त्याच्याविना...त्याच्यासाठी!

"या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे" ह्या उक्तीप्रमाणे जगणारं हे एक जोडपं, नागेश आणि शरयु घाडी. लग्न, मग त्यानंतर बाळाचं आगमन, त्याच्या बाळलीलांमध्ये बुडून जाणं इथपर्यंत त्यांचा प्रवास तुमच्या माझ्यासारखाच. आता दुडक्या चालीने बाळ घरभर फिरेल आणि मग त्याच्या ह्या अशा मस्तीच्या कौतुकमिश्रित तक्रारी कराव्यात असंच काहीसं स्वप्न बघणारं हे जोडपं. पण सटवाईने ललाटी लिहिलेला लेख काही वेगळाच होता. "बाळ चालत का नाही?" ह्या चिंतेने सुरू झालेला प्रवास, बाळ "स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रोपी" ह्या जनुकीय दोषाचा बळी आहे, ह्या निदानापर्यंत येऊन ठेपला आणि मग तुमच्या माझ्यासारखाच होणारा त्यांचा प्रवास एका वेगळ्या समांतर रस्त्यावरून सुरू झाला.

डोक्यात विचार येतो काय, संपादक मंडळाचा होकार येऊन, शरयुताईंचाही होकार येऊन आम्ही त्यांच्या घरी जाऊन पोहोचतो काय, सगळंच कुणीतरी आखून दिल्याप्रमाणे घडत गेलं. खरं सांगायचं तर त्यांच्याकडे जाताना थोडं दडपण येत होतं. माझा मुलाखत घेण्यामागचा हेतू जरी चांगला असला तरीही माझ्याकरता मी त्यांच्या जखमेवरची खपली काढतेय हा अपराधीपणा माझी पाठ सोडत नव्हता. पण त्यांच्या घरी पोहोचलो आणि खूप दिवसांची ओळख असल्याप्रमाणे कधी सैलावलो हे आम्हालाही कळलेच नाही. कुठेही गंड नाही, आपण कोणी वेगळे असा दावा नाही. समोरच्याला पटकन आपलंसं करणारा जिव्हाळा पाहून त्यांच्याशी खूप जुने ऋणानुबंध असावेत असंच वाटलं.

"मनश्री" ह्या सुमेध वडावाला रिसबूड ह्यांनी शब्दांकन केलेल्या पुस्तकात मी प्रसादविषयी सर्वप्रथम वाचलं होतं. त्याच्या आंतरजालावरच्या संकेतस्थळालाही भेट दिली. त्यातून त्याच्याविषयी, त्याने मिळवलेल्या शाबासक्यांविषयी आणि मुख्य म्हणजे "स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रॉपी" ह्या जनुकीय दोषाविषयीही काही माहिती मिळाली. त्याच्यावर शरयुताईंनी लिहिलेलं "पंखाविना भरारी" हे पुस्तक देखील मिळवून वाचलं. पुस्तक वाचते वेळी मी लोकलमध्ये चार लोकांबरोबर प्रवास करतेय ह्याचाही विसर पडून माझे डोळे ओलावले. प्रसादविषयी तर लिहिण्यासारखं बरंच काही आहे. तो तर खरोखरचा शापित गंधर्व होता.खरंच त्याचे आईवडील स्पेशल असणार म्हणूनच त्यांच्या पोटी असा स्पेशल बाळ जन्माला आला. त्यांच्या जिद्दीची कहाणी वाचून आपल्यापैकी कोणाला जगण्याचं बळ मिळावं, कोणाला त्यातून काही घेता यावं ह्या हेतूने मी हे लिहायचं ठरवलं. मला स्वत:ला "हे जीवन सुंदर आहे" ह्याची जाणीव नव्याने झाली. "काय नाही ते बघण्यापेक्षा काय आहे ते शोधावं" हा धडा मिळाला. आम्हा उभयतांचा एका खूप चांगल्या कुटुंबाशी ऋणानुबंध जुळला, कायमसाठीच!

resize_of_dscn6905_copy.jpg


तु

म्ही दोघांनीही मायबोली दिवाळी अंकाच्या ह्या "दिवाळी संवाद" साठी मुलाखत द्यायचं कबूल केलंत त्याबद्दल आधी तुम्हा दोघांचेही मनापासून आभार. तुम्हाला जेव्हा ह्या जनुकीय दोषाविषयी कळलं तेव्हा धक्का तर बसलाच असणार, शब्दात मांडता न येणारं असं दु:ख झालं असणार! पण त्या दु:खाला तुम्ही ज्या पद्धतीने सामोरे गेलात त्याला खरंच तोड नाही. कसा होता तुमचा तो सुरवातीचा प्रवास?


