मनाच्या श्रीमंत - राजाबाई

छोटंसं घर! त्यात इतके लोक! नवर्‍याच्या प्रेमात सवतीचा वाटा! रात्री बंद खोलीच्या आड होत असलेल्या हालचाली. हे तिने कसं काय सहन केलं असेल देव जाणे! होता होता त्याचीही सवय झाली. नवर्‍याचं त्यांच्यावरचं प्रेम मात्र तिळभरही कमी झालं नाही. जेवण फक्त आणि फक्त राजाबाईंच्याच हातचं लागायचं. रात्रीच्या प्रेमाची वाटेकरीण मात्र दुसरीच.

borderpng.png

ईची तब्येत जरा नाजूकच झाली होती त्यामुळे दिवसभर तिला सांभाळायला कोणीतरी हवं होतं. नर्स वगैरे सगळे सोपस्कार विचार करुन झाले पण मनासारखं कोणी भेटेना. अचानक पोळीवाल्या बाईच्या ओळखीच्या एक बाई आहेत असं कळलं आणि राजाबाई आमच्या घरी आल्या.

आता राजाबाई म्हटलं म्हणजे छानपैकी खात्यापित्या घरची, नऊवारी पातळ, कपाळावर मोठं कुंकू, असं रुपडं डोळ्यासमोर येतं ना! पण ह्या राजाबाई म्हणजे सडपातळ, नाजूक, निमगोरा रंग, डोळ्यावर सोनेरी काड्यांचा चष्मा, हसरा पण थोडासा बुजरा चेहेरा, छोटीशी जिवणी, डोळ्यात थोडेसे केविलवाणे भाव अशा रुपात आल्या! पहिल्या नजरेत तरी त्या आवडून गेल्या. जे काम सांगू ते नक्की करतील, प्रेमाने करतील असं सगळ्यांनाच वाटलं.

bai_new.jpgखरं म्हणजे राजाबाई जेव्हा कामासाठी घरी आल्या त्यावेळी मी काही त्यांना बघितलं नव्हतं. जेव्हा सुट्टीसाठी माहेरी आले तेव्हाच त्यांची आणि माझी भेट झाली. त्यांच्याबद्दल आईकडून, वहिनीकडून फोनवर कळत होतं. आईची छान काळजी घेतात म्हटल्यावर त्यांच्याबद्दल आपोआपच चांगलं मत झालं. आईची मात्र थोडीशी कुरबुर सुरु होती. दिवसभर आपल्यावर लक्ष ठेवते म्हटल्यावर तिचं स्वातंत्र्य थोडंफार कमी झालं होतं. पण नाही म्हटलं तरी सगळे कामाला गेल्यानंतर त्यांचीच सोबत होती, आधार होता. जुळवून घेईस्तोवर थोडा वेळ लागलाच. पण मग मनाच्या तारा अशा काही जुळल्या की जणू मागच्या जन्मीचा काही ऋणानुबंध!

आईला तिच्या पद्धतीनंच काम केलेलं आवडायचं. त्यात मग काही वेडवाकडं झालं तर ती चिडणारच. तिच्या कामाची पद्धत समजून तसं काम जमायला वेळ लागणारच. ते जमेपर्यंत राजाबाईंना आईची भरपूर बोलणी खावी लागली. सकाळी आठ ते संध्याकाळी चार म्हणजे संपूर्ण आठ तास फक्त दोघीच घरात. जे काय दोघी करणार ते समोरासमोरच! त्यामुळे दोघींना एकमेकींशी जुळवून घेणं भाग होतं. थोडं कमी, थोडं जास्त असं करत करत राजाबाई घरात छान रुळल्या. आईला पण हळूहळू उमजत गेलं त्यांचं प्रेम, त्यांची आपुलकी. घरातली थोडी फार कामं झाली की मग त्यांचा सगळा वेळ फक्त आईसाठीच होता. तिला काय हवं नको ते त्यांनी फार पटकन समजून घेतलं आणि त्या आईच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक बनल्या.

आम्ही सुट्टीत जेव्हा आलो तेव्हा राजाबाईंशी ओळख झाली. फोनवरुन त्यांच्याबद्दल सगळं कळत होतंच, त्यामुळे आपल्या आईची मनापासून सेवा करणार्‍या राजाबाईंबद्दल मनात आपुलकी निर्माण झाली होतीच. पहिल्या भेटीतच त्या आवडल्या आणि नंतर त्यांच्याबद्दलचा जिव्हाळा वाढतच गेला.

