म्हणजे जपानी लोकांनी त्यांचं दु:ख व्यक्त केलंच नाही का? असं नक्कीच नाही. डोळ्यात पाणी निश्चितच होतं, पण त्या रडण्यात कुठेही अगतिकता नव्हती, आक्रोश नव्हता. झालेल्या हानीचं दु:ख अपरिमित होतं, पण त्यासाठी कोणालाही त्यांनी दोष दिला नाही.
१
१ मार्च २०११ - शुक्रवार. दिवस नेहमीसारखाच उजाडला. सकाळपासून हवा मस्त होती. आज लेकीला ट्रेन ऐवजी स्वत:च्या सायकलवरुन शाळेत जायचं होतं. त्यामुळे सकाळी दोघी आपापल्या सायकलवरून गेलो. आता दुपारी पण तिला आणायला जावं लागणार, ह्या कल्पनेने नाही म्हटलं तरी जरा कंटाळाच आला होता.
दुपारी २.४५ च्या सुमाराला घाईघाईने निघाले. तेवढ्यात अचानक आभाळ भरुन यायला लागलं. हवामान खात्याचा अंदाज चुकून अचानक पाऊस पडणार की काय ही चिंता आणि निघायला झालेला उशीर, ह्यामुळे जरा जोरातच सायकल मारायला लागले. सिग्नलला थांबले आणि अचानक वाटायला लागलं की मला चक्कर येतेय आणि मी सायकल वरून खाली पडणार. समोरचा सिग्नल, झाडं, इमारती सगळंच हलताना दिसायला लागलं. एवढंच काय, तर मागच्या बागेत इतका वेळ निवांत बसलेली मांजरंसुद्धा सैरावैरा पळत सुटली. क्षणभराने जाणवलं, ही चक्कर नाही, हा भूकंप होतोय. असेल नेहमी सारखाच साधा भूकंप, म्हणून आधी दुर्लक्ष केलं पण हलण्याचा जोर वाढतच चालला होता. इतका की मी घाबरून हातातली सायकल रस्त्यावर आडवी केली आणि एका ठिकाणी उभी राहिले. कधी नव्हे ती आजूबाजूच्या इमारतींमधून माणसं बाहेर पडली, रस्त्यावरून जाणारी वाहनं थांबली. भूकंपाचा इतका मोठा हादरा गेल्या ११ वर्षात पहिल्यांदाच अनुभवत होते. हादरे कमी कमी होत थांबले असं वाटल्यावर पुन्हा सायकल उचलून शाळेत निघाले.
लेकीच्या शाळेची इमारत तशी जुनी आहे त्यामुळे शाळेतली सगळी मुलं सुखरूप असतील ना, हा विचार सारखा मनात येत होता. शक्य तितकी जोरात सायकल चालवत शाळेत पोचले. पहिला धक्का बसल्यानंतर लगेच सगळ्या मुलांना आपापली Disaster hoods डोक्यावर घेऊन वर्गांमधून शाळेच्या मैदानावर आणून बसवलं होतं. सगळेच जण घाबरून गेले होते. लेकीजवळ गेले आणि लक्षात आलं की पुन्हा एकदा सगळं हादरतय. असं चार पाच वेळा झालं. समोर शाळेची इमारतही अगदी झुलताना दिसत होती. फोनचं नेटवर्क बंद झाल्यामुळे आम्ही दोघी सोडून बाकी सगळे कसे आहेत हे कळतच नव्हतं. थोड्यावेळानी आयफोनवरून अगदी थोड्या वेळासाठी इ-मेलला लॉग-इन होता आलं. पण निदान तेवढ्यात घरचे सगळे सुरक्षित आहेत हे तरी कळलं.
