एक नाते, हिरवे गर्द

एकेकाळी माझं वाटणारं ते रोप आज कोणाचंतरी झाड असेल, कदाचित तसंच निखळ डवरत असेल किंवा बहरत नसेलही. पण त्याच्या सान्निध्यात घालवलेली दीड वर्ष त्याच्या फुलांहूनही सुगंधी होती आणि अजूनही आहेत. अचानक कुठेही जाईजुईचा वास भोवती रुंजी घालायला लागला की पहिली आठवण त्याचीच होते.

borderpng.png

"ज

पून घरी ने आणि लवकरात लवकर लाव." एक रोपटं बक्षिसादाखल अलगद माझ्या हातात ठेवत प्रमुख पाहुणे म्हणाले. गर्द हिरव्या पानांनी दाटी केलेली ती एकच लहानशी फांदी होती. तिसरीत गीता पाठांतराच्या स्पर्धेत मिळालेलं पारितोषिक! ते झाड कशाचं आहे, कुठे लावायचं, किती मोठं होणार, त्याला फळंफुलं येणार की तुळशीसारखेच ते कुंडीभर नुसतं पसरत रहाणार, काही काही ठाऊक नव्हतं. समोर टाळ्या वाजवणारे चारशे हात आणि कौतुकाने बघणारे तितकेच डोळे मंचावर खिळले होते, पण माझे डोळे मात्र तेवढ्यातल्या तेवढ्यात मातीने माखलेल्या माझ्या हातांकडे, त्यांमधे घट्ट धरून ठेवलेल्या ओंजळभर चिखलातून डोकावणार्‍या हिरव्या पानांकडे होते.

garda hirave nate.jpgघरी जाईपर्यंत त्या रोपावरची पकड अधिकाधिक घट्ट व्हायला लागली. भोवताली गुंडाळलेल्या प्लॅस्टिकच्या रुमालाला न जुमानता मातीचे डाग कपड्यांवरही पडले होते. स्नेहसंमेलनाचा संपूर्ण दिवस मी हातातल्या रोपट्याकडे एकटक बघण्यात घालवला होता. मला ‘माझं’ म्हणून सांभाळायला मिळालेलं सजीव असं पहिलंच काहीतरी. त्याला उशाशी घेऊन झोपण्याच्या हट्टापायी एक उशी खराब झाली आणि बिचारं रोपटं एक रात्र तहानलेलं राहिलं ते निराळंच! सकाळी उठून पाहिलं तर आजोबा रोप प्लॅस्टिकमधून बाहेर काढून ओल्या मातीच्या ओंजळीसकट, मोठ्या कुंडीत लावत होते. कुंडीत आधीच पुष्कळ माती होती. आता नव्या-जुन्या मातीचं आपापसात पटेल की नाही, त्या झगड्यात माझ्या रोपाला तर काही होणार नाही ना, अशा अनेक चिंतांनी माझा जीव खालीवर होत होता.

जगदीशचंद्र बोस या शास्त्रज्ञांनी झाडांबद्दल लिहिलेला एक नवीन लेख त्याच वेळी हातात आला होता. वाढ, प्रजनन या सजीव प्राण्यांच्या गुणधर्मासोबतच झाडांना संवेदनाही असतात अशा काहीशा आशयाचा लेख होता तो. संवेदना म्हणजे काय आणि त्या कोणाला असतात हे समजत नसलं तरी माणसासारखा आणि प्राण्यांसारखाच जीव लावावा असं माझ्याही रोपट्यात काहीतरी होतं याची खात्री पटायला लागली. "कशाचं झाड आहे गं आजी?" मन लावून टीव्ही बघत असलेल्या आजीला मी विचारलं. "हं? अगं जाईजुईचं आहेसं वाटतंय मला." वाकूनवाकून रोपट्याची पानं गोंजारतानाच टीव्हीवरच्या गाण्याचे शब्द कानावर आले . . .

