साद देती हिमशिखरे

आम्ही सुरुवात केली तेव्हा सगळीकडे मिट्ट काळोख होता, पण चंद्रप्रकाशामुळे बॅटरीचीही गरज नव्हती. वर पोचता-पोचताच फटफटायला लागले होते. सूर्याचे किरण पडायच्या आधीच आम्हाला वर पोचायचे होते म्हणून पावले भराभर टाकायला सुरुवात केली

borderpng.png

त्तराखंड म्हणजेच पूर्वीचे उत्तरांचल हे उत्तरप्रदेशमधून वेगळे झालेले उत्तर भारतातील एक राज्य.
अनेक तीर्थक्षेत्रे, त्यांच्याशी जोडले गेलेले कित्येक पौराणिक संदर्भ, गंगा व यमुना या नद्यांची उगमस्थाने ह्या सगळ्यांसाठी उत्तराखंड प्रसिद्ध आहे. सुट्टी घालवणार्‍यांसाठी, भटकंती करण्यार्‍यांसाठी तसेच यात्रेकरूंसाठी उत्तराखंड म्हणजे नंदनवन आहे. उत्तराखंड दोन भागांत विभागले आहे... ’टिहरी गढवाल’ व ’कुमाऊं गढवाल’. यातील तीर्थक्षेत्रे बहुतांशी ‘टिहरी गढवाल’ मधेच येतात. याच उत्तराखंडमधील ‘छोटे चारधाम’ आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहे.

उत्तराखंडमधील एक जिल्हा आहे ‘हरिद्वार’. हरिद्वारचा शब्दशः अर्थ ‘ईश्वराचे द्वार’. गंगानदी गोमुख येथून तब्बल दोनशेत्रेपन्न किलोमीटरची यात्रा करून याच हरिद्वारमध्ये प्रथम प्रवेश करते, म्हणून काही ठिकाणी हरिद्वारला गंगाद्वारही म्हटले जाते. आपल्या धर्मातील पौराणिक कथांनुसार समुद्रमंथनाच्या वेळी अमृत नेताना पृथ्वीवर ज्या ठिकाणी त्याचे काही थेंब सांडले, त्यातले एक हरिद्वार. त्यामुळे धार्मिक संदर्भात हरिद्वारचे खूप महत्त्व आहे. अशा अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या उत्तराखंडाची जुजबी ओळख झाली २००३ सालात. नंतर त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात कधी झाले ते कळलेच नाही खरेतर. तिथले ट्रेकिंगचे पर्याय व तीर्थक्षेत्रे खुणावत होती आणि आम्हीही त्यांच्या आमंत्रणाचा अव्हेर न करता दरवर्षी जात होतो.

तर अशा ह्या गाठीभेटींमध्ये गेल्या तीन वर्षांत खंड पडला होता. हिमालयाची शिखरे, गंगामैय्या, हरिद्वार यांचे दर्शन केव्हा एकदा घेऊ असे झाले होते आणि अशातच ट्रेक-सवंड्यांनी ट्रेकचे प्लॅनिंग सुरू केल्याची कुणकुण लागली. पंचकेदारमधले ‘केदारनाथ’ आणि ‘तुंगनाथ’ हे दोन केदार आधी झालेले असल्याने यावेळेस ‘मदमहेश्वर’ हे तिसरे केदार करावे का असा एक प्रस्ताव समोर आला. इतर प्रस्तावांबरोबरच मोजक्या दिवसांच्या वेळापत्रकात ट्रेक बसवायची कसरत केल्यावर दहा दिवसांमधे फक्त ‘देवरिया ताल-तुंगनाथ-चंद्रशिला शिखर’ हाच ट्रेक होईल हे स्पष्ट झाले व त्या ट्रेकवर शिक्कामोर्तब केले. एकदा ट्रेक ठरला म्हटल्यावर मग आपसूकच पटापट रिझर्वेशन्स वगैरे बाबी उरकल्या आणि ट्रेकच्या तयारीला लागलो.

२०११ सालच्या सप्टेंबर महिन्यात बाडबिस्तारासह हरिद्वारच्या दिशेने कूच केले. बरोब्बर पाच वाजता हरिद्वारला उतरलो. सामान टाकले, पटापट आंघोळी उरकल्या व गंगाघाटाकडे प्रस्थान केले. आम्ही पोहोचेपर्यंत गंगेची पूजा झाली असल्याने गंगेचे दर्शन घेऊन हॉटेलवर परतलो व सॅकची नव्याने बांधाबांध केली. यावेळेस मेंबर्सची संख्या समाधानकारक असल्याने आम्ही पुढच्या पाच दिवसांसाठी सुमो ठरवली होती, त्यामुळे आपल्या मनाप्रमाणे हवे तिथे गाडी थांबवून प्रवास करता येणार होता.

आजपासून ट्रेक सुरू होणार होता. भल्या पहाटे उठून आवरले व सात वाजता हॉटेल सोडले. आम्ही ठरवलेली गाडीही वेळेवर येऊन उभी होती. सामान टपावर चढवले व सगळ्या घोषणांच्या गजरात निघालो. आज मुक्काम तुंगनाथला जाण्यासाठी चोपत्याला करायचा की देवरिया तालला जाण्यासाठी उखीमठला करायचा हेच नक्की नव्हते. शेवटी आज उखीमठला राहायचे व देवरिया ताल-तुंगनाथ झाल्यावर बद्रीनाथलाही जायचे असे केव्हातरी ठरले.

हरिद्वार-ऋषीकेशच्या रस्त्यात गंगेचे दर्शन झाले. गंगेचा उगम गंगोत्री येथे होतो. टिहरी गढवालमध्ये तुम्ही कुठेही जा, गंगामैय्या तिच्या वेगवेगळ्या नावांनी तुमची सतत साथसोबत करत असते. गंगेचा प्रारंभ अलकनंदा व भागीरथी या नद्यांनी होतो.

