झाड

शेवटी आप्पा उठले, आणि 'येतो तात्या' म्हणत काठी सावरत निघालेच. 'आप्पा, अहो निघालात कुठं?' असं तात्या म्हणतात तोवर आप्पा रस्त्यावर आलेच. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघत तिथेच ते थोडा वेळ काठी हलकेच आपटत थांबले. पाण्याच्या टाकीच्या दिशेने, गावाबाहेर जाण्यासाठी दोन पावलं टाकून पुन्हा थबकले. मग वळून काहीतरी निश्चय केल्यागत उलटपावली चालू लागले.

borderpng.png

काळी दहालाच तापू लागलेल्या उन्हात एखाद्यातरी उतारूची वाट बघत सुना पडलेला एस्टी-स्टँड आला तशी मोतीआप्पांची जीप धुरळा उडवत थांबली. मोठी आणि जाड काठी तोलत, डोक्यावर उपरणं घेत ते पुढल्या सीटवरून खाली उतरले. जीपच्या मागे ठेवलेल्या पुढे तालुक्याला काही कामासाठी न्यायच्या सामानाबद्दल ड्रायव्हर बारकूला त्यांनी सूचना दिल्या. सांगितलेल्या कामांत हयगय होऊ नये म्हणून ती सारी बारकूकडून वदवूनही घेतली. सारं नीट होईल, याची खात्री पटल्यावर त्यांनी त्याला निरोप दिला तेव्हा त्यानंही सुटका झाल्याच्या आनंदात गाडी पुन्हा धुरळा उडवत भर्रकन पुढे काढली.

zaad_1.jpgउडालेल्या धुळीला हात जोरजोरात हलवून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत, डोळे बारीक करत ते जाणार्‍या जीपकडे बघत राहिले. वळण घेऊन लवणात उतरून जीप दिसेनाशी झाली, आणि मग आप्पा आजूबाजूला बघू लागले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतं होती, आणि दुरवर कुठे कुठे कामं करणारी माणसं, बैल, औतं दिसत होती खरी. पण इथं तिठ्ठ्यावर एक जुनं झाड तोडून, चार पत्रे टाकून नुकत्याच बनवलेल्या स्टँडच्या शेडच्या आसपास आणि रस्त्यावर दोन्ही बाजूला औषधालाही हालचाल दिसत नव्हती. जिकडेतिकडे साचून राहिल्यागत दिसणारं निष्क्रीय पण डोळ्यांत घुसणार्‍या भडक रंगाचं चटके देणारं ऊन.

'या गावची लोकंच बारा टकुर्‍याची!' मोतीआप्पा पुटपुटले, 'एवढं मोठं झाड तोडून हे झ्यापागत स्टँड बनवलंन. या टीचभर गावात एकतर माणसांची पहिल्यापासूनच वानवा. आधी पाखरं तरी असायची या तिठ्ठ्यावर. आता तीही नाहीत!' मग निषेध केल्यागत मान हलवत त्यांनी आजूबाजूला पुन्हा निरीक्षण केलं. अर्धा फर्लांग अंतरावरच्या गावाकडे पाहिलं, आणि काठी तोलत काठीपेक्षाही ताठ होऊन तरातरा गावाच्या दिशेनं चालू लागले.

चार पावलं टाकली असतील नसतील, तेवढ्यात कसलीशी आठवण येऊन ते थबकले. मग उलट पावली परत येऊन तिठ्ठा आणि डांबरी सडक ओलांडून लवणाच्या दिशेला असलेल्या जुन्या गावविहिरीकडे ते आले. विहीरीचं पाणी बघून ते स्वत:शीच समाधानाने म्हणाले 'हे एक बरंय यांचं. इथलं पाणी जात नाही कुठं सालोसाल.' पुन्हा एक क्षण थांबून, रूंद कपाळावर आठ्या चढवत काठी विहीरीच्या कठड्यावर जोरात आपटत पुटपुटले, 'खरं म्हणजे यांचे धंगडे नि पापं बुडवायला एवढं तरी पाणी पाहिजेच कमीत कमी!'

