आकाशपाळण्याची गोष्ट!

एका नातेवाईकाचा परिचित होता. एक दिवस आमच्याकडे राहिला. एका रात्रीतून त्याने वडिलांना काय पट्टी पढवली, कधीच कळलं नाही. झालं! सकाळपर्यंत वडिलांनी सगळे विकून त्याच्या धंद्यात पैसे लावायचे ठरवले. हे कोपरखैराण्यातले दुकान विकले. अजून एक छोटीशी जागा होती, तीही विकली आणि सर्व पैसे लावले. लोग बोलते है शनी की साडेसाती थी. अब सच लगता है. त्याच सुमारास घेतलेले सर्व निर्णय चुकीचे ठरत गेले.

borderpng.png

दपथावरच्या जुन्या पुस्तकांशिवाय पुस्तकप्रेमींचे प्रेम अपुरं आहे. पूर्वी मुंबईत फोर्टात असे अनेक पुस्तकविक्रेते असायचे. (अजूनही असतात, फक्त वेगळ्या पदपथांवर) त्यांच्याकडे कमी किंमतीत वापरलेली पुस्तके, नेहमीची आणि दुर्मिळ, दोन्ही मिळून जायची. पहिली चार पुस्तकं चाळायला मागितली, की या पुस्तकविक्रेत्यांना समोरच्याच्या 'पॅकेज'चा अंदाज यायचा. (शब्दः साभार - आंतरजालावरील (कु)प्रसिद्ध पॅकेजवादावरील युद्ध 2010.
पॅकेजवादावरील युद्ध आणि चांगला वाचक वाद, चांगला वाचक वाद
) की ते फटाफटा पुस्तकं सुचवत. हे विक्रीकौशल्य आजच्या मोठाल्या पुस्तकविक्रेत्या chainstores च्या प्रशिक्षित स्टाफकडेही नाही. क्रॉसवर्डमध्ये मला पुस्तकं सुचवणारे कर्मचारी सहसा भेटले नाहीत. ते तुम्हांला फक्त सध्या काय खपतंय एवढंच सांगू शकतात. म्हणजेच कॅसेटी विकणार्‍याने शास्त्रीय संगीत फिती विकत घेणार्‍याला ग्राहकाला 'झंकारबीट्स ऐकून पहा, काय खपतंय आजकाल रिक्षांमध्ये!!' असे सांगण्यासारखे आहे.

AkhileshBooks.jpg

श्री अखिलेश कमलेश हा आमचा परिचयाचा पदपथावरील पुस्तकविक्रेता. याच्याशी दर रविवारी थोड्याबहुत गप्पा होतात. एकदा सहज त्याला 'धंदा का वाढवत नाही' असे विचारले. त्याने सांगितले, की तो आधी फोर्टात पुस्तकं विकायचा, मग दुर्दैवाच्या एका फटक्यात दुकान गेले. एकदा त्याच्याशी नीट बोलायची खूणगाठ बांधली, तो योग आता आला.

वाचण्याच्या आधी, यातली बरीचशी मतं अखिलेशची आहेत आणि ती त्याच्या जीवनानुभवातून तयार झाली आहेत, एवढेच आपण लक्षात ठेवूयात. देवळात चपलांसकट आपले अस्तित्व आणि इगो बाहेर काढून ठेवतो, तसे वाचकांना जमल्यास करता आले, तर तेच कदाचित उचित ठरेल. पांढरपेशा मध्यमवर्गीय चौकटी थोड्याशा बाहेर ठेवूयात आणि मानवी आयुष्याची एक दास्ताँ जाणवली आणि भिडली तर ही कहाणी थोडीशी सुफळ ठरेल.

आणि खुसपटंच काढायची म्हणली, तर पदपथ नक्की कशासाठी असतात, इथपासून सुरवात आहेच . . .

***

मुंबईतल्या एका उपनगरातले एक गृहसंकुल, त्याच्याबाहेरच्या अंगाला काही दुकानं. एक सलून, एक हार्डवेअरचे, एक स्त्रियांच्या कपड्यांचे, एक सायबर कॅफे आणि एक केरळ चिप्सचे. सायबरकॅफेच्या समोरच्या बाजूला एक पुस्तकांचा स्टॉल. जुनीपानी पुस्तकं, पण जीर्ण नव्हे. मालक पुस्तकं वाचायलाही देतो आणि विकतोही. Mills & Boons, John Grisham, Patricia Cornwell, Dick Francis, Management ची पुस्तकं (Who moved my cheese हे पुस्त़क नसेल त्या विक्रेत्याला रस्त्यावरच्या पुस्तकविक्रीतून बेदखल करत असावेत!), नॅन्सी ड्र्यू, एनिड ब्लिटन पासून भारतीय इंग्लिश ललित साहित्यापर्यंत पुस्तके रचून ठेवलेली असतात.

त्याचा चालक, मालक सर्वच अखिलेश.

सावळा वर्ण, वय साधारण सत्तावीसच्या आसपास असावे, चष्मा, साधे ,स्वच्छ टापटीप कपडे आणि सभ्य वर्तन, पुस्तकांची बरीच बरी माहिती, बोलायला चांगला. त्या सायबरकॅफेत बरीच उडाणटप्पू मुलं असतात. पण हा स्वतःचा आब सांभाळून असतो आणि सभ्यता कधी सोडत नाही. याला मी कधीच येणार्‍या जाणार्‍या मुलींवर फालतू शेरे मारताना पाहिलेला नाही.