मधेच एका ठिकाणी लॅंडस्लाईडमुळे गाड्या थांबलेल्या दिसल्या. ढिगारे उपसून रहदारी पूर्ववत करायचे काम इथे अव्याहत सुरू असते. मला इथल्या कामगारांचे, लोकांच्या सहनशक्तीचे कायमच प्रचंड कौतुक वाटते. लॅंडस्लाईड मोठा नसल्याने फार वेळ न मोडता पंधरा-एक मिनिटांत प्रवास सुरू झाला.

हरिद्वार-ऋषीकेशहून निघाल्यावर बद्रीनाथ-केदारनाथकडे जाताना सगळ्यात सुरुवातीला लागते ‘देवप्रयाग’. दोन नद्यांच्या संगमाच्या ठिकाणाला प्रयाग म्हणतात. इथे भागीरथी व अलकनंदा या एकमेकींना भेटतात. गंगोत्री या गंगेच्या उगमाच्या ठिकाणी तिला ‘भागीरथी’, केदारनाथ येथे ‘मंदाकिनी’ तर बद्रीनाथ येथे ‘अलकनंदा’ म्हणतात. उत्तराखंडमधले सगळेच प्रयाग बघण्यासारखे आहेत, खासकरून रुद्रप्रयाग. रुद्रप्रयाग येथे संगमावरच शंकराचे व जगदंबेचे देऊळ बांधले आहे. त्या संगमावर संध्याकाळच्या वेळेस जाऊन शांतपणे बसणे हा एक खासा अनुभव आहे.

दुपारचा दीड वाजत आला होता, म्हणून आमच्या सारथ्याने रुद्रप्रयाग गावात शिरायच्या थोडेसे आधीच एका रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलपाशी गाडी थांबवली. हॉटेलचे लोकेशन मस्त होते. खाली छोटीशी बाग व खिडकीतून अलकनंदेचे दर्शन होत होते. मागे कर्णयागला थांबलो होतो, त्या हॉटेलची आठवण आल्यावाचून राहिले नाही. गरमागरम तवा-रोटी बरोबर बैंगन-भरता, भेंडी-मसाला आणि दह्यावर ताव मारल्यावर गारेगार वाटले. मला इथले दही-ताक प्रचंडच आवडतात. पोटात जरा थंडावा राहतो, त्यामुळे जिथे मिळेल तिथे दही-ताक घ्यायचा एकही मौका मी सोडत नाही. जेवल्यावर परत उखीमठच्या दिशेने प्रवास सुरू झाला. रुद्रप्रयागहूनच पुढे एक रस्ता रतुडा-नगरासु-गौचर-कर्णप्रयाग मार्गे जोशीमठहून बद्रीनाथला जातो व दुसरा रस्ता तिलवाडा-भटवाडी-उखीमठमार्गे केदारनाथला. आम्हाला या दुसर्‍या रस्त्याने जायचे होते. उखीमठला पोचता-पोचता पाच-सव्वापाच होत आले होते. उखीमठचे पहिले दर्शन झाले आणि ठरवले की आज मुक्काम इथेच करायचा. म्हणून गाडी निगमच्या रेस्टहाऊसकडे वळवली.

उखीमठचे पहिले दर्शन
DSC_4848.JPG

निगमच्या रेस्टहाऊसमध्ये फक्त डॉरमेटरीच शिल्लक असल्याचे कळले, पण इथल्या रेस्टहाऊसचे लोकेशनही छान होते. थोडे गावाबाहेर असल्याने समोरचे डोंगर व हिमालयाचे मस्त दर्शन होत होते. शेवटी "डॉरमेटरी तर डॉरमेटरी!" असे म्हणून सामान टाकले व आंघोळीकरिता गरम पाण्याची ऑर्डर दिली. जेवण तिथेच मिळणार होते त्यामुळे त्याची चिंता नव्हती. झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा उद्याची तयारी हाताशी ठेवली व आडवे झालो.

सकाळी जाग आली तोपर्यंत काही मंडळी उठून तयारही झालेली. बाहेर जाऊन बघितले तर शिखरांवर ढगांचा पाठशिवणीचा खेळ चाललेला. मधेच ढगांच्या आडून एखादे हिमशिखर डोके वर काढत होते तर मधेच लपत होते. थोड्या वेळाने त्यांचा नाद सोडला व आवराआवरीला लागलो. निघण्यापूर्वी एकदा खोली तपासली, सॅक्स गाडीवर चढवल्या व उखीमठचा निरोप घेऊन ‘सारी’ गावाकडे निघालो. सारी गावाकडे येत असताना एका नागमोडी वळणावरून हिमशिखरांचे व डोंगरदर्‍यांचे मस्त दर्शन होत होते. मग काय! गाडी थांबवली. फोटो काढले पण मन काही भरले नाही.

DSC_4905.JPG

थोडे पुढे गेल्यावर रस्ता चुकल्याचे लक्षात आले. पण त्या गावातलले लोक ‘देवरिया ताल’ला जाण्यासाठी इथूनही रस्ता आहे असे सांगत होते. पण या रस्त्याबाबत ऐकले नसल्याने आम्ही परत फिरायचे ठरवले. काल संध्याकाळी जिथे चहा घेतला होता, त्याच्या समोरूनच चोपता-बद्रीनाथ-देवरिया तालला रस्ता जात होता. साधारण अर्ध्या तासाने ‘सारी’ गावात पोचलो. जिथे गाडी थांबवली तिथूनच समोरून देवरिया तालला जाणारा रस्ता दिसत होता. तिथल्याच एका टपरी-कम-धाब्यावर नाश्ता केला. त्याने घरचे तूप लावून बन-मस्का दिल्यावर पब्लिक एकदम खुश झाले. दुपारच्या जेवणासाठी त्यालाच सांगून देवरिया तालची चढाई चढायला सुरुवात केली.

