोंग वठवायला डोळे मिटते.

- देवी