साधारण दीड तास तसेच शाळेत बसून राहिलो. मुलांना गडबडीने वर्गातून मैदानात आणल्यामुळे जॅकेट्स, टोप्या सगळं काही वर्गातच होतं. त्यामुळे त्यांना थंडी वाजायला लागली. आता हळूहळू अंधार पडायला लागल्यावर थंडी अजूनच वाढेल, दुपारनंतर अचानक भरुन आलेलं आभाळ कधीही कोसळायला लागेल ह्याची चिंता वाटायला लागली. भूकंपामुळे सगळ्या लोकल गाड्या थांबवल्याचं कळलं. शाळेने पालक बरोबर असतील तरच मुलांना घरी जायची परवानगी दिली. (दुसर्या दिवशी पहाटे पाच वाजता शेवटचा विद्यार्थी घरी जाईपर्यंत शिक्षक शाळेतच होते.) आम्ही दोघींच्या सायकली शाळेतच ठेवल्या आणि मिळेल त्या वाहनाने घरी जायचा निर्णय घेतला. रस्त्यावर आलो तर एकही टॅक्सी रिकामी दिसेना. शेवटी घरापर्यंत चालतच गेलो. चालता चालता एकीकडे टॅक्सी मिळते का, कोणाला फोन लागतोय का ह्याची चाचपणी आणि विरुद्ध दिशेने शाळेत निघालेल्या पालकांना शाळेत सगळं ठीक असल्याचं सांगून धीर देणं हे सुरु होतं. चालतानाही मधूनच बसणारे भूकंपाचे हादरे जाणवतच होते.
घरी पोचेपर्यंत पाऊण तास लागला. आणि पोचल्यावर टीव्हीवर बघितला तो जपानच्या पूर्व किनार्याला, तोक्यो पासून ३७३ किलोमीटर अंतरावर, निसर्गाने दिलेला एक जबरदस्त हादरा! ९.० मॅग्निट्युडचा भूकंप आणि पाठोपाठ त्सुनामीचा तडाखा! एका जबरदस्त ताकदवान लाटेच्या फटकार्याने अगणित घरं, माणसं, जनावरं आणि वाहनं गिळंकृत केली होती, होत्याची नव्हती करुन टाकली होती. भूकंपानंतर दिलेल्या त्सुनामीच्या इशार्यानंतर घरातून पळून जरा उंचावर गेलेली माणसं आपली घरं, गाड्या डोळ्यासमोर वाहून जाताना बघूनसुद्धा काहीही करू शकत नव्हती. एक जहाज, काही गाड्या तर घराच्या छपरांवर गेल्या होत्या. कित्येक ठिकाणाचे रस्ते, रेल्वेचे ट्रॅक्स पाण्याखाली गेले, उद्ध्वस्त झाले. नकाशावरून ते गाव जवळजवळ पुसलं गेल्यासारखंच झालं होतं.
म्हणजे मी जेंव्हा, आपण लेकीला धीर देत देत इतकं अंतर चालून सुखरूप घरी आलो असा निःश्वास टाकत होते, तेंव्हा अनेक लोक ह्या त्सुनामीच्या तडाख्यापासून स्वत:चा आणि इतरांचा जीव वाचावा म्हणून आकांताने पळत सुटले होते. जेव्हा मला माझी लेक थंडी-पावसाने गारठेल, आपण लवकर घरी पोचलेलं बरं ही चिंता वाटत होती; तेंव्हा कित्येक लहान मुलांचा निवाराच कायमचा उद्ध्वस्त झाला होता. घरातली माणसं समोर दिसल्यावर मला जेंव्हा अत्यानंद झाला तेंव्हा अनेकांची घरं, माणसं त्यांना लाटांनी गिळंकृत करताना दिसत होती. आज लेकीने नेहमीसारखं ट्रेनने न जाता सायकलने जाण्याचा हट्ट केला, म्हणून भूकंपानंतरच्या दहाव्या मिनिटाला मी तिच्याकडे पोचू शकले म्हणून जेव्हा मी सुस्कारा टाकत होते, तेंव्हा आपले कुटुंबीय नक्की जिवंत आहेत की नाही ह्या प्रश्नाने कित्येक जण व्याकुळ झाले होते. जेंव्हा मला घरी येताना "अरे बापरे, अजून किती वेळ ट्रेन्स बंद ठेवणार? लोकांचे घरी जाताना हाल होणार!" असं वाटत होतं, तेंव्हा कित्येक ठिकाणी रेल्वेचे रुळच्या रुळच उद्ध्वस्त झाले होते.
मी घरी पोचले म्हणून मला वाटलेलं समाधान किती क्षुल्लक आणि क्षणिक होतं ह्याची जाणीव झाली.
