दिलखुलास! (पूर्वार्ध)


मि

ताली जगताप - अभिनयाचे स्वप्न पाहून त्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी औरंगाबादहून मुंबईच्या मायानगरीत आलेली एक मराठमोळी मुलगी ! सुरूवातीला केवळ संघर्ष, धडपड, त्यांनतर रंगभूमी, छोटा पडदा, रुपेरी पडदा असा गेल्या १०-१२ वर्षांचा तिचा प्रवास एका वाक्यात संपणारा नक्कीच नाही! "बाबू बँड बाजा" या चित्रपटासाठी मितालीला २०१० चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच जाहीर झाला. यानिमित्ताने मायबोली दिवाळी अंकाच्या "दिवाळी संवाद"साठी जेव्हा तिची भेट घेतली तेव्हा या संपूर्ण प्रवासात आलेले असंख्य चढ-उतार, यश-अपयश यांना सामोरे जाताना एकूणच आयुष्याबद्दल मिळालेल्या नवीन जाणिवेबद्दल मितालीच्याच तोंडून ऐकणं हा एक खरोखर आनंददायी अनुभव होता. पूर्णपणे मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या मितालीची आतापर्यंतची वाटचाल ही केवळ याच नव्हे तर कुठल्याही कलाक्षेत्रामध्ये स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडत असलेल्यांसाठी प्रेरणादायी आहे.


भारतीय चित्रपटक्षेत्रामध्ये राष्ट्रीय पुरस्कारांना निर्विवादपणे खूप महत्त्व आहे. राष्ट्रीय पुरस्कारांच्या इतिहासामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणार्‍या केवळ दोन मराठी अभिनेत्री आहेत. पहिली - स्मिता पाटील आणि दुसरी - मिताली जगताप-वराडकर. आणि त्याहीपुढे जाऊन सांगायचे तर मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेली मिताली ही पहिलीच अभिनेत्री आहे! (स्मिता पाटीलला दोन्हीवेळा हिंदी चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे). त्यामुळे गप्पांची सुरूवात ओघाने तिथूनच झाली. औपचारिकतासुद्धा पुष्पगुच्छ देण्यापुरतीच टिकली आणि पुढचा तास-सव्वा तास अत्यंत अनौपचारिकपणे मितालीने दिलखुलासपणे गप्पा मारल्या . . .

medal.jpg---सर्वप्रथम राष्ट्रीय पुरस्काराबद्दल संपूर्ण मायबोली परिवारातर्फे तुझं हार्दिक अभिनंदन! राष्ट्रीय पुरस्काराचा अनुभव कसा होता?
प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्नं असतं की तिला आयुष्यात एकतरी पुरस्कार मिळावा, एकतरी पावती मिळावी. खास करून माझ्यासारख्या, ज्या मुंबईच्या बाहेरून मुंबईत काम करायला येतात, त्यांच्याकडून घरच्यांचीही अपेक्षा असते. पुरस्कार ही गोष्ट अशी आहे की ज्याने तुम्हाला आदर मिळतो. त्यातही जेव्हा तो राष्ट्रीय पुरस्कार असतो तेव्हा तर ती हिमालय चढून गेल्यासारखी भावना असते.

---घरच्यांची प्रतिक्रिया कशी होती याबद्दल?
साहजिकच खूप छान होती. खरं सांगायचं तर मला पुरस्काराची क्रेझ अशी नव्हती. पण यावर्षी माझे वडील खूप आजारी होते. आतापर्यंत त्यांच्या पाठिंब्यामुळे मी इथपर्यंत आले आहे. त्यामुळे मला कुठेतरी असं वाटत होतं की मला त्यांच्यासाठी एक तरी पुरस्कार मिळावा. हा चित्रपट जेव्हा फेस्टिवलमधे दाखवण्यात आला, तेव्हा त्याला प्रेक्षकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे कुठेतरी असं वाटत होतं की आपण बरं काम केलं आहे तर एखादा पुरस्कार मिळू शकतो. त्यानंतर एका महिन्यातच मला राज्य पुरस्कार मिळाला. मी मुंबईला आल्यानंतर गेल्या दहा वर्षातला हा पहिला पुरस्कार होता. मी खूप आनंदित झाले होते, कारण वडिलांनी 'मला राज्य पुरस्कार मिळाला' हे पाहिलं. त्यांचं कौतुक वेगळंच होतं! आणि पंधरा दिवसातच मला माझ्या निर्मात्यांचा फोन आला की तुला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मी अगदी ठामपणे त्यांना विचारत होते की तुम्ही मला राज्य पुरस्काराबद्दल सांगताय का? ते 'नाही, नाही' म्हणत होते. कारण पंधरा दिवसाच्या अंतरानेच राज्य पुरस्कार आणि राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले होते आणि त्यामुळे सगळेच थोडे गोंधळले होते. त्यामुळे ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायला खूप वेळ लागला. ही गोष्ट जेव्हा माझ्या वडिलांना कळली तेव्हा ते अ‍ॅडमिट होते, पण काही काळापुरतं त्यांच्यासाठी ह्या गोष्टीने जणू एका औषधाचं काम केलं.

