इतके सगळे साज लेऊनही त्या निळाईत न्हालेले आकाश! निळा रंग परमात्म्याचा. निळा रंग कृष्णाचा. निळा रंग नभाचा! मनही हे असेच आकाशासारखे. अथांग! गूढ! गहन! शेवटच्या श्वासानंतर त्या निळ्या कृष्णात विलीन होणारे!
अ
गदी बाळपणी आईच्या कडेवरून जाताना त्या आभाळाकडे पहिल्यांदा लक्ष गेले असणार माझे. ते ही आमच्याबरोबर उडणार्या चांदोमामाला बघायला. तेव्हा आभाळापेक्षा चांदोबाचेच आकर्षण असावे. देवबाप्पा कुठे असतो? पाऊस कुठून पडतो? ढग कुठे असतात? वीज कुठून चमकते? चांदण्या कुठे असतात? चंद्र, सूर्य कुठे असतात? असल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे जेव्हा 'आकाशात!' अशा शब्दात मिळायला लागली तेव्हा मात्र आकाशाबद्दलचे कुतूहल वाढत गेले.
लहानपणी मुंबईच्या एका दूरच्या उपनगरात राहिल्याने पूर्ण मोकळे विस्तीर्ण आकाश मात्र सहज वाट्याला आले नाही. बाल्कनीतून दृष्टीला पडलेला तो छोटासा चौकोनी निळा तुकडा म्हणजे आकाश असेच मानून चालले होते बराच काळ. त्याच निळ्या तुकड्यातले पांढरे शुभ्र ढग हे पुन्हा एकदा आकाशाकडे पहाण्याचे कारण. त्या ढगांतले आकार शोधत खेळायचा खेळ कितीतरी वेळा खेळला असेल तेव्हा. पुढे गच्चीवर जायची मिळालेली परवानगी, क्वचित कधीतरी झालेले समुद्रावरचे फिरणे यामुळे माझ्या 'आकाश' या संकल्पनेच्या कक्षा हळूहळू रुंदावत गेल्या. केव्हातरी गोव्याच्या समुद्रकिनारी दिसलेले पावसाने ओथंबलेले आकाश ही विस्तीर्ण आकाशाची पहिली आठवण ठरावी.
शिकण्यासाठी मुंबईपासून दूर आल्यावर मोकळे आभाळ दिसणे ही तितकीशी दुर्मिळ गोष्ट नाही हे जाणवले! आकाशातून पडणारे तारे पहात मैत्रिणींबरोबर जागवलेल्या रात्री, पहाटे पहाटे पायर्यांवर बसून अभ्यासाच्या नावाखाली पेंगुळताना पाहिलेला निळ्याशार क्षितिजावरचा चांदीसारखा चमकणारा नुकताच उगवलेला चंद्र, वळवाच्या पावसानंतर रुपेरी कडांचे ढग असलेले आकाश, गुलमोहराच्या लालबुंद फुलांच्या मधूनच डोकावणारे आकाशाचे कवडसे अशा अनेक आठवणी आकाशाला आणि त्या फुलपाखरी जीवनाला एकत्र बांधतात.
नंतर असंख्य घरे बदलली पण आकाश मात्र सदोदित साथीला होते. घराच्या कुठल्यातरी एका खिडकीतून, बाल्कनीमधून तरी ते दिसत राहिले, खुणावत राहिले. जपानला आल्यावर मात्र मी नशीबवान ठरले. इतक्या दाटीवाटीने वसलेल्या या देशातही मला मोकळे विस्तीर्ण आकाश दिसेल अशी घरे मिळाली. त्यापैकी एक घर तर कायम लक्षात राहील असे. पश्चिमेला काचेची मोठी मोठी तावदाने. त्यातही एक त्रिकोणी कोपरा घरापासून पुढे आलेला; त्याला दोन्ही बाजूंनी काचा आणि महत्त्वाचे म्हणजे समोर अथांग पसरलेले आकाश. पार दूरच्या क्षितिजापर्यंत आणि फुजी पर्वतापर्यंत. मध्ये एकही उंच इमारत नाही. अहाहा! त्या त्रिकोणी कोपर्यात उभे राहिले की आजूबाजूला फक्त अथांग आकाशच दिसे.
या घरातून आकाशाची इतकी विलोभनीय रूपे दिसली की आकाशाने अगदी वेडच लावले. कधी पहाटे पहाटे निळे गुलाबी आकाश आणि उडणारे पाखरांचे थवे दिसत. कधी फुजीपर्वताच्या माथ्यावर पडणारे केशराचे किरण दिसत. कधी ढगांशी लपाछपी करणारा मिश्कील निळा कृष्ण दिसे. कधी निळाशार अथांग पसरलेला सागर भासे, तर कधी सोनकेशराने न्हाऊन गेलेली सांज दिसे. कधी कधी मात्र दिवस दिवस वाट पाहून सुद्धा एखादा निळा कवडसाही दिसणे दुरापास्त होई. येणारा प्रत्येक दिवस एक नवीन रूप, नवीन छटा घेऊन येई. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा खिडकी उघडून त्या निळाईचे आणि फुजीचे दर्शन घेत एक मोकळा श्वास घेऊन दिवसाची सुरुवात करण्यासारखे सुख नाही.
शक्य असते तर हे घर कधी सोडलेच नसते. पण सगळ्याच गोष्टी कुठे आपल्या हातात असतात. त्यानंतरही दोनदा घरे बदलून झाली. या दोन्ही वेळा उगवतीला असेच मोकळे विस्तीर्ण आकाश. यावेळी पार अगदी समुद्रापर्यंत! पहाटे उठल्यावर उगवत्या सूर्यनारायणाचे दर्शन घेत दिवस चालू करायचा. आकाशाचा उगवतीचा रंगही दररोज नवा! कुठून इतके रंग आणते ते एक देवच जाणे.