तोक्योमध्ये लोक ऑफिसमधून घरी जायला बाहेर तर पडले होते. पण ट्रेन बंद, टॅक्सी आणि बसच्या प्रचंड रांगा, एरवीपेक्षा अनेक गाड्या रस्त्यावर आल्यामुळे रस्त्यावर झालेली गर्दी, ह्यामुळे अनेकांना चालत घरी जाण्यावाचून इलाज नव्हता. तोक्योमधला माणूस कामाच्या ठिकाणी सबवे आणि ट्रेनमधूनच प्रवास करतो. त्यामुळे आपल्या घराची दिशा नक्की कोणती हे बरेचदा त्यांनी रस्त्यावर येऊन बघितलेलंच नसतं. नेमकी हीच गरज लक्षात घेऊन विविध ठिकाणी काही स्वयंसेवक तोक्यो आणि उपनगराचे नकाशे घेऊन उभे राहिले होते आणि पादचार्यांना मार्गदर्शन करत होते. छोटीशीच कृती पण चार-पाच तासांच्या पायपिटीसाठी अनेकांना त्याची मदत झाली. आज पादचार्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्यामुळे त्यांना पदपथ पुरत नव्हते. मग ह्या सगळ्या गर्दीमुळे रस्त्यावर गोंधळ माजला का? तर, अजिबात नाही! दोन्ही दिशांच्या वाहनचालकांनी स्वेच्छेने आपापल्या बाजूची एकेक लेन पादचार्यांसाठी मोकळी करुन दिली. कुठेही आरडाओरडा नाही, धक्काबुक्की नाही की बेशिस्त वर्तन नाही!
शारीरिक आणि मानसिकरीत्या दमलेलो असूनही त्या रात्री आम्हाला झोप लागत नव्हती. एक कारण म्हणजे त्सुनामीची दुर्घटना डोळ्यासमोरून जात नव्हती आणि रात्रभर भूकंपाचे धक्के (आफ्टरशॉक्स) बसतच होते. शुक्रवारपासून पुढच्या ३ दिवसात १५० आफ्टरशॉक्स झाले आणि त्यानंतर पुढच्या दीड महिन्यात त्यांची संख्या हजारावर गेली होती.
दुसर्या दिवसापासून तोक्योमधील रेल्वेचं वेळापत्रक हळूहळू मार्गावर येताना दिसत होतं. आज शनिवार असल्याने शाळा आणि ऑफिसेसला सुट्टी. त्यामुळे त्या धक्क्यातून लोकांना सावरायला वेळ मिळतोय, सुट्टीचा दिवस असल्यामुळे ह्या आफ्टरशॉक्समध्येही आपापल्या कुटुंबाबरोबर राहता येतंय असा दिलासा मनाला वाटत होता. पण सकाळी ८.३० नंतर लक्षात आलं की आपला हा विचार फक्त आयटी किंवा तत्सम ठिकाणी काम करणार्या लोकांनाच लागू होतोय. कारण शेजारच्या इमारतीचं नूतनीकरण करणारे कामगार ट्रॉलीवर चढून त्यांचं काम करतायत, elevators चालू नसले तरी कुरिअरवाली माणसं प्रसंगी ३० मजले चढून एखादं पार्सल पोचवण्याचं काम करतायत. "ग्राहक देवो भव!" चा ह्यापेक्षा वेगळा नमुना कुठे बघायला मिळणार?
"तोक्यो स्काय ट्री" हा जगातला सर्वात उंच टि.व्ही टॉवर म्हणून ओळखला जाईल. १ मार्च २०११ ला टॉवरच्या बांधकामाने ६०० मीटर उंची गाठली होती. भूकंप झाला तेव्हा त्याची बांधणी अगदी निर्णायक टप्प्यावर आली होती. पण १२ मार्च २०११ ला पूर्वयोजनेप्रमाणे त्याच्या बांधकामाची ६२५ मीटर पर्यंत उंची गाठली गेली. आणि १८ मार्च २०११ ला ६३४ मीटरचा अंतिम टप्पा गाठून त्याचं काम पूर्ण झालं.
