दिलखुलास! (उत्तरार्ध)

---या सगळ्यातून छंदांसाठी वेळ द्यायला जमतं का?
अरे अ‍ॅवॉर्ड घेऊन आल्यापासून माझे बरेच दिवस हे मुलाखती देण्यातच चालले आहेत. नवनवीन पत्रकारांशी, सूत्रसंचालकांशी, वाहिन्यांशी मी संवाद साधते आहे. नव्या ओळखी होताहेत, मैत्री होतेय. हे सगळं मी आत्ता खूप छान एन्जॉय करते आहे.

---तुला कवितांची आवड आहे? फेसबूकवर तू आर्टस् आणि एंटरटेन्मेंटमध्ये संदीप खरेचं पेज टाकलं आहेस . . .
हां, मला लिहिण्याची आवड नाही, पण ऐकायला आवडतं. मी लहानपणी एक दोन अशाच गंमतीशीर कविता केल्या होत्या. वडील कवी होते पण मी कविता नाही लिहिल्या ­कधी. संदीप खरेच्या कविता मला खूप आवडतात कारण की त्या गप्पा मारल्यासारख्या असतात. आपल्याला सहज कळून जातात. आपल्याशी खूप निगडीत, अगदी रोजच्या दिवसात घडलेल्या प्रसंगावर लिहिल्यासारख्या वाटतात.

---आत्ता तू किशोर कदमचा उल्लेख केलास, तोही स्वतः एक उत्तम कवी आहे . . .
स्ट्रगलिंग पिरिअडमधे किशोर कदम हा माझा खूप जवळचा मित्र होता. मृणाल देशपांडे, जी तेव्हा माझी रूम पार्टनर होती, ती किशोरबरोबर 'गांधी' नाटक करायची. तिच्यामुळे माझी किशोरशी ओळख झाली. त्या काळामधे असे खूप दिवस असायचे की किशोर, मी, मृणाल नरिमन पॉईन्टवर बसायचो, किंवा "पाऊस आलाय म्हणून भेटूयात आपण दादरला" अशी फोनाफोनी व्हायची आणि आम्ही भेटायचो. कटींग प्यायचो, पावसामध्ये ओलेचिंब व्हायचो, आणि किशोरच्या कविता ऐकायचो. भिजलेले आम्ही, हातात गरमागरम चहा आणि वरळी सीफेसवर किशोर त्याच्या कविता ऐकवतोय . . .

---व्व्व्वाह . . . पावसात साक्षात सौमित्रच्या तोंडून त्याच्या कविता, तेही वरळी सीफेसवर . . . अजून काय हवं!!!
अरे नचिकेत, अजूनही माझा दर पावसाळ्यात त्याला एक फोन असतो. आता भेटीगाठी होत नाहीत रे . . . गेल्या सहासात वर्षातले पावसाळे विनाकिशोरच गेले. अर्थात, अजूनही 'गारवा' ऐकल्याशिवाय माझा पावसाळा जात नाही. पण आज तोही बिझी आहे, मीही बिझी आहे. पण 'गारवा' ऐकताना त्याचा आवाज ऐकून फोन होतो, आणि तेवढ्याच आनंदाने आणि आत्मीयतेने तो बोलतो. कवितेच्या अशा आठवणी आहेत.

---त्या स्ट्रगलिंगच्या दिवसातल्या काही गोष्टी आपण खूप मिस करतोय असं आता वाटत असेल ना . . .
तो जो काळ होता तो फक्त कामासाठीच होता . . . धडपड, प्रवास, उपाशीपण . . . सगळं जे काही होतं ते कामासाठी होतं. खूप आनंद, समाधान देणारे ते दिवस होते. मी जेव्हा नाटकाचा प्रयोग करून घरी यायचे, 'पृथ्वी'चं, 'एनसीपीए'चं ते वातावरण, तिथे मिळालेल्या प्रतिक्रिया आणि कौतुक हे सगळं खूप काही देऊन जायचं. खूप मजा वाटायची, माझ्यातल्या कलाकाराला खूप समाधान मिळायचं. आताही मी आई आहे, बायको आहे याचं समाधान आहेच, पण तेव्हाची मजा वेगळीच होती!