सारी गावातून दिसणार्‍या हिमालयाच्या डोंगररांगा
DSC_4914.JPG

इथल्या बर्‍याचशा स्थळांना जसे काही ना काही पौराणिक संदर्भ आहेत, तसाच देवरिया ताललाही आहे. या तलावात, म्हणे देव आंघोळ करून गेले आहेत म्हणून याचे नाव ‘देवरिया ताल’. याला इंद्रसरोवरही मानले जाते. तसाच आणखी एक पौराणिक संदर्भ वाचनात आला तो म्हणजे यक्षाने इथेच पांडवांना काही शंका विचारल्या होत्या. खरेखोटे पांडव आणि यक्षच जाणोत! बाकी ट्रेकर्समधे हा ताल याच्या तीनशे डिग्रीजच्या पॅनोरमिक व्ह्यूसाठी प्रसिद्ध आहे. इथून बंदरपुछ, चौखंबा, केदारची रेंज अशी बरीच शिखरे व त्यांची प्रतिबिंबेही तलावात दिसतात.

चढाईला सुरुवात
DSC_4931.JPG

चढाई अगदी खडी होती, हळू-हळू आपापल्या स्पीडने फोटो काढत काढत चढत होतो. खालून एक पिवळा झेंडा दिसत होता. तिथे पोचलात की अर्धे अंतर झाले असे समजा असे गावातल्या लोकांनी सांगितले होते. पाठीवर भरपूर सॅक लादलेले एक खेचरही उतरताना दिसले. त्याच्या मालकाला विचारले तर काही लोक देवरिया तालहून तुंगनाथपर्यंत चालत गेले होते. सहा-सात तासांचा ट्रेक आहे म्हणे. आपल्याला कधीतरी हा ट्रेक जमेल का असे मनात आल्यावाचून राहिले नाही. त्याचे कारण म्हणजे सहा-सात तास चाल व त्यात उंचीही गाठायची कारण तुंगनाथ हे शंकराचे जगातले सगळ्यात जास्त उंचीवरचे देवस्थान समजले जाते. एकदाचे धापत धापत पिवळ्या झेंड्यापाशी पोचलो. सावलीत थोडे विसावलो. तिथे बसायला एक छानशी छत्री बांधली होती. थोडा वेळ आराम केल्यावर बरे वाटले. चढायला खूपच ऊन झाले होते, त्यामुळे आणखीनच दम लागत होता. पिवळ्या झेंड्यानंतर पंधरा-वीस मिनिटे चालल्यावर देवरिया तालचा बोर्ड दिसला. बोर्ड बघितल्यावर पोचलो हे बघून हायसे वाटले. देवरिया तालचे फोटो आंतरजालावर बघितले होते, आता प्रत्यक्ष बघायची खूपच उत्सुकता लागून राहिली होती. टपरीवाला चाचा सांगत होता, तलावात सकाळी भगवान शंकर स्नानाला येतात. इथे मुक्कामाला आल्यास सकाळी तलावात सगळ्या शिखरांचे प्रतिबिंब छान दिसते. जाऊ दे, आता विचार करून काहीच उपयोग नव्हता. चहा पिऊन तलावाकडे निघालो. एक वळण घेतले आणि ताल असा एकदम डोळ्यांसमोर उभा ठाकला.

देवरिया ताल
DSC_5000.JPG

DSC_4994.JPG

खरेच पूर्ण पॅनोरमिक व्ह्यू दिसत होता. फक्त ऊन चांगलेच वर आल्याने आम्हाला शिखरा-बिखरांचे प्रतिबिंब अजिबात दिसत नव्हते. शिखरे मात्र बघायला मिळाली. तिथे थोडावेळ बसलो व तलावाला एक प्रदक्षिणा घालून निघायचे ठरवले. थोड्या अंतरावर एक वॉचटॉवर सदृश काहीतरी दिसत होते. आमच्यातले काका आधीच जाऊन पाहणी करून आले होते. ते म्हणाले, इतक्या छान ठिकाणीसुद्धा लोकांनी बाटल्या (दारूच्या) टाकून कचरा केलेला आहे. तलावाला प्रदक्षिणा घालतानासुद्धा दुसर्‍या टोकाला खूप प्लॅस्टिकचा कचरा दिसला. आमच्या ग्रूपमधल्यांनी तो कचरा उचलला व आपल्या बरोबर आणला. इथे येताना एका घराच्या/ऑफिसच्या भिंतीवर काही सूचना व शुल्क लिहिलेले होते. त्याप्रमाणे भारतीय नागरिकांना दीडशे रुपये व परदेशी नागरिकांना काहीतरी भरपूर शुल्क लिहिले होते. तिथला जो कर्मचारी होता तो आम्ही तिथे पोचल्या-पोचल्या आमच्याकडून प्रवेश फी म्हणून पैसे मागायला लागला. नंतर कळले की ते शुल्क तुम्ही तिथे मुक्काम करत असाल तर द्यावे लागते. गोळा केलेला कचरा त्या कर्मचार्‍याला दाखवला व तुम्ही याकडे लक्ष द्यायला हवे असेही सांगितले. कधीतरी इथे मुक्कामाला येण्याइतकी ही जागा वर्थ आहे, त्यामुळे ‘देवरिया ताल’ला ‘मुक्काम-विशलिस्ट’वर टाकला व बाय-बाय करून निघालो. तिथून उतरताना आमच्यातल्या काही लोकांनी नवीन प्रस्ताव मांडला, "सारी गावात जेवून लगेच चोपत्याला जायचे व रात्री मुक्काम तुंगनाथला ठोकायचा." चंद्रशिला शिखरावर जायचे तर तिथला सूर्योदय बघण्यासारखा असतो म्हणे. दुखर्‍या गुडघ्याने तुंगनाथ चढणे मुश्किलच नाही, तर नामुमकीन होते! जेवणाच्या टेबलवर सगळ्यांच्या मताने निर्णयावर मंजुरी झाली व आज रात्री तुंगनाथला मुक्काम करायचे ठरले. सारी गावात जेवलो, त्याने परत घरातले साजूक तूप आमटीत घालून दिल्यावर परत मंडळी खूष झाली.