त्सुनामीग्रस्त भागातल्या लोकांची पर्यायी व्यवस्था तात्काळ मोठ्या शाळांमधून वगैरे केली गेली होती. पर्यायी व्यवस्था म्हणजे काय? तर त्या क्षणी त्यांच्या डोक्यावर केवळ छप्पर होतं. पहिले दोन दिवस रस्ते बंद झाल्यामुळे पुरेसं अन्नपाणी नाही, अचानक कोसळलेल्या मोठ्या प्रमाणावरच्या आपत्तीमुळे टॉयलेट्सची अपुरी व्यवस्था, हीटिंगची अपुरी सुविधा ह्या सगळ्याबद्दल कोणी साधी तक्रारही केली नाही. हे सगळं सोसणारे आपण एकटेच नाही, हा एक विचारही त्यांच्यासाठी पुरेसा होता. जे मिळेल ते सगळ्यांनी समसमान वाटून घ्यायचं. मग ते अंथरुण-पांघरुण असो की जेवण-खाण असो. एकदा तर एका evacuation center मधे जेवणाला फक्त एक केळं आणि एक स्ट्रॉबेरी इतकाच अन्नपुरवठा होऊ शकला. तर काही ठिकाणी फक्त एक ओ-निगिरी (राइसबॉल) किंवा ओ-बेन्तो (जपानी जेवणाचा डबा) किंवा कप-नूडल्स आणि पाण्याची बाटली. 'मिनामी-सानरिकु' नावाच्या ठिकाणी एका माणसाचं घर समुद्रापासून जवळ असल्यामुळे वाहून गेलं. पण त्याचं रामेनचं; म्हणजे जपानी नूडल्सचं उपाहारगृह मात्र सुरक्षित होतं. त्या माणसाने दुकानातला माल संपेपर्यंत तिथल्या शक्य तितक्या लोकांना विनामूल्य रामेन खायला दिल्या. स्वत:चं घर नष्ट झाल्यावरसुद्धा इतकं नि:स्वार्थी राहणं कसं जमू शकतं ह्या माणसांना?
नेहमीच्या आयुष्यात अतिशय शिस्तबद्ध वागणारे जपानी लोक नेहमीच पाहिले होते. पण ह्या आणीबाणीच्या प्रसंगीदेखील एकानेही आपल्यातलं माणूसपण सोडलं नाही. मग ती लहान मुलं असोत की वयोवृद्ध. तिथे सहनशीलतेला वयाची मर्यादा नव्हती. ज्यांचे आईबाबा घ्यायला येऊ शकले नाहीत अशी आठ ते बारा वयोगटातली ३० मुलं, ३ दिवस शाळेत बसून होती. "आईबाबा कधी येणार?" असं विचारून शिक्षकांना भंडावून न सोडता लायब्ररीमधली पुस्तकं वाचत, एकमेकांशी कार्डगेम्स खेळत आपापला जीव रमवत होती. कुठून आला असेल ह्या चिमुरड्यांमधे इतका पराकोटीचा समजूतदारपणा?
म्हणजे जपानी लोकांनी त्यांचं दु:ख व्यक्त केलंच नाही का? असं नक्कीच नाही. डोळ्यात पाणी निश्चितच होतं, पण त्या रडण्यात कुठेही अगतिकता नव्हती, आक्रोश नव्हता. झालेल्या हानीचं दु:ख अपरिमित होतं, पण त्यासाठी कोणालाही त्यांनी दोष दिला नाही.
उद्ध्वस्त भागांमध्ये स्वयंसेवक सतत झटत होते. स्वयंसेवक म्हणजे फक्त उत्साहाच्या भरात गेलेले कार्यकर्ते नव्हेत. तर सरकारी, तसंच विविध स्वयंसेवी संस्थांमधे नाव नोंदणी केलेल्या कार्यकर्त्यांच्या उभारलेल्या फळ्या. ठराविक संख्यांनी केलेले त्यांचे गट आणि त्यांना वाटून दिलेली कामं. प्रत्येकाने आपल्याला नेमून दिलेलं काम चोखपणे करायचं. मग ते चिखलातून, राडारोड्यातून एखादं घर साफ करून पूर्ववत करणं असो की evacuation center मधल्या अनेकशे माणसांसाठी स्वैंपाक करण्याचं असो. कधी नव्हे ते मार्च अर्धा संपल्यानंतरही त्या भागात बर्फ पाडून निसर्ग त्यांच्या कामात अडथळे आणत होताच. पण ह्या अडथळ्यांना भीक घालेल तो जपानी माणूस कुठला? काही ठिकाणी स्वयंसेवकांच्या मदतीला होती तीच माणसं ज्यांची घरंदारं, कुटुंब ह्या त्सुनामीच्या तडाख्यात उद्ध्वस्त झाली होती. साफसफाई करताना त्यातल्या एखाद्याच्या हाती कधी कुटुंबाचा चिखलात दडलेला एखादा फोटो सापडला किंवा अगदी मुलीची एखादी हेअरपिन सापडली तरी त्यांच्या लेखी तो आनंद अवर्णनीय होता.