अंकुराचे होता रोप, होई रोपट्याचे झाड
मुळ्या रोवून रानात उभे राहील हे खोड
निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात
बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत

काय झालं कोणास ठाऊक? मी वाकून बघताना जाईच्या एका पानावर डोळ्यातल्या पाण्याचा थेंब पडला. मी झाडाला घातलेलं पहिलंवहिलं पाणी. हळूहळू त्याच्याशी बोलणं, त्याच्यासमोर तक्रारी मांडणं, लहानशा फांदीला सूर्यप्रकाशात ठेवणं, गरजेपेक्षा जास्तच खतपाणी घालणं, नव्याने फुटणार्‍या प्रत्येक पानाची नोंद ठेवणं आणि येणार्‍या जाणार्‍या प्रत्येकाला जाईदर्शन घडवणं या सगळ्या गोष्टी अगदी नेहमीच्या झाल्या. महिन्या, दोन महिन्यांतच रोप रांगत रांगत कुंडीकाठाच्या आधाराने तळवाभर पसरलं होतं. त्याची जुनी पानं दिवसेंदिवस जास्तच गडद होत चालली होती, नवी अधिकच नाजूक आणि पोपटी वाटत. नवी पालवी साशंक असायची, वाकून वाकून खालच्या निर्ढावलेल्या पानांकडे बघत असायची. नवख्यांना दिलासा देणारी गडद हिरवी पानं हसताना आणखीनच रुंद वाटायची. झाडाच्या नाविन्यातील नियमितता मला भावायची आणि कदाचित माझ्यातील नियमिततेचं नाविन्य झाडाला भावत असेल. रोपाशी न बोलता मी कधी जेवलेही नाही, तसंच मला न सांगता रोप नुसतं सूर्यप्रकाशाकडेही झुकणार नाही अशी मला खात्री होती. एरवी कधी तुळशीलाही पाणी न घालणारी मी, एका झाडाला मात्र न चुकता भरपूर पाणी घालायला लागले. बाळसं धरू लागलेली ती हिरवळ बघता बघता माझं पानांचं गणित ओलांडायला लागली.

अचानक एक दिवस कच्चट, पिवळसर कळी आली. तिची पुरेशी ओळख व्हायच्या आतच अजून चार नजरेस पडल्या. "ओळखलंस की नाही?" म्हणत एकेक करून माझ्या रोपावर सरावल्या. तीन महिने इतर सोबत नसलेल्या पानांना आता माझ्याशिवायही कोणीतरी सापडल्याचा मला नक्की आनंद झाला की खंत वाटली हे ठरवायचा मात्र मी आजही प्रयत्न करते आहे. पण रोपावर राग धरता यायचा नाही. नव्याने डवरलेल्या फुलांचा घमघमाट आपोआप ओढून खिडकीपाशी न्यायचा.

गजरादेखील फक्त घरच्या जाईचाच असावासा वाटायचा. फुलं असेनात का दहा-पंधराच? स्वतःच्या कष्टाने म्हणण्यापेक्षाही स्वःच्या प्रेमाने वाढवलेली होती ती. पण जी अलवार फांदीपासून वेगळी व्हायची तीच गजर्‍यात ओवायची. मग बाकीची कितीही टपोरी, ताजी आणि शुभ्र असली तरीही झाडावरच्या फुलांना हात लावायला माझी मलाच मनाई होती. खाली पसरलेल्या फुलांच्या देठाशी हात लावला की प्रत्येक फुलातून मधाचा मोजून एक लहानसा थेंब गळत असे.

ते रोप माझा एक आरसा होत होतं. माझ्या परीक्षांच्या दिवसात ते उन्हाला कंटाळलेलं वाटायचं, माझ्या सुट्टीत ते नसलेल्या वार्‍यावरही डोलत असायचं, मैत्रिणीशी भांडण माझं पण निशिगंधाकडे पाठ फिरवून कोरफडीकडे गार्‍हाणं तेच सांगायचं. नवीन कपडे मला घेतले तरी टवटवी त्याच्या पानांवर दिसायची, माझं कौतुक झालं तर एखाद्या कळीचं फूल होत असे आणि मला कोणी खूपच रागावलं तर नुकतीच आलेली कळी कित्येक दिवस घट्ट बंद रहायची. माझं पोट भरलं असेल तर कुंडीतलं पाणी ह्याला नकोसं व्हायचं. मला गोवर झाला आणि ह्याचीच पानं वाळायला लागली. माझी रडण्याची आणि याची फुलांचा सडा पाडण्याचीही एकच वेळ! ही माझी समजूत असेल, विश्वास, असेल, खात्री असेल, अंधश्रद्धा असेल किंवा कदाचित फक्त फक्त प्रेम असेल. जे काय होतं ते फार सुखद होतं!

