टाके

स्वत:च्या आयुष्याकडे पाहताना तिला नेहमी प्रश्न पडायचा की प्रेमाचे, मैत्रीचे हे धागे आपल्यालाही कधी आईसारखेच सुबक, देखणे घालायला जमतील का? की आपलं अवघं आयुष्य असंच ह्या ’यार जुलाहे’ ची विनवणी करण्यात जाणार!

borderpng.png

ते

शहर सोडूनही आता तिला बरीच वर्षे झाली आहेत . . . पण त्या शहराच्या, तिथल्या वास्तव्याच्या आठवणी या ना त्या निमित्ताने किंवा बरेचदा कोणत्याही निमित्ताशिवायही मनात दाटून येतातच. का तश्या आठवणी येण्यासाठी ती काही ना काही निमित्तच शोधत असते . . .

takey_final.jpgकाही महिन्यांपूर्वी एका पेपरच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्या शहराच्या, त्या लॅबच्या आठवणी जाग्या झाल्या. तिथे केलेल्या संशोधनाच्या आणि त्याहीपेक्षा ते शिक्षण, ते काम, ते कष्ट, ते यश-अपयश . . . सगळे सगळे आनंददायी करणार्‍या, रोज नवीन काही शिकण्याच्या अनुभवाची झिंग देणार्‍या त्या वातावरणाच्या, तिच्या सहकार्‍यांच्या, तिच्या गुरुंच्या! रोज सकाळी दहा वाजता सहकार्‍यांबरोबर अनुभवलेल्या खास युरोपियन कॉफीच्या आणि कॉफी पिताना मारलेल्या कधीही न विसरता येणार्‍या वेगवेगळ्या विषयांवरच्या गप्पांच्या आठवणी !

"तू लिव्हरला घातलेले टाके कायमच इतके नीट कसे दिसतात?" रॉबी त्याच्या खास 'मिलानो' उच्चारपद्धती असलेल्या भन्नाट इटालियन इंग्रजीमध्ये तिला हा प्रश्न अनेकदा विचारायचा. विशेषत: आदल्या दिवशी liver perfusion केलेले असेल आणि दोन-तीन तास अवघडलेल्या अवस्थेत त्या sterile hood समोर बसून हातातल्या थंडगार लिव्हरच्या लहान-मोठ्या, अतिशय नाजूक, हलक्याश्या ताणाने देखील सहज तुटू शकतील अश्या वाहिन्यांमध्ये नळी घालण्यासाठी, तिने सुचर करायला टाके घातले असतील तर नक्कीच!

रॉबीने एक अस्सल इटालियन शिवी घालून केलेले त्या टाक्यांचे कौतुक ऐकून ती नेहेमीसारखीच हलकेच हसायची आणि तिचे ठेवणीतले उत्तर द्यायची.

"माझ्या आईमुळे . . . असे नीट टाके घालायला मी तिच्याकडून शिकले."
"तुझी आई डॉक्टर किंवा सर्जन आहे?" त्याचाही पुढचा प्रश्न ठरलेला.

"नाही . . . सर्जन नाही . . . पण तरीही सुबक, चांगले टाके घालायला मला तिनेच शिकवले."

आणि मग हातातल्या कॉफीच्या प्रत्येक घोटाबरोबर, ती त्यांना तिचे बालपण, आईची शिवणाची आवड, घरातले वातावरण, आई-वडिलांनी सहजपणे गप्पा मारताना, त्यांच्या वागण्या-बोलण्यातून तिला नकळत कसे घडवले आहे, कसे शिकवले आहे हे सगळं सांगत सांगत पार तिच्या लहानपणात, तिच्या शाळेत, तिच्या घरी घेऊन जायची.

