तू समोरी अन् अशी ही पावसाची सर कशाला?
लाभले एकाच वेळी एवढे हे वर कशाला?
भोवती नाही कुणी हा फक्त योगायोग नाही
दैव देते आपल्याला हे असे अवसर कशाला?
यापुढे उपयोग रात्रींचा मला व्हावा निजाया
यापुढे भेटीस स्वप्नांचा उगा वापर कशाला?
संयमाने वागते काळीज माझे एरव्ही, पण
या क्षणी त्या संयमाचा वाटतो अडसर कशाला?
"ही अचानक भेट पण कां वाटते ठरवून झाली?"
ह्या जगाच्या चौकशांना द्यायचे उत्तर कशाला?
- जयन्ता५२