नात्यातला सुसंवाद व विसंवाद

विसंवाद होण्याचं आणखी एक कारण म्हणजे स्थावर मालमत्ता, पैसा अडका, सोनं-नाणं ह्यांचं योग्य नियोजन नसणं, विल तयार करून ठेवलेलं नसणं. त्यामुळे भावाभावांमधे भांडणं-मतभेद. काही जणं आयुष्यभर पुरेल एवढी पुंजी स्वतःला ठेवतात, उरलेल्याची सोय करून ठेवतात की विसंवादाला जागाच उरत नाही.

borderpng.png

बो

लता बोलता सहज विषय निघतो, "घरी कोण कोण असतं तुमच्या?"

घरी ना, ८५ वर्षांच्या सासूबाई, मुलं, सुना, नातवंडं, यजमान आणि मी - आम्ही चार पिढ्या एकत्र राहतो आहोत म्हटलं की सगळ्यांना आश्चर्य वाटतं. एकत्रं राहणं आणि त्यात चार पिढ्या हा एक मोठ्ठा 'प्लस पॉईंट' झाला आहे. हल्लीची विभक्त कुटुंब पद्धती, बदललेली जीवनशैली, नोकरीनिमित्तं वेगवेगळी गावं, जागेच्या अडचणी ह्यामुळे 'हम दो-हमारे दो' चा जमाना आला. एकत्र कुटुंबात वडीलधारी मंडळी सामावून जायची, लहान मुलांकडे घरातच लक्ष दिलं जायचं ते संपलं. परिणामी वृद्धाश्रम, पाळणाघरं वाढली. पैसा भरपूर आला, पण भावनिक ओलावा, प्रेम कमी झालं. फक्त झाल्या-केल्याला, तोरणाला, मरणाला सगळे एकत्र येतात पण कर्तव्य म्हणून, जायलाच हवे म्हणून.

वाडा संस्कृतीत एकत्र कुटुंब रहात. घरातली सत्ता कर्त्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या हाती असायची. आयुष्यभराची पुंजी जमवून बांधलेली घरंदारं, काढलेल्या खस्ता सतत ऐकवल्या जायच्या. ऐकून ऐकून मुलं वैतागायची. "त्यापेक्षा तुमचं आम्हाला काहीच नको. आम्ही आमचं बघू, आमची सुखदु:खं आम्ही निभावू." ही विचारसरणी वाढायला लागली. पुढे पगार वाढले, सुबत्ता आली. त्यामुळे ह्या पिढीला काटकसर करायची गरज राहिली नाही. कर्ज काढून नवीन घरं, मोटारी घेतल्या जाऊ लागल्या. कर्ज फेडण्याची धमक होती. उरलेला पैसा मौजमजेसाठी खर्च होऊ लागला. शिवाय पैसा साठूही लागला. मुलांचे लाड पुरवले जाऊ लागले. आठवड्याचे पाच दिवस भरपूर काम केल्यानंतर, शनिवारी घरची कामं झाल्यावर रविवार पूर्ण आरामात घालवला जाऊ लागला. त्याचवेळी 'आमच्या वेळी असं नव्हतं' असं तुणतुणं वाजायला लागतं आणि मग धुसफुस सुरू होते. जुनं ते सगळंच सोनं असतं असं नाही, तसंच नवं सगळंच वाईट असतं असंही नाही; हे कोणीतरी सगळ्यांनाच समजावून सांगायची वेळ येऊ लागते.

माझ्या सासूबाईंच्या मैत्रिणींचा ग्रुप आहे. एक जवळ रहाणार्‍या आजी मुला-नातवंडांना रोज ऐकवतात, 'हे घर मी कष्टाने बांधले, तुम्हाला त्याची किंमत नाही. घर खाली करा.'. घर खाली करून ह्या आजी काय एकट्या रहाणार ह्या वयात! उलट सासूबाई आणि त्यांच्या काही जणी ऐटीत रहातात. मुला-नातवंडांबरोबर गाडीतून फिरतात, पिझ्झा बर्गर खातात. TV सिरियल बघतात, पेपर-मासिकं वाचतात. त्यांचं म्हातारपण छान उपभोगतात. आणखीन एक आज्जी वयाच्या ८० व्या वर्षी युरोप टूरला जाऊन आल्या. तिथलं जेवण चवीने खाल्लं. हिंडल्या फिरल्या. त्या स्वतः कुंदनचे दागिने करतात. बागकाम करतात, बागेतली फुलं-फळं सगळ्यांना वाटतात. प्रकृती साथ देतेच आहे पण खूप आनंदात रहातात. घरात सगळ्यांशी छान पटतं त्यांचं. असे घराघरात सुसंवाद असतील तर काय हवं?