सारी गावचा निरोप घेऊन चोपत्याकडे निघालो. हा रस्ता माझा प्रचंड आवडता. खूपच रमणीय, बुग्याल व दाट झाडांमधून जाणारा रस्ता. आजूबाजूला सगळीकडे हिरवळच हिरवळ. बुग्याल म्हणजे थोडक्यात चराऊ कुरण. साधारण आठ-दहा हजार फुटांच्या उंचीवर ही बुग्याल बघायला मिळतात. प्राण्यांना चरण्यासाठी, भटक्यांना व ट्रेकर्सना कॅंपिंगसाठी एकदम योग्य लोकेशन. चोपत्याला पोचल्यावर सामानाकरिता घोडे ठरवले. आम्ही पाचजण घोड्यावरून जाणार होतो व सॅककरिता अजून दोन खेचरे ठरवली. आजूबाजूला छान वातावरण होते पण फोटो काढणे हे निव्वळ घोड्यांवर अवलंबून होते. मधेच एके ठिकाणी ढगात लपलेली शिखरे छान दिसत होती म्हणून घोडेवाल्याला दोन मिनिटे थांबायची विनंती केली. पण छे ! घोड्याची थांबायची अजिबातच इच्छा नव्हती. मग शेवटी तुंगनाथला पोचल्यावरच काय ते फोटो काढू असे ठरवले. तुंगनाथला पोचता-पोचताच अंधार पडत आला होता. विविधरंगी छटांनी नटलेले आकाश आमच्या स्वागताला हजर होते. पण त्या स्वागत सोहळ्याचे फोटो काढायला वेळ मिळाला नाही कारण आधी रहायची व्यवस्था बघायची गरज होती. मग मी व गुलशन, तुंगनाथ मंदिराचा लॉज बघायला गेलो. देवदत्त व मृणाल, आम्ही उतरलो होतो तिथेच एके ठिकाणी रहायचे जमतेय का बघत होते. खाली म्हणजे चोपत्याला सगळ्यांनी सांगितले होते की आता तुंगनाथला लाईट्स आहेत. पण इथे कुठेही लाईट्स दिसत नव्हते. आम्ही बघायला गेलो तो लॉज अगदी मस्त उघड्यावर होता. म्हणजे व्ह्यू एकदम भारी दिसत होता. रूम्सही त्यामानाने खूपच चांगल्या होत्या. बाथरूममध्ये नळ होते पण पाणी नव्हते. दाखवणार्‍या मुलाला त्याबद्दल विचारले तर तो म्हणाला की मी पाणी बंद करून ठेवले आहे. चालू केले की पाणी येईल. फारशी खात्री नव्हती पण त्यावेळी थंडीमुळे काही सुचत नव्हते. त्यात हाSSSS दम लागत होता आणि तो लॉज अगदी सगळ्या टपर्‍या ओलांडून गेल्यावर शेवटी, तो ही उंचावर! शेवटी जास्त विचारविमर्श न करता तोच लॉज फायनल केला. आमच्यातले चालत येणारे चौघेजण अजून यायचे होते. मग खाली येऊन त्यांची वाट पहात थांबलो. नशिबाने जास्त थांबावे लागले नाही. मग सगळ्या सॅक्स घेऊन लॉजवर आलो तर गुलशन कानटोपी, स्वेटर, लोकरीचे सॉक्स घालून बसलेली. आम्हीपण सॅकमधून स्वेटर व जॅकेट काढून चढवले. थोड्या वेळाने परत खाली जाऊन चार घास पोटात ढकलून आलो. लॉज दाखवणारा मुलगा संदीपही तिथेच त्या टपरीवाल्याला स्वैंपाकात मदत करत होता. त्याच्याकडे चंद्रशिलाला जाण्यासाठी किती वेळ लागेल व सकाळी कितीला निघावे लागेल याची चौकशी केली; तर म्हणाला, "तुम्हाला वर पोचायला दीड तास तरी लागेल . सूर्योदय सकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी होतो, तुम्ही चार वाजता तरी निघाच." बापरे, म्हणजे आता गेल्या गेल्या रजईतच शिरायला हवे होते, तर सकाळी तीन वाजता जाग आली असती. जेवल्याजेवल्या परत धापा टाकत लॉजवर आलो. थंडीने हातपाय काम करेनासे झालेले. त्यामुळे दात-बित घासणे प्रोग्रॅमला फाट्यावर मारून अंथरूणात शिरलो. अर्धवट झोप लागतेय न लागतेय तोच बाजूच्या खोलीतून आमच्यातल्याच लोकांचा आवाज यायला लागला व दार जोराजोरात ठोठावले गेले. घड्याळात पाहिले तर साडेबाराच वाजलेले. म्हणून त्यांचे दार वाजवून त्यांना म्हटले की साडेबारा वाजलेयत, आत्ता उठून काय करताय तुम्ही? तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ते चुकीच्या वेळेला उठलेयत. ते साडेतीन वाजले आहेत असे समजून आरडाओरडा करत बसलेले! नंतर झोपायचा क्षीण प्रयत्न केला, पण नीट झोप नाहीच लागली. साडेतीनला गजर झाल्यावर उठलो, पटापट आवरले व साडेचार वाजता निघालो चंद्रशिलाला भेटायला.

