बाप-लेकीचे नाते

बाप-लेकीचे नाते....

baplek_new.jpg

बाप-लेकीचे नाते
जसे तरूखाली तृण
नित स्मरणी धरावे
गर्द सावलीचे ऋण

बाप-लेकीचे नाते
कधी बोबड्या बोलांचे
शब्दाविना जे साधते
हितगुज जिव्हाळ्याचे

बाप-लेकीचे नाते
त्याला धाक नजरेचा
तरूणाईस भावतो
एक आडोसा आईचा

बाप-लेकीचे नाते
पाठवणी ढगाळते
ऊन उसने डोळ्यात
काळजात बरसते

बाप-लेकीचे नाते
रेंगाळते वार्‍यावरी
सोनसळी पावलांची
धाव आजोबांच्या घरी

बाप-लेकीचे नाते
होई नातीला फितूर
घाली नजरेस भूल
खोडी लबाड चतुर

बाप-लेकीचे नाते
मित्र होऊया म्हणते
अंकुरते नवे नाते
शब्द शब्द गीत होते

बाप-लेकीचे नाते
असा देवदत्त वसा
सदा रहावा गंधित
दृढ मायेचा वारसा

- रूपाली परांजपे