---मुंबईत येऊन दहा वर्षे झाली तुला . . .
हो. पण माझा बायोडेटा खूपच छोटा आहे. मी जवळपास दहा-अकरा वर्षांपूर्वी काम सुरू केलं. सुरुवातीची काही वर्ष संघर्षाची होती. तीनच वर्ष मी काम केलं, मग त्यानंतर लग्न झालं. लग्नानंतर आणि ओवीच्या जन्मानंतर जवळपास सहा-सात वर्षांचा गॅप होता, म्हणजे एकूण दहा-अकरा वर्षांत तसा माझा कामाचा वेळ हा तीन-चार वर्षांचाच आहे. 'बाबू बँड बाजा' हा एकूणात माझा चौथाच चित्रपट.

---अभिनेत्री व्हायचं हे तू लहानपणापासूनच ठरवलं होतंस का? तू भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतलं आहेस ना?
हो! मी शास्त्रीय नृत्यांगना आहे. म्हणजे 'होते' म्हणायला हरकत नाही कारण नृत्य आता बर्‍यापैकी सुटलंच आहे. माझ्या आईने मला भरतनाट्यमला घातलं. तेव्हा जवळच्या नातेवाईकांकडून थोडा विरोध झाला. "शास्त्रीय नृत्य" त्यांना माहित नव्हतं. इतकंच काय, मुलींनी नाचणं ही संकल्पनाच त्यांना मान्य नव्हती. पण माझ्या आई-वडीलांनी मला पाठिंबा दिला. आज मी जेव्हा अशा बंधनांमुळे आतल्याआत कुढत राहणार्‍या एखाद्या कलाकाराला बघते तेव्हा वाईट वाटतं. त्या व्यक्तीने जर स्वतःहून निर्णय घेतला असेल की मला घरी बसायचंय तर गोष्ट वेगळी, पण त्याच्यावर बंधनं आणली तर ती गुदमरून गेल्यासारखी भावना येते असं मला वाटतं. ज्यांना कोणाचा आधार नसतो, घरच्यांचा पाठिंबा नसतो असे कलाकार खूप दुर्दैवी असतात. पण मी खूपच भाग्यवान आहे की मला या सगळ्या गोष्टी मिळाल्या. माझे वडील कवी, साहित्यिक. त्यामुळे घरचं वातावरण कलेशी निगडीत आणि कलेचा आदर केलं जाणारं असंच होतं. त्यामुळे मला घरातून, खास करून वडिलांचा खूप चांगला पाठिंबा होता.

---स्मिता पाटील तुझी सगळ्यात आवडती अभिनेत्री आहे, हो ना?
खरं आहे. मी नृत्य शिकत असताना माझ्या पालकांना मी वैजयंतीमालासारखं नृत्य करावं असं वाटायचं. जेव्हा मी अभिनयाकडे वळले, तेव्हा त्यांना वाटायला लागलं की; त्यांच्या आवडत्या अभिनेत्री - स्मिता पाटीलसारखं मी काम करावं. तिने ज्या प्रकारच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं तशा भूमिका मीही कराव्यात. मी मुंबईला आले तेव्हा हाच विचार करून आले की स्मिता पाटीलसारखी कामं करायची आहेत. पूर्णपणे तिच्यासारखं होणं खूप अवघड आहे, पण कणभर जरी तिच्यासारखं होता आलं तरी खूप मोठी गोष्ट आहे ती! तिच्यामधल्या साधेपणामुळे आणि स्वतःला झोकून देऊन केलेल्या भूमिकांमुळे प्रत्येकाला ती आपलीशी वाटायची. तो तिच्यामधला अतिशय जमेचा भाग होता. त्यामुळे तिचा आदर्श कायम माझ्यापुढे आहे.