एकीकडे चिखलात सापडलेल्या फोटोंचं नक्की काय करायचं, हे कळत नसताना काही फोटोग्राफर्स मदतीला आले. त्यांनी ते फोटो स्वच्छ करून धुवून फ्रेम करून दिले. कोणी त्या स्वच्छ फोटोंचे डिजिटल कॅमेर्यानी फोटो काढून ते कायमस्वरूपी डिजिटल स्वरुपात राहतील ह्याची व्यवस्था केली.
कधी कधी स्वयंसेवकांना तो परिसर बघून नैराश्य येत होतं. पण कधी त्यांना अवचित दैवी चमत्कारानं ढिगार्याखाली एखादं चार महिन्यांचं तान्हं बाळ जिवंत सापडलं, तर कधी नऊ दिवसांनंतर एक ८० वर्षाची आजी आणि तिचा १६ वर्षाचा नातू घरातल्या कपाटाखाली सुखरूप सापडला. तेंव्हा मात्र ते नैराश्य, ती वेदना अगदी सहज पुसली जात होती. कारण त्यांच्या तनामनात घुमत होता एकच घोष - "गांबारोऽ निप्पोन !" (सगळे जपानवासी एकजुटीने प्रयत्न करूयात - धीर न सोडता लढूयात!)
मामोरू ओकिनावा नावाचा तीस वर्षीय युवक. त्सुनामीमुळे बेपत्ता झालेल्या आपल्या बायकोला आणि सव्वा वर्षाच्या मुलीला कित्येक दिवस शोधत होता - हातात केवळ त्याचा फॅमिली फोटो आणि एक फावडं घेऊन, सतत फोटोमधल्या बायकोला, मुलीला म्हणत होता, "मला माफ करा. मी तुम्हाला शोधण्यात अपयशी ठरलोय. माझ्या नावाला मीच काळिमा फासलाय" - कारण "मामोरू" चा अर्थ आहे "रक्षण करणे".
जपानी लोकांच्या कार्यक्षमतेला दाद द्यावीशी वाटली जेंव्हा पुढच्या पाच ते सहा दिवसात खचलेले रस्ते दुरुस्त झाले. लोकांकडे रसद पोचू लागली.
ही दुर्घटना झाल्यानंतर अवघ्या पन्नास दिवसातच; म्हणजे २९ एप्रिलला तोक्योमधून आकिताला जाणारी शिनकानसेन, म्हणजेच बुलेट ट्रेन, पुन्हा चालू करण्यात आली. एरवी जपानच्या जवळजवळ सर्व भागातून दर काही मिनिटांनी ये-जा करणार्या ह्या शिनकानसेनचं खरं तर कोणालाच अप्रूप नाही म्हटलं तरी चालेल. पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र २९ एप्रिलला आकिताला जाणारी पहिली गाडी जेंव्हा तोक्योमधून निघाली, तेंव्हा तोक्यो स्टेशनवर जमून लोकांनी तिला आनंदाने निरोप दिला. मधल्या सेनदाई स्टेशनवर आणि शेवटच्या आकिता स्टेशनवरही लोकांनी उत्साहाने गर्दी केली होती. जणू एखाद्या समारंभाला उपस्थित रहावं अशा कपड्यात स्त्री-पुरुष तिथे आले होते. अक्षरश: वाद्यांच्या आणि टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत झालं. तसंच जिथून-जिथून ती गाडी जाताना दिसते, तिथे रस्त्यांवर उभे राहून लोक आनंदाने हात हलवत गाडीचं स्वागत करत होते, शुभेच्छा देत होते. कोणाच्या हातात झेंडे होते तर कोणाच्या हातात कापडी 'कोई' मासे ('कोई' हा मासा प्रवाहाविरुद्ध पोहणारा. म्हणून जपानमधे त्याला सांस्कृतिक महत्त्व आहे), तर बर्याच जणांच्या हातात मोठे कापडी फलक होते ज्यावर लिहिलं होतं " गांबारोऽ निप्पोन!". हा आनंद पुन्हा एकदा अंशत: का होईना पण एक सुरळीत सुरुवात होतेय, ह्याचा होता. डोळ्यात त्या सर्वांसाठी कृतज्ञता होती, ज्यांनी शिनकानसेन ट्रॅक्सच्या अंदाजे ५०० किलोमीटरच्या विस्तारातले १२०० ठिकाणचे fault points शोधून, रात्रंदिवस राबून ते दुरुस्त केले होते.