कधीकधी हवी असलेली इंग्रजी पुस्तकं मिळवूनही देतो. मराठी पुस्तकं मात्र कधीच नाही. सर्व casual paperbacks मी याच्या वाचनालयातून वाचण्यासाठी घेते. आणि जे इंग्रजीतले भारतीय लेखकांचे लेखन संग्रही ठेवावेसे वाटते, ते अखिलेशकडून विकत घेते. त्याच्याकडे पुरेसा संग्रह नाही, असे नवरा म्हणतो आणि सहा दुकानं पलिकडल्या दुसर्‍या पदपथावरील पुस्तकविक्रेत्याकडे जातो. पण तो दुसरा मुलगा एकतर मला फारसा आवडत नाही, त्याला पुस्तकातले काहीही कळत नाही, ठोंब्या आहे, आणि शिवाय, त्याला ती जागा एका प्रतिष्ठित दुकानाच्या चेनने भाड्याने दिली आहे. त्याचा संग्रह आणि जागा मोठी आहे हे मात्र खरे आहे.

तिकडे नवर्‍याचे पुस्तक परत द्यायला म्हणून जरी गेले, तरी अखिलेशला बरोब्बर कुणकुण लागते. मग तो 'आप उधर गये थे क्या, सर भी उधर जाते रहते है . . .' असे बारीक आवाजामध्ये म्हणतो. 'तुझे आणि सरांचे तुम्ही दोघं पाहून घ्या, मी फक्त पुस्तक परत करायला गेले होते. आणि तसेही मी तुझ्याकडून कितीतरी जास्त पुस्तकं घेते,' असे सांगते. नेहमीचा संवाद. कधी आम्ही या परिसरातील सर्व वाचनालयांच्या मनसोक्त कुचाळक्या करतो. अखिलेशने संग्रह आणि जागा दोन्हीबाबत अजून फाईट मारायला हवीये, हे मात्र मला प्रामाणिकपणे वाटते.

आणि एवढे असले, तरी नवर्‍याला समोर बसवूनच या गप्पा माराव्या लागल्या. तो वैतागला. मायबोलीचा उद्धार झाला. पण तो तिथे बसायला तयार झाला नसता, तर यातल्या अर्ध्याहून अधिक गप्पा कटाप झाल्या असत्या, यातच काय ते आले. क्लू देऊच का? या देशात, स्त्रिया, . . .

बहुत काय सांगावे?

* या गप्पा बंबैय्या हिंदी या बोलीभाषेत झाल्या आहेत. यथाशक्ती आणि यथामती त्या अनुवादित केल्या आहेत. जिथे मला तो भाव महत्त्वाचा वाटला तिथे मूळ वाक्यच ठेवले आहे.

** बर्‍याच ठिकाणी त्याच्या भाषेच्या लहेजासाठी शब्द त्याने उच्चारले तसेच ठेवले आहेत. उदाहरणार्थ : 'मेईन कॅम्फ'.

Akhilesh.jpg

*****

फोर्टात माझ्या वडलांचा पदपथावर पुस्तकविक्रीचा व्यवसाय होता पूर्वी. आमची ४० फूट लांब पुस्तकविक्रीची जागा होती २००४ मध्ये. वडील खूप पूर्वी, मध्यप्रदेशातील सिवनी गावातून आपल्या वडिलांशी भांडून मुंबईला आले. मग या धंद्यात आले. हम लोग बुनकर है, कोष्टी समाज. बरीच वर्षे वडिलांनी दुसर्‍याच्या हाताखाली काम केले, हळूहळू स्वतः पुस्तकं विकायला लागले, आणि मग शेवटी ही फुटपाथवरची जागा विकत घेतली. एक चमचा वगैरे विकणार्‍याकडून विकत घेतली होती. तो तिथे बरीच वर्षे काय काय विकायचा. अगदी मोक्याची जागा. हायकोर्टालगतच्या पदपथावर. भन्नाट विक्री होई, रोजचे चार हजार रुपये. सात मुलं कामाला होती.

रोजचे चार हजार रुपये?

हो, एप्रिल-मे (कॉलेज विद्यार्थ्यांच्या सुट्ट्यांचा हंगाम सोडला) तर आरामात रोज एवढी मिळकत होती. या काळात अभ्यासाच्या पुस्तकांची विक्री होत नसे, फिर बस novel पे depend रहना पडता था.
देखों, मेडिकल के बुक्स सबसे महंगे रहते है. पॅथॉलॉजी, अ‍ॅनाटॉमी वगैरे १६०० रुपये नवीन आवृत्ती, आणि आम्ही वापरलेली पुस्तकं अर्ध्यात विकायचो. म्हणजे तरी ८०० रुपये एका पुस्तकाचे. विक्री व्हायची आणि वाचण्यासाठीही पुस्तकं देत होतो. दोन्हीचा धंदा होता. दोन वर्ष जरी चालला असता तर गुंतवणूक वसूल झाली असती. तसेही आठ हजार रुपये महिना भाडं भरत होतोच. स्पर्धाही बरीच होती. मी आठ हजार देत होतो, लोकं जास्तही द्यायला तयार असायचे. लगा था, पर्मनंट हो जायेगा, इसलिये जगह खरीदी. लेकीन क्या से क्या हो गया. . .

तुम्ही कितीला घेत होता?

कुठून पुस्तक मिळवलं त्यावर हे अवलंबून असतं. समजा, मी थेट मिळवलं पुस्तक, तर ते फुकट किंवा फारतर पंचवीस रुपयांना. जर दुसर्‍याकडून विकत घेतलं, तर कदाचित साठाला बसले असतं. पण नेहमी थेट मिळतीलच, असे नाही. सगळीकडून प्रयत्न करावा लागतो.