संध्याकाळची वेळ . . . दिवसभराची शाळा, त्यानंतर कोणत्या ना कोणत्या स्पर्धेची तयारी किंवा मैदानावर जीव तोडून खेळून, दाणदाण सायकल हाणत घरी आलेली ती. दिवसभरात काय काय झालं, कोण कोणाला काय म्हणालं, कोण कोणाशी कसं वागलं, काय पाहिलं, काय वाचलं या सगळ्याबद्दल ''विविधभारती''लाही मागे टाकेल इतकी अखंड बडबड . . . आणि मग जेवण झाल्यावर डोळे पेंगुळलेले असताना तिला आठवण व्हायची शिवणाची. शाळेच्या अभ्यासक्रमात असलेल्या भरतकाम किंवा विणकामाची. पलंगावर बसून खाली मान घालून जडावलेल्या डोळ्यांनी ती शिवणकामाचे, भरतकामाचे टाके घालत बसायची. अनेकदा, म्हणजे बहुतेक वेळा, स्वत:च प्रकाश अडवत, दिव्याकडे पाठ करून बसत!

स्वयंपाकघरातली कामे आटोपून आई आतल्या खोलीत आली की तिला पहिल्यांदा दिव्याकडे तोंड करून बसायला सांगायची आणि परत आपल्या कामात मग्न. कधी घरातली कामे, कधी तिचे शाळेचे तपासायचे पेपर-वह्या, कधी काही लिखाण . . . एकीकडे आई तिचे काम करायची आणि ती अर्धवट झोपेत शिवणकाम.

डोळ्यावरची झोप अगदीच अनावर झाली की मध्येच कधीतरी भरतकामातला एखादा टाका चुकायचा, विणकामातला टाका सुटायचा, पण त्याकडे दुर्लक्ष करत ती तशीच शिवणकाम उरकत राही. काही वेळाने तिचे तिलाच काय वाटायचे कुणास ठाऊक? ती आईला विचारायची "आई, कसं दिसतंय? हे चालेल का गं?"

अशावेळी ते शिस्तभंग करून, रांगा सोडून गडबडलेले टाके आईला चटकन दिसायचे . . . मास्तरीण असल्याने असेल कदाचित.

"काय करावंसं वाटतंय? चूक करून तशीच तू बरीच पुढे गेली आहेस . . . तूच ठरव . . . मला विचारशील तर उसवून परत घाल टाके. आत्ता थोडे कष्ट पडतील पण काम पूर्ण झालं की नेटकं दिसेल आणि ह्या जास्तीच्या कामाचं काहीही वाटणार नाही."

आईचं ठरलेलं उत्तर "तू ठरव!" कंटाळायची ती खरं तर, पण तरीही आईचा साधाच पण समजावणीचा धीर देणारा स्वर कुठेतरी "असर" करून जायचा . . . मग डोळ्यांवर पाण्याचा हबका मारून ती चुकलेले टाके उसवून नव्या जोमाने आणि उमेदीने सुबक टाके घालायचा प्रयत्न करायची . . .

. . . असे चुकलेले टाके उसवत उसवत, नीटस दिसणारे टाके घालायचा प्रयत्न करता करता तिच्याही नकळत मुळातच नीट, नेटके, सुबक टाके घालायची सवय कधी लागली तिचं तिलाच कळलं नाही.

शाळकरी वय सरलं. त्या बरोबर अभ्यासक्रमातलं ते शिवणकामही सुटलं . . . पुढे अनेक वर्षांनी संशोधनाच्या निमित्ताने आयुष्याच्या एका वेगळ्याच स्तरावर हे टाके तिला परत एकदा भेटले . . . त्यांचे रूप बदलले होते, त्यांची वीण बदलली होती . . . आता तिने घातलेले टाके पाहणार्‍याचे लक्ष वेधून घेणारे आणि मनात ठसणारे झाले होते.

काम करायला sterile hood समोर बसलं की त्या टाक्यांची आणि आईची तिला हमखास आठवण व्हायची. हे 'टाके' घालणे म्हणजे तिच्यासाठी वेगवेगळ्या प्रसंगात दिसलेल्या, अनुभवलेल्या आईच्या व्यक्तिमत्त्वाला समजून घेणे. जणू काही आईशी संवादाची वीण साधणे . . . ह्या टाक्यांच्या माध्यमातून!