---थोडक्यात म्हणजे, तू ज्या क्षेत्रात जाशील तिथल्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांचा आदर्श ठेवण्याची शिकवण घरातून तुला मिळाली आहे . . .
येस! नक्कीच. त्याबद्दल आई-बाबांची अगदी नेमकी हीच इच्छा असायची की जे करशील ते सर्वोत्कृष्ट कर!

---तुझ्या पहिल्या सिनेमाबद्दल, 'देवकी'बद्दल थोडंसं . . .
माझे वडील साहित्यिक असल्यामुळे आमच्या घरामधे बर्‍याच साहित्यिकांचं येणं-जाणं असायचं. कोल्हापूरचे लेखक चंद्रकुमार एकदा आमच्याकडे आले होते. मी तेव्हा नृत्यवर्गाला जात होते, म्हणून ते सहज म्हणाले की नाचून दाखव. माझं नृत्य बघताना त्यांचं लक्ष माझ्या नृत्यापेक्षा माझ्या हावभावांकडे गेलं, आणि ते माझ्या वडिलांना म्हणाले की "बापूराव, मी एक सिनेमा करतोय, आणि त्यात मला एक नवीन बालकलाकार हवाय. आणि मला वाटतंय ही त्याच्यासाठी एकदम योग्य आहे." 'देवकी' हा तो माझा पहिला सिनेमा!. दुर्दैवाने तो पूर्ण नाही झाला, पण एक मात्र झालं नचिकेत, की मला माझ्यातला स्पार्क कळला. माझ्याजवळ केवळ नृत्यच नाही तर अभिनयसुद्धा आहे.

mitali03.jpg ---तुझ्या मुंबईतल्या सुरूवातीच्या स्ट्रगलिंगबद्दल सांग ना . . .
जेव्हा मी मुंबईला आले तेव्हा असं वाटत होतं की आपल्याकडे नृत्य आहे आणि तेवढ्या शिदोरीवर आपण बर्‍यापैकी काम मिळवू शकू. पण मुंबईत आल्यावर खर्‍या परिस्थितीची जाणीव झाली की इतकं सोपं नाहीये हे सगळं! खूप स्पर्धा आहे आणि आपल्या पाठीशी कोणी नाहीये. अजून एक गोष्ट मला कळत गेली की मी ज्या क्षेत्रात प्रवेश घ्यायचा प्रयत्न करते आहे त्या क्षेत्राचं 'ग्लॅमर' हे अविभाज्य अंग आहे. पण मला ते पचवणं खूप अवघड गेलं. कारण तुम्ही कलावंत असाल तर तुम्हाला ग्लॅमर कशाला लागतं असं मला वाटायचं. पण या क्षेत्रात असं नाहीये. इथे तुम्ही सुंदर असलं पाहिजे, तुम्ही सतत मेकअपमधे असलं पाहिजे, तुमचं इंग्लिश चांगलंच असलं पाहिजे, तुमची पर्सनॅलिटी चांगली असली पाहिजे, तुमची वेशभूषा अ‍ॅट्रॅक्टीव्ह असली पाहिजे. आणि यातली कुठलीही गोष्ट माझ्याजवळ नव्हती. खरं सांगते, मी मध्यमवर्गीय, काळी-सावळी, साधारण दिसणारी मुलगी, कुणी गॉडफादर नाही, मराठी शाळेत शिकलेली त्यामुळे सफाईदार इंग्लिश न येणारी अशी होते. मी आल्यावर खरंच गोंधळून गेले की आता काय करायचं? असंही वाटायला लागलं की हे सगळं आपल्याकडून नाही होणार कदाचित. पण निर्णय ठाम होता की स्वतःला सिद्ध करायचं. मग त्या दिशेने हळूहळू कामं सुरू झाली.