आईला त्या 'आज्जी' म्हणायच्या. पण आई मात्र त्यांना 'बाई' म्हणायची. आतापर्यंत आई आम्हा तिघा बहिण-भावांची होती पण आता मात्र आई तितकीच राजाबाईंची पण होती. आईच्या प्रेमाचा हिस्सा त्यांनी स्वत: मिळवला होता. 'आजकालच्या जगात कितीही पैसा दिला तरी प्रेम मिळत नाही' हे वाक्य राजाबाईंनी पार खोटं ठरवलं. पोटची मुलगी करणार नाही इतकं प्रेम त्यांनी ह्या आज्जीवर केलं. आईची आंघोळ, वेणी, तिचे कपडे धुणं, कधी कधी तिच्या आवडीचं खायला करणं आणि दुपारी दोघींनी मिळून मनापासून टिव्ही बघणं. एक मस्त रुटीन सुरु झालं होतं. त्यांचं इतकं जीव तोडून करणं मनाला खूपच सुखावत होतं. पण सोबतच राजाबाईंबद्दलचं कुतूहलही जागं झालं होतं. कोण होत्या ह्या राजाबाई? त्यांच्या घरी कोण कोण असेल? घरी त्या कशा असतील? ज्याअर्थी त्या बाहेरच्या लोकांशी इतक्या प्रेमाने वागतात त्याअर्थी घरातही त्या तशाच प्रेमळ असतील. मग एक दिवस त्यांच्याशी बोलता बोलता विषय काढलाच. त्यावर त्यांनी जे काय सांगितलं ते ऐकून राजाबाईंना काय विशेषण लावावं हेच कळेना. नि:स्वार्थी, निरपेक्ष, स्वच्छ आणि विलक्षण मोठ्या मनाची साक्षात मूर्ती!

शेतीवाडी भरपूर असलेल्या घरची, भावांची लाडकी अशी राजाबाई लग्न होऊन सासरी आली तेव्हा सगळ्या मुलींसारखीच डोळ्यात खूप सारी सुखस्वप्नं घेऊन आली. आपल्या प्रेमळ, आदबशीर वागणुकीनं लवकरच सगळ्यांची मनं जिंकली. नवर्‍याच्या गळ्यातला तर ताईतच झाली. छोट्याशा जिवणीत लाघवी हसणारी राजाबाई सगळ्या घराची आवडती झाली. हळूहळू नव्याची नवलाई ओसरली. सुरवातीला आडून-आडून विचारणा झाली. अजून बाळाची चाहूल का नाही? नंतर जरा काळजीनं आणि पुढे जरबेनं. बिचारी राजाबाई हिरमुसली, रडकुंडीला आली. नवर्‍याचा जीवही कासावीस झाला. कारण काहीच कळेना. तीन वर्षं झाल्यानंतर मात्र तिचा धीर खचला आणि तिने मोठ्या मनानं नवर्‍याला दुसरं लग्न करायची परवानगी दिली. नवराही हो-नाही म्हणता म्हणता लग्नाला तयार झाला आणि राजाबाईची सवत घरी आली.

छोटंसं घर! त्यात इतके लोक! नवर्‍याच्या प्रेमात सवतीचा वाटा! रात्री बंद खोलीच्या आड होत असलेल्या हालचाली. हे तिने कसं काय सहन केलं असेल देव जाणे! होता होता त्याचीही सवय झाली. नवर्‍याचं त्यांच्यावरचं प्रेम मात्र तिळभरही कमी झालं नाही. जेवण फक्त आणि फक्त राजाबाईंच्याच हातचं लागायचं. रात्रीच्या प्रेमाची वाटेकरीण मात्र दुसरीच.

दिवस पटापट पुढे सरकत होते.रात्री मात्र मंदगतीनं सरकत होत्या. एक दिवस सवतीची गोड बातमी कळली. मोठ्या मनाने त्यांनी तिची सगळी उस्तवारी केली आणि एका पाठोपाठ एक अशी ३-४ मुलं घरात आली. घराचं गोकुळ झालं. घरचे आनंदले, नवरा आनंदला तशी राजाबाईही आनंदली. आता तर तिला अजिबातच फुरसत नव्हती. नवर्‍यासोबत लेकराबाळांचं करता करता तिला दिवस पुरत नव्हता. राजाबाई आता 'आई' सुद्धा झाली होती. सगळ्यांचं प्रेमानं करतांना ती स्वत:चं वांझपण कधीच विसरली. इतकं स्वच्छ मन असू शकतं कोणाचं!

इतक्या सहजपणे ती हे सगळं सांगत होती की जणू काय ही अतिशय नॉर्मल गोष्ट आहे. आम्हीच ते सगळं ऐकून कासावीस झालो होतो. ती मात्र काहीच झालं नाही अशा थाटात पुन्हा कामाला लागली. त्यादिवसापासून राजाबाईंबद्दल मनात एक वेगळंच स्थान निर्माण झालं होतं. प्रत्येक वेळी भारतात येतांना राजाबाईंसाठी, त्यांच्या मुलांसाठी नकळतच काही वस्तू घेतल्या जात होत्या. आईशी फोनवर बोलताना आवर्जून राजाबाईंशी सुद्धा बोलत होतो. "आज आज्जीला साडी नेसवली आहे, आज नवीन गाऊन घातला आहे, आज आज्जी खूप छान दिसताहेत" अशी सगळी माहिती त्या द्यायच्या. ते बोलणं ऐकून आई अगदी सुखात आहे हे कळायचं, जाणवायचं.