आप्पा पुन्हा वळून डांबरी रस्ता ओलांडत गावाकडे जाणारी कच्ची वाट तुडवू लागले. या वाटेच्या दोन्ही बाजूला शेतं असणार्‍यांनी वाटेलगत आपापली खळी केली होती. खळ्यात साठवलेल्या धान्याच्या उड्या, लाकडं, गुरांसाठीच्या चार्‍याचा साठा, गायीबैलांसाठी उसाच्या पाचटाचं छप्पर तयार करून केलेले गोठे, बैलगाड्या, घरात ठेवता न येण्यासारखं नांगरा-वखरायचं शेतसामान असं बरंच काय काय होतं. यातली बरीच खळी त्यांच्या ओळखीची होती. हे सुपडू पाटलाचं, हे झिपरू भाऊचं, हे निंबा महादूचं.. अशा त्या दोन्ही बाजूंच्या रानबाभळी आणि थोराच्या झाडाझुडुपांपासून बनवलेल्या कुंपणांआडच्या खळ्यांना ओळखी देत ते चालत राहिले. काही नवीनही तयार झाली होती. त्यातल्या काहींच्या सुबकतेला, स्वच्छता-टापटीपीला त्यांनी मनातच दादही दिली.

'कस्काय आप्पा, बरं चाल्लंय का? लई दिसांनी आमच्या गावात आलात बघा तुम्ही..' भीमाण्णाचा आवाज त्यांच्या कानावर आला. उन्हाची काहिली वाढत चालली होती. गावात शिरायला अजून थोडा वेळ लागेल, तर मध्ये थोडी विश्रांती घ्यायला हरकत नाही, असा विचार करून ते त्याच्या खळ्यात शिरले.

'आलो झालं असाच बिनबुलाव्याचाच. तुमच्यात तर काय, रीतीभातींचा प्रकारच नाही. बोलावणं धाडायचं म्हणलं, की तुमच्या अंगावर बाभळीचे मोठमोठे काटे. जगातली सारी काटेरी झाडंझुडुपं तुमच्याच शिवारात माजली, तर काय नवलच नाही बघ!' हाश्शहुश्श करून भीमाण्णाच्या खळ्याचं शिवाडं उघडत, गोठ्याच्या छपराखालच्या लाकडी गव्हाणीवर टेकत आप्पा म्हणाले.

'तस्सेच आप्पा तुम्ही, मी बघत असल्यापास्नं! मस्त वाटलं तुम्हाला बघून. घ्या पाणी तर घ्या..' भीमाण्णा मोकळं हसत, त्यांच्याशेजारी टेकत म्हणाला. त्याने मातीच्या घागरीतून फुलपात्रात पाणी ओतून आप्पांना दिलं.

'पाणी गोड बघ, तुमच्या गावचं..' काहिलीने सुकलेला घसा ओला करत आप्पा म्हणाले, 'इथल्या माणसांमधलं कमीपण बरोब्बर भरून काढलं म्हणायचं पाण्याने!'

'कडू म्हणता होय आम्हाला? पण मग इथल्या कडू मैतरांशी दोस्ती कशी जमली म्हणायची?'

'ह्याऽऽऽ! सहा-सहा महिने फिरून बघत नाहीत, अन हे म्हणे मैतरं! अशी दसरा-दिवाळीलाच मैत्री दाखवायची पद्धत नाही आमच्यात!' आप्पा उसळून म्हणाले.

'तसं नाही आप्पा. आता तुमच्या गावातही आहेतच की दोस्त लोक आमचे. पण शेतीचं काम म्हणजे बारा महिने चोवीस काळ जुंपलेलं असायला लागतं की नाही? सुखदु:खाला भेटतो कुठेतरी. कधी कधी वर्षाकाठी, दुसर्‍याच कुठच्या तरी गावी, अन कधी तर तेही नाही. कितीही दिवस झाले तरी भेटल्यावर तीच गोडी, अन मनाला शांती.'