आठ-दहा महिन्यांपूर्वी अजस्त्र वाटणारी कुंडी आता जाईच्या नवीन लव्हाळ्यांनाही अपुरी पडायला लागली. तरी जाईला रोजची नजर जाईल अशा कप्प्यात बंद करून ठेवायची माझी हाव जाईना. आठवणींचं कुंपण घालून जेवढा तिच्या विस्ताराला आळं करायचा प्रयत्न केला तितकीच जाई आणि तिचा हिरवा पिसारा कुंडीतून ओसंडून बहरायला लागले. नाइलाजाने मुळासकट उचलून तिचं नवीन घर बिल्डिंगमधेच वसवलं. शाळेतून घरी यायला मग रोज पंधरा-वीस मिनिटं उशीर व्हायला लागला. घरात नसूनही आमच्या गप्पा वाढायला लागल्या. जाईच्या शेजारी मित्रमैत्रिणींशी भांडणं झाली, तिथेच ती मिटली, त्याच कट्ट्यावर बसून बरीच पुस्तकं वाचली. होळीच्या दिवशी त्या राईवर चंद्राने धरलेलं छत्र पाहिलं, उजेडात अजून शुभ्र झालेली, रात्री झोपाळलेली फुलं पाहिली. बाजूच्या तगरीच्या रोज रोज फुलण्याचा कधीतरी हेवा वाटायचा, पण कधीतरीच भरभरून ओंजळीत घालणारं माझं रोपटंच लाडकं राहिलं.

पुढच्या उन्हाळ्यात त्याची एक फांदी पूर्णपणे वाळली. मुळांना खाली कातळाने अडवलं. नव्याने झालेल्या बिल्डिंगमुळे सूर्यप्रकाश अडला. एव्हाना सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झालेल्या झाडाची एकेक फांदी सगळ्यांनी आपापल्या घरी लावायला नेली. माझ्याच ओळखीचं प्रत्येक पान कोणीतरी नेलं होतं! जितक्या सहजतेने विणलेलं नातं होतं ते त्याहूनही सहजतेने विरघळत होतं.

रक्ताच्या, हाडामासाच्या, रूढार्थाच्या आणि सजीवतेच्या चौकटीबाहेरचं हे एक नातं. रोप बोलायचं की नाही हा प्रश्न गौण होता, त्याचं बोलणं मला ऐकू येत होतं ही गोष्ट महत्त्वाची होती. माझं प्रेम त्याला जाणवायचं की नाही हा प्रश्न गौण आहे, ते जाणवतंय ही जाणीव प्रेम अजून वाढवत होती ही गोष्ट महत्त्वाची आहे. रोप बोसांच्या म्हणण्याप्रमाणे खरच संवेदनशील होतं का हा प्रश्न गौण आहे, त्यात केलेल्या प्राणप्रतिष्ठेमागची संवेदना सगळ्यात महत्त्वाची. एकेकाळी माझं वाटणारं ते रोप आज कोणाचंतरी झाड असेल, कदाचित तसंच निखळ डवरत असेल किंवा बहरत नसेलही. पण त्याच्या सान्निध्यात घालवलेली दीड वर्ष त्याच्या फुलांहूनही सुगंधी होती आणि अजूनही आहेत. अचानक कुठेही जाईजुईचा वास भोवती रुंजी घालायला लागला की पहिली आठवण त्याचीच होते. निरपेक्ष प्रेम करायला शिकवणारा हा पहिला अमानवी जीव त्या जुन्या गाण्याच्या उरलेल्या ओळी गायला लावतो.

नाही झाला महावृक्ष, जरी नसे कल्पतरु
फुलाफळांचा त्यावरी नाही आला रे बहरु
क्षणभर विसावेल वाटसरु सावलीत,
कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात

- arnika