सुरुवात खरंच कठीण होती. धक्का तर बसलाच होता. "आपल्याच नशिबात असं का?" असा प्रश्नही सुरुवातीला पडला होता. पण मग जेव्हा त्यावर पुन्हा पुन्हा विचार केला तेव्हा वाटलं, कदाचित देवाने आम्ही ही जबाबदारी पेलण्यास योग्य वाटल्यामुळेच केवळ आमची निवड प्रसादचे पालक म्हणून केली असणार, असा विचार आला आणि मग त्या भगवंताने दाखवलेला विश्वास सार्थ करायचा असंच मनाशी ठरवून, मनामधले सगळे नकारात्मक विचार बाजूला सारून लढायचं ठरवलं.

नक्की काय होतं ह्या जनुकीय दोषामुळे? तुम्हाला ह्यासंबंधी आधी काही माहिती होती का?
नाही, आधी त्यासंबंधी कधी काही वाचनात आलं नव्हतं. आजूबाजूलाही अशा प्रकारचं अपंगत्व पाहिलं नव्हतं. बाळाच्या जन्माच्यावेळी बाळ खूपच गुटगुटीत होता. त्यामुळे तो वर्षाचा होईपर्यंत असं कधी जाणवलंही नाही. पुढे जेव्हा नीट बसता येत नाही, चालत नाही ह्या तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे गेलो तेव्हा काही तपासण्या कराव्या लागल्या. त्या तपासण्यांनंतर ह्या दोषाचं निदान झालं.
हा खरंतर आजार नाही. हा जनुकीय दोष आहे. त्यामुळे त्याच्यावर अजून तरी उपचार असे नाहीत. स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रोपी म्हणजे मज्जारज्जूशी संबंधित मांसपेशींचा क्षय होणे. ही व्याधी, अशी केस दहा लाखांत एखाद्याला होते. ह्यातही टाईप वन, टाईप टू असे उपप्रकार आहेत. ह्या व्याधीचे कारण आनुवंशिक किंवा इतरही असू शकते. प्रसादला टाईप वन प्रकारची व्याधी होती. ह्यात जन्मापासूनच लक्षणे दिसायला लागतात. जसे मान धरायला, हालचाली करायला वेळ लागणे वगैरे.
पुढे पुढे जसजसं वय वाढत जातं तसतसं मणका हळूहळू वाकू लागतो, फुफ्फुसाची क्षमता कमी कमी होत जाते. त्यामुळे सर्व हालचाली कमी कमी होत शेवटी बंद होतात. प्रथम प्रसादचे पाय बारीक होत गेले. संवेदना असूनही हालचाल काहीच करता यायची नाही. नंतर काही वेळा बायपॅप मशीन वापरून श्वसनाचा त्रास कमी करता येतो.
हे सर्व आधी काहीच माहीत नव्हतं. प्रसादमुळे ह्या सर्व गोष्टींची एक एक करून माहिती होत गेली. डॉक्टरांनी समजावून कल्पना दिलीच होती, तरी शेवटी मनाचं समाधान म्हणून सुरुवातीला कोणी सांगेल तसे काही देवाधर्माचे असे प्रकार करून बघितले, भोंदूगिरीला काही काळ फसलो, पण त्यातला फोलपणा कळल्याने त्याच्या आहारी न जाता वेळीच बाहेर पडून वास्तव स्वीकारायची मनाची तयारी केली.