चॅनल सिस्टीम बंधा हुवा था. रद्दी गोळा करणारे मुंबईभर रद्दी गोळा करायचे आणि मग तिथे फाऊंटनला आम्हांला द्यायला यायचे. नाहीतर मग कांदिवलीत एक मोठ्ठं रद्दीचं दुकान होतं, ते माल गोळा करुन ठेवायचे आणि फोन करायचे. मग मी जाऊन पाहून घेऊन यायचो. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पुस्तकं, इंटिरीयरची, स्थापत्यशास्त्राची, वैद्यकीय अभ्यासक्रमाची वगैरे. . . मग आपापल्या हिशेबाने त्याची योग्य किंम्मत लावायची, घासाघीस करायची आणि घ्यायची. ती फोर्टात आणून विकायची .

कुठली पुस्तकं जास्त विकली जायची?

ज्यादातर इंजिनियरिंग और फिक्शन बहुत खपता है, देखो! गेल्या काही वर्षात इंग्रजीत लिहिणारे भारतीय लेखक, अशी नवी कॅटेगरी चांगली चालते आहे.

सगळी पुस्तक एकत्र ठेवता?

नाही, तिकडे जागा होती बरीच, तर व्यवस्थित वर्गवारी करुन ठेवायचो. अभियांत्रिकीच्या शिक्षणक्रमातील पुस्तकं एका बाजूला, इंग्रजी ललित साहित्यातील क्लासिक एकीकडे , कलाविषयक एकीकडे, असे नीट ठेवायचो.

कॉफी टेबल पुस्तकांची किंमत जास्त येत असेल ना?

हो, पण घेणारे कमी असतात. तरीही ठेवावी लागतात. नवीन पुस्तकंही ठेवायला सुरवात केली होती मी.

नवीन?

हो एक XXX Publishing Company आहे. ते क्रेडिटवर पुस्तकं द्यायचे. एक महिनेका, देढ महिनेका क्रेडिट देते थे. जितकी विक्री होईल, तसे त्यांचे पैसे चुकते करायचे. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन यांची शैक्षणिक पुस्तकं असायची ती.

ते दुकानातल्यापेक्षा स्वस्त पडते का रे ग्राहकाला?

हो तर. तुम्ही स्ट्रँड, स्टर्लिंग मध्ये तीच पुस्तकं घ्यायला गेलात तर सेल्स टॅक्स पडतो. आम्ही शिवाय MRP वर दहा टक्के सूट द्यायचो. ज्याला बरीच पुस्तकं घ्यायची आहेत, त्याला परवडते ते. स्टुडंट्स का एक कमसे कम एक पिक्चर निकल जाता था बचे हुवे पैसो में.

जास्तीत जास्त किती पुस्तक ठेवत होता?

बरीच होती हो. ज्यावेळेला सगळी उचलून नेली तेव्हा कमीतकमी अर्धा ट्रक तरी भरला असेल.

बापरे. गेली सगळी?

BMC चे वडाळ्यामध्ये कोठार आहे. तिथे नेऊन टाकली त्यांनी पुस्तकं. बहौत लॉस हुवा.

परत नाही मिळाली?

नाही. आठ दहा गठ्ठे कसेबसे परत मिळवले, तेही त्यांनी ८ हजाराला आम्हाला विकले. गर्मीका टाईम था, फ्रायडे का दिन था. २००४ की बात थी. ते आले, कसलीही पूर्वसूचना नव्हती, सरळ ४ ट्रक आणून उभे केले,सगळी पुस्तकं जप्त केली, दुकाने बंद. आधी काहीच सांगीतलं नव्हतं, चौकशी केली नव्हती, काहीच नाही. मग सगळ्यांनीच लावून धरले तसे त्यांनी नंतर नंतर सांगितले की सिक्युरीटीचा प्रॉब्लेम येतो आहे वगैरे वगैरे, मग दुसर्‍या जागा देऊ म्हणून थोडीफार आश्वासने दिली. सगळे जण पुढची ३-४ वर्षे आस लावून होते की आता मिळेल, मग मिळेल, छोटीशी का होईना फोर्ट भागात जागा, स्टॉल मिळेल, पण . . . काहीच नाही मिळाले. आम्ही सुरवातीला दोन तीनदा पुन्हा तिथेच पुस्तकं लावून पाहिली, पण प्रत्येक वेळा ट्रक यायचा, मग पुस्तकं घेऊन पळून जावे लागायचे.

ही पुस्तकं तुम्ही ठेवायचा कुठे?

पक्के बांधून ठेवायचो. रस्त्यावर ग्रिल होते, त्यालालगत लाकडी मजबूत फळ्यांची खोकी असत, त्यात पुस्तकं रचून ठेवून मग त्यावर प्लॅस्टिक टाकत, आणि जाळ्याने पक्के बांधून टाकत. बस!

रात्री कोणी झोपायचं तिथे? पुस्तकं चोरीला नाही गेली?

नाही. रात्री तिथे झोपायची गरज नसते. पुस्तकांना काही होत नाही. सगळ्यांची पुस्तकं तशीच ठेवलेली असायची. कभी कुछ नहीं हुवा. बुक्स का ऐसे है, की कोई चुरा नहीं सकता (का ते!!? हे मला अजूनही कळलेले नाही). कपडे वगैरे असतील तर ते चोरीला जाऊ शकतात. पुस्तकांना काही होत नाही. आजतक मेरे टाईममें तो मैने चोरी होते हुए देखा नहीं. और सुना भी नहीं. भीतिही नाही वाटली कधी. तसा मी फाऊंटन मध्ये दोनच वर्ष होतो, पण कधी आमची किंवा इतर कोणाची पुस्तकं गेल्याचे ऐकिवात नाही.