आणि मग आठवणींच्या अश्या एका मागून एक गुंफलेल्या टाक्यांमधून तिच्या आजवरच्या अवघ्या आयुष्याचा पडदाच तिच्या डोळ्यासमोर तरळून जायचा. तसं पाहिलं तर लहानपणी तिचे रोल मॉडेल, आदर्श म्हणजे तिचे बाबा! बाबांसारखं बोलणं, त्यांची नक्कल करत त्यांच्यासारखा अभिनय करण्याचा प्रयत्न करणं, इतकंच काय तर बाबांसारखा केसांचा कोंबडा असलेला भांग पाडता यावा म्हणून केसांचा बॉय कट ठेवला होते तिने तिच्या शाळकरी वयात. आणि ते साहजिकच होतं . . . त्या लहान वयात डोळ्यांना सहज दिसत होतं ते बाबांचं व्यक्तिमत्व. नाटक, सिनेमा, लेखन या विविध क्षेत्रातला त्यांचा वावर, त्या आणि इतरही क्षेत्रातली नावाजलेली त्यांची मित्रमंडळी, त्यांची घरी असणारी ये-जा आणि बाबांच्या साहित्य प्रेमामुळे घरात कायम चाललेली विविध विषयांवरची चर्चा!

पुढे जशी समज यायला लागली, डोळ्यांना दिसताहेत त्याही पलीकडच्या गोष्टी 'महसूस' करण्याची उमज आली, तशी तिची आई तिची आदर्श होत गेली. स्वत:च व्यक्तिमत्त्व कुठेही कोमेजू न देता, बाबांची आयुष्याच्या प्रत्येक पावलावर साथ करणारी तिची आई. भल्या-बुर्‍या प्रसंगात ठामपणे, खंबीरपणे घराला सावरणारी तिची आई.

आई समर्थपणे नोकरी आणि संसार सांभाळत होती, म्हणून बाबा त्यांचं नाटक-सिनेमा-लेखनाचं वेड सांभाळू शकले, जोपासू शकले हे वाढत्या वयानुसार तिला जाणवत गेलं आणि ती तिच्या आईच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पोत असलेल्या धाग्यात अधिकाधिक गुंतत गेली.

’तुझ्या आईला कधीही कोणाहीबद्दल वाईट बोलताना, कोणाला नावं ठेवताना ऐकलं नाहीये’ . . . अनेकदा गप्पांच्या ओघात तिचे मित्र-मैत्रिणी सहजपणे बोलून जायचे.

खरंच की . . . तिने ह्याबद्दल कधी वेगळा विचारच केला नव्हता. समजायला लागल्यापासून गेल्या वीस-पंचवीस वर्षात तिनं कधीही आईला कोणाहीबद्दल तक्रार करताना, नावं ठेवताना, वाईट बोलताना ऐकलं नव्हतं . . . नातेवाईक असोत, शाळेतले विद्यार्थी असोत, सहकारी असोत, घरी येणार-जाणारे लोक असोत . . . प्रत्येकामधले फक्त चांगले गुणच आईला दिसायचे आणि तेच ती लोकांना सांगायची . . .

इतकी सगळी नाती, मित्रपरिवार, घरात कायम असलेली माणसांची वर्दळ . . . घरातल्या मांजरापासून ते केळीच्या झाडाला नुकत्याच लगडलेल्या केळफुलापर्यंत . . . सगळ्यांशीच तिचे लागेबांधे अतिशय आपुलकीचे, जिव्हाळ्याचे!

'मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे
अक्सर तुझको देखा है कि ताना बुनते
जब कोई तागा टूट गया या ख़तम हुआ
फिर से बाँध के
और सिरा कोई जोड़ के उसमें
आगे बुनने लगते हो
तेरे इस ताने में लेकिन
इक भी गाँठ गिरह बुनतर की
देख नहीं सकता है कोई...

आईला ही धागे विणायची तरकीब त्या `यार जुलाहे' नी शिकवली असावी . . . तिला नेहेमी वाटायचं.
'अज्ञात हात त्याचे कोणा कधी न दिसती' असा 'तो' विणकर आईवर नक्कीच प्रसन्न असावा . . . त्याशिवाय नात्यांचे, प्रेमाचे हे इतके मजबूत आणि सुबक टाके, ही वीण कशी शक्य आहे!

`मैने तो एक बार बुना था एक ही रिश्ता ...
लेकीन मेरे उस ताने की सारी गिरहे साफ़ नज़र आती है मेरे यार जुलाहे'

स्वत:च्या आयुष्याकडे पाहताना तिला नेहमी प्रश्न पडायचा की प्रेमाचे, मैत्रीचे हे धागे आपल्यालाही कधी आईसारखेच सुबक, देखणे घालायला जमतील का? की आपलं अवघं आयुष्य असंच ह्या ’यार जुलाहे’ ची विनवणी करण्यात जाणार!