खरंय तुमचं, पण आज तुम्ही प्रामाणिकपणे हे सर्व कबूल करताय, हा प्रामाणिकपणाच महत्त्वाचा वाटतो मला! लहान मूल म्हटलं की त्याला सांभाळताना असंख्य गोष्टी येतात. प्रसादही त्याला अपवाद नसणार. जनुकीय दोषांमुळे आलेल्या मर्यादांमुळे काही विशेष काळजी घ्यावी लागायची का? तुम्ही दोघांनीच ही सर्व जबाबदारी नोकरी सांभाळून कशी पेललीत?
त्याला सांभाळायला आम्ही दोघेच. त्यामुळे मग त्याच्या बाबांनी कायमची रात्रपाळी मागून घेतली. त्यामुळे दिवसा त्याचे बाबा आणि रात्री मी सांभाळायचे, अशी वाटणी करून एकीकडे आम्हाला आमच्या नोकरीच्या ठिकाणीही नीट लक्ष देता आले.
विशेष काळजी म्हणाल तर त्याची प्रत्येक हालचाल ही मदतनिसामार्फतच होत असे. अगदी त्याला अंघोळ घालण्यापासून ते त्याचे डोळे पुसून देण्यापर्यंत सगळ्याच शारीरिक क्रियांकरता त्याला आमची मदत लागत असे. प्रत्येक गोष्ट घेताना अगदी पलंगावरच्या चादरीपासून ते त्याला लागणार्‍या प्रत्येक गोष्टीत त्याला कशाने त्रास होणार नाही ह्याचा विचार करूनच खरेदी केली जायची.
पण तरीही त्याला गरज असेल तेव्हा ती ती गोष्ट करतानादेखील आमचा कटाक्ष असे ते त्याला त्याच्या अपंगत्वाबद्दल कधी न्यून वाटू नये, त्याने मनाने कधी खचून जाऊ नये आणि आपण इतर मुलांपेक्षा कमी आहोत असं मानून दु:खी होऊ नये ह्याकडेच! ह्या मर्यादांमुळे घ्यावी लागलेली मदत सोडता त्याला मुद्दाम कधी वेगळी वागणूक दिली नाही.

आता आपण उल्लेख केला वेगळी वागणूक दिली नाही ह्या गोष्टीचा. म्हणजे नक्की काय केलंत? त्यासाठी काही वेगळे प्रयास पडले का तुम्हाला?
प्रयास म्हणजे जे आपल्या हातात नाही त्याविषयी खंत करत बसण्यात वेळ आणि शक्ती दवडण्यापेक्षा आम्ही काय मिळालंय हे शोधायला सुरुवात केली. विचारांची साखळी म्हणाल तर आमच्याकडून तो शिकला की त्याच्याकडून आम्ही, हेच वेगळं करून सांगता येणार नाही. त्याच्या स्वत:च्या जिद्दीने त्याने शारीरिक मर्यादांशीच मैत्री केली आणि त्याची क्षण न् क्षण जगायची उमेद आम्हालाही तसाच विचार करायचं बळ देऊन गेली.
घरातल्या प्रत्येक लहानसहान गोष्टीबाबतही आम्ही तिघेही मिळून निर्णय घेत असू. मग ते पडद्याचं कापड घेणं असो किंवा फर्निचर करायचं असो, प्रत्येक बाबतीत त्याचाही तितकाच सहभाग असायचा.
अभ्यासाच्या बाबतीतही त्याला बसायला, पुस्तक समोर ठेवायला वगैरे जी काही त्याच्या ताकदीबाहेरची गोष्ट होती तिथे आम्ही मदत करायचो. पण बाकी अभ्यास करण्याबाबत मात्र त्याला आम्ही परावलंबी बनवलं नाही. त्याचा ३-४ थी पासून पुढे अगदी १० वी पर्यंतचा अभ्यास हा त्याचा त्यानेच केलाय, अडेल तिथे आमची मदत घेत. शारीरिक गोष्ट त्याच्या हातात नव्हती तिथे आमची मदत असायची, पण त्याची बुद्धी तीक्ष्ण होती. त्याच्या वेळेचं नियोजन तो स्वत: करून अभ्यास करत असे.