'हां. होळीला पुरणपोळी, अन भिल्लीणीला चोळी! मोठीधाटी अन कधीतरी वर्षाकाठी. बरं असतं नाही का?' आप्पा भीमाण्णाकडे तीक्ष्णपणे बघत तिरकस सुरांत म्हणाले.

आप्पांचं असं बोलणं अपेक्षित असल्यागत भीमाण्णा पुन्हा हसला नि म्हणाला, 'गाव अजून दोन कोस, नि चाकांना वंगणाचा सोस! चला आप्पा, गाडीला जरा तेलवंगण करू देत. तुम्हाला जरा चहापाण्याचं बघू देत. मी आवरतो अन येतो तुमच्याच सोबत घरी. मग जेवण करून कुरमाळातही जायचंय मला, आमच्या खालच्या शेतात. सकाळी माणसं मिळाली नाहीत बाजर्‍या कापायला. दुपारी आमच्या रोहिदासाला सोबत घेऊन मीच काम चालू करतो.'

सरमटाचा चारा कुर्‍हाडीने खांडून भीमाने बैलांसमोर टाकला. गड्याला, रोहिदासाला खळ्यातल्या पुढल्या कामाच्या सूचना दिल्या, आणि दिवसभर सोबत करणार्‍या त्याच्या कुत्र्याला हाक मारून बाहेर बोलावत शिवाडं लावून घेत तो मोतीआप्पांसोबत बाहेर पडला.

वाट चालताना आप्पांनी पावसाची-पिकांची चौकशी चालू केली. पुढे रस्त्याला लागूनच धोंडूमामाच्या नव्या घराचं बांधकाम चालू असल्याचं बघून त्यात डोकावले. 'मामाला पहिल्यापासून डोकं कमीच. पोरांचं ऐकणं ठीक, पण धर्मशाळेसारखं घराला बांधून काढणं म्हणजे काय खरं नाही..' असं पुटपुटूनही झालं. मग पुढे रस्त्यातच आडवा वाहत असलेला नाला बघून 'एवढीशी फरशी बांधता येईना नाल्यावर तुम्हाला वर्षानुवर्षे' अशी नापसंती दाखवली. नाला ओलांडून एक छोटं वळण घेतलं, तर चार लिंबाच्या सावलीतली दगडी बांधकाम असलेली टाकी, आणि तिच्याशेजारचा जनावरांना पाणी पाजण्याचा हाळ नजरेस पडला. टाकीतून पाणी भरत असलेल्या गावच्या सुनांनी आप्पांना बघून पदर घेतले, आणि तिथल्या दोन तीन वयस्कर बायांनी त्यांचं तोंडभरून स्वागत केलं. या गावात लग्न होऊन आल्यापासून आप्पांना बघत आलेल्या म्हातार्‍या कमळामायनं दादांची, त्यांच्या गावातल्यांची चौकशी सुरू केली. कमळामाय आणि भीमाण्णासोबत बोलत आणि हातातली जड काठी तोलत ते पुढे चालू लागले.