जेव्हा ही जागा जप्त झाली तेव्हा विकत घेऊन जेमतेम ३ महिने झाले होते. तो पूर्ण काळच आम्हाला खराब होता. आधी फुफाजी गेले. मग या जागेची वाट लागली. मग माझे कोपरखैराण्यात एक दुकान होते, ते वडिलांनी विकले आणि नागपूरसाईड के पास यवतमाळ है, तिथे एका बांधकाम व्यवसायात भागीदारीत गुंतवणूक केली. पार्टनर चोर निकला. दुसर्‍याच्याच मालकीच्या जागेवर त्यांनी बांधकाम सुरु केले होते. गुन्हा दाखल झाला. बांधकाम स्थगित करायचा फतवा निघाला. भागीदार सगळ्यांचे पैसे घेऊन पळून गेला. आमचं दिवाळं वाजलं.

भागीदार ओळखीचा होता?

नाही. कसलं काय. एका नातेवाईकाचा परिचित होता. एक दिवस आमच्याकडे राहिला. एका रात्रीतून त्याने वडिलांना काय पट्टी पढवली, कधीच कळलं नाही. झालं! सकाळपर्यंत वडिलांनी सगळे विकून त्याच्या धंद्यात पैसे लावायचे ठरवले. हे कोपरखैराण्यातले दुकान विकले. अजून एक छोटीशी जागा होती, तीही विकली आणि सर्व पैसे लावले. लोग बोलते है शनी की साडेसाती थी. अब सच लगता है. त्याच सुमारास घेतलेले सर्व निर्णय चुकीचे ठरत गेले.

२००२ मध्ये मी BCA चा अभ्यासक्रम अपूर्ण सोडून इथे आलो, मुंबईत धंद्यात मदत करायला.

कुठून?

मध्यप्रदेशातून. मी तिथेच वाढलो. शिक्षण सुरू होतं, पण इकडे धंद्यात मदत करायला घरचं कुणीतरी असणं आवश्यक होतं. मला यायचं नव्हतं. BCA, MCA करायचं होतं, पण वडिलांनी आजोबांकरवी खूप दबाव टाकला. मग आलो. २००४ मध्ये सगळा बोर्‍या वाजल्यावर मी विचार केला, निदान एक पदवी हाताशी असावी. बाहेरून बी.ए पूर्ण केले शेवटी.

मी मध्यप्रदेशात होतो. इकडे वडिलांना त्यांच्या हाताखाली काम करणार्‍याने फसवले होते. पापाने बहौत चढाके रखा था. गल्ला उस आदमी के हाथ था. त्याने अगदी आमच्या शेजारीच, आमच्या नाकावर टिच्चून पदपथावर स्वतःची पुस्तकविक्री सुरु केली. वडील स्वत: कधी पुस्तकं विकायचे नाहीत. त्यामुळे ग्राहकांना याचाच चेहरा ओळखीचा होता. आमचे ग्राहक त्याच्याकडे जायला लागले. मग मला बोलावून घेतले.

तुम्ही पाहताय ना किती वर्ष. मी कधी कोणाला हाताखाली ठेवत नाही ते यासाठीच. मी स्वत: पुस्तकं विकतो. लोकांना माझाच चेहरा ओळखीचा असतो. ते या धंद्यासाठी फार आवश्यक आहे.

आता अभ्यासक्रमातील पुस्त्तकं ठेवत नाही? पूर्वी खूप विक्री व्हायची ना त्यांची?

आता जागा नाही. ती पुस्तकं नीट ठेवली पाहिजेत. मोठी असतात आकाराने. वो फोर्ट एरियाकी बातही और थी! इथे ती पुस्तकं इतकी खपणारही नाहीत. तरी कोणाला हवी असल्यास मी जुगाड करुन देतो बरोबर. त्या पुस्तकांचं कसं असतं, सतत ठेवली पाहिजेत, विद्यार्थ्यांना कळले पाहिजे, की अरे, ही इथे याच्याकडे मिळतात, तरच धंदा वाढतो.

तुमच्याकडे जी सात मुलं कामाला होती त्यांना काय देत होता?

१३५ रुपये रोजंदारीने. कधी १५०. रोजचे रोज पैसे द्यावे लागत. बिहार, यूपी से आते हैं छोकरे.

(ती मुलं अल्पवयीन असतात का, राहतात कुठे, खातात काय, किती तास काम करतात, हे सर्व प्रश्न मी गिळले. त्यांची उत्तरं पुरेशा गुंतागुंतीची असतात आणि फाड्कन समोरच्याला आपल्या तथाकथित पांढरपेशा मूल्यांनुसार जोखणे आणि त्या व्यक्तीवर एक कायदेशीर self righteous फुकटची फुली मारणे याच्याइतका दुसरा मूर्खपणा नाही, हेही वाढत्या वयानुसार कळू लागले आहेच.)

त्यांना लिहिता वाचता येतं? पुस्तकांत काय असतं, ते वाचता येतं? माहित असतं?

नहीं. आप ताज्जुब मानिये. इनको कुछ भनक नहीं रहती किताबों के बारे में. पण कान देऊन शिकतात. Donaldson, Sydney Sheldon हे सगळं लक्षात ठेवतात, कुठली पुस्तकं खपतात, हे रंगावरुन लक्षात ठेवतात, जुजबी इंग्रजी शिकतात. अडत नाही काही. मलाही माहित नव्हतं आधी. पण हळूहळू वाचायला लागलो. कस्टमर को खुद अटेंड करता था, तो मैं जल्दी सीख गया, की क्या चीजें चलती है. मीही छोट्या गावातला होतो. सीडनी शेल्डन, नोरा रॉबर्ट कोण आहे, तेही माहित नव्हतं, 'मेइन कँम्फ' सुना भी नहीं था! मग शिकलो. प्रत्येक पुस्तकाच्या मलपृष्ठावरचा मजकूर तरी कमीतकमी आणि प्रत्येक लेखकाचे एकतरी पुस्तकं एवढे तरी वाचायला लागलो. आता मी कुठलेही पुस्तक विकू शकतो.