‘चंद्रशिला शिखर’ हा तुंगनाथचा माथा म्हणून ओळखला जातो. ह्याची उंची चार हजार मीटर म्हणजे तेरा हजार फूट. चंद्रशिलाबद्दलही पौराणिक संदर्भ आहेतच. त्यातला एक म्हणजे रावणाला युद्धात हरवल्यानंतर रामाने इथेच तपश्चर्या केली होती. दुसरा संदर्भ म्हणजे चंद्रदेवाने इथेच पापक्षालन केले आहे. तुंगनाथहून चंद्रशिलापर्यंतचे अंतर खरेतर फक्त एक किलोमीटर आहे पण सगळा रस्ता पूर्ण चढाचा आहे. आम्ही सुरुवात केली तेव्हा सगळीकडे मिट्ट काळोख होता, पण चंद्रप्रकाशामुळे बॅटरीचीही गरज नव्हती. वर पोचता-पोचताच फटफटायला लागले होते. सूर्याचे किरण पडायच्या आधीच आम्हाला वर पोचायचे होते म्हणून पावले भराभर टाकायला सुरुवात केली. वर आधीच लोक येऊन पोचले होते, सगळीकडे नुसता क्लिकक्लिकाट सुरू होता. आम्हीपण कॅमेरे सरसावले व कामाला लागलो. सूर्याचे किरण एकेका शिखराला प्रकाशमान करत होते. सगळ्यात आधी चौखंबा, मग हाथी परबत, केदारडोम, गंगोत्री, यमनोत्री ही शिखरे दिसत होती.

चंद्रशिलावरून दिसणारी शिखरे १) चौखंबा
DSC_5111.JPG

२) केदारडोम
DSC_5112.JPG

डोळे भरून तो सगळा नजारा पाहिला व जड पावलांनी उतरायला सुरुवात केली. यावर्षी शेवटी चंद्रशिलाला पाय लागले होते. मागच्या वेळेस खराब हवामानामुळे इथे येता आले नव्हते. आता चांगलेच उजाडले असल्याने उतरायला फार वेळ लागला नाही.

चंद्रशिलाहून परतताना
DSC_5172_(Image-cropped-by-Swapnali).jpg

DSC_5160.JPG

लॉजवर परतल्यावर जरा सामानाची आवराआवर केली व परत खाली नाश्त्याला गेलो. ज्या थंडीने काल तोंडचे पाणी पळवलेलं तिचे आता सकाळी नामोनिशाण राहिले नव्हते. नाश्ता झाल्यावर तुंगनाथचे बाहेरूनच दर्शन घेतले व निघालोच. दुखर्‍या पायामुळे हळूहळू उतरलो तरी उतरायला दोन तास लागलेच. आमचा सारथी रथ घेऊन तयार होताच. चोपत्याला वेळ न घालवता आम्ही बद्रिनाथच्या दिशेने कूच केले.

तुंगनाथहून उतरताना दिसणारी बुग्याल
DSC_5226.JPG

तुंगनाथहून उतरताना दिसलेले मंदिर
DSC_5205.JPG

चोपत्याहून बद्रिनाथला जायला मन्डल-गोपेश्वर-चमोली मार्गे एक रस्ता आहे. सारथी म्हणाला की मन्डलपर्यंतचा रस्ता खूप खराब आहे. पण नंतर काही त्रास नाही. रस्ता मस्त दाट झाडीतून जाणारा होता. हा सगळा भाग केदारनाथ वाईल्ड लाईफच्या अखत्यारीत येतो. जाताना वाटेत ‘कस्तुरीमृग प्रजनन केंद्र’ दिसले. गाडी थांबवलीच लगेच, म्हटले आपल्याला कस्तुरीमृग तरी केव्हा बघायला मिळायचे. इथेच बघून घेऊ म्हणून आत गेलो, तर एकदम शुकशुकाट होता. एकही माणूस कुठे दिसत नव्हता. आमच्यातले काहीजण अजून खालपर्यंत जाऊन आले. पण छे, कर्मचारी किंवा कस्तुरीमृग कोणीच दिसले नाही. निराशा झाली थोडी. परत सफर सुरू झाली. रस्त्यात दुतर्फा भोजपत्राची झाडे दिसत होती, साल काढून घ्यावी असे वाटले पण हात धजावले नाहीत.

सारथी म्हणाला तितका रस्ता वाईट नव्हता. दुपारची वेळ असल्याने ऊन चांगलेच कडकडीत होते मात्र. हा रस्ता चमोलीहून पुढे पिपलकोटी-जोशीमठमार्गे बद्रीनाथला जातो. आमचा दुपारच्या जेवणाचा प्लॅन पिपलकोटीला होता. या मार्गावर सगळ्यात जास्त लॅंडस्लाईड झालेले दिसत होते. त्यामुळे रस्ताही खूपच खराब होता. पिपलकोटीला पोचलो तेव्हा अडीच-पावणेतीन होत आले होते. रस्ता अरुंद असल्याने वाहनांची बक्कळ गर्दी होती. तिथेच गाडी लावून आम्ही हॉटेल इंद्रलोक (?) मधे जेवायला शिरलो. जेवण यथातथाच होते, पण दही एकदम ब्येष्ट होते. मन तृप्त झाल्यावर साडेतीनच्या सुमारास निघालो बद्रीनाथच्या दिशेने. आज मुक्काम बद्रीनाथला ठोकायचा होता. जोशीमठला बिर्ला रेस्ट-हाऊसला राहायची खूप इच्छा होती, पण वेळेअभावी जमले नसते. जोशीमठहून पुढे जाताना सगळे डोळे भरून पाहून घेतले. स्काऊट्सच्या बरॅक्स व त्याचा परिसर बघायला छान वाटत होते. जोशीमठ ते बद्रीनाथच्या रस्त्यावर ‘विष्णूप्रयाग’ लागते. हे धौलीगंगा व अलकनंदेच्या संगमाचे ठिकाण. इथेही जेपीचा मोठ्ठा हायड्रो प्रोजेक्ट आहे. मागच्या वेळेपेक्षा यावेळेस रस्ताही रुंद केलेला वाटला. अजून थोडे पुढे गेल्यावर गोविंदघाटला जाणारा रस्ता दिसला. मागच्या ट्रेकच्या आठवणींनी अगदी नॉस्टॅल्जिक झाले. गोविंदघाटहून घांगरियाला जाणारी वाटही दिसत होती. त्या वाटेकडे पाहूनच समाधान मानले व पुढे निघालो. पांडुकेश्वर, हनुमान चट्टी ही गावे मागे टाकत चाललो होतो. इथेही लॅंडस्लाईड्समुळे रस्त्याची खूपच वाट लागलेली दिसत होती. वरून येणारे पाणी मातीच्या ढिगार्‍यांना दरीत ढकलून देत होते. बद्रीनाथला पोचेस्तोवर एकदम पावसाळी वाटायला लागले.