***

आता समोर गावातला मुख्य रस्ता थेट त्याच्या शेवटी असलेल्या भिल्लांच्या राजवाड्यापर्यंत दिसत होता. या रस्त्याला उजव्या बाजूला लंब असलेल्या आडव्या, एकापुढे एक अशा तीन गल्ल्या. पहिल्या गल्लीजवळ आल्यानंतर तिच्या शेवटच्या टोकाला असलेलं मारूतीचं मंदिर बघून त्यांना बरं वाटलं. मागल्या साली ते इथं आले होते, तेव्हा देवळाच्या जीर्णोद्धाराच्या गप्पा चाललेल्या गावात. गप्पांच्या ओघात स्वानुभवावरून आप्पांनी सांगितलेलं सार्‍यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतलं. देऊळ, शाळा आणि ग्रामपंचायतीच्या नवीन बांधकामाबद्दल, सोसायटीच्या आणि अनुदानांच्या नव्या योजनांबद्दल आप्पा बरंच काय काय बोलले होते, आणि त्यांच्या इथल्या मित्रांनी ते लक्षात ठेऊन त्याप्रमाणे करायचंही ठरवलं होतं. एव्हाना आप्पांना नमस्कार करत त्यांच्यासोबत आणखी एक-दोघे आले होते, आणि उत्साहाने नवीन देवळाबद्दल, शाळेबद्दल सांगू लागले होते. ते सारं ऐकून आप्पा समाधानानं मान डोलवत होते.

ही पहिली गल्ली सुरू होत होती, तिथंच भीमाण्णाचं घर. त्याने आप्पांना हात धरून पडवीत नेलं, आणि तिथल्या खाटेवर गादी टाकून बसवलं. मग आत डोकावून चहासाठी हाक दिली.

शेजारच्या महादेवरावांना सुगावा लागला तसे तेही आले. गळाभेट झाली. आणि पुन्हा गप्पा सुरू झाल्या. चहा पडवीत आणून भीमाच्या बायकोनं आप्पांना वाकून नमस्कार केला, तसं 'सुखी हो पोरी' म्हणत त्यांनी तिच्या माहेरची चौकशी केली.

'आलात होय आप्पा आमच्या गावात! निरोप-पडताळा काहीच नाही.. आहात कुठं?' अशी भरभक्कम आवाजातली हाक गल्लीतून ऐकू आली. इतका खणखणीत आवाज फक्त बळीरामतात्यांचाच. गाडी-बैल पुढे पाठवून तात्या पायर्‍या चढून पडवीत आले, आणि मग आप्पा-तात्या आता लहान पोरांगत धक्काबुक्की खेळतात की काय, असं बघणार्‍यांना वाटू लागलं. zaad_2.jpg

चहा झाल्यावर तात्यांनी भीमाच्या घरून मोतीआप्पांना उठवलं, आणि मुख्य रस्त्यावरच्या आपल्या घरी नेलं. तात्यांच्या ओट्या-पडवीपासून सारंच मोठं-धाटं आणि राजेशाही. अनेक महत्वाच्या चर्चा आणि गप्पा ग्रामपंचायतीच्या ऐवजी गावाच्या बर्‍यापैकी मध्यभागी असलेल्या या जागेतच अनेक वेळा व्हायच्या. ओट्याच्या पायर्‍या चढताना परत आप्पांनी मुख्य रस्त्याकडे थेट राजवड्यापर्यंत नीट निरखून पाहून घेतलं. काहीसं खुपल्यासारखं कपाळाला आठ्या पाडत, पायर्‍यांवर काठी आपटत काहीसं पुटपुटत ते तात्यांच्या पडवीत आले, आणि उपरण्याने वारा घेत, घाम पुसत बसले. एव्हाना थालीपीठाच्या बशा लोण्यासोबत पुढ्यात आल्याही होत्या.

'निळे झेंडे कसे लागले तात्या इथं? पिढ्यान् पिढ्या राजवाड्याला मान देत, कामं देत त्यांना तुमचं म्हणत आलात तुम्ही. आता हे काय नवीन? पण तसंही, काहीही चूका केल्या तरी राजवाड्याला पंखाखाली घेणारे शहाणे आहेतच म्हणा तुमच्या गावात..' आप्पा म्हणाले.

'फिरलेल्या वाशांची कहाण्या त्या, आप्पा. थोड्या आपल्याही चूका आहेतच. गावोगावी वेगळे संसार होऊ लागलेत. हे गाव कसं मागे राहील? तुमच्या गावात काय वेगळी परिस्थिती आहे, सांगा बघू? बरं नको तो विषय सोडा. बाकी तुमच्या गावात कसंकसं चाल्लंय? जिवलग मित्र काय म्हणतात आणि तुमचे?'