काही जणांच्या बाबतीत वयोमानाने मनावर परिणाम होतो, तेच ते बोललं जातं, मग घरातली शांतता भंग पावते.

विसंवाद होण्याचं आणखी एक कारण म्हणजे स्थावर मालमत्ता, पैसा अडका, सोनं-नाणं ह्यांचं योग्य नियोजन नसणं, विल तयार करून ठेवलेलं नसणं. त्यामुळे भावाभावांमधे भांडणं-मतभेद. काही जणं आयुष्यभर पुरेल एवढी पुंजी स्वतःला ठेवतात, उरलेल्याची सोय करून ठेवतात की विसंवादाला जागाच उरत नाही.

मी माझा मोठा मुलगा १० महिन्यांचा झाल्यावर नोकरीला लागले. बाकीच्या मुली विचारत, "मुलाला कुठे ठेवतेस?" मी म्हंटलं "घरी!". तोपर्यंत घरात माणसं असताना मूल बाहेर ठेवायचं ही कल्पनाच केली नव्हती मी. आणि सासूबाईंनी पण आनंदानं ती गोड जबाबदारी स्वीकारली होती. पुढे मी पण माझ्या नातवंडांना छान प्रेमानी सांभाळलं, त्यांचं बालपण उपभोगलं. सुना निर्धास्तपणे नोकर्‍या करू शकल्या.

आमच्या पिढीने विचार केला, आपली नोकरी संपल्यावर आराम करू, आपल्या आवडीनिवडी जोपासू. पण काहीच वर्षांत सुना नोकरी करणार्‍या, त्यामुळे नातवंडांची जबाबदारी आपसूक येऊन पडते (अर्थात घेतली तर). कारण नातवंडांना दुसरीकडे ठेवलेलं आपल्याला पटणारं नसतं. हल्लीच्या वाढलेल्या कामांच्या व्यापामुळे सुनांच्या ऑफिसच्या वेळा निश्चित नसतात. मग नातवंडाचे अभ्यास, ग्राउंडला नेणं-आणणं, प्रोजेक्ट्स, खाणं-पिणं ह्यात सबंध दिवस संपून जातो. शिवाय आधीच्या पिढीच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. त्यांचे दवाखाने, पथ्यपाणी, औषधोपचार ह्या सगळ्यांत स्वतःसाठी वेळ असतोच कुठे? आमच्या पिढीने नोकरी करताना, आधीच्या पिढीशी जमवून घेतलं. आता पुढची पिढी पण नोकरी करते म्हणून त्यांचाशी जमवून घेता घेता आमची पिढी कायम सूनच राहिली. सतत जमवून घेता घेता स्वतःच्या मतांची गळचेपी होऊ लागली. आर्थिक स्वातंत्र्य मिळालं, पण मतस्वातंत्र्यावर घाला आला. संवाद म्हणजे विचारांची देवाण घेवाण न होता फक्त घेवाणच होऊ लागली. सतत पड खायची सवय लागली.

आजच्या तरूण पिढीने आपल्या व्यापांतून थोडा वेळ काढून आपल्या मुलांबरोबरच आपल्या आई वडिलांनाही दिला, कधी मिळून बाहेर जेवण, एखादी ट्रीप, नाटक, सिनेमा असे कार्यक्रम आखले, रात्रीचं जेवणतरी एकत्र, गप्पा मारत केलं, एकमेकांचे वाढदिवस घरगुती वातावरणात साजरे केले तर दोन पिढ्यांतला सुसंवाद आपोआपच वाढेल. सुसंवाद वाढला नाही तर गरज असेपर्यंत एकत्र राहणारी मुलं वेटिंगरूमसारखी आपलं घर तयार होईपर्यंत रहातात मग निघून जातात. मागे वळून पहायला त्यांना वेळ होत नाही. आपलं चौकोनी कुटूंब एवढंच त्यांचं जग उरतं. दोघं नोकरी करणारे असले तर आल्यावर तो कंप्यूटर घेऊन बसतो, नाहीतर टीव्हीसमोर. ती स्वयंपाकाचं बघते. त्या दोघांत तरी संवाद कुठे होतो? मुलांचा अभ्यास घेता ती दमून झोपतात. त्यामुळे मुलं आणि आईवडील यांच्यातही संवाद होत नाही. ती कसर ते शनिवार-रविवारी भरून काढतात. मुलांना मागू ते मिळतं त्यामुळे नकार पचवायची त्यांना सवय उरत नाही. नाही म्हटलं की आक्रस्ताळेपणा करतात, नाहीतर गप्प गप्पं होतात. हेच आजी-आजोबांच्या सान्निध्यात, संपर्कात रहाणारी मुलं त्यामाने शहाणी, समजूतदार असतात. कारण त्यांच्याशी बोलायला, संवाद साधायला, गमतीजमती ऐकवायला माणसं असतात प्रेमाची.