बद्रीनाथलाही तुंगनाथ इतके नाही, पण छान गारेगार वाटत होते. मागच्या वेळेस ‘आचार्य सदन’ मध्ये राहिलो होतो, म्हणून याहीवेळेस इतरत्र शोधाशोध न करता तिथेच गेलो. ह्या हॉटेलचे मालक श्री. उपाध्ये खूप वर्षांपूर्वी इथे आले आणि कायमचे इथेच स्थायिक झाले. हॉटेलमधे एक गृहस्थ होते ते कदाचित उपाध्यांपैकीच असावेत. विदर्भाकडचे होते. इथे सीझन नसताना ते देवप्रयागला जातात. तिथेही त्यांचे हॉटेल आहे. आमचा पटापट आंघोळी करून दर्शनाला देवळात जायचा प्लॅन होता. पण मालकांनी गरम पाणी मिळणार नाही असे आधी सांगितले. मग रिक्वेस्ट केल्यावर,"देतो पण वेळ लागेल," असे सांगितले. ते पाणी आणेपर्यंत इतका वेळ गेला की आज दर्शन घडणार नाही हे कळून चुकले. आमच्यापैकी ज्या दोन-तीन जणांच्या आंघोळी आटोपल्या त्यांना दर्शन घेता आले. आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले. आम्ही गेलो त्यावेळेस खरेतर फार गर्दी नव्हती. इतर सदस्यांनी सटरफटर खरेदीसाठी दुकाने धुंडाळायला सुरुवात केली, तर आम्ही ‘साकेत’मधे बसून ते येण्याची वाट बघत बसलो. हे एक हॉटेल मला इथे मिळणार्‍या व्हरायटी जेवणामुळे खूप आवडते. ओनियन उत्तप्पम व गरम-गरम झणझणीत रस्सम प्यायल्यावर मस्त वाटले एकदम!

सकाळी उठणार तेवढ्यात कोणीतरी दरवाजा ठोठावला व पटकन कॅमेरा घेऊन बाहेर यायला सांगितले. बाहेर आलो पण हॉटेलच्या पॅसेजमधून काहीच दिसत नव्हते. तसेच रस्त्यावर पळाले तर समोरच नीळकंठ शिखर सोन्यासारखे चमकत होते. मनसोक्त फोटो काढले. मागच्या वेळची भरपाईही करून टाकली. चहा ढोसून पटापट आवरले व देवळाकडे निघालो. काल संध्याकाळपेक्षा जास्त गर्दी होती पण इलाज नव्हता.

नीळकंठ शिखर
DSC_5250.JPG

‘बद्रीनाथ’ हे अलकनंदेच्या काठी वसलेले भगवान विष्णूंचे धाम. चारधाम तसेच उत्तराखंडमधील छोटे चारधाममधील एक धाम. गाभार्‍यात भगवान विष्णूंची काळ्या शाळिग्रामातील मूर्ती आहे. इथे येण्यासाठी योग्य काळ म्हणजे एप्रिल ते नोव्हेंबर. थंडी सुरू झाली की मूर्तीची प्रतिमा ‘जोशीमठ’ येथे आणून तिची पूजा केली जाते. मुख्य मंदिराच्या खालीच ‘तप्तकुंड’ म्हणजे गंधकाचे झरे आहेत. बरेच भाविक यात आंघोळ करतात. देवळात गर्दी होतीच पण मग त्यामानाने दर्शन पटकन झाले. मंदिराच्या अगदी खालीच तप्तकुंड व अलकनंदेच्या काठावर लोकांनी कचरा टाकलेला दिसत होता. एका बाजूला इतके पवित्र मंदिर, बाजूने अलकनंदा वाहतेय व तो कचरा हे दृश्य नजरेला अगदी विसंगत वाटत होते.

बद्रीनाथ मंदिर
DSC_5258.JPG

मंदिराच्या शेजारून वाहणारी अलकनंदा
DSC_5267.JPG

दर्शन घेऊन आल्यावर परत पोटपूजेसाठी साकेतमधे गेलो. बर्‍याच दिवसांनी इडल्यांवर यथेच्छ ताव मारल्यावर तिबेटियन मार्केटमधे खरेदीला गेलो. सगळ्यांनी तिबेटियन शालींची खरेदी केल्यावर आचार्य सदनमधे परतलो व लगेच सॅक भरून ‘माणा/माना’ गावाकडे रवाना झालो.

‘माना/माणा’ हे भारत-तिबेट सीमेवरील भारतातले शेवटचे गाव. इथून फक्त चोवीस किलोमीटर्सवर भारत-तिबेटची बॉर्डर आहे. या गावात ‘भोतिया’ या भारत-मंगोलियन वंशाचे लोक राहातात. वसुधारा फॉलला जाण्यासाठी इथूनच रस्ता आहे. तसेच व्यास-गुहा, भीमपूल बघायला पर्यटक इथे मोठ्या संख्येने येतात. या बाबतही पौराणिक दंतकथा ऐकायला मिळते ती अशी. पांडव, द्रौपदी व त्यांच्या एका कुत्र्यासह ‘स्वर्गरोहिणी’ शिखरावरून स्वर्गात गेले. असे मानतात की स्वर्गरोहिणी हा देहासकट स्वर्गात जाण्याचा एकमेव मार्ग आहे. तर स्वर्गात जात असताना मधे आलेला पाण्याचा प्रवाह पाहून द्रौपदी खूप घाबरली. तो पाण्याचा प्रवाह तिला ओलांडता यावा म्हणून भीमाने एका दगडाचाच पूल बनवला, त्यालाच ‘भीमपूल’ म्हणतात. भीमपुलापर्यंत जाऊन आलो, वाटेत एका दगडाच्या खोबणीत एक साधू बसला होता. तोतया होता की खरा ते काही कळले नाही कारण तोंडाने मंत्रोच्चार चालले होते, पण तिथे लक्ष अजिबातच नव्हते. एक मित्र म्हणाला की तो गायत्री मंत्रही पूर्ण म्हणत नव्हता.