त्याच्या बौद्धिक प्रगतीबरोबरच त्याच्यातली कलाकारीही अफाट होती. त्याच्या संकेतस्थळावर मी त्याची चित्रं बघितली, गाण्यातील कौशल्याविषयी वाचलं. त्याला बालश्री पुरस्कार, राजीव रत्न पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. तो कवी, गायक, चित्रकार, नट, दिग्दर्शक असा चतुरस्र कलाकार होता. त्याच्यातली ही कलाकारी कशी फुलली त्याविषयी ऐकायला नक्कीच आवडेल आम्हाला.
Awards-1.jpgअगदी लहान असताना स्पॅस्टीक सोसायटीच्या अपंगांसाठीच्या शाळेमध्ये असल्यापासूनच त्याच्यातल्या गात्या गळ्याची झलक बघायला मिळाली होती. तीव्र इच्छा असेल तर मार्गही निघतो ह्या उक्तीप्रमाणे त्याला घरी येऊन शिकवायला येणारे गुरू लाभले. त्यांच्यामुळे प्रसादला गाणं शिकता आलं. पुढे त्याने बर्‍याच स्पर्धांमध्ये यश मिळवलं. 'नक्षत्रांचे देणे' ह्या कार्यक्रमातही एक गाणं सादर केलं. भारतात बर्‍याच ठिकाणी आणि भारताबाहेरही तो कार्यक्रम करू शकला. त्याच्यामुळे खरंतर आम्हाला ह्या सर्व ठिकाणी जाता आलं ह्या गोष्टीचा आम्हाला खूपच अभिमान वाटतो.
"बक्षीस मिळो न मिळो, पण तुला स्वत:ला तू कुठे आहेस, काय शिकलास, काय कमी आहे हे कळेल, तुझा आत्मविश्वासही वाढेल हा उद्देश ठेव." हेच आम्ही दोघेही त्याला सांगायचो.
खरंतर हे गाणं ही त्याच्यासाठी एक उपचारपद्धती ठरली. त्यामुळेच ह्या व्याधीमध्ये पुढे पुढे जाणवणारे श्वासाचे त्रास प्रसादला फारसे जाणवले नाहीत.
जी गोष्ट गाण्याची तीच त्याच्या चित्रकलेसंबंधी. त्याची चित्रकला शिकायची आवड आणि त्या जोडीला कष्ट करायची तयारी ह्यामुळे तो त्याच्या चित्रकलेतल्या गुरुंच्या मार्गदर्शनाखाली इतकी प्रगती करू शकला की त्याच्या चित्रावर त्यावेळचे राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम ह्यांच्याकडून त्याला शाबासकीचं पत्रही आलं आहे. नेहरू सेंटर सारख्या ठिकाणी त्याच्या चित्रांचं प्रदर्शन भरून त्याच्या चित्रांची विक्रीही झाली आहे.

drawings-by-Prasad.jpgतो बाहेर मुलांबरोबर मैदानी खेळ खेळायला जाऊ शकत नसे. मग सुट्टीत वेळ घालवायचं साधन म्हणून त्याची चित्रांशी ओळख करून दिली आणि पुढे त्याची कल्पकता, जिद्द ही त्याच्या चित्रांची ओळख होऊन गेली.
त्याच्या हातात ब्रशही दुसर्‍याला द्यावा लागे. कोपराच्या पुढे अगदी थोडी होणारी हाताची हालचाल, त्यातही हात पूर्ण उचलणे तर अशक्यच गोष्ट त्याच्यासाठी! इतकं सारं असूनही तो तासंतास बसून शरीरात असलेली सर्व ऊर्जा पणाला लावून चित्र काढत असे.
आमच्यासाठी त्याचा हा आनंद हीच आमच्या साधनेची पावती होती.

greeting-1-using-prasad's-drawing-.jpg


greeting-2-using-prasad's-drawing-.jpg

ह्या सगळ्यात तुमच्या दृष्टिकोनाबरोबरच प्रसादचा प्रतिसाद देखील तितकाच महत्त्वाचा होता. त्याचा ह्या सगळ्यात कसा सहभाग होता?
कदाचित त्याचाच सहभाग इतका सकारात्मक असायचा की आपोआप आमचाही पूर्ण दृष्टिकोन सकारात्मक होऊन जायचा. त्याचं शरीर परावलंबी होतं, मन नाही, हे त्याच्या प्रत्येक गोष्टीतून दिसून यायचं. आम्हीपण कधीही ह्या परावलंबित्वाला बोल लावून रडत बसलो नाही की त्याला आणि आम्हालाही मनाने परावलंबी, दुबळं बनू दिलं नाही. आम्ही दिलं नाही म्हणण्यापेक्षा त्याच्या मानसिक, बौद्धिक चैतन्यामुळेच केवळ आम्हीही आपोआप मानसिक दुबळेपणाच्या कुबड्यांचा आधार घेतला नाही. आईबाबा म्हणून आम्ही खरंच खूप धन्य झालो.