आणि वडील?

वडिलांना लिहितावाचता येतं, पण पुस्त्तक कधी वाचलं नसेल. आयुष्यभर विकली, पण आतला मजकूर काय आहे, ते त्यांना नाही सांगता येणार.

हिशेब कसा ठेवतात मालाचा?

प्रत्येक पुस्तक त्याच्या कॅटेगरीनुसार नोंदवत जायचे एका बाजूला. या विभागातले हे पुस्तक गेले आज असे. विक्रीच्या आणि उसन्या दिल्याच्या नोंदी आणि एकीकडे कुठल्या व्यापार्‍याला किती पैसे दिले, त्याचा हिशेब. दिवसाचा ताळेबंद घालायचा शेवटी. सगळे हाताने लिहायचे आणि हिशेब करायचे. आणि कंपनीकडून जी नवीन पुस्तकं विकायला यायची, त्याचे तर छापील बिल असायचे.

सकाळी दहा ते रात्री सातपर्यंत कामाचे तास. मग सगळे आवरून, रोजंदारीचे पैसे चुकते करुन, पुस्तकं बांधून ठेवली की हिशेब. नऊ, दहा वाजत असत. फोर्ट में था, दो साल कैसे चलें गये, पता ही नहीं चला. कितने आदमी और कितनी किताबें. मुझे खुदको ताज्जुब होता है. अगर वहाँ और तीन साल मिलते तो मै ऐसा सेट हो जाता! लेकीन . . .

समजा, एकावेळेस जास्त लोकं आली तर गडबडीत पुस्तकं गहाळ होऊ शकतात? चोरीला जाऊ शकतात?

नाही. जनरली पढेलिखे लोग ऐसा करते नहीं हैं. और काम करनेवाले सभी लोगोंका ध्यान रहता है बराबर. आणि मी स्वतः असायचो दिवसभर. वडिलांनी कधी स्वत: लक्ष ठेवले नाही. कायम हाताखाली कोणीतरी. असा परस्पर परभारे धंदा चालत नसतो. स्वतः डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते, तर हाताखालच्या लोकांना कळते.

मैं बडा लडका था, मेरा माईंड डिस्टर्ब करके रखा इन लोगोंने. सब एज्युकेशन छोडके यहाँ आना पडा, तो मुझे तो सब सीखनाही था, धंदेका सब...

आता लहान भावाचे शिक्षण संपले, एक नोकरी करत होता, पण तीही सोडली. धरसोड करत असतो. तो काही खूप हुशार नाहीये. मला जरा धंद्यात मदत करेल, तर आमच्या दोघांचाही फायदा होईल. पण ऐकत नाही. हा जर सकाळपासून उघडून बसला तर दुकान उघडं राहील, खप वाढेल. सगळीकडून मरमर करत पुस्तकं घेऊन येईस्तोवर मला २ वाजतात . . . अर्धा दिवस दुकान बंदच असतं.

इथे या परिसरात कसे काय आला?

तीनच वर्षं झाली इथे हे सुरु करुन. लोकेशन अच्छा लगा. जेव्हा सुरु केलं ना इकडे, तेव्हा समोर एक सँडविचवाला, डोसेवाला आणि चहावाला होता. तेव्हा त्यांची गिर्‍हाईकं माझ्याकडे यायचे. खाताखाता पुस्तकं चाळायचे. त्यांना सोसायटीने काढल्यापासून माझे फार नुकसान झाले.

दुकानमालकाने दुकान भाड्याने दिले आहे, आणि भाडेकर्‍याने तुला दुकानाबाहेरची पायर्‍यांवरची जागा . . . हे अधिकृत असतं?

(याला हसण्याशिवाय तो तरी काय उत्तर देणार? आपले अज्ञान अगाध असते. )

अपने यहाँ पे जो सब लोग ऐसे हैं, वो सब किसी ना किसी को रेंट देते है. भेलवाला, फूलवाला, सब्जीवाला, इडलीवाला, फिशवाला, चाय की टपरी . . . हर कोई . . . ये मुंबई है मॅडम. फुटपाथ पे खडे रहना हो, तो भी रेंट देना पडता है.

तो वो Rxxxxxx Fxxxx (भारतातील प्रसिद्ध प्रतिष्ठित Supermarket Chainचे नाव) त्याच्या बाहेरचा तो फ्रँकीवाला, भेळवाला आहे तो या स्टोरला भाडं देतो? काय सांगतोस? पण पदपथ त्याच्या मालकीचा थोडीच आहे . . .?

हो. आणि ते भाडं बरंच जास्त आहे.

(आणि ही तर पब्लिक लिमिटेड कंपनी आहे ना? ते हे पैसे घेतात कसे आणि दाखवतात काय म्हणे हिशेबात? )

मिळकत ठीक आहे? भाडं निघतं? पुस्तकं कुठे ठेवतोस?

भाडं निघतं . . . तीन हजार रुपये भाडं आहे. पण अजून म्हणावी तशी बरकत नाही. माझाही नाईलाज आहे. इथे दुकानाची भाडी खूप वाढलीत. तितके पैसे नाहीत माझ्याकडे. पण एक दिवस मी दुकान जरुर घेईन.

पुस्तकं ना . . . थोडी त्या खोक्यात ठेवतो (त्याच्या विक्रीची जागा), थोडी घरी घेऊन जातो आणि थोडी पुस्तकं त्या नेटकॅफेत ठेवतो. म्हणून तर inventory वाढवत नाही. जागाच नाहीये.

खोक्याला कुलुप?

नाही. गरज नाही. कुछ नहीं होता . . . ATM का वॉचमन है. रातमें नजर रख्खे रहता हैं.