एक दिवस अचानक आईची तब्येत बिघडली आणि आईला हॉस्पिटल मधे अ‍ॅडमिट करावं लागलं. त्यावेळी राजाबाई भाऊ आणि वहिनीच्या बरोबरीने काळजी करत होत्या, त्यांच्या एवढ्याच कासावीस होत होत्या. आम्ही सगळे भारतात आलो. आईला ICU मधे ठेवावं लागलं बरेच दिवस. सुरुवातीचे काही दिवस अतिशय तणावात गेले. मग आईची तब्येत सुधारु लागली. ती जरा बरी झाल्यावर तिने राजाबाईंबद्दल विचारलं. तिकडे आई हॉस्पिटल मधे गेल्यापासून राजाबाईंनाही अजिबात चैन पडत नव्हतं. आईने त्यांची आठवण काढताच दुसर्‍या दिवशी राजाबाईंना आम्ही तिला भेटायला घेऊन गेलो. राजाबाई आल्यावर आई आणि त्यांनी एकमेकांकडे ज्या नजरेनं बघितलं ती नजर मी कधीच विसरु शकणार नाही. एकमेकांचे जिवलग खूऽऽऽप दिवसांनी भेटल्यावर त्यांच्या नजरेत जी व्याकुळता, जे प्रेम दिसेल तेच प्रेम त्या नजरभेटीत मला दिसलं. "कशा आहात आज्जी?" असं जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा आईच्या डोळ्यातून पाणी आलं. राजाबाईंचे डोळे ही भरलेलेच होते. "इथल्या नर्सला माझी वेणीच घालता येत नाही, उद्या तुम्ही कंगवा घेऊन या आणि माझी छान खसखसून विंचरुन वेणी घालून द्या राजाबाई." असं जेव्हा आई म्हणाली तेव्हा आम्ही सगळेच गहिवरलो. एक वेगळाच भावबंध होता तो!

आई पूर्ण बरी झाली. घरी आली. आमची सुटी संपून आम्ही पण आपापल्या घरी आलो. आई आणि राजाबाईचं रुटीन पुन्हा एकदा सुरु झालं. आईनं आता त्यांना क्रोशिया शिकवायला सुरवात केली होती. सगळं व्यवस्थित सुरु असतांनाच आईला हार्ट अटॅक आला आणि आई तडकाफडकी गेली. सगळंच संपलं होतं. ज्या आईसाठी त्या आमच्या घरात आल्या ती आईच आता राहिली नव्हती. मी जेव्हा तिकडे पोचले तेव्हा माझ्या गळ्यात पडून त्या हमसाहमशी रडल्या. माझ्याइतकाच किंबहुना माझ्याहीपेक्षा जास्त अधिकार होता त्यांना रडण्याचा. खूप खूप सेवा केली होती त्यांनी आईची.

आईच्या दु:खात त्या आमच्याइतक्याच व्याकुळ होत्या. घरच्या एक महत्वाच्या सभासद म्हणून त्या सगळ्या विधींमधे सामील होत्या. सगळं झाल्यानंतर जेव्हा मी परत निघाले तेव्हा त्यांना कडकडून मिठी मारली, रडले. आईच्या जाण्याचं माझं दु:ख, तितक्याच तीव्रतेनं समजून घेणार्‍या राजाबाई त्या क्षणी फार जवळच्या वाटल्या. यानंतर त्यांची भेट होणं किती शक्य आहे ते माहित नाही पण जातांना त्यांचं "ताई, मधून मधून फोन करत जा." हे डोळ्यात पाणी आणून म्हटलेलं वाक्य मी कधीच विसरु शकणार नाही. नक्कीच मागच्या जन्मीचा काहीतरी विलक्षण ऋणानुबंध असावा त्यांचा आमच्याशी! नावासारखीच मनाची श्रीमंती असणार्‍या राजाबाई आम्हाला कायमचं त्यांच्या ऋणात बांधून निरोप घेत होत्या! आमच्या मनातला एक कोपरा त्यांनी स्वत:च्या नावाने राखून ठेवायला आम्हाला भाग पाडलं होतं.

सवतीवर, तिच्या मुलांवर आणि नवर्‍यावर जीवापाड प्रेम करणारी राजाबाई, रक्ताचं नातं नसतानाही कोण, कुठल्या आज्जीची मनापासून सेवा करणारी राजाबाई ह्यातली श्रेष्ठ कोण म्हणावी ? कुठल्या अजब रसायनाने बनली होती ही राजाबाई? आम्ही फक्त विचारच करत राहणार. पण ही राजाबाई मात्र आमच्या सगळ्यांच्या मनावर नेहेमीसाठी अधिराज्य गाजवत राहणार हे नक्की.

- जयश्री अंबासकर (जयवी)