---तुझा एखादा ड्रीमरोल आहे का, जो तुला करायला आवडेल?
एखादा असं नाही . . . असे अनेsssक आहेत रे! 'अर्थ'मधला स्मिता पाटीलचा रोल, रेखाचा 'इजाजत'मधला रोल, वैजयंती मालाने केलेले अनेक डान्स ओरीएन्टेड रोल, मधुबालाने केलेले रोल - म्हणजे अगदी जुन्या काळातले ब्लॅक अँड व्हाईट रोल, सगळंच करायला आवडेल मला. एक असं नाही.

थोडक्यात म्हणजे नुसत्या ग्लॅमरवर अवलंबून न राहता सर्व प्रकारचे रोल तुला करायचे आहेत . . .
अरे तुला माहितेय का, 'बाबू बँड बाजा' मला मिळाला तो माझ्या लूकमुळे, माझ्या साधारण दिसण्यामुळे! तेव्हा मला त्या सगळ्या गोष्टी आठवल्या ज्याचं मला दु:ख व्हायचं. 'मी ग्लॅमरस का नाहीये? मी गोरी का नाहीये? मी सुंदर का नाहीये वगैरे वगैरे'. पण आता मला हे समजतंय की मला काहीतरी वेगळं मिळणार होतं. कदाचित म्हणून मला एखादी अ‍ॅडफिल्म किंवा एखादी सिरीअल नाही मिळाली.

mitali01.jpgनचिकेत, ती हरणाची एक गोष्ट तुला आठवतेय का? एका हरणाला आपले कुरूप पाय आवडायचे नाहीत, पण जेव्हा तेच पाय वेगात धावून त्याला शिकार्‍यापासून वाचवतात, तेव्हा त्याला उमजतं 'अरे मला माझी शिंगं आवडायची, पण तीच मात्र मला जाळ्यामधे अडकवायची. आणि मला न आवडणार्‍या माझ्या पायांनी मात्र माझी संकटातून सुटका केली.' ओवीला मी नेहमी ही गोष्ट सांगत असते. रंग-रूपावर काहीही नसतं. मला माझ्या लूकचा, सर्वसाधारण दिसण्याचा, मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्याचा अभिमान वाटतो. आणि मी मातीशी खूप निगडीत आहे अरे . . . माझ्या घरच्यांनी मला तसं ठेवलं, मला तसं वाढवलं. आम्ही आजोळी गावाकडे जायचो, तेव्हा माझे वडील आम्हाला चप्पल काढायला लावायचे, आणि मातीच्या ढेकळांमधून चालायला लावायचे. तेव्हा कडक कडक ढेकळं टोचायची, बोचायची. मग ते आम्हाला झर्‍याच्या पाण्यामधे पाय बुडवून ठेवायला सांगायचे . उन्हाळ्यामधेसुद्धा ते वाहतं पाणी इतकं थंड असायचं की खूप बरं वाटायचं. नंतर मग ते आम्हाला चिखलातून चालायला लावायचे, असा क्रीम लावल्यासारखा इफेक्ट यायचा ना! भूमिका करताना या सगळ्या गोष्टी नकळत कॅरी झाल्या. 'बाबू बॅड बाजा'मध्ये मी एक बोहारीण असते, मग तिचं ते टोपली उचलणं, त्या कॅरॅक्टरची देहबोली . . . कशाचीच रीहर्सल करावी लागली नाही. ती टोपली सुद्धा मी हात न पकडता वागवली केली आहे पूर्ण चित्रपटभर . . . त्याचं श्रेय मी या सगळ्या जुन्या सवयींना देईन. आणि अर्थातच भरतनाट्यम शिकल्यामुळे मला बॅलन्स जमत होता.