आई-बाबा म्हणून प्रसादमुळे अनेक भाग्याचे क्षण वाट्याला आले तुमच्या. पण ह्या सगळ्यात शारीरिक आणि मानसिक दमछाक तर नक्कीच झाली असणार! आई-वडील ही भूमिका बजावताना पती-पत्नी ह्या नात्याचाही कस लागला असणार. प्रत्येक नात्याची आपली अशी एक जागा असते. दोघांनीच ही जबाबदारी पेलताना तुमच्यातल्या "पती-पत्नी" ह्या नात्यावर तसंच स्वत:च्या व्यक्तिगत आवडीनिवडींवर, छंदावर थोडा अन्याय झाला, दुर्लक्ष झालं असं कधी वाटतं का तुम्हाला?
प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही न्यून हे असतेच, कोणीच परिपूर्ण नाही. आम्ही दोघे तरी त्याला कसे अपवाद असणार? आमच्यातही काही कारणाने वाद होत, मतभेद होत. पण तरीही आमच्या तिघांचे बंध फार घट्ट होते. प्रसादसाठी तर कधीच आमचा वैयक्तिक वाद आड आला नाही. व्यक्ती म्हणून म्हणाल तर प्रसाद बरोबर आम्हीही वाढत होतो. शिकत होतो. त्याच्यामुळेच स्पॅस्टीक सोसायटीची ओळख झाली, एस ई सी डेज स्कूल ह्या स्पेशल शाळेची ओळख झाली. तिथे जी बाळं बघितली त्यामुळे आम्हाला "आपलं दु:ख तर काहीच नाही" असं वाटायला लागलं. "आमचा प्रसाद फक्त शरीराने अपंग होता, पण मनाने आणि बुद्धीने तो खूप पुढे होता. त्यामुळे त्याच्या बुद्धीची झेप आणि मनाची भरारी तोकडी पडू न देणं हे आमचंही काम आहे, हे आम्ही जपलं.
शरयुताई: नात्यांमध्ये एकतर माफ करता आलं पाहिजे किंवा आहे ते स्वीकारता आलं पाहिजे हे आम्ही देखील हळूहळू शिकत गेलो.
नागेशजी: आम्ही आमच्या कामाची क्षेत्रं वाटून घेतली होती आणि मग आम्ही दोघेही एकमेकांच्या क्षेत्रामध्ये लुडबुड करत नसू. त्याचा शैक्षणिक विकास, त्याच्या कार्यक्रमांची तयारी, त्यासाठी तयार करावी लागणारी फाईल इ. हे सर्व त्याची आई बघत असे आणि त्याच्या बाबतीतली शारीरिक कष्टाची कामं ही माझी जबाबदारी होती. अगदी त्याला अंघोळ घालण्यापासून ते त्याला आणि वेळप्रसंगी त्याच्या ३९ किलो वजनाच्या व्हीलचेअरलाही त्याच्यासकट उचलून न्यायचे काम माझ्याकडे होते. बहुतेक देवाने तेव्हढ्याकरताच मला हे कष्ट पेलू शकेल असं शरीर दिलं असावं.
शरयुताई: असं करताना आम्ही आमचे छंदही जोपासत होतो. त्याच्या बाबांना हस्तकलेची विशेष आवड आहे. त्याच्याकडे लक्ष देताना ते एकीकडे लग्न, बारसं अशा कामांसाठी रुखवत सजवून द्यायचे. त्यांनी मत्स्यपालनाची आवडही जोपासली आहे. मी प्रसाद झाल्यावरच माझं बी. ए. पूर्ण केलं, ५ वर्षं नृत्याचं प्रशिक्षण घेतलं.