इथे डोंगरादर्यात फिरायला गेले की या आकाशाचे नखरे विचारूच नका. गुलाबी साकुराच्या फुलांआडून दिसणारे निळेभोर आकाश, पोपटी पालवीकडे कौतुकाने पहाणारे ढगाळलेले आकाश, आणि रक्तवर्णी मोमिजीच्या पानातून दिसणारे निळेशार आकाश एकच असले तरी त्याची एक वेगळी कहाणी असते. तुम्ही लक्ष देऊन पाहाल, ऐकाल तर ते सांगेलही तुमच्या कानात. उंच उंच कड्यांच्याही वर असलेले आकाश या पर्वतांशी कोणते हितगुज करत असते तेच जाणे. स्वतःचे रूप पाण्यात निरखायची भारी हौस आहे या आभाळाला. जरा कुठे पाणी दिसले की गेलेच हे डोकावायला. मात्र क्षितिजापर्यंत पसरलेल्या सरोवरात डोकावून पहाताना ते पाणीच केव्हा आकाशरूप होते हे त्या पाण्यालाही कळत नसावे. झुंजूमुंजू व्हायच्या आधीच एकट्याने अशा, शांत निश्चल तळ्याच्या काठी बसावे. मग ते आकाश तळ्यात उतरून तुमच्याशी गुजगोष्टी करते. मात्र पहाटेचा थंड वारा सुटला, पाखरांची किलबिल वाढायला लागली की भानावर येऊन तळ्यातून चटदिशी निघून जाते. अशा कितीतरी पहाटवेळा मी त्या आभाळाशी गप्पा मारण्यात घालवल्या आहेत. कधी पांढर्याशुभ्र बर्फाचे अप्रूप वाटून त्या मऊ बर्फाला स्पर्श करायला आभाळ डोंगरमाथ्यावर उतरते. मी जाऊन कधी पाहिले नाही पण तिथे आभाळाच्या पाऊलखुणा नक्की असणार अशी मला खात्री आहे. कधी त्या बर्फाचा हेवा वाटून तसलेच पांढरेशुभ्र ढग आणते, निळ्या अंगणात खेळायला. कधी सांजेचे सोनेरी किरण घेऊन तरूशिखरांवर उतरते आणि तिथल्या पक्षांना आमंत्रण देऊन जाते.
ट्रेनने दूरवरचे परतीचे प्रवास करताना संध्याकाळच्या, गर्द निळ्या, पावसाने ओथंबलेल्या आकाशाने गावातल्या घरा-शेतांवर निळी पाखर घातलेली पाहणे म्हणजे एक दुर्मिळ योग. त्या तशा सांजवेळा पहाण्यासाठी मी कितीही वेळा प्रवास करायला तयार होईन. अशा प्रवासात सगळे प्रवासी दमून भागून झोपलेले असतात. ही संधी साधून ते आकाश गुपचूप खाली उतरते. तुम्ही जागे राहिलात, त्याची वाट पहात राहिलात की ते तुमचीही विचारपूस केल्यावाचून राहात नाही.
एकदा नभाशी नाते जडले की ते सगळीच गुपिते तुम्हाला सांगायला लागते, तुमची सुखदुःखे वाटून घेते! आयुष्याच्या प्रवासभर तुमच्या साथीला थांबते. लहानपणी चांदोबा, चांदण्या दाखवते. कापसाच्या ढगांचे आकार दाखवून हसवते. कधी मिश्कीलपणा करायला दिवसभर काळ्या मेघांच्या आड लपून राहते. तुम्ही खट्टू होऊन परतायला लागलात की हळूच एक निळा तुकडा दाखवून तुम्हाला खुणावते, चिडवते आणि पुन्हा सुखदुःखाची लपाछपी खेळायला लागते. कधी शांततेचा निळा डोह दाखवते तर कधी संकटांच्या बिजलीचे रौद्ररूप दाखवते. कधी धुरकटलेले, राखाडी, निस्तेज, दुःखी दिसते तर कधी आनंदाचे इंद्रधनू घेऊन येते. कधी तेजोनिधीची सुवर्णझळाळी लेऊन उत्कर्षाची स्वप्न दाखवते तर कधी गूढगंभीर सांजेचे रूप लेऊन शेवटचा प्रवास दाखवते.
इतके सगळे साज लेऊनही त्या निळाईत न्हालेले आकाश! निळा रंग परमात्म्याचा. निळा रंग कृष्णाचा. निळा रंग नभाचा! मनही हे असेच आकाशासारखे. अथांग! गूढ! गहन! शेवटच्या श्वासानंतर त्या निळ्या कृष्णात विलीन होणारे!
मोहरल्या दिशा दाही, धरणी सुवर्णाच्या राशी
प्रकाशाचं लेणं तुला, नभ केशरी केशरी
बिंब कोण? रूप कोण? अवघीची तुझी माया
हळदुले पडे ऊन, कुठे सावलीचा ठाव
रंग तुझा मन निळा, कसा र्हायचा लपून?
निळ्या आकाशाचे गाणे, वारा नेई रानोमाळी
तुझे निळाईचे देणे, कान्हा झाली धरणी रे!
तुझ्याप्रती पोहोचती, सार्या मोक्षरूपी वाटा
- स्वप्नाली मठकर (सावली)