---मातीतून चालण्याचां विषय तू आत्ता काढलास म्हणून सांगतो की मी आणि योगेश, आम्ही दोघेही ट्रेकर आहोत. आम्ही डोंगरदर्‍यांमध्ये गेलो की बरेच वेळा बूट काढून ओल्या गवतावरून, चिखलाने भरलेल्या मातीवरून चालत जातो. आपल्या मातीशी कुठेतरी आपलं नातं जोडलं जातंय ही भावना खूप मनाला स्पर्शून जाते . . .
खरंय! ते बोचणं, टोचणं सुद्धा खूप आनंद देणारं असतं. खरं सांगते, घामट होऊन जातो आपण, आणि रात्री आडवं झाल्यावरचा जो थकवा असतो ना तो खूप सुंदर असतो. आणि मला असं वाटतं, ह्या सगळ्या गोष्टी, मग अगदी निसर्गही जो माणूस अनुभवतो, एंजॉय करतो ना तो माणूस कलाकार असतो.

mitali01.jpg ---तुझे वडील हा तुझा खूप वीक पॉइंट आहे असं मला जाणवलंय. आमच्या वाचकांसाठी तुझ्या वडिलांशी असलेल्या तुझ्या या स्पेशल नात्याबद्दल सांगशील का?
काय म्हणता येईल . . . माझे वडील म्हणजे आपण पाठीचा कणा म्हणतो, तसा कणा होता माझ्यासाठी. मला हे अ‍ॅवॉर्ड डिक्लेअर झालं, तेव्हा ते अ‍ॅडमिट होते. पण ते खूप खूश होते, आनंदात होते. त्यांच्या चेहर्‍यावर अभिमान होता, डोळ्यामधे कौतुक होतं की ''जे स्वप्न आम्ही बघितलं होतं ते पूर्ण करून माझी मुलगी इथपर्यंत पोचली ".

आणि मग ते त्यानंतर कोमात गेले आणि अ‍ॅवॉर्ड डिक्लेअर झाल्यानंतर काही दिवसातच ते वारले. माझ्या आयुष्यामधे खूप पोकळी निर्माण झाली. पण जेव्हा मी विचार करते तेव्हा असं जाणवतं की जेव्हा तुम्हाला काही चांगलं मिळणार असेल तर त्यासाठी तुमचे हात मोकळे असावे लागतात. माझ्याकडे माझे बाबा ही एकच अनमोल गोष्ट होती; ती माझ्याकडून घेतली गेली आणि मला अ‍ॅवॉर्ड मिळालं. आयुष्यभर वडिलांनी काहीच साठवलं नाही. शेवटीसुद्धा ते वाईट आर्थिक परिस्थितीत होते, पण समाधानी होते. मी म्हणेन की खूप श्रीमंत बाप होता तो . . . पैसा ही श्रीमंती असू शकत नाही. अंत जेव्हा येतो तेव्हा समाधान ही श्रीमंती असते आणि ती त्यांच्याजवळ होती. मृत्यु इतका समाधानकारक असू शकतो, इतका आनंदी, उत्साही असू शकतो असं वाटलं नव्हतं मला . . . ते त्यांची त्यांच्या पदरातली सगळी पुण्याई मला देऊन गेले. असे वडील प्रत्येक मुलीला मिळावेत. पण मला असं वाटतं की ते गेले नाहीयेत. ते माझ्या अवतीभवती आहेत. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार माझ्या नावाच्या पुढे असणार आहे आणि मला असं वाटतं की जिथे 'सर्वोत्कृष्ट' म्हटलं जातं तिथे माझे वडीलच आहेत.

--- आपण ओघात बर्‍याच नात्यांवर गप्पा मारतोय. योगायोगाची गोष्ट म्हणजे यंदा मायबोली दिवाळी अंकामध्ये आपण 'थांग अथांग' हा नात्यांवर आधारित संकल्पनेचा एक विभाग ठेवला आहे. ओपन थीम आहे ही. आता बरेच ऑनलाईन मराठी दिवाळी अंक निघालेत, पण मराठी ऑनलाईन दिवाळी अंक प्रसिद्ध करणारी 'मायबोली' पहिली वेबसाईट आहे . . .
अरे वा! मायबोलीचं माझ्यातर्फे अभिनंदन! खरं सांगायचं तर मी याबाबतीत इतकी अशिक्षित किंवा अनपढ आहे की जेव्हा तू मला फोनवर ही संकल्पना सांगितलीस तेव्हाच मला याबद्दल कळलं. खूपच सुंदर आहे हे सगळं . . .