ते जे दुसरं स्टोअर आहे, त्याच्या समोरची जागा महाग आहे का? (अर्थातच नवर्‍याचा प्रश्न. त्याचा पुस्तकवाला असतो ना तिकडे)

बॅडलक था सर. त्याचं भाडंही माझ्याएवढंच आहे, पण तेव्हा इथे तो सँडविच/डोसावाला होता, माझा इथला खप चांगला होता. मला कळलंच नाही की एक दिवस ते स्टोर चालेल, तसतसा माझा धंदाही चालेल. आणि नेमका सँडविच डोसेवालाही गेला . . . गलती हो गई. उसके पास अभी ज्यादा जगा है.

दुकान घ्यायचं झालं तुला भाड्याने तर किती भाडं आहे?

आपल्या इथे आता खूप वाढलीत भाडी. रुपये २२,००० च्या आसपास आणि डिपॉझिट. एवढी तर आपल्या इथे पुस्तकं खपत नाही. आणि पूर्वी वीस रुपये किलोने जुनी पुस्तकं मी स्वतः घेतलीत. आता तेही शक्य नाही.. सगळ्याच गोष्टींचा खर्च वाढलाय.

पुस्तकं आता कुठून आणता?

बर्‍याच ठिकाणाहून. आपल्या परिसरातील सर्व रद्दीवाले (शनिवार, रविवारी, कारण या दिवशीच लोकांना घर आवरायला वेळ मिळतो), माझी जुनी गिर्‍हाईकं, बाकी केंम्प्सकॉर्नर-पेडर रोड-मलबार हिल इथून.

रोज दक्षिण मुंबईत जातो?

दर दोन दिवसांनी तरी जातोच. ट्रेनने महालक्ष्मीला उतरतो, दर्शन करतो, तिथून चालत पेडर रोड, अल्टामाऊंट रोड, मग मुकेश अंबानीच्या घराच्या तिकडे एक भंगारवाला आहे तिकडे, केम्प्स कॉर्नर, तिथून नेपियन सी रोड, तिथून बस, दरिया महल, विल्सन कॉलेच्या तिकडे, बाबुलनाथ, मलबार हिल . . .
इथे सर्व पारशी, गुजराथी श्रीमंत लोकं राहतात. ज्या दिवशी पुस्तक प्रकाशित होतं, त्या दिवशी विकत घेतात आणि मग त्या आठवड्यात रद्दीत टाकतात. पण घेणारा मी एकटाच नाही ना . . . खूप लोकं असतात. गाडी घेऊन रद्दीतली पुस्तकं घेत असतात. नशीब चांगले असले तरच मिळते. शिवाय मी हातात मावेल तितकीच पुस्तकं घेऊ शकतो. वो भी तो मजबूरी है . . .

राहता कुठे?

सांताक्रूज. साडेतीनसो स्क्वेअर फीटका घर है, घरी आईवडील, भाऊ आहे. मध्यंतरी वडिलांना एका दिवशी दोन अटॅक येऊन गेले. मीही फार निराश झालो होतो.

आता . . .

वडिलांचा धंदा चालू आहे पुन्हा. राजस्थानातील एका कॉलेजसोबत जुगाड केला आहे अभियांत्रिकी पुस्तकं खपवायचा. पाहूयात. मोठ्या कंपन्यांची पाठ्यपुस्तकं. त्याने कंपनीचे नाव सांगितले.

(मातोश्रींचे या सर्व गोष्टींबद्दल, नफ्यातोट्याबद्दल काय मत आहे, किंबहुना आईला मत आहे का? हेही ओठावर आलेले प्रश्न म्यान केले.)

एवढी मोठी कंपनी?

हो, मी त्यांना इमेल पाठवली. मी करतो ना इमेल वगैरे. लॅपटॉप आहे. नवीन प्रकाशकांशी संपर्क साधतो. कॉलेजने पैसे लावले की प्रकाशकांकडून त्यांना पुस्तकं मिळवून देतो. थोडेबहुत कमिशन निघते ३%, ५%, पण कसंय, धंदा म्हणला की असा छोटा विचार नाही करायचा. आज छोटे आहे . . . उद्या?
उम्मीद रखनी चाहिये, अलग सोचना चाहिये . . .

ये बिजनेसमें लोकेशन मेन हैं. तीन साल में आप उपर जा सकते अगर सब सही हो तो.

इंटरनेटवर पुस्तकं मिळतात माहित आहे ना?

Flipkart ना? खूप सूट देते, तीच तर समस्या आहे. ३०%, ४०%. वो सबको मार डालना चाहतें हैं. मलाही खूप लोकं सांगतात की ते तर एवढी सूट देतात. पण मी नाही ना देऊ शकत तेवढी सूट. कधीतरी मीच तिथून मागवून लोकांना विकतो. क्रॉसवर्डलाही चांगले भाजले असणार त्यांच्यामुळे.

देखो, अपने यहाँ पे लोग सेकंडहँड बुक्स पढना कभी बंद नही करेंगे. क्रॉसवर्ड को ये मालूम नही है. आज कईं साल मैंने इसपे गौर किया हुवा है. माझे कितीतरी ग्राहक आधी वाचतात, आणि मग आवडले तर विकतही घेतात.

क्रॉसवर्ड पाहिलंय?

हो, नेहमी जातो. दोनतीन ठिकाणच्या क्रॉसवर्डमध्ये जातो. लॅंडमार्क मध्येही. तिथूनच तर सध्याची नवीन पुस्तकांची नावं समजतात. क्रॉसवर्ड तो एक नंबर पैसे लेता है. २००४ के किताब पे ३०% छूट देंगे. नवीन पुस्तकांवर कधीच नाही. लोकं तिथे जाऊन पुस्तकं चाळतात आणि सेकंडहँड नाहीतर फ्लिपकार्टवरून पुस्तकं विकत घेतात.