तेव्हा 'मायापुरी' नावाचं एक मासिक यायचं. आणि त्या मासिकात पत्ते असायचे. पण हे माहीत नसायचं की तिथपर्यंत कसं पोचायचं. मुंबईत मी आयुष्यात पहिल्यांदा आले होते त्यामुळे मुंबई पाहण्यामध्येच माझे तीच-चार महिने गेले होते. दहा मजली इमारती, लोकल, गर्दी, अनोळखी रस्ते . . . ते पत्ते शोधून तिथपर्यंत पोचल्यावर कळायचं की हा त्यांच्या घराचा पत्ता आहे, ऑफिसचा पत्ता वेगळा आहे, मग तिथून परत दुसरा प्रवास ऑफिसपर्यंत पोचायला . . . मग ऑफिसला पोचेपर्यंत थकलेला, घामेजलेला चेहरा! अशा चेहर्‍याला कोण कामं देणार? मग तिथून ते 'निघा' म्हणायचे. असे खूप दिवस घालवले.

अशातच एकदा माझी आशुतोष गोवारीकरशी भेट झाली. त्याने मला सांगितलं की 'तू एक व्यवस्थित फोटोसेशन करून घे. ते फोटो तू ऑफिसमधे ठेव, एक बायोडेटा बनव.' मग मी तसा प्रयत्न केला. गौतम राजाध्यक्षांकडून फोटोसेशन केलं. पण तेही खूप अवघड होतं कारण की माझे आई-वडील दोघेही शिक्षण क्षेत्रातले. त्या पेशात असल्यामुळे आमच्याकडे खूप पैसा कधीच नव्हता. त्यात माझ्या वडिलांचा स्वभाव असा होता की त्यांनी आयुष्यात कधीच एक रुपयाही साठवला नाही. पण तरीही त्यांनी त्या काळामधे मला केवळ फोटोसेशनसाठी भरघोस रक्कम दिली होती. इतके पैसे एका शिक्षकाने आपल्या मुलीला 'फोटोसाठी' देणं हे खूप अवघड होतं. अनेकदा ते फोटो बघून माझी निवड व्हायची, मला बोलावलं जायचं, पण जेव्हा मी ऑनसेट जायचे तेव्हा जरा नाराजीचा सूर यायचा, की आम्हाला ग्लॅमरवाली मुलगी हवी आहे. एकदा तर मी एका जाहिरातीसाठी गेले होते. तिथे 'आम्हाला साधारण दिसणारी मुलगी नको' म्हणून मी केलेला मेकअप मला उतरवायला सांगितला होता. मग वाटायचं - 'अरे मी अशी का आहे? हे असं असणं माझ्याआड येतंय, माझ्या करिअरच्या आड येतंय!' अशा गोष्टी घडल्यावर हरल्याची भावना असायची. माझ्या कलेकडे बघितलं जात नाहीये, तिची दखल घेतली जात नाहीये वगैरे वगैरे . . .

---मग या धडपडीतूनच 'अश्वत्थ'ची सुरूवात झाली का?
त्याकाळात मी दादरला शिफ्ट झाले होते. त्यानंतर माझ्या आयुष्यात बर्‍यापैकी सकारात्मक गोष्टी घडत गेल्या. मी जिथे राहत होते, मानसी कुलकर्णीकडे, तिथे तिची खाणावळ होती. नाट्यक्षेत्रातली बरीच मंडळी तिच्याकडे जेवायला यायची. त्यामुळे मला तिथे असा मित्रवर्ग मिळाला की जो बाहेरून मुंबईत येतोय आणि स्ट्रगल करतोय. त्यांनाही कुठे व्यासपीठ मिळत नाहीये. मग आम्ही 'आपणच एक ग्रूप स्थापन करूया आणि त्यामार्फत आपण नाटकं करूया' असा विचार केला. मग अशा प्रकारे आम्ही 'अश्वत्थ' ग्रूप स्थापन केला. मराठी नाटकांपेक्षा आपण हिंदी नाटकं केली की दोन्ही मिडियावाले आपल्याला बघू शकतात, म्हणून आम्ही हिंदीत काम केलं. आम्ही व्यावसायिक करू शकत नव्हतो कारण आमच्याकडे पैसा नव्हता. म्हणून मग आम्ही प्रायोगिक रंगभूमी केली. त्यातही आम्ही अ‍ॅड्जस्टमेंट करत होतो. आम्ही अभिनय करणारी मुले किती आणि मुली किती आहेत हे बघायचो आणि त्यानुसार आम्ही स्क्रिप्ट निवडायचो. आम्ही 'एक्झिट' नावाचं नाटक केलं, प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मग हळूहळू कामं येत गेली. दोन्ही थिएटर केल्यामुळे माझ्या कामाची सुरुवात हिंदी मालिकांपासून झाली. पण हिंदीत मी फार कम्फर्टेबल नव्हते. कारण मला ते खूप मेकॅनिकल वाटायला लागलं. सतत दोन-दोन तीन-तीन दिवस तोचतोच अभिनय करा, मेलोड्रामा करा . . . त्यापेक्षा आपले सहकलाकार आपल्याला त्यांच्यामधे सामावून घेणारे असतील तर ते काम करणंही आपल्याला जरा आनंददायक असतं. मग मी मराठी मालिकांमधे आले. मराठीत मला एक-दोन मालिका मिळाल्या ज्या त्यावेळेला खूप लोकप्रिय होत्या. मग माझं स्ट्रगल बर्‍यापैकी संपलं.