---पुन्हा नाटकात यायला आवडेल? तशा काही ऑफर्स आहेत?
हो! पण अरे मी नाटकातून बाहेर पडलेच नाहीये. नाटक तर असं माध्यम आहे की तुम्हाला लगेच प्रतिक्रिया मिळतात, पावती मिळते, त्यामुळे ते माध्यम मला खूप आवडतं. पण आता असं झालंय की काही जबाबदार्‍यांमुळे मी पूर्णवेळ नाटक करू शकत नाही. खरं सांगू, गेल्या चार वर्षांमधे मी थिएटरमधे जाऊन चित्रपटही बघितला नाहीये. ओवी थोडी मोठी झाल्यावर मी बर्‍यापैकी वेळ काढून या गोष्टी करू शकेन.

--तू पाहिलेल्यापैकी आवडता चित्रपट कुठला?
मला फॅमिली ओरीएन्टेड आणि रोमँटीक चित्रपट बघायला आवडतात. नातेसंबंधांवर आधारीत, मग ते नवरा-बायकोचं नातं असो किंवा मग फॅमिली बॅकग्राऊंड असलेलं . . . मला 'हम साथ साथ है' सारखे चित्रपटही आवडतात. तो चित्रपट बघत असताना मी ढसाढसा रडत असते. मी त्या सगळ्या सीन्सशी इतकी अ‍ॅटॅच्ड होते की ओवी कधी येऊन माझे डोळे पुसून जाते हेही मला कळत नाही.

---इतर भाषांतल्या चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल?
हो. मला साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करायचंय आणि कधीतरी मणिरत्नमबरोबर फिल्म करायची आहे. सो क्रॉस द फिंगर की मला एखादातरी साऊथचा चित्रपट मिळावा.

---लवकरात लवकर तुझी इच्छा पूर्ण होवो. मराठीतल्या कुठल्या दिग्दर्शकाबरोबर तुला काम करायला आवडेल?
मला गजेंद्रबरोबर पुन्हा काम करायला आवडेल. गजेंद्र अहिरे बर्‍यापैकी जरा वेगळे विषय हाताळतो. अभिनय करणार्‍यांना त्याच्याकडे खूप मोकळीक असते. तो कलाकाराला मोकाट सोडून देतो. मी त्याच्या बरोबर 'पाऊलवाट' मालिकाही केली होती. मला जब्बार पटेलांबरोबर - अश्या दिग्दर्शकांबरोबर ज्यांनी स्मिता पाटीलला रोल दिलाय - काम करायला आवडेल . . . मला संजय सूरकरांबरोबरही काम करायला आवडेल.

---संघर्षातून इतकं पुढे आल्यानंतर सध्या ज्यांचं स्ट्रगल सुरू आहे असे अनेकजण तुला दिसत असतील. त्यांच्यासाठी काही करायचा विचार केला आहेस का?
हो, त्यांच्यासाठी मी अजून काही केलं नाहीये, पण मला करायला नक्कीच आवडेल. पुरस्कार मिळाल्यानंतर मला औरंगाबादच्या ड्रामा डिपार्टमेंटमध्ये बोलावलं गेलं होतं. मी औरंगाबादची आहे आणि त्यांच्यासारखी आहे याबद्दल त्यांना खूप कौतुक होतं. तिथल्या विद्यार्थ्यांबरोबर मी माझे अनुभव शेअर केले. मला वाटतंय त्यांना त्याच्यातून बरंच काही कळलं असेल. आणि यानंतरही कुणी माझी मदत मागितली तर मला आनंदाने करायला आवडेल.

---मुंबईत राहणार्‍या आणि मुंबईबाहेरून येणार्‍या आणि या क्षेत्रात काम करणार्‍यांच्या अनुभवामधे, स्ट्रगलिंगमधे काही फरक पडतो का?
हो पडतो. पण त्याची दुसरीही बाजू आहे. बाहेरून येणार्‍यांसाठी राहणं, खाणं, पैसा या सगळ्या गोष्टी वाढतात. इथलं कल्चर वेगळं आहे. या कल्चरशी जुळवून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. या बेसिक गोष्टी आहेत. मला वाटतं स्ट्रगल हे एखाद्या कलाकाराशी आयुष्यभर अ‍ॅटॅच्ड असतं. म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार मिळायच्या आधीचं स्ट्रगल असो वा मिळाल्यानंतरचं स्ट्रगल असो. आता मला चांगली कामं मिळावीत यासाठी माझं स्ट्रगल असणार आहे. आता माझा जो बहुमान केला गेला आहे तो राखण्यासाठी माझं स्ट्रगल असणार आहे. एवढंच आहे की तुम्ही बाहेरून आल्यानंतर बेसिक गोष्टींसाठी तुम्हाला जास्त झगडावं लागतं. पण स्वतःला सिद्ध करताना दोन्ही व्यक्तींना समांतरच सिद्ध करावं लागतं. तुमच्यामध्ये कला असलीच पाहिजे. तुमच्यातल्या गुणवत्तेला जर तुम्ही पॉलिश केलंत, व्यवस्थित मार्गाने तुम्ही तिला घेऊन गेलात तर नक्कीच यश तुमचं आहे.