आणखी एक वादाचा मुद्दा म्हणजे सून परक्या घरून आलेली असते. तिच्यावर अर्थात माहेरचे संस्कार असतात. तिथल्या पद्धती, सवयी, आवडी-निवडी वेगळ्या असतात. तिलाही रुळायला वेळ लागतो. तिची परिस्थिती विचारात घ्यायला हवी. काळानुसार, सोयीनुसार तुम्हीपण बदलायला हवं. पुढच्या पिढीवर जबाबदारी टाकली तर ती व्यवस्थित निभावते. माझ्या सासूबाई नवरात्रीची सवाष्ण शुक्रवारीच घालायच्या. मी पण अर्धा दिवस रजा घेऊन सवाष्ण घालायची पण प्रायव्हेट कंपन्यांत सुट्ट्या कमी, सहजपणे रजा घेणं दरवेळी शक्यही नसतं. मग सगळे घरी असताना आम्ही सुट्टी बघून सवाष्ण घालतो. तिलाही आनंद होतो. मला विशेष काही कारण नसतानाही आल्यागेल्या पाहुण्याला भेटवस्तू द्यायची सवय आहे.

त्याबदल्यात माझी काही अपेक्षाही नसते. पण सुनेचं म्हणणं की घेणार्‍यावर त्याचं दडपण येतं. ते मलाही हळूहळू पटलं. त्यामुळे मी कारणाशिवाय देणं-घेणं कमी केलं. दोन्ही पिढ्यांनी थोडंथोडं सोडलं तर विसंवाद होणार नाहीत. जुन्या पिढीजवळ अनुभवांचं गाठोडं असतं. त्यात मुलाबाळांचं नुकसान होऊ नये हाच हेतू असतो. पूर्वीच्या पिढ्यांनी काटकसर करून जमवलेलं सामान नव्या पिढीला कालबाह्य वाटतं. पण तिसरी पिढी दुधावरची साय, ती आजी-आजोबांना पटवून देते तेव्हा हे त्यांना पटतं.

तसंच पैसा, वैभव मिळवण्यासाठी, संधी मिळवण्यासाठी मुलं परदेशी जातात. आईवडील त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसतात. मुलं पैसा पाठवतात. पण मोलाची नोकर माणसं काय प्रेमाने करणार? ती आली नाहीत की आईवडील अंधारात उपाशी असतात हे नवीन पिढीला कधी कळणार? पैसा, वैभव ह्यांच्या मोहापायी, परदेशातल्या सुसंधींसाठी आईवडील एवढे दूरचे होतात का? की नकोसे होतात? काही काही ठिकाणी आई वडीलही मुलांबरोबर परदेशी जातात. तिथे रू़ळतात. कोणालाच काळजीचं कारण उरत नाही. माझ्या मैत्रिणीची सून गाण्याच्या प्रोग्रॅम्ससाठी देशीविदेशी जाते. नात आनंदाने आजीआजोबांकडे रहाते. सुनेला काळजी नको, नात आनंदात. शक्य असेल तेव्हा मैत्रीणही सुनेबरोबर दौर्‍यावर जाते. नातीला आई बरोबर रहाता येतं. सुनेला सोबत होते.

आम्हां तीन चार मैत्रिणींकडे चार चार पिढ्या सुखाने नांदतात. काही फायदे तसचं काही तोटेही असतात. पण मोठी माणसं त्यांचं वार्धक्य सुखाने घालवतात. नातवंडा-पतवंडांची चांगली काळजी घेतली जाते. त्यांचं बालपण निरोगी वातावरणात फुलतंय, सुना निर्धास्तपणे नोकर्‍या करू शकतात. आम्हीपण आमच्या वेळा सांभाळून छंद जोपासतो, फिरतो. आलेला माणूस सुखासमाधानाने, आदरातिथ्याने भारावून बाहेर पडतो. सासरची, माहेरची, सुनांच्या माहेरची मंडळी, सगळ्यांचे मित्रमंडळ, अगदी नातवंडांचेसुद्धा, येतात रहातात. आत एक बाहेर एक असं नसल्याने येणार्‍याला संकोच वाटत नाही. इतरांशी जमवून घेण्यापेक्षा आपल्याच माणसांशी जमवून घेतलं तर जीवन आनंदमय, निर्धास्त व सुखाचं होतं. असा तीन-चार पिढ्यांतला सुसंवाद घडवणं घरातल्या कर्त्या स्त्रीवर अवलंबून असतं. त्यावरच घराचं घरपण-आनंद व सूख अवलंबून असतं.

असं चित्र घरोघरी असेल तर विसंवादाला स्थानच उरणार नाही!

- सौ. नीला सहस्रबुद्धे