मराठी पुस्तकं का नाही ठेवत?

माहिती नाही मला त्याची. आपल्याला माहिती आहे, तेच करावे नीट. आणि इंग्रजी पुस्तकांची आता मला बरीच माहिती आहे. हिंदी पुस्तकांचासुद्धा खूप मार्केट आहे. पण तेही मला माहित नाही, तर मी त्यात पडत नाही फारसा.

आपल्या परिसरात लोकं काय वाचतात रे?

John Grisham, Sydney Sheldon, Dale Carnegie और पॉजिटिव्ह सोचनेवाली किताबें सालोंसे बेस्टसेलर हैं, फिर आजकल वो जादुई कहानियाँ जैसे Harry Potter, Percy Jackson, Artemis Fowl वगैरे, अभी का ट्रेंड इंडियन फिक्शन, शांताराम, Maximum City, Booker Prize वालें, अमिताव घोष, रोहिंटन मिस्त्री, चेतन भगत वगैरे . . . जो रियेलिटी को दर्साते हैं, लोग उसे पसंद करते हैं. आजकल काफी चलती है Vampire किताबें, और पुरानी क्लासिक्स तो हैं ही हैं. कैसा हैं, ये सब पढा नही ऐसे बोल नहीं सकतें. जैसे एनिमल फार्म, हू मुव्ह्ड माय चीझ वगैरे . . . इसके लिए लोग पढते हैं.

फिर वो मॅनेजमेंटवाली किताबें बहुत चलती हैं. पहले मेरे टाईम मे 'यू कॅन विन' का बहुत चर्चा था, फिर अरिंदम चौधरी, सुब्रतो बागची वगैरा. आधी असे नव्हते. पूर्वी फक्त Warren Buffet, Peter Drucker यांची पुस्त्तकं खपत. क्रायसिस मॅनेजमेंटची पुस्तकं, BLINK वगैरा . . . फिर लेहमन ब्रदर डुबने के बाद वो इंन्व्हेस्टमेंटवाली किताबें बहुत चलीं. जैसे Intelligent Investor हुवा, Economist हुवा, Too big to Fail, Alan Greenspan की किताब, Michael Lewis का Big Shot वगैरे . . . स्टॉक में हर बंदा घुसने लगा.

(ही एक गंमतच आहे. एकदा नवरा माझ्या कंपनीचे नाव आणि चिन्ह असलेली कापडी पिशवी घेऊन पुस्तकं परत करायला गेला होता, तेव्हा अखिलेशने त्याला दिवाळखोरीवर आलेले पुस्तक दाखवले होते आणि कंपनीबाबत गप्पा मारल्या होत्या. )

Meluha series, George Bush, Clintons की किताबें, Dan Brown . . . यें सब बीच में बहुत खपते थे.
Mills &Boons . . . हमेशा चलते हैं. ज्यादातर औरतें कस्टमर है. तो रोमँटिक नॉव्हेल बहुत चलते हैं.
बच्चों की किताबोंमें Enid Blyton, Hardy Boys, Nancy Drew, Tintin, Archies. काफी चलते हैं. कितनेही सालोंसें चले आ रहे हैं.

मेलुहा का हिट आहे एवढं?

अरे भगवान सिव को नॉर्मल आदमी की तरह दिखाया हैं. ट्रायलॉजी हैं. लोगोंको बहुत पसंद आ रहा हैं.
बहौत interesting fiction हैं. मै भी चाह रहा हूं की हिन्दी अनुवाद अपने दादाजी को भेंजू.

पायरेटेड पुस्तकं?

लोकं कधीकधी अति करतात. Meluha series आजकल बहुत चलता हैं. अब १९५ रुपयें की किताब में क्या पायरेटेड खरीदना.साताठसोंका थोडी हैं. वैसे भी मै पायरेटेड नहीं बेचता हूं ज्यादा.
वो धंदा अलग हैं. मेरेको पायरेटेड का कोई खास शौक नहीं हैं. किसी को देनें मे शरम आती हैं इतना गंदा फाँन्ट. पढनेकोभी होता नहीं. मैने जरुर चालीस रुपये में लिया, सौ में बेचूंगा, लेकीन अजीब लगता हैं, सामनेवाला आधी चीज पढ पायेगा, आधी नहीं पढ पायेगा, इतनी बकवास छपाई. वैसेभी . . . वो धंदा पुराही अलग है. छोडो ना . . .

पायरेटेड पुस्तकांवर आमचे एक मोठे आणि महत्त्वाचे संभाषण झाले. त्यांचा स्रोत, विक्री, व्यवसाय, आकडेवारी, नफ्याची मार्जिन आणि विक्रेते वगैरे. लिहायला मला आवडले असते, पण ते एक असो.

आणि इथे मुंबईत सिग्नलवर पुस्तकं विकणारी मुलं?

ती मुलं वीस वीस रुपयांच्या मार्जिनवर काम करतात. ती पुस्तकं मोस्टली पायरेटेड असतात आणि छापणारेच यांना देतात. मुलं काय, दिवसातून पन्नास पुस्तकं विकली, तरी त्यांचा दिवस निघतो. महालक्ष्मी सिग्नल, माहीम सिग्नल, सी लिंक होने के बाद बांद्रा सिग्नल पें . . . ये सब रहते हैं. बर्‍याच गाड्या असतात, त्यांची पुस्तकं खपतात, साठ रुपयांना पुस्तक विकतात. तुम्हाला शंभराच्या खाली कुठलेही पुस्तक मिळाले तर समजायचे, की ते पायरेटेड आहे. जे पुस्तकं काढतात, त्यांनीच आपली विक्री व्यवस्था तयार केली आहे.

