डॉक्टर विसरभोळे

नर्स झोपेबाईंनी कपाळावर हात मारला. रोजच्याप्रमाणेच! घड्याळात नुकतेच दहा वाजत होते. पण नेहमीप्रमाणेच कोणता काटा कुठे आहे ते विसरून, बारा वाजायला आले असं समजून, डॉक्टर जेवायला घरी निघून गेले होते.

borderpng.png

"हं.

हे घ्या पर्सबाई. हे दातांचं औषध त्या वाघ्यासाठी." डॉक्टर म्हणाले. त्यांनी एक पुडी नर्सबाईंच्या हातात दिली. मग भिंतीवरच्या घड्याळात पाहिलं.

"अरेच्या, इतक्यात जेवायची वेळ झाली सुद्धा? पर्सबाई, चला, दवाखाना बंद करा पाहू." मग त्यांनी भराभरा आपल्या टेबलावरचे कागद गोळा केले. कुठल्याकुठल्या खणात, फायलीत कोंबले, बॅग उचलली, आणि ते तरातरा दाराबाहेर पडले.

wisarbhole_new.jpgनर्स झोपेबाईंनी कपाळावर हात मारला. रोजच्याप्रमाणेच! घड्याळात नुकतेच दहा वाजत होते. पण नेहमीप्रमाणेच कोणता काटा कुठे आहे ते विसरून, बारा वाजायला आले असं समजून, डॉक्टर जेवायला घरी निघून गेले होते.

"अहो, मी नर्सबाई आहे. पर्सबाई नव्हे. आणि ती तुमची बॅग नाही, माझी पर्स आहे." नर्सबाई पुटपुटल्या. पण ते ऐकायला डॉक्टर दवाखान्यात होते कुठे? "आता कॉलेजला जाण्याआधी डॉक्टरांच्या घरी जाऊन पर्स शोधायला हवी. रोजचाच उद्योग झाला आहे हा आता." त्या सकाळी दवाखान्यात काम करीत आणि दुपारी नर्सिंग कॉलेजला जात. डॉक्टर अगदी नावाप्रमाणेच विसरभोळे होते. त्यामुळे रोजच अशी काहीतरी गंमत जंमत होत असे.

त्यांनी हातातल्या पुडीकडे पाहिलं. "वाघ्याला कशाला ते दातांचं औषध?" त्या विचारात पडल्या. समोरच चिंट्या बसला होता, त्याला म्हणाल्या, "वाघ्याचा पाय ना रे दुखावलाय?" चिंट्या हो म्हणाला.

अरे हो, वाघ्या म्हणजे चिंट्याचा कुत्रा बरं का. तोही लंगडत लंगडत चिंट्याबरोबर आला होता आणि आपला दुखरा पाय अंगाशी घेऊन चिंट्याच्या पायाशी निमूट बसला होता. डॉ. विसरभोळे प्राण्यांचे डॉक्टर होते हे सांगायचं राहिलंच वाटतं विसरून?

"अरे, मग त्याला ते पिवळं मलम लावायला हवं" नर्सबाई म्हणाल्या आणि औषधांच्या कपाटात मलम शोधू लागल्या.
"पण मग हे दातांचं औषध कुणासाठी असेल बरं?" त्या पुन्हा विचार करू लागल्या.

इतक्यात धपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. "आली वाटतं धप्पी" नर्सबाई म्हणाल्या. धप्पी म्हणजे डॉ. विसरभोळ्यांची खास विसरभोळी पेशंट चिमणी. दवाखान्यासमोरच्या झाडावर तिचं घरटं होतं. ती नेहमीच सकाळी घरट्यातून बाहेर पडायची. उडता उडता आकाशातले ढग पाहायची. आणि ढग पाहता पाहता उडायलाच विसरायची. मग काय? डॉक्टरांच्या दारासमोर धपकन पडायची. म्हणून तर नर्सबाई तिला धप्पी म्हणत. नेहमीप्रमाणेच नर्सबाईंनी तिला उचलली. कापसावर झोपवली. पाणी प्यायला दिलं. रुमालात बर्फ गुंडाळून तिच्या पंखांजवळ धरला.

"पर्सबाई! काय हा गोंधळ? माझ्या मनीच्या दातांसाठी हे पिवळं पायाचं मलम? आणि ही घ्या तुमची नर्स. माझ्या हातात कशी आली ही बायकांची नर्स?" डॉक्टर विसरभोळे परत आले होते आणि भलतेच रागावलेले दिसत होते.

आत्ता नर्सबाईंच्या लक्षात आलं काय झालं असावं ते. "अहो डॉक्टर, मी नर्स आहे आणि ही पर्स आहे." हळूच हसत त्यांनी आपली पर्स डॉक्टरांच्या हातातून काढून घेतली. ते पिवळं मलमही घेतलं आणि चिंट्याला दिलं. मग आपल्या हातातली दातांच्या औषधाची पुडी त्यांनी डॉक्टरांना दिली.

"मनीचं काय म्हणालात डॉक्टर?" त्यांनी विचारलं.
"अहो, तिचा दात दुखतोय ना, म्हणून तिच्यासाठी हे औषध." डॉक्टर म्हणाले.

आता मात्र नर्सबाई जोरात हसू लागल्या. मनी त्यांना चांगलीच ठाऊक होती. अनेकदा ती डॉक्टरांच्या मागून धावत पळत दवाखान्यात यायची. डॉक्टरांनी मोबाईल समजून आणलेली आपली रंगपेटी न्यायला. काल तर त्यांनी स्टेथोस्कोप समजून तिची उड्या मारायची दोरी गळ्याभोवती घातली होती.

"अहो डॉक्टर, ही मनी म्हणजे मांजर नव्हे! तुमच्या मुलीचं नाव आहे ना ते? मग प्राण्यांचं औषध तिला कसं चालेल?" त्या म्हणाल्या.

"अरे हो. खरंच की. विसरलोच. म्हणजे, मी दातांचं औषध इथेच विसरलो ते बरंच झालं म्हणायचं. नाहीतर मोठाच गोंधळ झाला असता आज." बोलता बोलता डॉक्टरांनी भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं. साडेदहा वाजले होते. पुन्हा एकदा कोणता काटा कुठे आहे हे विसरून डॉक्टर म्हणाले, "अरेच्या! कमाल झाली. इतक्यात सहा वाजत आलेसुध्दा! घरी जायची वेळ झाली. पर्सबाई, तुम्ही अजून इथे कशा? आज कॉलेजला जायला विसरलात की काय? चला चला, दवाखाना बंद करा पाहू."

डॉक्टरांनी पुन्हा एकदा नर्सबाईंची पर्स उचलली आणि ते तरातरा दाराबाहेर पडले. नर्स झोपेबाईंनी पुन्हा एकदा कपाळावर हात मारला!

- स्मिताके