माना गावातून दिसणारे हिमालयाचं लँडस्केप
DSC_5278.JPG

DSC_5289.JPG

हाच भीमपूल
DSC_5300.JPG

यावेळेस ट्रेक कमी आणि ट्रीपच जास्त झाल्यासारखे वाटत होते. सततच्या प्रवासाने कंटाळाही आला होता. आजपर्यंत दैवाने साथ दिली आहे त्यामुळे कधीच लॅंडस्लाईड्समुळे किंवा इतर काही कारणांमुळे अडकावे लागले नाहीये हेच नशीब. बद्रीनाथ ते हरिद्वार हे अंतर जवळपास सव्वातीनशे किलोमीटर आहे. आम्हाला व सारथ्यालाही ते कंटाळवाणे झाले असते म्हणून अर्ध्या अंतरावर म्हणजे रुद्रप्रयागला मुक्काम करून उद्या उरलेला प्रवास करायचा असे ठरवले होते. आधी न आलेल्यांना रुद्रप्रयागचा अप्रतिम संगमही बघता आला असता हाही एक हेतू होताच. अधेमधे पाचदहा मिनिटे थांबून प्रवास सुरू होता. दुपारचे जेवण परत पिपलकोटीलाच करायचे हे ठरले होते. त्याप्रमाणे तीनच्या सुमारास पिपलकोटीला पोचलो. जेवण झाल्यावर तिथले ताक पिऊन तृप्त झालो व रुद्रप्रयागच्या दिशेने निघालो. रुद्रप्रयागच्या वाटेवर आज ‘कर्णप्रयाग’चा संगमही बघता आला. पण तिथे न थांबता पुढे निघालो. मधे ‘विराजकुन्ज’ नावाच्या गावात फक्त चहासाठी थांबलो. रुद्रप्रयागला पोचेस्तोवर अंधार झाला होता व तिथले लाईट्सही गेलेले दिसत होते. मागे राहिलो होतो व अंधारात शोधाशोध करायला नको या हेतूने गढवाल निगमच्या रेस्ट हाऊसकडेच मोर्चा वळवला. आमच्यातले तीनचार जण चौकशीला म्हणून उतरले. परत आले ते उतरलेले तोंड घेऊनच. रुद्रप्रयागच्या रेस्ट-हाऊसचे रेट म्हणजे अगदी शहरातल्या हॉटेल-रुमच्या तोंडात मारतील असे होते. काय तोंडाला येईल ते रेट सांगताहेत याबद्दल आमची खात्रीच पटली. त्यामुळे इथे नक्कीच राहायचे नाही, पुढे दुसरे एखादे हॉटेल बघू असे ठरवून आम्ही निघालोच. पुढे गेल्यावर एक हॉटेल दिसलेच. रूम्स वगैरे एकदम ऐसपैस, स्वच्छ होत्या व हॉटेलही नवीनच होते. मग जास्त विचार न करता सामान उतरवले. जेवणाची सोय तिथेच होणार होती त्यामुळे तोही प्रश्न नव्हता.

सकाळी नेहमीपेक्षा आरामात उठलो. आन्हिके उरकली व नऊ-साडेनऊच्या सुमारास निघालो. संगमावर जायचे होते तर सारथी म्हणाला इथून उलट जायला खूप कटकटीचे आहे कारण सकाळी बसचे ट्रॅफीक खूप असते गावात. नाईलाजाने प्लॅन रद्द केला व श्रीनगरच्या दिशेने निघालो. श्रीनगरमधे एका बर्‍या हॉटेलमधे नाश्ता केला व पुढे निघालो. आज आम्ही आधी ऋषीकेशला लक्ष्मणझुला बघणार होतो व मगच पुढे हरिद्वारला जाणार होतो. खाली आल्यावर परत उकाडा सुरू झाला. वर होतो (तुंगनाथ-बद्रीनाथ) तेच बरे होते असे वाटायला लागण्याइतपत उकडत होते. मधे देवप्रयागचा संगम दुरूनच बघितला. देवप्रयाग सोडल्यावर मधेच एका लॅंडस्लाईडच्या ठिकाणी एक दगड आमच्या गाडीवर येऊन आदळला. गाडीच्या पुढच्या चाकाचे किरकोळ नुकसान व थोडी माती आत आली या व्यतिरिक्त गंभीर काही झाले नाही हेच नशीब. पुढे गेल्यावर गाडी थांबवून तो लॅंडस्लाईड बघितला. कायच्या काय मोठ्ठा होता, त्या घसार्‍यात दोन गाड्या गेलेल्याही दिसत होत्या. ऋषीकेशला पोचेस्तोवर तीन वाजत आले होते. पार्किंग एरियात गाडी ठेवून आम्ही जेवण करण्यासाठी व लक्ष्मणझुला बघण्यासाठी निघालो. जवळपासच एक रेस्टॉरंट दिसले; लेबनीज फूड, इटालिअन फूड असे प्रकार मिळणारे. जास्त शोधाशोध न करता तिथेच शिरलो. अप्रतिम जेवण होते तिथले. लक्ष्मणझुल्यावर माकडेच माकडे होती. लोकही त्यांना खायला देत होते त्यामुळे त्यांनी तिथेच बस्तान बसवले असावे. लक्ष्मणझुल्याबद्दलही आंतरजालावर पौराणिक संदर्भ मिळालेच. झुला ओलांडून आम्ही गंगेत एक बोटराईड घ्यावी या उद्देशाने मार्केटमधे शिरलो. बोटराईड काही खास नव्हती खरेतर, पण म्हटले जाऊ देत, तेवढाच एक अनुभव घ्यावा!

