तळ्यातली कमळे

आता बकुळीची फुलं त्यांची इच्छा होईल तेव्हा झाडावरून खाली भिरभिरत पडतात. छोटीछोटी मुलंमुली फुलं वेचून त्यांचे हार आणि गजरे करतात. नीट बघितलत ना तर कळेल की ही बकुळीची फुलं त्या कमळांसारखीच आहेत.

borderpng.png

का जंगलात एक खूप मोठ्ठं सुंदर तळं होतं. चहूबाजूंनी मऊ गवताने वेढलेलं, निळ्याशार गोड पाण्याचं. या तळ्यात इवली इवलीशी अगणित कमळं होती. इवलीशी म्हणजे अगदीच इवलीशी. अगदी बोटाच्या पेराएवढी, सुंदर पांढर्‍या मोतिया रंगाची. प्रत्येक पाकळीला सोनेरी तपकिरी कडा, अगदी आखीव रेखीव रूप.

takamale_urvika.jpgगंमत म्हणजे ही कमळं चवीला अतिशय मधुर होती पण हेच त्यांचं दु:खही होतं. सगळेजण ही कमळं खाण्यासाठी म्हणूनच त्यांच्या जवळ जात. पक्ष्यांचा थवा भुर्रकन येऊन टोची मारून निघून जाई. कधी बदकं आपल्या फताड्या चोचीने ओरबाडत तर कधी पाणकोंबड्या, हुदाळ्या, पाणमांजरे येऊन कमळावर यथेच्छ ताव मारत. सगळ्यांना आवडणारं खाद्य म्हणजे ही कमळं! अगदी केव्हातरी जंगलात फिरायला येणारी मुलंमुली सुद्धा काठीने ओढून ओढून ही कमळं काढून खात.

कमळांना वाटे, खरंतर आपण फुलं आहोत मग आपल्यालाही फुलांसारखं वागवावं. आपल्या सुंदर पाकळ्याकडे कोणीतरी बघावं. पण इथे तर काय कोणीही येऊन नुसते खाऊन टाकतात. शेवटी त्यांनी ठरवलं की आता वनदेवीकडे तक्रार करायची.

प्रत्येक ऋतू बदलायच्या आधी वनदेवी जंगलात फेरफटका मारत असे. सगळ्यांची विचारपूस करत असे आणि सगळे काही आलबेल असले की मगच ऋतू बदलत असे. यावेळी कमळं वनदेवीची वाटच बघत होती. वनदेवी आल्या आल्या दु:खी आवाजात त्यांनी आपली व्यथा देवीला ऐकवली. तिला विनवलं की एकतर आम्हाला सुंदर चवीचे फळ करून टाक म्हणजे कोणी खाल्लं तरी काही हरकत नाही. किंवा मग सुंदर वासाचे फूल करून टाक म्हणजे सगळेजण आमचा सुवास घेतील आणि कुण्णी कुण्णी खाणार नाही.

वनदेवीने विचार केला आणि तिलाही ते पटलं. ती म्हणाली खरंतर तुम्ही फुलंच आहात. म्हणून मी तुमची चव काढून टाकून त्याजागी सुंदर वास देते तुम्हाला. मात्र एक आहे. आता तुम्हाला या तळ्यात राहता येणार नाही. या समोरच्या झाडांनाही केव्हापासून फुलं हवी होती. म्हणून तुमची रवानगी त्या झाडांवर होणार. कमळांनी आनंदाने मान डोलावली. तशी देवी "तथास्तु!" असे म्हणून पुढे निघून गेली.

झालं! ऋतू हळूच बदलला. सगळ्या झाडांना फुलं यायला लागली. इथे या तळ्यातली कमळं हळुहळू नाहीशी झाली. सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटलं. मात्र त्या उंच झाडाच्या फांद्या फांद्यांवर पांढर्‍या कळ्या आणि फुलं उमलायला लागली. झाडे आनंदानं हरखून गेली. पक्षी त्या झाडांवर येऊन फुलांशी खेळू लागले. फुलांचा गंध इतका सुंदर होता की कुणी त्या फुलांना खाल्लंच नाही. शिवाय पाण्यातले इतर प्राणीही आता वरपर्यंत पोहोचू शकणार नव्हते.

आता बकुळीची फुलं त्यांची इच्छा होईल तेव्हा झाडावरून खाली भिरभिरत पडतात. छोटीछोटी मुलंमुली फुलं वेचून त्यांचे हार आणि गजरे करतात. नीट बघितलत ना तर कळेल की ही बकुळीची फुलं त्या कमळांसारखीच आहेत. तशीच पांढरी मोतिया रंगाची, सोनेरी तपकिरी काठ असलेली, आखीवरेखीव.

- स्वप्नाली मठकर (सावली)