---अंगात तेव्हा एक प्रकारचं झपाटलेपण असेल ना? तहान-भूक विसरून फक्त काम . . .
आता सगळंच गंमतीशीर वाटतं. पैसे नसले की मी आणि माझी एक मैत्रीण अशा दोघी विनातिकीट प्रवास करायचो. ट्रेनच्या एका दारात मी असायचे, आणि एका दारात ती! मग स्टेशन आलं आणि टीसी दिसला की आम्ही एकमेकींना खाणाखुणा करून उड्या टाकायचो. आम्ही सहा जणी होतो. सकाळी बाहेर पडायचो. थेपल्याचे एक पाकीट दिवसभर पुरवायचं. तेव्हा ते सगळं असह्य व्हायचं. आज जेव्हा मी त्या सगळ्याचा विचार करते तेव्हा असं वाटतं की मी त्या सगळ्यातून बरंच काही शिकले. औरंगाबादमधे असताना मी खूप अल्लड होते, लाडावलेली होते, आईवडिलांना गृहीत धरणारी होते. पण इथे आल्यावर या स्ट्रगलने मला बर्‍यापैकी प्रगल्भ बनवलं. आपण स्ट्रगल करतोय असं त्या काळात वाटतं, पण तो काळ निघून गेल्यावर असं वाटतं की अरे आपल्याला पॉलिश्ड व्हायचं होतं म्हणून तो मधला काळ होता. असं झाल्यावर पुढे मिळणारं यश छान एंजॉय करता येतं. सगळंच सहज मिळालं ना तर आपल्याला ते फारसं भावत नाही.

---अगदी खरं आहे.. तुझ्या आवाजावरून, देहबोलीवरून तुझा हा सकारात्मक दृष्टीकोन माझ्यापर्यंत पोचतोय . . .
अरे, परिस्थिती खूप काही शिकवून जाते माणसाला! मुंबईत मी आले तेव्हा मलाच स्वतःला सावरायचं होतं, स्वतःचा आधार व्हायचं होतं. त्यामुळे मी खूप कणखर झाले. मला वेळेची किंमत कळली, पैशांची किंमत कळली. माझ्यात निर्णयक्षमता आली.

--- मराठीत केलेल्या मालिकांबद्दल काही सांगशील का?
मी हिंदीतून मराठीत आले त्यावेळी, साधारण २००२-०३ साली 'वादळवाट' नावाची मालिका केली. झी साठी 'असा हा धागा सुखाचा', 'पिंपळपान' केली. यातल्या खासकरून 'वादळवाट'मुळे माझी ओळख निर्माण झाली. त्यातली माझी भूमिका खूप आवडायची लोकांना. त्याच दरम्यान मी सिनेमाही केला. कांचन नायकांच्या 'राजी' सिनेमासाठी 'सर्वोत्कृष्ट पदार्पणा'साठी मला नामांकन मिळालं होतं. ती भूमिका एका नृत्यांगनेची होती. मी नृत्यांगना असल्यामुळे मला तो सिनेमा मिळाला होता. दुसरा चित्रपट मी गजेंद्र अहिरेंचा 'विठ्ठल विठ्ठल' हा केला. डॉ. सलिल कुलकर्णींचा संगीत दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट. खूप सुंदर संगीत हीसुद्धा त्या चित्रपटाची जमेची बाजू होती. त्या चित्रपटासाठी साठी मला पुन्हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नामांकन मिळालं. त्यानंतर मी 'आग' नावाचा चित्रपट केला. तो प्रदर्शित झाला नाही. ही दोन-चार वर्ष मी कामाचा खूप छानप्रकारे आनंद लुटला. जे काही मोजके चित्रपट केले त्याबद्दल पुरस्कारांसाठी नामांकन मला मिळत होतं. त्यामुळे मला जाणवत होतं की माझ्याकडे ग्लॅमर नाहीये, फेम नाहीये; पण मला परीक्षकांकडून, प्रेक्षकांकडून पावती मिळतेय, माझी दखल घेतली जातेय. 'वादळवाट' करत असतानाच सँडीशी भेट झाली.