---चित्रपटसृष्टीत किंवा एकंदरीत ग्लॅमरस वर्ल्डमधे स्त्रियांना आलेले अनुभव बघता स्त्रियांसाठी हे फिल्ड त्यामानाने चांगलं नाही असं म्हटलं जातं. पण मला इथे एक थोडासा वेगळा प्रश्न विचारायला आवडेल की या सगळ्याला छेद देऊन तुला जे चांगले अनुभव या क्षेत्रात आले त्याबद्दल थोडंसं सांग.
आता बर्‍यापैकी असं झालंय की टॅलेन्टपेक्षा ग्लॅमर हवंय आपल्याला. आणि नुसतं ग्लॅमर हवंय पण त्यासाठी झगडण्याचीही तयारी नाहीये. सगळं ताबडतोब हवंय अशी धारणा असलेले अनेक जण येऊ लागलेत. त्यामुळे मग अशा तडजोडी होतात. पण शेवटी ते सगळं करणं, न करणं हे व्यक्ती-व्यक्तीवर अवलंबून आहे. या फिल्डमधल्या स्त्रियांना समाजामध्ये खूप आदरसुद्धा आहे. त्या खूप आदर्श मानल्या जातात. मी जेव्हा घरातून बाहेर पडते, तेव्हा आजूबाजूला मला अशा व्यक्ती भेटतात, ज्यांच्या नजरेमधे मला अभिमान दिसतो. तात्पर्य काय, तर तुम्ही कुठला मार्ग अवलंबता, कशाप्रकारे पुढे जाता, कुठल्या प्रकारचं काम करता, माणसांशी कशा प्रकारे वागता, तुमची वर्तणूक कशी आहे यावर सगळं अवलंबून आहे.

--- . . . मग भले यश मिळायला वेळ लागला तरी चालेल . . .
नक्कीच . . . पण नचिकेत, शेवटी यश तुम्ही कशामधे मानता हेही तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा मी हा चित्रपट केला तेव्हा कुठेही माझ्या डोक्यामधे हे नव्हतं की मला अ‍ॅवॉर्ड मिळवायचंय. मला खूप दिवसांनी चित्रपट मिळतोय, मला काम करणं शक्य आहे आणि मी जे काम करायला औरंगाबादहून मुंबईला आलेय ते मला मिळतंय. म्हणून मी खूप प्रामाणिकपणे काम केलं. मी प्रामाणिकपणे काम करणं हे माझं, माझ्या आतल्या कलाकाराचं यश होतं आणि ते या मार्गाने मला मिळालं. शेवटी जेव्हा आपण समाधानी आहोत ते यश आहे की आपण सारखे टीव्हीवर दिसत राहतो आणि दहा लोकांना सह्या देतो ते यश आहे हे प्रत्येकाने ठरवायला हवं!

---खरंय. आत्तापर्यंतच्या दहाबारा वर्षांच्या प्रवासामधे अशी एखादी व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती, ज्यांनी तुला आधार दिला, मदत केली, त्यांच्यापैकी कुणाकुणाचा उल्लेख तुला करावासा वाटतो?