'नाहीत कुणी जिवलग मित्र आमचे!' आप्पा तोडून टाकल्यागत पटदिशी म्हणाले.

'असं कसं?' मिस्कील हसत बळीरामतात्या म्हणाले, 'मोतीआप्पा आणि तारूदादा या दोन माणसांची शरीरंच फक्त वेगळी आहेत, असंच समजत होतो आम्ही!'

'तारूचं नाव काढू नका अजिबात!' आप्पा पुन्हा उसळून म्हणाले, 'माझ्यावाचून त्याचं काही अडत नाही. त्या द्वाडमूर्ख माणसांच्या पॅनेलला परस्पर पाठिंबा जाहीर केला त्यानं तालुक्याच्या सूतगिरणीत. ते असोच, पण सोयरिकी जमवण्यात, बोलणं-चालणं करण्यातही आता त्याला माझी गरज राहिली नाही. ठीक आहे. त्याला नाही, तर मला तरी कशाला..? नकोच मला तो!'

'तुमची कितीतरी भांडणं अन दोस्तीचे-प्रेमाचे दाखलेही अख्खी पंचक्रोशी चघळते आप्पा. आता तर सोयरिक होऊनही काही वर्षे झाली. चुकून का जाणार आहात तुम्ही एकमेकांना?'

'मला चुकवून जातोय कुठे तो ढलप्या! पण माझं त्याचं जमणार नाहीच आता!' आप्पा निग्रहाने म्हणाले. राग थालीपीठावर काढल्यागत त्यांनी ते संपवलं, आणि बशी जवळजवळ आदळलीच.

'असं कसं जमणार नाही? तुम्ही दोघं तरणेताठे असताना गाजवलेले कुस्तीचे फड, एकत्र रंगवलेल्या बैठका, मिळून केलेलं राजकारण अन अनेकांना चारलेली धूळ, एकमेकांच्या मदतीने वाढवलेली शेती, सोबत राहून केलेलं वाघासारखं काम या सार्‍याला आम्ही साक्षीदार आहोत. तुमच्या अन दुसर्‍या गावांतलेही आणखी कितीतरी लोक असतील. दादांच्या तारामायचं दागिन्यांचं गाठोडं चोरीला गेलं, तेव्हा दोन दिवस दोन रात्री घोडे उडवत रानं, शेतं नि माळ पिंजून काढले. गावोगावी माहिती घेऊन, शेवटी चोरांना शोधून त्यांना मारमारून तुम्ही टांग्यात घालून गावात आणलं, नि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं. ही गोष्ट आजही लहान मुलांना सांगतो आम्ही! मोठी माणसंही तितक्याच चवीने ती पुन्हापुन्हा सांगतात, ऐकतात. माहिती आहे ना तुम्हाला?'

आप्पा शून्यात नजर लावून खाटेच्या माच्यावर ठेका धरत आठवणींत हरवलेले दिसले, तसे तात्या पुन्हा हसून म्हणाले, 'बरं असू दे. चला जरा पंचायतीत चक्कर टाकू, आणि तिथनं आमच्या शेजारच्या वावरात. तोवर स्वैपाक होईलच. तुमच्या आवडीचा स्वैपाक सुरूही झाला बघा आत.'

ते घरून निघाले, तर पंचायतीच्या अलीकडेच चारा बैलगाडीत भरून आणणारा माणिक समोर दिसला. त्याने चटकन उतरून आप्पांना नमस्कार केला. चौकशी केली. आप्पांनी त्याच्याकडे रोखून बघत 'काय बरं चाललंय ना?' विचारलं. माणिक मान डोलवून अवघडत तसाच उभा राहिला. मग क्षणभराने म्हणाला, 'येताय ना घरी?'

