काजळ

kajal_kavita1.jpg

कधी किनारा कधी मेघ अन्, कधी इशारा असते काजळ
ओळख पटता गतजन्मांची, डोळ्यांआधी हसते काजळ

लावण्याचे ओठ हरवती, जेंव्हा त्यावर नसते काजळ
धुंद बदामी प्रत्यंचेतून, आरपार हे घुसते काजळ

जरा पाहता कुणी विखारी, नागीण जैसे डसते काजळ
श्रावणातल्या नभातुनीही, मला अताशा दिसते काजळ

डोळ्यांमधल्या वाटेवरूनी, कुठे साजणा? पुसते काजळ
विरहामध्ये वाट पाहता, अबोध वेडे; रूसते काजळ

रूपगर्विता, तूच अप्सरा, तुला पुरे गं; नुसते काजळ
कधी उमटले? कसे, कुणावर? किती बहाणे; फसते काजळ

- उमेश कोठीकर