family.jpg ---'वादळवाट'चा विषय निघाल्यावर मी पुढचा प्रश्न हाच विचारणार होतो. संदीपबद्दल काय सांगशील?
माझं संदीपविषयी फर्स्ट इंप्रेशन असं होतं, की खूप शिव्या देऊन बोलणारा एक कॅमेरामन! असं वाटायचं की असं कुजकट, उद्धटपणे बोलणारा कोण आहे हा? पण हळूहळू जेव्हा आमच्यामधे मैत्री झाली तेव्हा मला जाणवलं की हा फारच प्रेमळ आहे. खूप साधा आणि अगदी आत्मियतेने, खूप आपुलकीने शिव्या वगैरे देणारा हा माणूस आहे. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोन महिन्यांमधे साखरपुडा, त्यानंतर दोन महिन्यांमधे लग्न! म्हणजे भेटल्यापासून सहा महिन्यातच आम्ही लग्नाच्या बेडीत अडकलो. त्याच्याकडे कुठली गोष्ट कशी कॅप्चर करायची याची एक व्हिजन आहे. तो खूप अबोल आहे. तो एक्स्प्रेस करू शकत नाही. मी आता त्याला खूप ओळखायला लागले आहे. तो शब्दामधे त्याच्या भावना मांडू शकत नाही. पण अनेकवेळा त्याच्या नजरेतून, हालचालीतून मला कळतं. त्याच्या कुठल्याही मागण्या नसतात - खाण्याबद्दल नाही, मी घरी कधी असावं/ नसावं, कुठलं काम करावं/ करू नये. अजून एक गुण म्हणजे वृत्तीने तो अगदी दुसरा 'कर्ण' आहे. त्याच्या स्वतःजवळ दहा रुपये असतील तर समोरच्याला नऊ रुपये देऊन मोकळा होईल. तो त्याच्या कुटुंबाशी खूपच अ‍ॅटॅच्ड आहे. आणि मीही खूप घरकोंबडी आहे अरे . . . शूटींग संपल्यावर मला नेहमीच असं वाटतं की ताबडतोब मला विमान मिळावं आणि मी घरी पोचावं . . .

---. . . घरी पोचावं आणि ओवीला भेटावं . . .
हो . . . ओवी माझ्या आयुष्यात आल्यापासून अनेक गोष्टी माझ्यासाठी दुय्यम झाल्या आहेत. तिच्यासाठी म्हणून मी काम मिळत असूनही बर्‍याचदा केलं नाही. जवळजवळ पाचेक वर्षांचा गॅप घेतला. मला आश्चर्य वाटतं या गोष्टीचं की ज्या गोष्टींसाठी मी आई वडिलांना सोडून मुंबईत आले, इतके खडतर दिवस पाहिले, त्याच गोष्टी जेव्हा नजरेसमोर ओवी दिसते, तिचं हास्य दिसतं तेव्हा मला गुंडाळून पुन्हा बाजूला ठेवाव्या वाटतात. अर्थात, माझ्या सासरच्यांचा खूप सपोर्ट होता मला. त्यांचं असं म्हणणं होतं की तुझ्यामधे क्षमता आहे. तू ज्यासाठी मुंबईत आली आहेस ते काम कर. ओवीची अ‍ॅड्जस्टमेंट होईल. त्यामुळे मी अधून मधून कुलवधू, मायलेक अशा मालिका केल्या. ओवी खूप लकी आहे माझ्यासाठी. तिच्या जन्मानंतर मी हे काम सुरू केलं, आणि हे पहिलं प्रोजेक्ट - 'बाबू बॅंड बाजा', ज्याने शिखरच गाठलं!