"हायाबुसा" ही, तोक्यो-आओमोरी दरम्यान धावणारी, जपानमधली सर्वात वेगवान शिनकानसेन. भूकंपाच्या अवघ्या काही दिवस आधी म्हणजे ५ मार्चला तिचं मोठ्या जल्लोषात उद्घाटन झालं होतं. भूकंपामुळे ती ट्रेन बंद करावी लागली. आता अवघ्या सहा महिन्यात पुन्हा एकदा ही हायाबुसा धावायला लागली आहे.
त्सुनामीमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या सेन्दाई भागामधे देखील २९ एप्रिलला फुटबॉलचं स्टेडियम चालू झालं. त्या पहिल्या मॅचला २०००० लोकांनी हजेरी लावून खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. मॅच सुरू करण्यापूर्वी राष्ट्रगीत म्हणताना कोणालाच अश्रू आवरता आले नाहीत.
जपानी शाळांमधे जुनं शैक्षणिक वर्ष मार्चमध्ये संपून एप्रिलपासून नवीन वर्ष सुरू होतं. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अगदी बालवाडीपासून ते महाविद्यालयापर्यंत सगळ्यांचंच graduation असतं. विस्कटलेली घडी बसवायचीच, ह्या हेतूने आता काही आठवडे उशीरा का होईना, पण त्सुनामीग्रस्त भागातल्या शाळां-महाविद्यालयांचं graduation व्हायला सुरुवात झाली. एका गावातल्या बालवाडीचं graduation होतं, ज्याला एक जपानी आई उपस्थित होती. तिच्या दोन्ही मुली, वय सहा आणि दोन, ह्या त्सुनामीच्या तडाख्यात कुठे गेल्या होत्या ते त्सुनामीच्या लाटांनाच ठाऊक! आज तिचीही मुलगी खरं तर ह्या समारंभात graduation चा गाऊन, टोपी घालून दिमाखात उभी असायची. तरीही ती आई आज समारंभाला उपस्थित राहिली. का? तर तिचं म्हणणं की "माझी मुलगी आज असती तर मी इथे तिचं कौतुक करायला, टाळ्या वाजवायला आलेच असते ना? मग आज ती नाही म्हणून बाकीच्या चिमुरड्यांचा हा समारंभ कमी महत्त्वाचा ठरतो का?" कसं आणि कुठून आलं असेल एका सर्वसामान्य गृहिणीमध्ये हे मानसिक बळ?
दुर्घटनेनंतर अवघ्या चार महिन्यात आता तात्पुरती घरं उभारली आहेत. तात्पुरती असली तरी त्यांचा दर्जा मात्र मुळीच कमी नाहीये. काही ठिकाणी घरं बांधल्यावर आराखड्यात काही चुका आहेत असं आढळलं. चुका म्हणजे बांधकामाच्या दर्जाविषयक नाहीत, तर घरांच्या रचनेसंदर्भात. आधीच्या रचनेनुसार आजूबाजूच्या घरांशी फारसा संपर्क येत नव्हता. आधीच इथे राहणारे सगळे लोक त्यांच्या हक्काच्या घरातून बाहेर फेकले गेल्यामुळे मानसिकरित्या खचून गेले होते. त्यात काही वृद्ध एकेकटेच रहात होते. त्यांचं दुखलं-खुपलं एकमेकांना बघता यावं, त्यांना सोबत मिळावी म्हणून पुढच्या बांधणार्या घरांची रचना त्यांची दारं एकमेकांसमोर येतील अशी केली. घरं बांधण्याच्या जोडीने ठिकठिकाणी 'साकुरा' म्हणजे चेरीची रोपं आणि सूर्यफुलाच्या बिया लावल्या. म्हणजे पुनर्वसन करताना तिथली फुलं बघितली की लोकांच्या चेहर्यावर आनंद उमटेल. नागरिकांचा केलेला इतका लहानसहान विचार ह्या सरकारविषयी खूप काही सांगून जातो.