मी कधीच हे काम केलं नाही आणि करणारही नाही. तुम्ही ऐकलं असेल. अंधेरी स्टेशनजवळ स्वस्त पुस्तकं मिळतात. तीही त्यातलीच.

नवीन पुस्तकांची नावं कळतात कशी?

एकतर गिर्‍हाईकं विचारतात. आणि मी ऑनलाईन ट्रॅक करत असतो. फ्लिप़कार्ट, हार्पर कॉलिन्सची साईट, पेंग्विनची साईट वगैरे, प्रत्येक वर्तमानपत्रात पुस्तकांचे परीक्षण असते ते वाचतो, बेस्टसेलर्स यादी बारकाईने वाचतो, क्रॉसवर्डचे बदलणारे डिस्प्ले, सगळे पहात असतो. शोधत असतो.

आणि एकदोन माझे खास गिर्‍हाईक होते. त्यांनी मला मॅनेजमेंट पुस्तकांबाबत खूप शिकवले. उन्होंनें मुझे बहौत सिखाया. डेरिव्हेटीव्हज . . . पासून रामचरणपर्यंत. मोठ्या पदावर होते एका रेटिंग एजन्सीत.

वर्तमानपत्र वाचतो?

हो. रोज. इंग्रजी तर नक्कीच. धंदा डिपेंड करता हैं ना.

आणि वाचनालयात मासिकं का ठेवत नाही?

मार्जिन नाही. जागाही नाही. सेकंडहँड मासिकं मिळत नाही लवकर. फेमिना, व्होग, ज्युलरीके मॅगझिन, फिल्मफेअर वगैरे बांद्रा साईडला चालतात. बाकी काही नाही.
(आमच्या परिसरात एखाद वर्षापूर्वी एक वाचनालय हिंदी मराठी इंग्रजी मासिक ठेवायचे. त्याची बरीच माहिती मी वेळोवेळी अखिलेशला दिली आहे. दिवाळी अंक ठेवण्याविषयी सुचवले आहे. त्याला ते अजिबात पटत नाही.)

एक मुलगा हाताशी ठेवून धंदा वाढवत का नाही. लायब्ररीवाला.कॉम घरी पुस्तक पाठवते . . .

कॅपिटल नहीं हैं. बहोत कुछ करना हैं . . . राह नहीं मिल रही. मैं तो बिजनेस और बढानेसे भी डरता हूं. अगर ऑर्डर आया और पूरा ना कर पाया, तो और नुकसान होगा . . .

फ्लिपकार्टचा धंदा का चालतो? लडकोंका नेटवर्क. फटाफट पुस्तकं पोचती करतात.

आता काय करायचे ठरवले आहे

धंदा वाढवायचा आहे. स्टॉकमध्येही पैसे गुंतवायचे आहेत. बीचमें मैं स्टॉकसे काफी खेला, फिर घाटा हुवा. घाटा झाल्यापासून थोडी भीती वाटते. बर्‍याच आयडिया आहेत. पाहूयात. अभी मैं पहले सोचना चाहता हूं, की ये सब हो क्या रहा हैं मेरे साथ. अगर सब ठीक हो गया, तो चाहूंगा की सेकंडहँड किताबोंकी एक बडीसी दुकान खोलूं. मुझे उसकी नब्ज पता है.

आता वडिलांच्या मागे लागतो आहे की मला नवीन स्टॉक हवाय थोडा, लोकं बोर होतायेत तीच तीच पुस्तकं वाचून. भाऊही हाताशी आला तर बरं पडेल. पुस्तकं वाचायला दिली की स्टेडी मिळकत असते, आणि विकली की नफा जास्त. त्यामुळे दोन्ही करावे लागते, सतत करत रहावे लागते . . .

किंडल, अ‍ॅमेझॉन, ऑडियो बुक्स . . .?

ऐकलं आहे, पाहिलं आहे. पण आपल्याकडे हे सगळं अजून दूर आहे असं मला वाटतं.

आजकाल चांगल्या दुकानातून नवीन पुस्तक घेतलं तरी कागद का इतका वाईट असतो रे?

हाँ. ये बात सही कहीं आपने. मैंने भी गौर किया हुआ हैं. माझ्या मते हे लोकं छापतात आणि स्वतःची मार्जिन बनवतात. त्याशिवाय हे ४०% डिस्काऊंट वगैरे अजिबात शक्य नाही या धंद्यात. लॉबी आहे ही एक.

नाही, ते कसं काय छापत असतील? वाटत नाही रे . . .

मैंने खुद देखा हुआ हैं. पहिले हार्डबाऊंड काढतात, मग जी खपली नाहीत त्यांचे पुठ्ठे टरकावून त्यांचेच पेपरबॅक बनवतात . . . येवढे करतात तर मग छापतही असतील . . . कोणाला ठाऊक . . .

. . . संपादित . . . पुढील संभाषण इथे लिहीण्यात हशील नाही.

*****

तर अशी ही आकाशपाळण्याची, अनुदिनी अनुतापाची गोष्ट. सुफळ नाही, संपूर्णही नाही. अपूर्ण वाटतेय ना?
मलाही. कदाचित अखिलेशलाही.

जितक्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तितकेच अजून प्रश्न तुमच्या माझ्या मनी उद्भवले असले, तर आपल्याला यातून काहीतरी उमजले असे म्हणता येईल. आणि हो, आज नाव त्याचे आहे, उद्या तुमचे, माझेही असू शकते. आकाशपाळणा कोणाला चुकलाय?

अखिलेशचा आकाशपाळणा पुन्हा आकाशाकडे झेपावा! एक आवर्तन तरी पूर्ण होऊ दे !

- रैना
छायाचित्रांसाठी आभार: अमित