---म्हणजे पाच वर्षांची गॅप पडली तरी तुझ्यातल्या मूळ अस्सल कलाकाराने ती पहिल्याच प्रोजेक्टमध्ये भरून काढली . . .
हो! खरंच . . . या मोठ्या गॅपमध्ये माझ्यातला कलाकार बहुतेक आतमधे तुंबून राहिला होता, आणि त्याचा एकदम असा भडका उडाला. मग इतक्या मोठ्या कॅनव्हासवर मी प्रामाणिकपणे काम केल्यामुळे त्याचं फळही इतकं चांगलं मिळालं.

---ओवीबरोबरच्या नात्याचा या चित्रपटासाठी किती उपयोग झाला?
खूपच झाला. हा चित्रपट मिळण्यामागेही ओवीचाच हातभार लागला आहे. मला हा चित्रपट कसा मिळाला ते सांगते. अरे एकदा माझा औरंगाबादचा जुना मित्र संजय कुलकर्णी, त्याचा मला फोन आला. तो चेष्टेत मला म्हणाला की तू जशी औरंगाबादला असताना दिसायचीस तशीच गावंढळ वगैरे दिसतेस का? तर मी म्हटलं, हो मी तश्शीच आहे आणि घरीच आहे. तो म्हणाला की "ठीक आहे. मी तुला राजेश पिंजानी म्हणून एक दिग्दर्शक आहेत, त्यांचा नंबर देतो. ते एक मराठी सिनेमा करत आहेत." राजेश पिंजानी मग घरी आले, माझ्याशी गप्पा मारल्या. मी ओवीबरोबर स्क्रिप्ट ऐकायला बसले होते. ते सगळं ऐकताना मला असं वाटलं की हा माणूस त्याच्या कामामधे खूप जेन्यूईन आहे. त्याने अभ्यास केलाय आणि खूप डेडिकेटेड आहे. मी मनात विचार करत होते की 'प्रोजेक्ट खूप छान आहे आणि माणूसही चांगला आहे. आपल्याला मिळाला तर? पण आपलाही पाच वर्षांचा गॅप आहे'. दहा मिनीटांनी पिंजानी मला म्हणाले की "माझ्या या चित्रपटातली या मुलाच्या आईची भूमिका तू करशील का?" मी खूप सरप्राईज्ड होते, की त्या माणसाने माझं काम पहाणं सोडाच, पण माझं नावही ऐकलेलं नव्हतं. ऑडीशन नाही, स्क्रीन टेस्ट नाही, आणि म्हणाले हे फायनल आहे. मी विचारलं, "तुम्ही हे कशाच्या बेसिसवर ठरवताय?" त्यावर ते म्हणाले, "एक म्हणजे त्या भूमिकेला हवा असणारा सर्वसाधारणपणा तुझ्यामध्ये आहे. आणि मला जी आई हवी आहे ती मला अशीच - तुझ्यासारखीच हवी आहे. मी तुझ्यामधे आणि तुझ्या मुलीमधे चालणारं गिव्ह अ‍ॅन्ड टेक पाहतो आहे. तुझं बोलणं पाहतोय, गप्पा पाहतोय. मला भूमिकेसाठी अशीच आई हवी आहे".

मला दोन पावत्या एकाच वेळी मिळून गेल्या, एक म्हणजे मी बरी आई होण्याबद्दल, आणि दुसरं म्हणजे अभिनेत्री असण्याबद्दल! म्हणून मला असं वाटतं की याचं क्रेडिट मी ओवीलाच द्यायला पाहिजे. या चारेक वर्षांमधे मी जे आईपण अनुभवत होते, तेच मी तिथे साकारलं. तिथे एका आठ वर्षाच्या मुलाचं आईपण निभावायचं होतं. आणि प्रत्येक आई ही सारखीच असते - लढणारी, झगडणारी, प्रेम करणारी, भविष्य घडवणारी, भविष्य घडवण्यासाठी मारझोड करणारी. अशीच आई मला साकारायची होती. म्हणून ते मला शक्य झालं.

collage01.jpg ---पुरस्कार मिळाल्याचा आनंद ओवीबरोबर कसा साजरा केलास?
अरे जेव्हा मला कळलं की मला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय तेव्हा ती आणि मी दोघीच एकट्या घरी कार्टून बघत होतो. ती पहिली व्यक्ती आहे जिच्याबरोबर मी हे अ‍ॅवॉर्ड शेअर केलं. बातमी कळल्यानंतर मलाच कळत नव्हतं. मी अस्वस्थपणे फेर्‍या घालत अक्षरशः रडत होते. ती हादरूनच गेली होती. तिला कळतच नव्हतं की हे काय झालंय काय! मग मी तिला सांगितलं की मला हा पुरस्कार मिळालाय. तिची त्यावर प्रतिक्रिया 'ओके, ओके' अशी होती. पण तो क्षण मी एन्जॉय केला तिच्याबरोबर.