'नाही रे बाबा. आता मी तात्यांकडेच जेवणार आहे, आणि जायचं आहे लगेच मला गावी..' आप्पा म्हणाले, आणि पुढे निघालेही. पाठमोर्‍या आप्पांकडे क्षणभर पाहत माणिकही मग तिथून घरी जायला निघाला.

***

जेवणं झाली, आणि पुन्हा पानसुपारीसोबत गप्पा रंगल्या. आप्पा मग तिथेच आडवे झाले. रानोमाळ उधळणारा टांगा अन त्यात आपल्यासोबत तारूदादा- असं काहीसं नीट न आठवणारं स्वप्न पडून ते जागे झाले, तेव्हा संध्याकाळचे पाच वाजून गेले होते. मळ्याखळ्यांत गेलेली मंडळी गुराढोरांसोबत घरी परतताना हळूहळू दिसू लागली. संध्याकाळचा चहाही नव्याने भेटणार्‍या मंडळींची विचारपूस करता करता झाला. मग उन्हं कलली, तशी आप्पांची उठबस वाढली. ते 'निघतो, जातो..' करू लागले. दोनतीन वेळा तर ते पडवीबाहेर पडून रस्त्यापर्यंत जाऊन आले. तिथून मुख्य रस्त्यातून दोन्ही बाजूला आरपार पाहत, गल्ल्यांमध्ये नजर टाकत पुन्हा पडवीत येऊन बसले. त्यांचं गप्पांमधलं लक्ष हळूहळू उडत असल्याचं तात्यांच्या लक्षात आलंच.

शेवटी आप्पा उठले, आणि 'येतो तात्या' म्हणत काठी सावरत निघालेच. 'आप्पा, अहो निघालात कुठं?' असं तात्या म्हणतात तोवर आप्पा रस्त्यावर आलेच. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघत तिथेच ते थोडा वेळ काठी हलकेच आपटत थांबले. पाण्याच्या टाकीच्या दिशेने, गावाबाहेर जाण्यासाठी दोन पावलं टाकून पुन्हा थबकले. मग वळून काहीतरी निश्चय केल्यागत उलटपावली चालू लागले. आप्पांचं हे सारं बघत असलेले तात्या मोठा हूंकार भरून गालांत हसू लागले.

ताठ चालीने अन काठी मागेपुढे फेकत आप्पा तरातरा चालू लागले. मुख्य रस्ता संपत होता, त्याच्या चारपाच घरे अलीकडे ते थांबले, आणि तिथल्या पडवीला असलेलं जाळीचं फाटक जोरात ढकलून काठीचा आवाज करत आत आले. बाहेर कसलंसं बी नीट बघून पिशव्यांत भरत असलेला माणिक त्यांना बघून गडबडीने उठला. 'या, या आप्पा' म्हणत आत गेला.

दोन फळ्यांच्या मोठ्या नक्षीदार सागवानी दरवाजापाशी येऊन आत घरात बघत आप्पा कपाळावरच्या आठ्या घेऊन तिथंच उभे राहिले..

ओसरीत सतरंजीवर केशरी गंध लावलेले धिप्पाड तारूदादा नुकताच चहा संपवून अडकित्त्यात सुपारी घेऊन तिरकी मान करत अगदी मन लावून कातरत होते.

दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. मग दादा म्हणाले, 'ये आप्पा. कसा आहेस? जीप का पाठवून दिलीस आणि?'

'अख्खा दिवस संपल्यावर, अन मी स्वतः तुझ्या दारात चालत आल्यावर तुला चौकशी सुचतेय?' आप्पा तिरमिरीत म्हणाले, 'माणिकने दुपारीच सांगितलं असेल नाही तुला मी आल्याचं?'

'हो. पण त्याआधी सकाळी तू आमची गावविहीर पाहत असतानाच मला निरोप मिळाला होता तू गावात आल्याचा! कशी आहे माझी लेक, बरी आहे ना?' दादा शांतपणे म्हणाले.