आईची आठवण करून देणार्‍या, आईशी जोडलेल्या ह्या टाक्यांचा विचार करत आपण कसे एकाग्र होऊन हातातल्या लिव्हरला टाके घालत जायचो . . . हे आठवत आठवत ती त्या प्रसंगापर्यंत पोचलीच . . .

. . . ती जीवघेणी पहाट . . . एअरपोर्टवर मनात नाही नाही त्या विचारांना, शंका-कुशंकांना सामोरे जात थंडीने कुडकुडत ती मनातल्या मनात ढसाढसा रडत होती . . . काल संध्याकाळपासूनच्या एक एक घटना मनात परत परत दाटून येत होत्या . . .

दिवाळीचे दिवस, एकीकडे दिवाळीच्या गाण्याच्या कार्यक्रमाची तयारी जोरात चाललेली . . . त्याचबरोबर रात्रीच्या विमानाने प्रवास करायचाय, उद्या पोचल्यावर लॅबमध्ये कोणकोणते प्रयोग करायचेत ह्याची मनात नकळत चालू असलेली उजळणी . . . आणि तेव्हाच अवेळी वाजलेला फोन.

"आई सीरियस आहे . . . अचानक ऑपरेशन करावं लागलं . . . आय.सी.यू. मध्ये आहे. पुढचे २४ तास क्रिटिकल आहेत . . ." बाबांचा जडावलेला चिंतित आवाज . . .

एक उन्हाळ्यात होणारा पित्ताचा त्रास सोडला तर आईला कधी आजारी पाहिलं नाही . . . कधी दमलेलं पाहिलं नाही . . . कालपर्यंत तर ठीक होती आई . . . अचानक काय झालं!

एकीकडे फोनवर बहिणीशी आणि बाबांशी ती बोलत होती . . . सगळ्यात धाकटी असूनही खंबीरपणे 'योग्य वेळी उपचार मिळालेत, सगळं ठीक होईल,' हे त्यांना समजावताना, धीर देताना तिच्याही आतमध्ये कुठेतरी काहीतरी नक्कीच तुटत होतं.

"दुपारी अचानक पोटात दुखायला लागलं. बघता बघता पोटावर गाठ आली, सूज आली . . . नशीब चांगलं, दिवाळी असून एक डॉक्टर देवासारखे भेटले . . . त्यांनी ऑपरेशन केलंय . . . म्हणे तिच्या जन्माच्या वेळी जे सी-सेक्शन केलं होतं, त्यातला एक न विरघळलेला टाका उरला होता . . . त्याने आतड्याला वेढा दिलाय . . . कदाचित आतड्याचा काही इंच भाग कायमचा काढून टाकावा लागेल . . ."

बाबा फोनवर सांगत होते आणि आपण हे नक्की काय ऐकतोय हे ही न कळण्याइतकी ती सुन्न होऊन गेली होती . . .

तीस वर्षं झाली तिच्या जन्माला . . . आणि त्यावेळचे ते टाके आज इतक्या वर्षांनी, तीस वर्षांनी आईला त्रासदायक ठरले होते.

ज्या टाक्यांनी तिला जन्माला घातलं . . . ते टाकेच आईच्या जीवाला धोकादायक ठरत होते. तीस वर्षांची तिची आणि आईची जवळीक . . . त्यांच्यातला संवाद . . . त्यांच्यातली मैत्री . . . त्यांच्यातलं नातं . . . आई जरा कुठे गावाला गेली की तापाने फणफणण्याइतकी आईवेडी असलेली ती . . . तिच्या खेळाच्या आवडीचं, कधीही न थकता कितीही काम करू शकण्याच्या क्षमतेचं, कधीही पाहाल तेव्हा हसतखेळत-उत्साही असण्याचं, तिच्या उद्योगी स्वभावाचं, माणसांपासून बागेतल्या झाडापर्यंत सगळ्यांना लळा लावणार्‍या आणि सगळ्यांसाठी जीव टाकणार्‍या तिच्या वागण्याचं, तिच्या दिसण्याचं, असण्याचं कारण असलेले ते टाके . . . त्या टाक्यांनी जोडले गेलेले तिच्या आणि आईच्या व्यक्तिमत्वातले अनेक पदर . . .!