---शूटींगच्या वेळी ती सेटवर यायची का?
हो, ती माझ्या शेवटच्या शेड्युलच्यावेळी सेटवर आली होती. पण अजून लहान असल्यामुळे ते वातावरण ती फार एन्जॉय करत नाही. शूटींग हा प्रकार तिला आवडत नाही. पण पुरस्कार घ्यायला मात्र तिला स्टेजवर यायचं असतं. राज्य पुरस्कार घ्यायला ती माझ्या बरोबर आली होती. राष्ट्रीय पुरस्काराच्या वेळीही ती माझ्याबरोबर दिल्लीला होती.

---या सगळ्या प्रवासामधे तू ज्या सहकलाकारांबरोबर काम केलंस त्यांच्यापैकी कुणाबरोबर काम करतांना खूप मजा आली?
'बाबू, बँड . . .' मध्ये मी आणि मिलिंद पहिल्यांदा एकत्र काम करत होतो. म्हणजे तसं आधी 'आग' मधेही काम केलं होतं. पण एवढे एकत्र प्रसंग नव्हते. इथे तर आम्ही नवरा-बायकोचं काम करत होतो. मी तुला सांगते नचिकेत, आम्ही स्क्रिप्ट वाचायचो, कॅमेरासाठी रीहर्सल करायचो आणि फर्स्ट टेक ओके व्हायचा. आमच्यामधे गिव्ह अँड टेकचं फार सुरेख अंडरस्टँडींग होतं. पूर्ण चित्रपटात मोजून एक-दोन शॉट वगळता आमचे बाकीचे सर्व फर्स्ट टेक ओके झाले. मिलिंदबरोबर काम करताना खरंच खूप मजा आली.

'वादळवाट', 'एक धागा सुखाचा', 'पिंपळपान' करतानाही खूप छान वाटलं. 'एक धागा सुखाचा' मध्ये अरूण नलावडे होते, 'पिंपळपान'मधे किशोर कदम होता. आणि सहकलाकारांबरोबरच हेही सांगते की दिग्दर्शकांबरोबरही काम करताना मजा आली. ज्यांच्याबरोबर माझं छान जमलं ते म्हणजे कांचन नायक. ते माझ्या वडिलांप्रमाणे वाटावेत अशी अ‍ॅटॅचमेंट माझी त्यांच्याबरोबर झाली. आणि राजेश पिंजानी, 'बाबू बँड बाजा'चा दिग्दर्शक . . . आमच्यामधे खूप छान मैत्रीचं नातं आहे. आणि मला हेही सांगायला आवडेल, की 'बाबू बँड बाजा' मधे एक कॅमेरामन माझा नवरा - संदीपही होता. ज्या चित्रपटामुळे मला एवढा मोठा सन्मान मिळाला त्यामधे माझ्या नवर्‍याचाही सहभाग आहे, हाही खूप आनंदाचा भाग आहे.

---आता यानंतर तुझे काय प्रोजेक्ट आहेत?
खरं सांगू नचिकेत? तो पुरस्काराचा हँगओव्हर अजूनही उतरला नाहीये. नऊ तारखेला मी पुरस्कार घेऊन आले. माझ्याकडे काही प्रोजेक्ट आले, पण मला ज्या प्रकारचं काम करायचं आहे तसे नव्हते. मी कधीच कामामधे कॉम्प्रमाईज केलं नाही. प्रसिद्धीसाठी मी इथे आलेच नव्हते, मला कामच करायचं होतं. त्यामुळे यापुढेही माझा विचार हाच राहील की मला कॉम्प्रमाईज, अ‍ॅड्जस्टमेंट्स करायच्या नाहीत, मला चांगलंच काम करायचं आहे. मी वाट बघतेय, एक दोघांचा विचार चालू आहे. पण अजून तसं फायनल काही नाहीये.

(उत्तरार्ध)