विरंगुळा

हे असे समोरासमोर नुसते बसून चालत नाही
शांतता मागते जबाब तेव्हा हसून चालत नाही
एकदा तुझ्या त्या विरंगुळ्याला विचार मर्जी त्याची
मी असून चालत नाही की मी नसून चालत नाही?

borderpng.png

"आ

ता आपण काही दिवस भेटायला नको!" त्याने सरळ सांगून टाकलं.

"तुला चालेल?" - ती.

"लै वेळा चालेल! तेवढा कंट्रोल हवाच! नाही म्हटलं तरी माझी फॅमिली आहे, माझं माझं असं एक चौकटीतलं जग आहे. कलंदरीच्या नावाखाली मी सगळे चोचले पुरवून घेत असलो, तरी कधीतरी बोचणी लागतेच की! आणि ते ही जाऊ दे, आपल्या भेटींमध्ये तोच तोचपणा यायला नको आहे मला! लेट्स हॅव अ ब्रेक!"

"अ‍ॅज यू से सर! अ‍ॅज ऑलवेज!" – ती शेवटचं अर्धं वाक्य तर ऑलमोस्ट पुटपुटली. एखाद्या पंचलाईन मधलेही अत्यंत महत्त्वाचे दोन शब्द हाती येता येता निसटल्यासारखं वाटलं त्याला.

घनगर्द धुके
नि:शब्द उभे
सच्च्या प्रश्नागत ठाम
... किरणांना फुटला घाम

abstractman.jpg“श्या! असलं काही नसतं!" असं म्हणत त्याने ए. सी. ऑन करत कार घराकडे वळवली. एव्हाना आपल्याला रिलीव्हड वाटायला हवं होतं, पण वाटेल. कदाचित आपल्याला हे अफेअर कायमचं पण तोडता येईल, अशी एक प्लेझंट शंका त्याच्या मनाला स्पर्शून गेली आणि त्याने एकदम गाडीत गाणीबिणीच लावली. च्यायला, किती दिवस झाले इतरांची गाणी ऐकून! दणादणा बिल्डिंगचे जिने चढत असतानाच त्याच्या डोक्यात संध्याकाळचं प्लॅनिंग सुरू होतं. घरच्यांना हॉटेलमध्ये घेऊन जायचं आज . . . स्वत:हून! बायको आणि पिल्लूसाठी मस्त सूप, स्वत:साठी फर्स्टक्लास स्कॉच आणि गप्पाच गप्पा! सुट्टीचं प्लॅनिंग, त्या आधीचं शॉपिंग वगैरे, ब्लॅकबेरीवर सर्च करत डेस्टिनेशन्स ठरवायची, फ्लाईट बुकिंग चेक करायचं आणि अकाऊंटला तेवढे पैसे असतील तर फिक्स करून टाकायचं सगळं, डिनर संपायच्या आत . . . किंवा पुन्हा तिची आठवण येण्याआधी.

शुभ्रफुलांची नभात पखरण
धरतीवर रंगांची उधळण
सागरातले अमृतमंथन
... तुझी आठवण ... तुझी आठवण.

"सर, रिपीट करू?" - वेटर!

"अं! या ऑफकोर्स! मघाशीच सांगितलं मी रिपीट ड्रिंक तुझ्या मॅनेजरला!" - असं म्हणून त्याने समोर नजर वळवली. काही टोटलच लागेना. “ही पिल्लूला वॉशरूमला घेऊन गेली की काय?? असेल!" म्हणून त्याने परत वेटरला हाक मारली. "सूप दिलं नाहीस अजून?"

"सर, सूप . . . तुम्ही जनरली तीन पेग नंतर डायरेक्ट चिकन कबाब मागवता म्हणून . . .!"

तो बराच वेळ त्याच्याकडे बघत राहिला. "ह्म्म! ओके, लीव्ह मी अलोन अ‍ॅन्ड कीप रिपीटिंग!" जाता जाता वेटरने स्टॅंडमधून काही टिश्यू पेपर्स आणि स्वत:चं पेन त्याच्यासमोर ठेवलं. त्याने बायकोच्या मोबाईलवर फोन लावला.

"वेळ लागणार आहे?"

"अं, हो! आय मीन जास्त नाही!"

"कुणासोबत आहेस?"

"वेल! एकटाच!"

"म्हणजे आज डेटवर आहेस, मग कसला लवकर येतोयस! माझी आठवण आली हेच नवल!"
तिने खळखळून हसत फोन ठेवला.

वरवर हासत झुरणे क्षणक्षण
अखंड अविरत तुटणे कणकण
अशी जागच्या जागी वणवण
... तुझी आठवण ... तुझी आठवण.