pankhavina-bharari-mukhaprushtha.jpg"पंखाविना भरारी" हे पुस्तक लिहावं हे तुम्हाला कसं सुचलं?
शरयुताई: मनश्रीच्या पुस्तकामध्ये प्रसादविषयी असलेलं प्रकरण वाचून, तसंच वर्तमानपत्रात त्याच्याविषयी आलेले लेख वाचून बर्‍याचजणांनी त्याच्या आठवणी लिहून ठेवण्याविषयी मला सांगितलं होतं. पण तोपर्यंत तोच स्वत: सगळ्यापासून मनाने अलिप्त होत चालल्यामुळे हात लिहायचं टाळतच होते.
परदेशात जसा ह्या स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रोपी विषयी आधारगट आहे तसा माझ्या पाहण्यात तरी आपल्याकडे नाही. असे बरेच प्रसाद आहेत समाजात ज्यांच्या पालकांना थोडा आधार हवा असतो "आपण एकटे नाही" ह्या भावनेचा! अशा मुलांना वाढवताना येणार्‍या आपत्तींमधून मार्ग काढायला आधी त्यातून गेलेल्यांचा अनुभव समोर असेल तर त्या आधारावर पुढची वाटचाल खंबीरपणे होते.
प्रसादविषयी वाचून पनवेलच्या भूषण कुलकर्णीला, जो त्याच्याचप्रमाणे मस्क्युलर अ‍ॅट्रोपीने पीडित आहे, आपणही काही करू शकतो अशी उमेद आली. त्याच्यावरचा लेख वाचून प्रेरणा मिळाली असे सांगणारे अनेक जण भेटले. अशीच प्रेरणा अजून काहींना मिळावी ह्या हेतूने हे पुस्तक लिहायला घेतलं. ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाकरताही प्रसादचंच एक बोलकं चित्र वापरलं आहे. ग्रंथाली प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.

खरंच आहे तुम्ही म्हणता ते! पुस्तक वाचताना सगळे प्रसंग आमच्याही समोर तसेच्या तसे उभे राहतात. माणूस किती जगला ह्यापेक्षाही तो कसा जगला हे जास्त महत्त्वाचं असतं. प्रसादचा प्रवास बघता "हे जीवन सुंदर आहे" हे त्यानेही अनुभवावं हा तुमचा यत्न सार्थकी लागल्यासारखाच वाटतो. तरीही प्रसाद होता तोपर्यंत तो केंद्रस्थानी ठेवून तुमचा जीवनक्रम चालू होता. तो असेपर्यंत ह्या एकाच ध्येयाने झपाटलेल्या तुम्हाला त्याच्या जाण्याने पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटलं असेल. ह्या पोकळीवर मात करायचा तुम्ही निवडलेला मार्गही खरोखर दाद देण्याजोगा असाच आहे. त्याची थोडी ओळख आमच्या वाचकांना द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते.
शरयूताई: फार वेगळं विशेष असं आम्ही काहीच करत नाही आहोत. तसंही त्याच्या सगळ्या गोष्टी आधीही होत्या तशाच आम्ही जपल्या आहेत. एक पालक म्हणून मुलाच्या जाण्याचं दु:ख तर मनात राहणारच! तरीही त्यात बुडून राहिलो तर त्याच्याकडून काहीच शिकलो नाही असं होईल. म्हणून आतापर्यंत जसे दु:खाशी मैत्री करत जगलो तसंच ह्याही पुढे होणार!
त्याला वाढवताना आम्हाला अनेक माणसांची अनेक प्रकारे मदत झाली. ईश्वरी संकेत असल्याप्रमाणे योग्य वेळी योग्य व्यक्ती आमच्या आयुष्यात आल्या, योग्य वेळी योग्य ती संधीही आम्हाला मिळू शकली. त्यामुळेच आता जमेल त्या पद्धतीने आपल्याकडून सेवा व्हावी असं वाटतं.
दिवाळीच्या सुट्टीत श्रद्धानंद अनाथाश्रम, तसंच इतर काही ठिकाणी मी इतर काही समविचारी मंडळींच्या मदतीने शैक्षणिक कॅम्प घेते. असं करून त्या मुलांच्या अभ्यासातील अडचणी सोडवायला आमचा थोडा हातभार लागतो ह्याचंही समाधान मिळतं. तसंही प्रसाद असतानाच मी पनवेल जवळच्या नेरे इथल्या शांतिवनात महिन्यातून एकदा किंवा जमेल तसं जायला सुरुवात केली होती. नेरे येथील इथल्या आधारगटात रहाणार्‍या एकाकी जीवांना देणगी, सुविधा ह्या जोडीने ज्याच्यापाशी मन हलकं करता येईल अशा मैत्रीच्या आधाराची गरज असते. मी जमेल तेव्हा तिथे जाते आणि त्यांच्याशी बोलून त्यांचं काही ऐकून परत येते. बस! सध्या तरी तितकंच होतंय. पुढे मागे व्हि. आर. एस. घेऊन तिथेच उरलेला काळ घालवायचं मनात घोळतंय. कितपत शक्य होईल ते तो देवच जाणे! प्रसादच्या बाबांचंही जमेल तिथे मदत करणं चालूच असतं. आम्हाला मदतीचे हात मिळत गेले तसंच आमच्याकडूनही जमेल तितकी मदत इतरांना करता यावी असं वाटतं. त्यात अगदी विशेष असं काहीच नाही.