तिच्या अवघ्या अस्तित्वाची निर्मिती करणारे ते टाके, तिच्या आईच्या अस्तित्वाचा प्रश्न बनले होते . . . एकीकडे तिचं वैद्यकीय ज्ञानावर पोसलेले मन 'यात तुझी काहीच चूक नाही' अशी ग्वाही देत होतं . . . तरीही एकीकडे 'माझ्यामुळे असं होतंय . . . जन्मापासून मी आईला त्रासच देत आले की काय?' . . . लहानपणापासून 'तत्त्वाचा' प्रश्न आला की अन्न सत्याग्रह करून आईला त्रास देणे ती समजू शकत होती . . . पण 'आज आईच्या जीवाला धोका निर्माण झालाय आणि तोही माझ्या जन्माच्या वेळच्या त्या टाक्यांमुळे . . .' ही बोचणी तिच्या मनाला अस्वस्थ करत होती.

एअरपोर्टवरचा तो काळ तिनं कसा काढला, तिचं तिलाच ठाऊक . . . सकाळी लॅबमध्ये पोचली . . . पण त्यात नेहेमीचा सळसळणारा उत्साह नव्हता. गप्प गप्प असलेल्या तिला नेहमीप्रमाणे दहा वाजता तिच्या सरांनी कॉफी करून दिली, अगदी तिला आवडते तशी . . . तो कप हातात घेताना तिच्या डोळ्यात नेहेमीची चमक नव्हती . . . त्या दिवशी, त्या कपातल्या कॉफीत तिच्या डोळ्यातले अश्रू कधी आणि किती काळ गळले तिलाही कळलं नाही.

पेजर वाजला तशी ती भानावर आली . . . आज एक केस होती . . . लिव्हर . . . sterile hood मध्ये तसेच अवघडलेल्या अवस्थेत बसून टाके . . . टाके . . . !!!

त्या विचारापाशीच ती थबकली. रात्रभराचं जागरण, रडून सुजलेले डोळे, डोक्यात विचारांचा कल्लोळ . . . अंगावर एप्रन, हातात ग्लोव्ह्ज् घालून ती हूड समोर बसली . . . हातातल्या त्या बर्फावर ठेवलेल्या लिव्हरला हाताच्या ओंजळीत उचलून घेतलं तेव्हा त्या स्पर्शाने ती आज पहिल्यांदा शहारली . . .

. . . आणि तिने टाके घालायला सुरुवात केली . . . एक एक टाका . . . एका पुढे एक . . . एकसारख्या दिसणार्‍या त्या सुबक, काळ्या टाक्यांचं वर्तुळ पूर्ण होत गेलं . . . आणि तिच्या मनातलं विचारांचं वादळही शांत होत गेलं.

सुबक, नेटके टाके . . . आईने शिकवलेले! . . . तिला जन्माला घालणारे . . . तिला तिच्या आईशी जोडणारे . . . तिला घडवणारे . . . कधीही न तुटणारे, कधीही न विरघळणारे . . . नाजूक पण भक्कम वीण असलेले!

काम संपवून हातातले ग्लोव्हज् काढले आणि पहिल्यांदा सेल फोन पाहिला . . . फोन वरती मेसेजची सूचना होती पण मेसेज ऐकायची तिच्यात हिंमत नव्हती . . . तशीच सुन्न अवस्थेत ती घरी आली . . .

कसाबसा धीर करून तिनं मेसेज ऐकला . . . 'आईच्या जीवाला असलेला धोका टळलाय, सगळं ठीक आहे, काळजी नसावी . . . बोलूच . . . ' . . . बाबांचा अजूनही काहीसा जडावलेला आवाज ऐकून तिने फक्त डोळे मिटले . . . भरून आलेल्या डोळ्यातलं पाणी टचकन गालावर ओघळले.

जगाची काळजी वाहणार्‍या त्या अज्ञात विणकराने आपले चुकलेले टाके उसवून दुरुस्त केले होते . . .!

- आरती रानडे (RAR)