त्सुनामीच्या तडाख्यामुळे फुकुशिमाचं अणूऊर्जाकेंद्र बंद करावं लागलं. ह्या संकटामुळे आता कधी नव्हे ती वीजबचत करावी लागणार होती. खरं म्हणजे तोक्यो अजून वीजबचत क्षेत्रात आलंच नव्हतं. पण तरीही तोक्योकरांनी आपणहून उत्स्फूर्तपणे वीजबचत करण्याचा निर्णय घेतला. वीजबचत म्हणजे नक्कीच रोज चार ते सहा तास घरातली वीज जाणार, ह्यापेक्षा वेगळं काही माझ्या भारतीय मनाला सुचलंदेखील नाही. पण हळूहळू लक्षात येत गेलं की वीजबचत म्हणजे काही फक्त वीज पुरवठा बंद ठेवून कामं ठप्प करणं नाही; तर कितीतरी छोट्या छोट्या गोष्टींमधून वीजबचत करून आपली रोजची कामं सुरळीत ठेवता येतात.
छोट्या दुकानापासून ते अगदी मोठ्या मॉल्सपर्यंत सगळीकडे रोज जितके दिवे लावलेले असत, त्यापेक्षा जवळपास निम्म्याने दिवे कमी केले. रेल्वे स्टेशन्सवरही तेच. विविध ठिकाणी असलेले escalators बंद ठेवले गेले. ज्यांना अगदीच जिने चढता येणं शक्य नाही त्यांनी elevators चा वापर करावा. रोज दर तीन ते चार मिनिटांनी धावणार्या लोकल गाड्या आता पाच ते सहा मिनिटांच्या अंतराने धावू लागल्या. सर्व ऑफिसेसमध्ये संध्याकाळी सहा नंतर एसी बंद करायला सुरुवात झाली.
ऑगस्ट महिना म्हणजे तोक्योमध्ये उन्हाळ्याची अगदी परिसीमा असते. त्या दिवसात विजेचा वापर सर्वाधिक होतो. त्यामुळे बर्याच कंपन्यांनी असा निर्णय घेतलाय की ऑगस्टमध्ये २ आठवडे सर्व कर्मचार्यांना सुट्टी द्यायची. ते दिवस सप्टेंबर मधले शनिवार, रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी भरुन द्यायचे. जेणेकरुन त्याकाळात वीजव्यवस्थेवर अतिरिक्त ताण येऊ नये. सगळ्यांच्या मनात एकच ध्यास होता "गांबारोऽ निप्पोन!" आणि अक्षरश: 'थेंबेथेंबे तळे साचे' ह्या उक्तीप्रमाणे बाकी ठिकाणी तेवढा वीज तुटवडा भासेनासा झाला.
तोशिबा, मित्सुबिशीसारख्या कंपन्यांनी ह्या काळात स्वत:च्या उत्पादनाची जाहिरात करतानाच जनजागृतीचं कामही केलं. एसीची जाहिरात करताना तापमान २४ ते २६ डिग्री ठेवलं तर कमी वीज खर्च होते हे ठसवण्याचा प्रयत्न केला; तर रेफ्रिजरेटरची जाहिरात करताना तो शक्य तितक्या कमी वेळा उघड-बंद करुन वीज वाचवा हे सांगितलं. त्याचबरोबर "पॅनासॉनिक" सारख्या कंपनीने लोकांच्या चेहर्यावर हसू फुलावं, आशावाद निर्माण व्हावा म्हणून भूकंपानंतर घडलेल्या सकारात्मक घटना (शिनकानसेनची, बोटींची सेवा परत सुरु झाली, मुलं पुन्हा शाळेत जाऊन हसू-खेळू लागली) एकत्र करुन त्याची सुंदर चित्रफीत तयार केली. जगाला हाच संदेश द्यायला; की "आम्ही पुन्हा आनंदाच्या दिशेने एकेक पाऊल पुढे टाकतोय"!
राखेतून उठलेल्या फिनिक्स पक्ष्याचा संदर्भ आजवर अनेकदा फक्त वाचला. खुद्द जपानच्या संदर्भातही महायुद्धातून फिनिक्स पक्षाप्रमाणे घेतलेल्या भरारीचे उल्लेख आहेत. हा पक्षी फक्त दंतकथांमधेच असतो असं म्हणतात. पण जपानला आज ह्या संकटातून बाहेर पडताना बघितलं आणि मी याची देही याची डोळा तो फिनिक्स पक्षी बघितला.
कुसुमाग्रज म्हणतात तसं,
“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून फक्त ’लढ’ म्हणा”
हा दृष्टिकोनच ह्या पक्षाला राखेतून पुन्हा उभारी घेण्याची हिंमत देत असेल का?
(प्रकाशचित्रे मुग्धा यार्दी यांचे कडून आणि आंतरजालावरून साभार.)
- मंजिरी