त्याने मान झटकत बारमधे नजर फिरवली. अजून ओळखीचं कुणी आलेलं दिसत नव्हतं आणि जे होते त्यांनी काही नोटीस केलं असेल असं वाटलं नाही. मग तो मेंदूच्या खनपटीलाच बसला. काय काय घडलं नक्की संध्याकाळपासून? भेंडी! सगळं तर नॉर्मल की! इन फॅक्ट जरा जास्तच नॉर्मल आणि प्रॅक्टिकल! डिस्कशन (!), कार, बिल्डिंग, जिना . . . पिल्लू . . . जिना . . . डिनर . . . जिना . . . जिना . . .

करेक्ट! शेवटच्या जिन्यात असताना एक मेसेज आला होता तिचा. काय होता साला? आपण वाचून डिलीट करून टाकला होता. अम्म्म्म, हां! एकच ओळ होती काहीतरी. बट फॉर गॉड्स सेक, व्हॉट वॉज दॅट??? हां! येस!

"हे असे समोरासमोर नुसते बसून चालत नाही
शांतता मागते जबाब तेव्हा हसून चालत नाही."

नाही! नाही! वेट! दुसरी ओळ नव्हती. दुसरी ओळ नक्की नव्हती. मग ही बया आली कुठून??

"मला एक कोक चालेल!"

"तू कधी आलीस?"

"जस्ट!"

"ह्म्म!"

"पिल्लू झोपला?"

"डन्नो! चेक नाही केलं!"

"कर एकदा, मग बोलू!"

"ह्म्म!"

त्याने स्पीड डायल वर १ नंबर दाबला. "हाऽऽऽऽऽय डॅडू! मी सगळा अभ्यास संपवला. तू आणलेल्या झिगव्हीलस मधल्या कार्सची पोस्टर्स बघतोय. लॅम्बोर्गिनि इज द बेस्ट! माझं आणि मम्माचं ठरलंय आपण ह्या वीकएंडला जाफ़्रानला जाणार आहोत डिनरला. ("डॅडला म्हणावं तू स्वत:हून ठरवत नाहीस म्हणून आम्ही ठरवलंय!" . . . बॅकग्राऊंडला आवाज!) त्याच्या आधी घ्यायची का डॅडू लॅम्बोर्गिनि?"

"क्रेझी बॉय! तुझा डॅड एवढा श्रीमंत नाहीये, बट जाफ़्रान इज डन, आणि झोप आता!"

त्याने मंद हसत कॉल टर्मिनेट केला, आणखी काही प्रॉमिसेस आठवण्याआधी!

पाण्यावरचा दिवा चिरंतन
पुन:पुन्हा आयुष्य समर्पण
सरते जेथे माझे मीपण
... तुझी आठवण ... तुझी आठवण.

"सर, बिल!"

"ह्म्म!"

तो कार्ड स्वाईप करून उठला. हॉटेलमधून बाहेर पडता पडता वेटरने मागून पळत येऊन टिश्यू पेपर हाती दिला.

"सर, हे टेबलवरंच राहिलं!"

"ह्म्म! मी फोनवर बोलत असताना ती निरोप लिहून गेली असणार!"

वेटरला भांबावलेल्या अवस्थेत सोडून तो लॉबीमधे आला. चावी देता देता वॅलेने सांगितलं, "सर, ब्रेक लागत नाहीये!"

"ओ या, आय ऍम अवेअर!" म्हणत त्याने कारमधील लाईट ऑन केला . . . तिचा निरोप वाचण्यासाठी.

हे असे समोरासमोर नुसते बसून चालत नाही
शांतता मागते जबाब तेव्हा हसून चालत नाही
एकदा तुझ्या त्या विरंगुळ्याला विचार मर्जी त्याची
मी असून चालत नाही की मी नसून चालत नाही?

पुढे निरोप कोरा . . . आनंद आहे, आऽऽऽनंद आऽऽहे!!

ह्या अर्ध्यामुर्ध्या कविता, ही अर्धी अपुरी गाणी
गरिबाच्या खिशात क्षणभर ही खुळखुळणारी नाणी.

"आयच्ची जय! कधी होणार सेव्हिंग!! मरू दे!" म्हणत त्याने भण्ण शांतता भंग करत स्टार्टर मारला.

ती शब्द कधी ...ती अर्थ कधी
ती विरळ कधी ... घनगर्द कधी
ती स्पर्श निरंतर मौनाचा
हळुवार कधी ... अनिवार कधी

कधि यावी सरळच सामोरी
कधि अनवट गहिर्‍या वाटांनी
ती आल्याचे सांगायाला
कल्लोळ करावा गात्रांनी
शत हातांनी झंकारावी
ही तार कधी ... ती तार कधी.

डॅशबोर्डच्या लाईट्सची चमक डोळ्यांत लपवत त्याने वॅलेच्या हातात १००ची नोट सरकवली थेट.

"लॅम्बोर्गिनीची ऑन स्ट्रीट प्राईस काय आहे रे मित्रा?"

- वैभव जोशी