इथे सांगताना तुम्ही जितक्या सहजतेने सांगताय तितका सहज साध्य हा प्रवास नक्कीच नव्हता. हे त्याचं यश. जितकं त्याच्या मेहनतीचं फळ होतं तितकंच ते तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनाचं, तुमच्या जिद्दीचंही होतं. हा दिवाळी अंक वाचणार्‍या सगळ्याच पालकांना/वाचकांना तुम्ही काय सांगू इच्छिता?
मूल स्पेशल चाईल्ड असो किंवा नॉर्मल, त्याला तुमचा वेळ द्या. त्याच्यातल्या मर्यादा जाणाच, पण त्याचबरोबर त्याच्यात काय आहे ते जाणून तो/ती १००% कसं अचिव्ह करू शकेल ह्याकडे लक्ष द्या. परिस्थितीचा बाऊ करून कुढत न बसता परिस्थिती स्वीकारून मार्ग काढायचं ठरवलंत तर तुमचा सकारात्मक विचार तुमच्या बाळालाही आधार देतो. मुलांना मदत करताना त्यांना परावलंबी बनवू नका, स्वावलंबी बनवा. त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला असं एखादं अपंग मूल असेल तर त्याच्याशी मैत्री करा. त्यांना तुमच्या मैत्रीची, प्रेमाची गरज असते. त्यातूनच त्यांना जगायचं बळ मिळतं हे आम्ही आमच्या अनुभवावरून सांगतोय. जगात फक्त सुखंच नसतात, दु:खही असतं ह्याचीही जाणीव मुलांना होऊ द्या. आपलं कुटुंब, आपला कोष सोडून इतरांसाठी काम करणार्‍या संस्थांनाही कधीतरी भेट द्या. मुलांनाही तुमच्या बरोबरीने तिथल्या लोकांना बघायची, जाणायची संधी मिळू दे. कदाचित इतरांचं दु:ख बघून तुम्हाला तुमचं दु:ख काहीच नाही असं वाटेल आणि जगण्याची नवी उमेद तुम्हाला मिळेल. आम्हा दोघांतर्फेही संपूर्ण मायबोली परिवाराला मनापासून शुभेच्छा!

तुमच्या तिघांच्याही जिद्दीला, हार न मानता, रडत न बसता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मार्ग काढणार्‍या वृत्तीला खरोखर सलाम! मायबोलीच्या ह्या दिवाळी अंकासाठी आमच्याशी इतक्या आपुलकीने संवाद साधल्याबद्दल तुम्हा दोघांचेही मनापासून आभार आणि ह्यापुढील सर्व वाटचालीला संपूर्ण मायबोली परिवारातर्फे शुभेच्छा!

****
मुलाखतकारः कविता नवरे
मुलाखतीसाठी साहाय्य - विश्वेश नवरे, किशोर गोविलकर
प्रकाशचित्रांचे प्रताधिकार - शरयु घाडी