लक्ष्मणझुला
DSC_5339.JPG

राईडनंतर काही मंडळींनी तिथे शॉपिंग केले व आम्ही गाडीकडे परतलो. हरिद्वारमधे परत हॉटेल शोधाशोध करायची होती. शक्यतो स्टेशनच्या आसपासचे हॉटेल बघणार होतो, म्हणजे सकाळी गाडी पकडायला त्रास झाला नसता. त्याप्रमाणे हरिद्वारला स्टेशनजवळच एक छान हॉटेल मिळाले. आमच्या लोकांना आरतीसाठी घाटावर जायची घाई झाली होती व आज आरतीसाठी जाण्यासाठी घाईगडबडीने आवरून जायची आमची इच्छा नव्हती. पण शेवटी मेजॉरिटी विन्स या तत्वावर आम्हाला जबरदस्ती जावेच लागले. आरती बघायला मिळाली नाहीच उगाच तंगडतोड मात्र करावी लागली.

काही काही ठिकाणे आपल्याला उगाचच पहिल्या नजरेत आवडून जातात. विचार केला तर कळते की त्यात आवडण्यासारखे खरेच काही नाहीये पण नाही, मन काही ते पटवून घेत नाही. हरिद्वारच्या बाबतीत माझे नेहमीच असे होते. इतके धार्मिक महत्त्व आहे या ठिकाणाला पण स्वच्छता शून्य! घाटाकडे जाणार्‍या बकाल गल्ल्या, ती नानाविध वस्तू विकणारी अनेक दुकाने, मिठाई व रेस्टॉरन्ट्स. घाटही मोठा स्वच्छ आहे असे नाही. पण पवित्र आहे म्हणून बोलायचे नाही इतकेच. असो. तर घाटाची फुकटची चक्कर झाली. उद्या चंडीदेवी व मनसादेवीला उडन खटोला अर्थात रोप-वेने जायचा प्लॅन केला होता आम्ही.

सकाळी नेहमीपेक्षा वेगळा ब्रेकफास्ट करून चंडीदेवीला जाण्यासाठी तयार झालो. चंडीदेवीला जाण्याच्या रोप-वेच्या प्रवेशद्वारापाशी सिक्युरीटी चेक सुरू होते. प्लॅस्टीकला परवानगी नाही म्हणे वर. मैत्रिणीच्या हातात एक प्लॅस्टीक बॅग होती, खरेदी केली तर असावी म्हणून. रिकामीच होती पण ती न्यायलाही परवानगी देईनात. शेवटी तिने ती तिथेच ठेवली व आम्ही रोप-वेत बसलो. हरिद्वारच्या कोलाहलापासून दूर गेल्यावर शांत शांत वाटले आणि असे वाटले की हा रोप-वे थोडया वेळासाठी इथेच बंद पडावा. चंडीदेवीचे हे मंदिर टेकडीवर आहे. एका बाजूला चंडीदेवी तर दुसर्‍या बाजूला अंजनीदेवीचे मंदिर होते. चंडीदेवीच्या मंदिरात दर्शन घेऊन बाजूला सरकलो आणि बघितले, तर देवीकडे मागणे पूर्ण व्हावे यासाठी बर्‍याच ठिकाणी दोरे, घंटा वगैरे बांधल्या जातात तसे इथे सगळीकडे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे तुकडे बांधलेले होते. अगदी कुठेही जागा मोकळी नव्हती. ते बघून अशी तिडीक गेली ना डोक्यात! तिथे मंदिराचे लोक होते, त्यांच्यापाशी जाऊन बरीच बडबडही केली आम्ही पण काही उपयोग होणार नाही हे दिसतच होते त्यांच्या बोलण्यावरून. अंजनीदेवीचे दर्शन घेतले व मनसादेवीला जाण्यासाठी खाली आलो. मनसादेवीला जाण्यासाठीही रोप-वे हा मार्ग आहे. मनसादेवी म्हणजे मनातल्या इच्छा पूर्ण करणारी. तिचे दर्शन घेतले. येताना रोप-वेसाठी खूपच प्रतीक्षा करावी लागली. परतायला बर्‍यापैकी उशीर झाला होता. मग सरळ हॉटेलवर परतताना जेवूनच परतलो. संध्याकाळी परत कालच्या राहिलेल्या आरतीसाठी घाटावर जायचे होते. आज मुहूर्त चुकवायचा नव्हता. दुपारी थोडावेळ पडलो व संध्याकाळी घाटावर जायला निघालो. आरती साडेसहाला सुरू होते असे कळले होते, त्यामुळे सहा वाजताच निघालो. रोज संध्याकाळी हरि-की-पौडीला घाटावर गंगेच्या आरतीसाठी लोकांची तोबा गर्दी होते. आरतीनंतर लोक पूर्वजांना किंवा निधन झालेल्या जवळच्या व्यक्तींना आदरांजली म्हणून पानात फुले घालून गंगेत दिवे सोडतात.

नशिबाने दोघा मित्रांनी आधीच पोचून घाटावर पहिल्या पायरीवर जागा पकडली होती. घाटावरचा आरतीचा नजारा खरेच बघण्यासारखा होता. मला तर गंगेचे ते गाणेही खूप आवडले.

गंगेचा घाट अर्थात हरि की पौडी
DSC_5352.JPG

ट्रेक संपल्यातच जमा होता. गंगेच्या आरतीचे ते देखणे रूप डोळ्यांत साठवून निघालो. वाटेत जणू आम्हाला निरोप द्यायला एक फलक होता "शिवालिक : आपके पुन: आगमन की प्रतीक्षा में|" हेच आमंत्रण समजून पुढच्या वर्षी कुठे जावे ह्याचे प्लॅन्स करत करत हरिद्वारचा निरोप घेऊन ट्रेकची सांगता केली.

- आऊटडोअर्स