खूप मोठी लिस्ट आहे! ती अगदी मला जन्म दिलेल्या आईवडिलांपासून सुरू होते. त्यांनी मला एक मुलगा किंवा मुलगी म्हणून न वाढवता एक व्यक्ती म्हणून माझा विकास केला, मला घडवलं. रात्री मी अकरा-साडेअकरा वाजता नाटकाची तालीम करून घरी यायचे. पण माझ्या आईवडीलांनी कधीही मला विचारलं नाही, की ''किती वाजलेत ते पाहिलंस का?'' म्हणजे या गोष्टी खूप सर्वसाधारण वाटतील कदाचित, पण ह्याच्यामागे माझ्या सर्व कुटुंबाचा माझ्यावर खूप विश्वास होता. तो मला सांभाळायचा होता.

withpresident.jpg मला नृत्य शिकवणार्‍या मीरा पाऊसकर, मग मुंबईत आल्यानंतर स्ट्रगलिंगच्या काळात माझे सगळे मित्रमैत्रिणी, मृणाल देशपांडे जी माझी रूम पार्टनर होती, मला मार्गदर्शन करणारे आणि खूप आर्थिक पाठबळ देणारे असे लेखक असलेले आमच्या 'अश्वत्थ'चे प्रमुख अनिल देशमुख, दादरला ज्यांच्याकडे मी पेईंग गेस्ट म्हणून रहिले, जिने मला तिच्या नणंदेसारखं घरामधे स्थान दिलं, मला रात्री-अपरात्रीही जेवायला वाढलं ती- मानसी कुलकर्णी, माझा नवरा, सासरची मंडळी, ज्यांनी मला पहिल्यांदा चित्रपटामधे संधी दिली त्या कांचन नायक, ज्यांनी मालिकेसाठी मला पहिल्यांदा लीडमधे घेतलं ते हेमंत देवधर, आमचे दिग्दर्शक राजेश पिंजानी, आमचे प्रोड्युसर, सगळे ज्युरी हे सगळे त्या लिस्टमध्ये आहेत! मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार याआधी कुणालाही मिळाला नाहीये. पण मराठीत अनेक गुणी श्रेष्ठ अभिनेत्री पूर्वीपासून आहेतच. मला वाटतं की हे अ‍ॅवॉर्ड त्या सर्वांपासून आत्तापर्यंतच्या सगळ्या नवनवीन अभिनेत्रींचंही आहे. मी फक्त त्या सर्व गुणवान मराठी अभिनेत्रींचं प्रतिनिधित्व करत आहे. आणि अर्थातच ज्यांनी मला लक्षात ठेवलं, त्या सगळ्या प्रेक्षकांना या प्रवासात खूप मोठं स्थान आहे. अजूनही मी भेटले तर राष्ट्रीय पुरस्कारापेक्षा त्यांना आठवतं की 'वादळवाट'मधे तुझं काम छान होतं. आणि ज्याने मला ह्या गोष्टीसाठी निवडलं त्या देवाचेही आभार!

---जगभर पसरलेल्या मायबोलीकरांसाठी तू काय सांगशील?
मायबोलीच्या सगळ्या रसिक वाचकांना माझ्याकडून दिवाळीनिमित्त हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी तुमच्यासाठी सुख-समृद्धी घेऊन येवो. माझ्यासाठी ही दिवाळी खूप स्पेशल आहे. अनायासे आपण दिवाळीनिमित्त भेटतच आहोत त्यामुळे काही गोष्टी शेअर कराव्याशा वाटतात, बोलाव्याशा वाटतात. स्पेशली त्या सगळ्या कलावंतांसाठी, स्ट्रगलर्ससाठी, जे माझ्यासारखे आहेत. त्यांना सांगावंस वाटतं की सकारात्मक विचार ठेवून तुम्ही कार्य करत रहा, स्ट्रगल करत रहा. आपल्या कामाशी प्रामाणिक रहा. यश तुमच्याजवळ आपण होऊन चालत येईल. आणि त्यानिमित्ताने हेही सांगावंसं वाटतं की ज्या लोकांच्या पाठिंब्यामुळे आपण पुढे जातो, आपल्यामधे एक प्रकारची शक्ती निर्माण होते, आपण कार्य करत राहतो, त्या नात्यांना, कितीही यश मिळालं तरी विसरू नका. त्यांचा आशीर्वाद, त्यांची साथ, हे सर्व नेहमी आपल्याबरोबर ठेवा एवढंच सांगणं. ऑल द बेस्ट अ‍ॅन्ड लव्ह यू ऑल!!!

mitali_autograph.png

***********
मुलाखतकार - नचिकेत जोशी (आनंदयात्री)
फोटो - योगेश जगताप (जिप्सी)
तांत्रिक साहाय्य - सुनिल सामंत