आप्पांचा आता पारा चढला. रागातच दारावर काठी आपटत ते म्हणाले, 'तुझी लेक नाही, माझी सून आहे ती. तू विचारू नकोस. असले नालायक दोस्त नको मला. आणि सोयरे तर त्याहून नको..!'

दादा आता हसत सतरंजीवरून उठून म्हणाले, 'इतक्या रागाला येऊ नकोस आप्पा. या वयात तब्येतीला बरं नाही ते. बेफाम घोडे उडवायचे दिवस नाहीत आता आपले. आणि सोयरिक मी नाही ठरवली बाबा. आमच्या माणिकने बारीखालच्या रूपखेड्यातल्या गंभीररावांची उमा आधीच बघून ठेवलेली रे. आता पोरंच ती. होऊ देत त्यांच्या मनासारखं. पोर चांगली आहे. गंभीरचं खानदान चांगलं आहे. गावात मान आहे. तोही राजी आहे. आता आणखी आपण काय खोडा घाला उगीच? पुढल्या आठवड्यात तुझ्याच गावी येऊन मग तुला सोबत घेऊन लग्नाची पुढची बोलणी करायला रूपखेड्याला जायचं होतं. आता तू आलास म्हणून मी सकाळीच निरोप पाठवला, की उद्या येतो आहोत म्हणून.'

आप्पांनी दादांवरची जळजळीत नजर माणिककडे वळवली तशी त्याने खाली मान घातली. क्षणभराने आप्पा म्हणाले, 'आणि मी बळीरामतात्यांच्या घरनं परस्पर गेलो असतो तर?'

'नसतास गेला.' दादा म्हणाले, 'मी टांग्यात घालून स्टॅंडवरनं आणलं असतं तुला परत!'

'घरच्या सावलीत घडीभर थांबला देव, नि तुक्या म्हणे आलाच आहेस तर मला पाव!' आप्पा उद्गारले, 'ते स्टँडचं गचाळ शेड का बांधून ठेवलंय आणि एवढं जुनं झाड तोडून?'

'घरातलाच रागाने सैतान झाला, म्हणून पायपूजा करून देव्हार्‍यात ठेवला!' दादांनी लगेच उत्तर दिलं, 'तोडलं नाही आप्पा. वादळात पडलं ते. जरा जास्तच ताठपणे उभं होतं ना सालोसाल. वठल्यावर ताठपणा कसा टिकेल दरसालच्या नव्या वादळात? नवीन झाडं लावायची आहेत तिथं पावसाळ्याच्या सुरूवातीला.'

माणिक खाली मान घालतच खुसखुसून हसत आत गेला. दादा म्हणाले, 'पॅनेललाही पाठिंबा द्यायचीही खेळी होती रे. त्याआधी तुझ्याकडे यायचं होतं, पण इतक्या घडामोडी घडल्या नि निस्तराव्या लागल्या की वेळच मिळाला नाही. मी सांगतो बाबा सारं. तू बस जरा शांत आधी. आता रात्री तुझ्या आवडीचं खाणं नि पिणं होऊ जाऊ देत सारं. कसं?'

***

थोड्या वेळात घरभर कोंबडीच्या रश्श्याचा घमघमाट सुटला. ओसरीमध्ये पेल्यांच्या किणकिणाटासोबत बोलण्याचा ताव वाढत गेला.

जेवणं झाली, तरी जगाचं भान नसल्यागत दोघं बोलत राहिले. घरात झाकपाक झाली. सारं गाव झोपलं. त्यानंतरच्या सामसूमीत मध्यरात्रही उलटून गेली, पण साठलेलं गूज संपत नव्हतं.

शुक्राची चांदणी आली, तरीही शेजारच्या तिठ्ठ्यावरचा भलामोठा पिंपळ फांद्या हलवत सळसळ करून दोघांच्या गप्पांना दाद देतच होता.

***

- साजिरा